Tuesday, December 25, 2007

बोंबील आख्यान !

पुणेरी विनंती:
’मासे तुमचं अन्न असेल’ किंवा ’मासे खाण्याविषयी वाचायला हरकत नसेल’ तरच कृपया हे वाचावे.
-- आज्ञेवरून !!!
---------------------------------------------------------------------
झर्र…झर्र…झर्र…झर्र…

ऑफीसमधे काम करताना खिशातला मोबाईल फोन थरथर करून थांबला. मनात म्हणलं समस (SMS) दिसतोय. फोन पाहिला तर दीपाचा समस होता “I got bombeel” ! कामाच्या गडबडीत त्या वाक्याचा अर्थ समजायला १-२ मिनिटे लागली. मग एकदम हजार tube lights पेटल्यासारखा डोक्यात प्रकाश पडला. सगळ्या लिंक्स लागल्या. ठरल्याप्रमाणे साधारण ह्या वेळी आज दीपा चायनीज स्टोअरमधे मासे आणायला जाणार होती नाही का ! आता समस आलाय की अचानक आज तिला ओले बोंबील मिळालेत !!! I wish आत्ता मी न्यू यॉर्कमधे नसतो ! I wish ५ मिनिटांत घरी पोचता आलं असतं !! I hope संध्याकाळ लवकर होईल !!! पाहिलंत, नुसतं ‘बोंबील‘ म्हणल्यावर मनात किती विचार डोकावले !

संध्याकाळी घरी पोचलो तर दीपा म्हणाली तुझ्या चेहऱ्यावर “बोंबील” असं लिहिलेलं दिसतंय ! छ्या, बायकोचं आपलं कायच्या काहीच म्हणणं असतं! असं चेहऱ्यावर “बोंबील” लिहिलेलं असतं का कधी? आणि जर लिहिलेलं वगैरे असलंच तर, “कधी जेवायचं” असं असेल की नाही?

अचानक बोंबील मिळाले पण प्रयोग म्हणून दीपाने फक्त थोडेच घेतले होते. (चांगले निघाले नसते तर पैसे शब्दश: पाण्यात गेले असते !) आता एक प्रॉब्लेम असा होता की चायनीज दुकानातून आल्यामुळे बोंबील आख्खे होते. ते साफ कसे करायचे? (आपल्या वाट्याला फक्त सुख यावं म्हणून अनावश्यक भाग आणि काटे आई परस्पर काढून टाकते ना त्यातलीच ही एक गोष्ट…छोटी पण महत्वाची !) मग काय, आम्ही दोघंही घड्याळावर नजर ठेवून होतो. भारतात सकाळचे सहा वाजले ना वाजले तेवढ्यात लगेच आईला फोन केला. बोंबील मिळालेत ह्याचा आनंद आमच्यापेक्षा तिलाच जास्त झाला ! आईकडून नीट समजावून घेतले आणि लगेच मासे साफ करायला सरसावलो !! आईचं एक आवडतं वाक्य आहे, “डोळे भितात..हात करतात” ! बघता बघता बोंबील साफ करून झालेही !

मला तरी असं वाटतं की बोंबील हा एक मासा असा आहे जो वाटीपेक्षा ताटात यावा ! मंद आचेवर तळलेले बोंबील समोर आले की भले भले जीभ सैल सोडतात !! “पुराव्यानिशी शाबीत करीन”, पुलंचे हरितात्या म्हणायचे तसं ! दीपा बोंबील तळताना गालात हसत होती असं मला अजूनही वाटतंय ! किचनच्या कट्ट्यावर बसलेला आदित्यही confused होता की बाबा आज इतका खूश का दिसतोय?

(बहुतेक माझ्या येरझाऱ्या पाहून) दीपा म्हणाली जरा चाखून तर बघ ना ! “कशाला उगीच !”, “जेवतानाच घेतो गं”, “आता तू म्हणतेयस तर..” वगैरे वाक्य निरर्थकपणे म्हणल्यासारखं केलं आणि हळूच एक तुकडी उचलली !! अहाहा…जीभेवर ठेवली आणि अलगद विरघळली !!! जेवायला बसल्यावर मात्र बोलत बसायला, गप्पा करायला वगैरे वेळ नव्हता हां ! गरम गरम चपाती, त्यावर पातळ धारेचं तूप आणि ताजे फडफडीत ओले बोंबील !! किंवा मग गरम आणि छान मऊ-मऊ असा पांढरा भात आणि चवदार बोंबिलांचं कालवण ! पण जेवणानंतर ’….जाणिजे यज्ञकर्म’ पूर्ण करण्यासाठी, नारळाचं दूध आणि आमसुलांचा रंग अशा रंगसंगतीने गुलाबी झालेली, आंबट-गोड सोलकढी ! बस्स…आपली मागणी एवढीच ! स्वर्ग ताटात येतो, दुसरं काय ! देव तरी कुठल्या रूपात भेटेल कधी सांगता येतं का? पुलं म्हणाले तसं “परमेश्वराचा प्रथमावतार आपल्या ताटात येतो” ! (पुलंचे असंख्य उपकार मानायचे की त्यांनी काळ-वेळ किंवा इतर संदर्भांच्या पलीकडली वाक्यं लिहून ठेवली आहेत! ते बागा फुलवून गेले; आपण पाहिजे तेव्हढी फुलं वेचायची !) तुम्हाला सांगतो, खूप कमी प्रकारचे पदार्थ असे आहेत की जे पोटात उतरताना शरीरातील सगळे senses जागे करत जातात ! त्या यादीत बोंबील खूपच वर !

तसं पाहिलं तर ’मासे खाणं’ हा प्रकार आयुष्यभर काहीनकाही शिकवत असतो बरं का ! बोंबील तर अगदी लहानपणापासून साथ देतो. नमुन्यादाखल बघा हं…
१) रंग: आपण रंगबिंग शिकायला लागतो तेव्हा हिरवी पानं, निळं आकाश वगैरे छान वाटतं पण golden brown रंगासाठी योग्य reference म्हणजे ‘तळलेला बोंबील’ !
२) वचन: एकवचन, अनेकवचन वगैरे शिकलो की नाही? ते गाणं आठवतंय? “चंदा एक, सूरज एक, तारे अनेक !” तसं मासा आणि त्यातले काटे लक्षात ठेवायचे. “बोंबील – एक, पापलेट – एक, करली - अनेक !” शिवाय मासे असल्याने, लक्षात ठेवायले सोपे !
३) लिंग: तो बोंबील, तो रावस, ती कोलंबी, ती सुरमई !
४) सामान्य-विज्ञान: पदार्थ ताजा नसेल तर तो गरम केला की लगेच कोरडा होतो. ओले बोंबील ताजे नसतील तर तळल्यावर लगेच कोरडे पडतात !
५) आकार आणि दर्जा: मोठा आकार म्हणजेच उत्तम दर्जा हे प्रत्येक वेळी खरं असेलच असं नाही. Sometimes best things come in small packages. छोट्या तिसऱ्या (शिंपले) जास्त रूचकर असतात !
६) Economics: Optimum utilization of available resources! म्हणजे बघा हं ….
- एक दिवस पुरेल इतक्या खापरी पापलेटच्या किंमतीत दोन दिवस पुरतील इतके बोंबील मिळतात ! (अमेरिकेत हे समीकरण बरोबर उलटे आहे !)
- कोलंबी, बोंबील ताजे तर छान लागतातच पण ते सुकवून अनुक्रमे सोडे, काड्या ह्या नावाने येतात तेव्हाही टेस्टीच असतात! पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा मासे पकडले जात नाहीत तेव्हा मग सोड्याची चटणी / खिचडी / कालवण किंवा सुट्टीच्या दिवशी breakfast म्हणजे मस्तपैकी सोडे घालून गरमागरम पोहे !!!
७) संयम आणि एकाग्रता: खेकडे (aka चिंबोऱ्या) खाल्लेत ना? संयम आणि एकाग्रता म्हणजे असं काय वेगळं असते हो?
८) प्रगती: टप्या-टप्याने झालेली प्रगती वेगळंच समाधान देते. लहान मूल कोळंबी आवडीनं खातं कारण कोलंबीत काटेच नसतात. त्यामुळे play school मधे खेळल्यासारखं वाटतं. बोंबलात काटे असतात पण ते कसे “जीभेची चाचपणी” करायला असल्यासारखे. मधे एक मोठा काटा असतो आणि बाकी मग बारीक काटे. चुकून मोठा काटा पोटात गेलाच तरी तो जीभ, घसा इथे फक्त जाणवत जातो. घशात अडकून जीव घाबरा करत नाही ! ही झाली Primary शाळा ! त्यानंतर ’पापलेट’, ’हलवा’, ’सुरमई’ वगैरे काटेवाले मासे म्हणजे High school म्हणाना ! एकदा आपण बारीक, बोचरे आणि असंख्य असे काटे व्यवस्थित काढत ’करली’ खायला शिकलो आणि फारसं काही वाया न जाऊ देता खेकडे खायला शिकलो की Graduation झालं समजायचं ! ह्या पुढची पायरी Post Graduation किंवा परदेशात येऊन M.S. करणं म्हणजे Salmon, Tilapia, raw Oyster वगैरे प्रकार आवडीनं खायचे !!!

तर मंडळी, असं हे आपलं ’बोंबील आख्यान’. पुन्हा कधी असेच अचानक बोंबील मिळाले तर भरपूर घेऊन ठेऊ. “पुढच्या वेळी आमच्याकडे नक्की जेवायला यायचं हं !” वाक्यं पुणेरी आहे पण आग्रह नागपुरी आहे !!!

Tuesday, December 11, 2007

आयुष्यावर खूप काही…

‘जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही…चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…’

कवी संदीप खरे, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि तबल्यावर आदित्य आठले ह्या तिघांनी एकाच दिवशी लागोपाठ ३/३ तास प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवले. ‘आयुष्यावर बोलू काही..’ हा कविता-गाण्यांचा कार्यक्रम आपल्या MVCC इथे हाऊसफ़ुल्ल सक्सेसफुल झाला. रसिकांमधे तरूण वर्ग मोठया प्रमाणात होता हे ठळकपणे जाणवलं. कार्यक्रम इतका successful झाला की संदीप, सलील आणि आदित्यने रसिकांना पुढील वर्षी इथे सलग सहा तासांचा कार्यक्रम करण्याचा ‘वादा’ केला.

संदीप, सलील आणि आदित्य ! शिक्षणाने अनुक्रमे इलेक्ट्रिकल इंजिनीयर, डॉक्टर आणि कॉंप्युटर तज्ज्ञ! ह्या तीन तरूणांच्या शब्द-सूर-तालानी सगळ्यांना भारलं. संदीपच्या मनस्वी कविता ‘समजून घेऊन’ योग्य चाली लावायला प्रतिभावान संगीतकार सलील भेटला आणि ‘आयुष्यावर बोलू काही…’ साकारला. कार्यक्रमातल्या काही गाण्यांना सलीलचं संगीत होतं तर काहींना संदीपचं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, “रंगमंचावर कुणीही स्त्री नसतानाही तुम्ही आला आहात म्हणजे तुम्हाला गाणं खरंच ‘ऐकायला’ आवडतं” अशी खसखस पिकवत सलीलनं श्रोत्यांना आपलंसं केलं. (इथे तिघांचाही उल्लेख एकेरी आहे; ‘सचिन आज काय मस्त खेळला’ असं आपण आपलेपणानं म्हणतो ना तसाच.) ‘जरा चुकीचे…’नं सुरू झालेला कार्यक्रम पुढे रंगतच गेला.

‘दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर…निळे निळे गार गार पावसाचे घरदार..सरीवर सर.’.
दुसऱ्याच कवितेपासून सगळे ठेका धरू लागले. ‘पाऊस असा रुणझुणता..’ साठी सलीलनं ‘मल्हार’ आणि ‘जयजयवंती’ अशा मिश्र रागांची सुरेख चाल लावली तर ‘मनाचे श्लोक’ ज्या ‘भुजंगप्रयात’ वृत्तात आहेत त्यात संदीपने ‘पावसाचे श्लोक’ बांधले. सलीलच्या शब्दांत म्हणजे, “मनातलीचे श्लोक आहेत.“
वानगीदाखल पहा -- प्रिये ये निघोनी, घनांच्या कडेनी….मला एकटेसे अता वाटताहे !!
‘लहान मुलांसाठी सोपं लिहिणं अवघड असतं’ ह्याचा प्रत्यय देणारी बालगीतं आली. खूप ताकदवान पण एकटा, एकाकी सुपरमॅन आणि मग त्याला भेटलेला हनुमान सगळ्यांना खूपच भावला. ‘अग्गोबाई, डग्गोबाई..’ला सलील लहान मुलांचं item song म्हणतो तर ‘मी पप्पांचा ढापून फोन…फोन केले एकशे दोन’ हसवता हसवता टचकन डोळ्यांत पाणी आणतं.

त्यानंतर गझलच्या आकृतिबंधात प्रेमकविता आली. ‘मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले…जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले…!’ इथे संदीपच्या शब्दांतून प्रेम इतकं नाजूकपणे येतं की ‘रंग देखील पाकळ्यांना भार वाटू लागले’ !

शेतकरी आणि भाजीवाल्याच्या गाण्यात, प्रेम व्यक्त करायला त्यांनी दिलेल्या उपमांनी, हसताना ‘डिब्बाडी…ढिप्पांग’ ह्या तालावर टाळ्या-शिट्ट्यांनी मन नाचू लागलं. एका कवितेत गाडी सुटल्यावर ‘फलाटावर निश्वासांचा कचरा झाला’ हे लिहिणारा संदीप हळवा असतो. सगळ्या नवऱ्यांना आवडलेलं (किंबहुना पटलेलं !), ‘जीवनातलं प्रखर वास्तव’ हे विशेषण सलीलनं बायकोबद्दल वापरलं तरी कधी खोडकर, कधी कटकटी वाटणारी बायको आसपास नसली की मात्र नवरा अस्थिर होतो. ’नसतेस घरी तू जेव्हा , जीव तुटका तुटका होतो…जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो’.

चाकोरीबध्द कारकुनी मनोवृत्तीवर, ‘कंटाळरसा’मधे, ‘आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो…’ असं संदीप लिहितो तर माणसांच्या आत्मकेंद्रीपणावर तो म्हणतो ‘मी धुकेही पाहिले, मी धबधबेही पाहिले….पण शेवटी मी, माझाच फोटो काढला’ !! ‘मी मोर्चा नेला नाही..’ कवितेत, माणसांच्या सामान्यच राहण्याच्या वृत्तीवर तो मार्मिकपणे म्हणतो.. “मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो…मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही, मी कांदा झालो नाही! आंबाही झालो नाही!”

‘भल्या पहाटे.. छातीमध्ये..जळजळणारे अल्कोहोल’ हे अमेरिकन ‘हिप हॉप’ स्टाइलमधे होतं तर ‘दीवानों की बाते हैं.. इनको लब पे लाए कौन? इतना गहरा जाए कौन? खुदको यूँ उलझाए कौन?’ ही अस्सल उर्दू गझल होती. ‘दिख जाए तू गर पलभर..मयखानेमें जाए कौन !” वाह जनाब ! क्या बात है! ह्या गझलला खास आदित्यच्या तबल्यासाठी जोरदार टाळ्या पडल्या.

सलील म्हणाला त्याप्रमाणे ‘जरीची साडी नेसून, गोड आवाजाने आपल्यावर जणू मोरपीस फिरवणारी निवेदिका’ अशा टिपिकल ढाच्यात कार्यक्रम न अडकवता श्रोत्यांशी मस्त गप्पा करत, विनोदी चुटके आणि पुणेरी किस्से सांगत, एकमेकांना कोपरखळ्या मारत, त्यांनी जादूगाराच्या पोतडीसारखी एकाहून एक सरस कविता, गाणी काढली. ६ ऑक्टोबर हा सलीलचा वाढदिवस असल्याने, त्याने खास स्वत:च्या आवडीची कविता घेतली, ‘आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते….बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दांत येते’.

अशा रंगलेल्या मैफिलीची सांगता हे नक्की कशी करतील ही खूप उत्सुकता होती. जादूगारांनी पोतडी पुन्हा उघडली आणि बाहेर आली, सहसा न भेटणारी, मराठी साजातली....कव्वाली !! बेधुंद आयुष्य जगताना, मोहासाठी देह तारण ठेवत सुंदरतेवर जगणे चक्काचूर करणाऱ्या वृत्तीची…कव्वाली !!
“जपत किनारा शीड सोडणे नामंजूर, अन वाऱ्याची वाट पहाणे नामंजूर,
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर झुलणे नामंजूर , नामंजूर !!!”

Wednesday, November 21, 2007

चाsssय रेssम…!

सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर…आडवा डोंगरssss
आन डोंगरावर त्या चहाचा, मळा हिरवागारssss

दिवसाची सुरूवात चांगल्या चहानं झाली की पुढचा सगळा दिवस चांगला जातो. तुमचं काय मत? सकाळची कोवळी किरणं खिडकीतून तिरीपतात. साधारण त्या वेळी पाय आपल्याला चहाच्या दिशेनं वळवतात. सकाळचा चहा आणि त्याबरोबर शांतपणे पेपर वाचणं म्हणजे काय आनंद असतो ते काय वेगळं सांगावं काय? दीडशे वर्षांनतर जाताना, इंग्रज चहा आणि क्रिकेट मागे सोडून गेले. आता सायबाच्या देशापेक्षा दोन्ही गोष्टी आपल्याच देशात जास्त पॉप्युलर आहेत. ’हाय टी’ ते ’चहाची टपरी’ असं क्लास आणि मास अपील असलेल्या मोजक्या पेयांत चहा खूपच वर आहे.

महाराष्ट्रात लहानपण गेलं असेल किंवा महाराष्ट्राबाहेर वाढला असाल पण तुमचे आई/वडील मराठी असतील तर मग, चहाशी पहिली ओळख व्हायला तारूण्य यावं लागलं नसेल. अगदी लहानपणापासून सकाळ (आणि दुपारचीही) झोप चहाच्या सुगंधानंच चाळवली असेल. उकळतं पाणी, त्यात थोडं आलं, साखर, चहाची पावडर (aka चहापत्ती), दूध आणि थोडी सुगंधी वेलची पावडर. पृथ्वीवरचं अमृत तयार !! पिओ और पिलाओ !! एक से भले दो, दो से भले चार !!!

लहानपणी कुणाकडे गेलो की चहा विचारण्यावर आणि चहाच्या चवीवर घराचं impression ठरायचं. First Impression is the Last Impression’ ह्या न्यायानं बहुतेक वेळा ते खरंही ठरायचं. आई-अप्पांबरोबर आम्हालाही चहा आणणाऱ्या घरच्या काकू-मावशींबद्दल एकदम आदर-बिदर वाटायचा ! पण ‘पुणे तिथे काय उणे’ असल्याने ‘ठिकठिकाणी स्वागताचे भलते नमुने’ ! काही ठिकाणी जिथे मोठयांनाच विचारलं जायचं, “चहा झालाय की चालेल अर्धा कप?”, तिथे आमचा काय पाड लागणार ! लहानपणी रेडियोवरच्या श्रुतीनाट्यात एक बाई प्रेमाने “चहा ठेवलाय हं भावोजी” म्हणायची, तेव्हा वाटायचं मोठेपणी आपल्यालाही कुणी ‘भावोजी’ वगैरे म्हणणार तर !! Btw, देशातल्या पुरूषप्रधान संस्कृतीचं ठळक उदाहरण म्हणजे, सणवारी किंवा काही कार्य म्हणून चार नातेवाईक जमले की बघा, बायकांची जेवणं होता-होताच दुपारच्या चहाची वेळ होते !

‘लहानपण सरायला सुरुवात झालीय’ हे समजायच्या बऱ्याच खूणांपैकी एक म्हणजे आई-वडिलांबरोबर नेहमीच्या दुकानात गेलं की दुकानदार तुम्हालाही चहा ऑफर करतात. कपातला अर्धा चहा बशीत ओतून, “घे रे…तू पण चहा घे. मोठा झाला की हा” असं म्हणत तुमच्यासमोर कप किंवा बशी धरतात. असं ऐकलंय की पुण्यात दुकानदारानं बाजूच्या चहावल्याकडून चहा मागवायचे दोन प्रकार आहेत ! एक ’अण्णाचा चहा’ आणि दुसरा ’नानाचा चहा’ ! पहिला चहा ’बारक्या’नं खरंच आणायचा; दुसऱ्या प्रकारच्या चहाची वाट पाहून शेवटी कंटाळून गिऱ्हाईक निघून जातं !!

लहानपणी क्वचित कधी मिळणारा चहा ‘स्टेपल फूड’ होतो कॉलेज सुरू झाल्यावर. सकाळ सकाळचं लेक्चर असो किंवा कट्ट्यावर दुपार/संध्याकाळचा time pass, जोडीला चहा असतोच. चहा आणि क्रीम-रोल किंवा समोसा-चहा पोटात टाकलं की बराच वेळ टाकी फुल्ल ! कॉलेजकॅंटीनच्या मॅनेजरला “क्या अण्णा ! एक चाय के लिए रोताय” ! हा डायलॉग बरीच पोरं मारायची. (“तेरा एक, उसका एक करते दिनमें सौ चाय होताय” ! कान कोरत मंद हसणारा अण्णा मनात हेच म्हणत असावा.)

परीक्षेच्या वेळेला तर आम्ही साताठ जणं रात्री २-३ वाजता शिवाजीनगर किंवा स्वारगेट एस.टी. स्टॅंडवर चहा प्यायला जायचो. इतक्या अपरात्री अजून कुठे चहा मिळणार? तिथे वेटरनं हाताची बोटं ग्लासांत वरच्या बाजूनं टाकून, चार ग्लासेस एका हातात धरलेलं, ’थर्मामीटर’ पाणीही मिळायचं !

पुण्यातली अमृततुल्य ही एक ‘स्पेशल कॅटेगरी’ आहे. I can guarantee, तुम्ही जर ‘अमृततुल्य’ चहा टेस्ट केला असेल तर तुमचं मन आत्ताही तिकडे पोहोचलंय ! मी मध्यंतरी पुण्याला गेलो होतो तेव्हा जमेल तेव्हा पटकन अमृततुल्यामधे चहा मारायचो; मग सकाळ, दुपार, संध्याकाळ काहीही असो ! पुण्यात वाढलेल्या प्रत्येक मनात एक तरी हक्काचं ‘मयूरेश्वर भुवन’, ‘नागनाथ भुवन’ किंवा तत्सम काही नाव असतंच असतं !! अमृततुल्यचा अजून एक फायदा म्हणजे नवीन सिनेमाच्या जाहिराती वाचायला ’प्रभात’सारखा योग्य पेपर तिथे मिळू शकतो.

’टपरी’वर मात्र छोट्या ग्लासात चहा मिळतो. गुलाबी थंडीत गरमागरम चहा पिताना, ग्लासच्या वरच्या कडेवर अंगठा आणि खालच्या कडेवर पहिलं बोट, असा ग्लास पकडावा लागतो ! मित्र सिगरेट पेटवेपर्यंत, आपल्याला दोन ग्लास तसेच धरावे लागतात; पण आनंद असतो त्यातही.

टपरीवरच्या चहाचा खरा आनंद कळतो लोणावळा-खंडाळ्याच्या पावसात ! हिरव्याकंच दरीत झेपावत धुक्याआड लपणारे धबधबे, रिमझिमत्या पावसात, पाहताना शरीराबरोबर मन चिंब होतं. पोटात उतरणाऱ्या चहाने त्या धुक्यासारखंच हलकं होतं. त्यात आपल्या जोडीला, सहेतूक पण कळत-नकळतसा, लाजरा स्पर्श करणारा हात असेल तर आपसूक मन आभाळभर होतं !

चहासाठी अजून एक स्पेशल कॅटेगरी म्हणजे ’इराणी रेस्टॉरंट’ ! एका चहावर तासनतास बसा; ढुंकून कुणी म्हणणार नाही, “कृपया कामाशिवाय जास्त वेळ बसू नये” ! ’जीन्स’ ही पॅंट असते आणि मुलींच्या हातातही सिगरेट दिसते हे ज्ञान कॅंपमधल्या ‘नाझ’ मधे मिळालं. प्रत्येक वेळी ‘नाझ’ पर्यंत जाणं व्हायचं नाही पण डेक्कनचं ‘गुडलक’ किंवा गरवारे कॉलेजसमोरचं ‘पॅराडाईज’ हे spots ‘पडीक’ बसायला मस्त होते. इराणी सढळ हाताने पट्टीचे समोसे भरलेली प्लेट समोर ठेवायचा…अजूनही ठेवत असेलच. पाहिजे तितके खा ! ‘पहिल्यांदा वाढलेले समोसे’ वजा ‘प्लेटमधे राहिलेले समोसे’ म्हणजे ‘तुम्ही खाल्लेले समोसे’ ह्या पद्धतीनं इराणी पैसे लावतो. एकदम सोपा हिशोब ! इराणी रेस्टॉरंटच्या लाकडी खुर्च्या मात्र एकदम confortable असतात. ठिय्या मारायला perfect. जनरल टीपी इतकाच इराणी रेस्टॉरंटमधे अभ्यास मात्र एकदम मनापासून व्हायचा. इथे ‘Barnes & Noble’ मधेही शांतपणे अभ्यास करणारे लोक दिसतात पण त्यांच्या हातात इराणी रेस्टॉरंटचा चहा नसतो आणि सोबतीला आपले रफी-किशोरही नसतात !!!

रेल्वे स्टेशन ही तर ’city never sleeps’ सारखी जागा असते. ‘चाssय रेssम, कॉफ्फी…कॉफ्फेssय’ असे आवाज सुरू झाले की प्रवासाची खरी मजा सुरू होते. गाडीच्या धडक, धडकबरोबर ताल धरून चहाचे घुटके घेत डेक्कन क्वीनच्या दरवाज्यात शांतपणे उभं रहायचं ! आपोआप अवतीभवतीचं सगळं विसरायला होतं. स्टेशनवरच्याच काय पण गाडीतल्याही गर्दीतून चहा-कॉफीचं छोटे पिंप घेऊन ‘चाssssय रेssम’ विकणारे कशी काय जागा काढतात? ’Will to survive’ जिद्दी असते हेच खरं.

चहाचा मझा असायचा ‘सवाई गंधर्व’ मधे. सलग तीन रात्रींभर रंगलेल्या मैफिली! आत्ता थोडा, नंतर थोडा, तल्लफ आली म्हणून, मित्रांबरोबर म्हणून, ‘तिच्या’ सो्बतीसाठी मधेच सगळ्यांपासून हळूच कटून, थोड्यावेळाने मग परत सगळ्यांबरोबर असं करत भरपूर चहा व्हायचा. डिसेंबरच्या थंडीत हातातला चहा पोटात गेला की असं छान उबदार वाटायचं. गाणं-बजावणं गुणगुणत सकाळी घरी जायला निघालं की वाटेतलं पहिलं ‘अमृततुल्य’ पाहून गाड्या थांबायच्या !

मध्यंतरी इथे न्यू जर्सीत एका अफगाणी रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो होतो. रविवार दुपार होती आणि मालकही गप्पा करायच्या मूडमधे होता. मस्त जेवणानंतर त्यांचा ’शीर चाय’ (दुधाचा चहा) काय अप्रतिम होता ! मालकाने तर चहाचे पैसेही घेतले नाहीत. तो म्हणाला तू भारतातला आहेस म्हणून तुला सांगतो. आपल्या शेजारी जरी पाहुणे आले तरी आपण त्यांना चहाला बोलावतो ना, त्याचे आपण पैसे कुठे घेतो? आजचा चहा तसाच समज. “These people don’t understand some nice things from our side of the world.” कुठेतरी आतपर्यंत जाणवलं की इतकी वर्षे अमेरिकेत काढल्यानंतरही, मुलं कॉलेजमधे जायच्या वयाची झाल्यानंतरही, त्याच्यासाठीसुद्धा our side of the world म्हणजे अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान हाच भाग होता !!

नुकतंच एकदा सकाळी लवकर ऑफिसला जाताना, महेश खानोलकरांनी व्हायोलीनवर वाजवलेली श्रीनिवास खळेंची गाणी, गाडीत ऐकत होतो. अवतीभवती झाडं-पानं ‘fall colors’ नावाचा रंगोत्सव साजरा करत होती ! सुरेल असं ‘बगळ्यांची माळ फुले..’ चालू होतं आणि चहाचा घोट घेत असताना अचानक समोर निळ्याभोर आकाशाच्या background वर, ऑक्टोबरच्या सोनसळी उन्हांत, बगळ्यांची माळ खरंच उडताना पाहिली !

सकाळी लवकर ऑफिसला जाताना गाडीत पिण्यासाठी मस्तपैकी चहा बरोबर ठेवायचा. गाडीसमोरून उडत जाणारी रंगीबेरंगी पानं असोत किंवा भुरभुरत्या बर्फाचे शुभ्रकण; ’तोडी’, ’सुहाग भैरव’ किंवा ’अहिर भैरव’च्या सुरांत हरवताना, चहाचा घुटका घ्यायचा आणि मनात म्हणायचं, ’अजी हुजूर ! वाह चाय बोलिये” !!!

Saturday, November 17, 2007

दूर आहे ‘डेडलाईन’ अजूनि !

(चाल: तरूण आहे रात्र अजूनि)


दूर आहे ‘डेडलाईन’ अजूनि, साहेबा पेटलास का रे....
एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे....

अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी
अजून मी लिहले कुठे रे, हाय तू रूसलास का रे….

सांग या शेजारच्या चटक चांदणीला काय सांगू
तिला पहाया जमती सारे, आणि तू बसलास का रे…

बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा
रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे…

उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा
तू भुतासारखा पण एकटा डोकावलास का रे…

डोळे अजूनि बंद का रे, श्वास ही मग मंद का रे
बोल रिक्रुटरच्या थापेवर, तू असा फसलास का रे…

Saturday, November 3, 2007

दुनियादारी

“तू गपे xxxच्या ! अजून दुनियादारी वाचलं नाहीयेस आणि म्हणे माझं लग्नं करा !”

हे ठेवणीतलं वाक्य यायचं आलं की वाक्याचा ‘घेता’ (recipient साठी दुसरा चांगला शब्द माहिती आहे?) आपोआप गप्प व्हायचा. बरोबर आहे, वर्मावर का कुठे म्हणतात तिथे बोट ठेवलं जायचं. आपण सुहास शिरवळकरांची जवळपास सगळी पुस्तकं पारायणं करून वाचली पण अजून मास्टर पीस वाचला नाहीये ! मारे ढीगभर हिंदी सिनेमा पाहिले पण ‘शोले नाही पाहिला अजून? ‘दुनियादारी’ नेमकं आत्ताच out of print? हॅत्त तेरी तर !!!

एक दिवस अचानक मिळालं. हुर्रे !!! जिओ यार…पुणे नगर वाचनालय जिंदाबाद !! एक दिवसात परत करायच्या बोलीवर मित्राकडून कसंबसं मिळालं. पुस्तक नुसतं हाताळतानाही थरारलो. रात्रीचा दिवस करून वाचलं आणि एका रात्रीत खूप काही बदललं. मागे एकदा किमी काटकरची मुलाखत वाचली होती. (बरोबर आहे, तीच किमी ! हिंदी “टारझन” सिनेमात जिच्यापेक्षा टारझनच्या अंगावर जास्त कपडे होते ना ती !) ती म्हणाली होती की ‘हम’ सिनेमात अमिताभची हिरॉइन झाल्यावर लोक तिला ‘किमी’ ऐवजी ‘किमीजी’ म्हणू लागले. तसं, ‘दुनियादारी’ वाचल्यावर, “गपे xxxच्या ! अजून दुनियादारी…..” हा डायलॉग म्हणायचा अधिकार मिळाला. आता ‘दुनियादारी’ची स्टोरी वगैरे सांगत नाही कारण तो ह्या लेखाचा उद्देशच नाही. ‘चिकन सूप’ चाखून ताटातल्या झणझणीत रश्याची नक्की चव नाही कळत !

कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं. खरं तर प्रत्येकानं college मधे असताना दुनियादारी वाचायलाच हवं. शिरवळकरांनी एक-एक पात्र काय अप्रतिम रेखलं आहे. College life मधली सळसळ म्हणजे दुनियादारी ! रोमँटिक तरूणाईची दुनियादारी ! भग्न प्रेम म्हणजे दुनियादारी ! अस्सल शिव्या, मारामारीची दुनियादारी ! वास्तवाचं भान देणारी दुनियादारी ! ह्या सगळ्यापेक्षा दशांगुळं वर म्हणजे कोवळ्या वयात चुका होऊ न देणारी दुनियादारी !!!

कॉलेजच्या भाषेचा एक छान लहेजा कादंबरीला आहे, योग्य तिथे आणि योग्य त्या शब्दांसकट !! दुर्दैवानं आता सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत पण त्यांचा वाचक-चाहता म्हणून मी अकरावीत असताना त्यांना पाठवलेल्या पहिल्याच पत्राच्या उत्तरात त्यांचं वाक्य होतं ,”दुनियादारी मात्र जरूर वाच.” त्यानंतर वयाचं अंतर पार करून, त्यांच्याशी छान स्नेह जुळला होता. मला आठवतंय एकदा त्यांच्या घरीच त्यांना विचारलं होतं की ‘दुनियादारी’त इतक्या सहजपणे शिव्या वगैरे का? ते म्हणाले होते, “एक तर कॉलेजमधली तुझ्याच आसपासची भाषा बघ, तुला वाक्यांगणिक सहज शिव्या सापडतील. दुसरं म्हणजे मारामारीचा वगैरे प्रसंग वाचताना,” अरे नालायका, मूर्खा ! थांब जरा तुझ्याकडे बघून घेईन” कसं वाटेल? तिथे शिव्यांशिवाय intensity येणारच नाही !! तसंच कॉलेजची पोरं, “काय वेडा किंवा काय बावळट आहेस का तू?” वगैरे म्हणतात का? नाही! सरळ “काय xx झाला काय?”, असंच म्हणतात ना?” येस बॉस, मानलं !

‘दुनियादारी’मधे श्रेयस तळवळकर मुख्य पात्र आहे पण ‘धासू रोल’ म्हणजे, एस.पी. कॉलेजमधला टेरर, ‘डीएसपी.’ ! दिग्या एस. पाटील !! जसं, रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’ मध्ये ‘सत्या’भोवती कथा फिरते पण ‘धासू रोल’ आहे ‘भिखू म्हात्रे’! सुशिंनी कादंबरीतलं ‘डीएसपी’ हे character ज्या कुणावरून तरी साधारणपणे घेतलं होतं ते शांत आणि मवाळ दिसणारे-बोलणारे गृहस्थ एकेकाळी ‘टेरर’ होते?

अर्थात दुनियादारीत शिव्या, रोमान्स, मारामारी, एस.पी. कॉलेजचा कट्टा, दारू, इतकंच काय श्रेयस, दिग्या, मिनू, रेखा, शिरीन, साई, अश्क्या, एम.के.श्रोत्री वगैरे सगळी फक्त ‘साधनं’ आहेत...कादंबरीचं ’साध्य’ नाही !! आपल्याला मारझोड करणाऱ्याची ओळख सांगताना नित्या म्हणतो “दिग्या त्याला काही करू शकणार नाही. ‘नितीन सदाशिव घोडके’ मधला तो माणूस ‘सदाशिव’ आहे रे !” असं अंगावर येणारं वाक्यं दुनियादारीतच आहे !

ऑर्कुटवर ‘Suhas Shirvakar’ नावाची कम्युनिटी आहेच पण नुकतीच ‘duniyadari’ ही community सापडली! Yes, आपल्या आवडत्या पुस्तकाची दुनियादारी !! मी तर त्या कम्युनिटीतल्या बऱ्याच मेंबर्सना (अजून तरी) ओळखतही नाही. कोण कुठले हे लोक? वेगवेगळ्या वयांचे, ठिकाणांचे, मतांचे आणि विचारांचेही !! पण सगळ्यांच्या मनाच्या एका सुगंधी कोपऱ्यात कुठेतरी ‘दुनियादारी’ कायम आहे.

‘दुनियादारी’नं तुम्हाला ‘बि’घडवलं असेल तर नक्की सांगा कारण आपण-तुपण गाववाले !!!

Saturday, October 20, 2007

पोरखेळ

‘Child's Play Is Serious Business’ ह्या उक्तीवर आधारित…
Anita Wadley ह्यांच्या ‘Just Playing’ कवितेवरून स्वैर अनुवादित…
-----------------------------------------------------------------
रचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर
वाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर !
शिकतो आहे मी, ‘भार’ आणि ‘तोल’
असेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १

हाती माझ्या बाहुली नि भातुकलीचा खेळ
नजर म्हणे तुमची, “आता आवरताना वेळ “ !
‘जपणं’ नि ’सांभाळणं’, शिकवतो हा खेळ
बनू उद्या ‘आई’/‘बाप’ आम्हीही एखादवेळ.... २

हातांवरती रंग, कधी चिखलातले कुंभार
वाटती तुम्हाला, पोरखेळ हे भंगार !
‘सांगणं मनातलं’ शिकवती ना खेळ
'कलाकार’ उद्या मी, होईन एखादवेळ.... ३

श्रोते नाहीत कुणी, पण ‘वाचनाला’ चढता रंग
तुम्ही म्हणता आहे मी, पोरखेळात पुरता दंग !
‘समजणं’ नि ‘समजावणं’, शिकवत असतो खेळ
असेनही उद्या मी, चांगला ‘शिक्षक’ एखादवेळ.... ४

फिरेन कधी झुडपांतून, खिशांत असे सटरफटर
नक्की वाटेल तुम्हाला, फालतू वाया गेले पोर !
माहीत नाही अजून जे, ते कदाचित शोधे खेळ
तुम्ही म्हणाल मला मग, 'संशोधक’ एखादवेळ...५

भान माझं हरपून जाता, सोडवण्या एखादं कोडं
म्हणू नका हं प्लीज आता, "काहीतरी करतं येडं" !
नुसता खेळण्यात नाही हो मी, वाया घालवत वेळ
सोडवताना प्रश्न उभारेन, 'उद्योग'ही एखादवेळ...६

भांडीकुंडी खुडबुडेन, मिटक्या मारेन थोडावेळ
तुम्हास नक्की वाटेल मग, भलतेसलते माझे थेर !
चवींमधले वेगवेगळे, फरक शिकवति सारे खेळ
चाखत असता आंबट-गोड, ‘बल्लव’ होईन एखादवेळ…७

उड्या मारतो दोरीवर की, वारा धावत असेन चपळ
तुमचं आपलं टुमणं की, ”देवासारखा बस अंमळ”!
शिकतो आहे ‘शरीर’ आणि, हालचालींचा मेळ
डॉक्टर, नर्स वा बहुधा, ऍथलीट होईन एखादवेळ...८

“काय केले शाळेत आज ? कसे होते दिवसाचे स्वरूप?”
"फार काही केले नाही पण, खेळलो मात्र सगळे खूप"!
रागवून आता म्हणू नका हं, “तुझे फालतू नसते खेळ" !
‘माझे’ पेक्षा चांगलं ‘आपले’, शिकायची ही असते वेळ...९

राहू द्याल ’आज’ मला जर, स्वच्छंदी नि आनंदी
पाहू याल मला ’उद्या’ तर, यश ठेवेन पायाशी
लहान आहे मी अजूनि, थांबा ना हो थोडावेळ
कामात आहे मी गढुनि, तुम्हा दिसतो पोरखेळ !!!... १०
--------------------------------------------------------------------

‘Just Playing’ ही कविता हातात आल्यापासून तीन-चार दिवस वाटत राहिलं की ह्या कवितेला मराठी रूप द्यावं। अनुवाद करताना मी थोडं स्वातंत्र्य घेतलंय. जर काही त्रुटी राहिली असेल तर ती माझ्यामुळं पण मनाला जे भावेल त्याचं श्रेय मात्र मूळ कवयित्रीचं. Google वर ’ Just Playing’ किंवा ’ Anita Wadley’ शोधलं तर मूळ कविता मिळेल.

इथे मी काही ब्लॉगयात्रींनाही टॅग करतोय.

---------------------------------------------------------------

Saturday, October 13, 2007

‘दरबारी’ दिमाख

“अलबेला सजन आयो रे...अलबेला …” ।

बासरी आणि सारंगी पाठोपाठ, पायांना ठेका धरायला लावणाऱ्या, तबला, ड्रम्समधून स्वरमंडल नाssजूकपणे झंकारलं आणि अचानक हे गाणं सुरु झालं. मी सिनेमा बघताना खुर्चीत सावरून बसलो. ध्यानीमनी नसताना एकदम ‘अहिर भैरव’ रागातली बंदिश? रूबाबदार विक्रम गोखलेसाठी उस्ताद सुलतान खॉंचा भरदार आवाज कस्सला मस्त आहे. १९९९ सालच्या कमर्शियल हिंदी सिनेमात शास्त्रीय संगीतानं बांधलेलं गाणं? Music director ची तब्येत बरी आहे ना? नक्की कोणाय music director? नेहमीचा वाटत नाही. हिंदी सिनेमावाल्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘जरा हटके…’ दिसतोय. एकापाठोपाठ एक अनेक विचार डोक्यात आले. दुसऱ्या दिवशी लगेच सिनेमाच्या गाण्यांची ध्वनिफीत (मराठीत ‘audio cassette’ हो !!) विकत घेतली. गाडीत दीपा आणि मी ती गाणी ऐकत होतोच पण शिशिर-प्रज्ञाच्या घरी पोहोचल्यावर त्यांनाही लगेच ‘अलबेला सजन..’ ऐकवलं होतं. तुम्हाला गाणं इथे बघायचंय?

‘इस्माइल दरबार’ ह्या नावाशी पहिली ओळख अशी झाली होती. जरा google केल्यावर समजलं की हा माणूस सूरतहून मुंबईत आला, शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं आहे, संजय लीला भन्साळीच्याच “खामोशी: द म्युझिकल” मध्ये त्यानं व्हायोलिन उत्तम वाजवलंय वगैरे, वगैरे. ‘हम दिल दे चुके सनम’च्या यशात संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन, ‘देखणी’ ऐश्वर्या (‘द्विरूक्ती’ झाली, माहित्येय ओs !!), नितीन देसाईचं रंगबहार कला दिग्दर्शन आणि त्या रंगांची उधळण अचूक टिपणारा अनिल मेहतांचा कॅमेरा, ह्याबरोबर इस्माइल दरबारच्या संगीताचा खूपच मोठा वाटा आहे.

‘ऑंखो की गुस्ताखियॉं…’ हे प्रणयतारा अलगद छेडणारं गाणं असो किंवा ‘तडप तडप…’ सारखं विरह गीत, ‘निंबूडा, निंबूडा..’ हे खट्टं-मीठं गाणं असो किंवा ‘हे ss हे हेss, हेss हेss हेहेss’ अशी नुसती सुरावट, प्रत्येक भाव संगीतात न्हाऊन निघाला आहे. ‘झोंका हवा का…’ मध्ये हळूवार फुंकीनं बासरीचा काय अप्रतिम वापर केलाय?!! हॉस्पिटलमधे जायबंदी हाताने कुंकू लावायला धडपडणाऱ्या ऐश्वर्याला, अजय देवगण ते लावताना, पार्श्वसंगीतात “तदेव लग्नं सुदिनं तदैव, ताराबलं चंद्रबलं तदैव..…शुभमंगल सावधान” ह्या मंगलाष्टकाच्या ओळी गाण्याला वेगळीच उंची देतात.

‘हम दिल दे चुके…’ गाणं तर आठवतंय? लाल साडी, मॅचिंग बांगड्या, कपाळावर लालचुटूक कुंकू, उजव्या खांद्यावर काळा-लाल रंगसंगतीची शाल आणि रेशमी केसांचा, मानेवर रूळता, सैल अंबाडा अशी सोज्वळ सजलेली, दरवाजा उघडून येणारी, अधोवदना ‘मूर्तिमंत नजाकत’ ऐश्वर्या (पुन्हा ‘द्विरूक्ती’..काय करणार ओ!!). हे सगळं सौंदर्य perfectly खुलवणारं संगीत. सिनेमाच्या फ्रेम्स जितक्या नेत्रसुखद तितकंच संगीत कर्णमधुर !!! गाणं बघायचा मोह होतोय? फक्त click करा.

‘हम दिल दे चुके..’ नंतर इस्माइल दरबार पुन्हा SLB बरोबर ‘देवदास’ करणार असं कळलं आणि पाठोपाठ समजलं ऐश्वर्या, माधुरी एका गाण्यात एकत्र दिसणार आहेत. मन आंनदानं ‘नाचू नाचू’ का काय म्हणतात ते झालं !! हे म्हणजे job offer देताना, “भरपूर पगार मिळेल पण घरून काम करण्याची सोय, भरघोस बोनस आणि वर्षाला ६ आठवड्यांची सुट्टी मान्य असेल तरच..!” असं आपल्याला खड्डूस HR नं सांगण्यासारखं आहे. (कृपया लगेच दिवास्वप्ने पहाण्याची चूक करू नये. खड्डूस HR असं विरघळत नसतं.)

‘सिलसिला ये चाहत का..’ गाण्यातून इस्माइल दरबारनं पार्श्वगायनातलं एक अनमोल रत्न आपल्याला भेट केलं – ‘श्रेया घोशाल’. नुसता नाजूकच नाही पण काय फिरणारा आवाज आहे तिचा ! ‘बैरी पिया…’ गाण्यातलं श्रेयाचं गोड ‘इश्शss..’ !!! संगीत दिग्दर्शकाकडे असं हटकेपण ‘वरूनच’ यावं लागतं.

‘डोला रे डोला..’ म्हणजे तर audio visual treat आहे. अनुपम सौंदर्याच्या दोन प्रतिमा ! दोघीही शास्त्रीय नृत्य शिकलेल्या आणि त्यांच्या play back singers तितक्याच कसलेल्या. बघायचंय?

अपेक्षेप्रमाणे एक से बढकर एक गाणी आणि ‘ह्या’ लावण्यवतींनीच ‘देवदास’ला सांभाळलं. पण, दोघींत आपलं माप अजूनही माधुरीकडेच झुकतं हां ! आठवा ‘काहे छेड, छेड मोहे..’ आणि ‘मार डाला..’ ह्या गाण्यांतली माधुरी. (पुन्हा मोह होतोय?... ‘काहे छेड..’ आणि ’मार डाला..’ !!) Btw, ‘उमराव जान’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’च्या रेखानंतर एकदम माधुरीची ‘चंद्रमुखी’ !!! तिच्याइतकं मोहक आणि graceful दुसरं कोणी आहे? ‘मार डाला…’ संपताना देवदास आणि चंद्रमुखी दोघांच्याही, आपापल्या, वेदना अधोरेखित करणारे सनईचे सूर !

‘अलबेला सजन..’ मधे उ. सुलतान खॉं होते तर ‘काहे छेड..’ साठी साक्षात पं. बिरजू महाराज !!! बिरजू महाराजांनी गाणं लिहिलंय, compose केलंय आणि थोडं गायलंही आहे. पंडितजींच्या जोडीनं कविता सुब्रम्हण्यम (आपली कविता कृष्णमूर्ती हो ss !!) आणि माधुरीनं गाणं मस्त खुलवलंय !

नुकताच Zee TV वर ‘सारेगमप’ चा एक भाग पाहिला. पकिस्तानच्या ‘अमानत अली’ ह्या हिऱ्याला ‘दरबार’ पैलू पाडतोय. अमानतच्या आवाजाची ‘फिरत’ दाखवण्यासाठी दरबारनं ‘अलबेला सजन…’ मुद्दाम थोडं अजून वेगळं बांधलं. गुरू-शिष्यानं मिळून काय ‘माहौल’ केलाय म्हणून सांगू !! (मोहात पडलेला सावरणं अवघड असतं महाराजा…’ ! थोडं distorted recording आहे पण ती ५ मिनिटे इथे आहेत ना! पं. जसराज, जगजीत सिंग ते हिमेश रेशमिया, सगळ्यांच्या प्रतिक्रिया नक्की पहा.)

‘ताल’ हे इस्माइल दरबारच्या संगीताचं खूप मोठं शक्तिस्थान आहे. Electronic drums सगळेच वापरतात पण ‘तबला’ अतिशय प्रभावीपणे वापरून घेण्यात, आजच्या संगीतकारांमधे, इस्माइल दरबार खूप पुढे आहे. जवळपास अडीच वर्षांचा आदित्य गाडीत बसल्यावर मधेच कधीतरी, Disney किंवा Barney ऐकण्यापेक्षा, जेव्हा म्हणतो, “बाबा ! धिन..धान..धा”, तेव्हा समजायचं त्याला “काहे छेड..” किंवा ‘अलबेला सजन..” ऐकायचंय. लहान मुलापासून ते संगीताच्या दिग्गज जाणकारापर्यंत सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी गाणी ऐकल्यावर मनात येतं, “हे येरा-गबाळ्याचं काम नोहे; हा दिमाख ‘दरबारी’ आहे” !!!

Sunday, October 7, 2007

सुरेल पद्मजा

‘मराठी विश्व’ने ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात ’पद्मश्री’ पद्मजा फेणाणी-जोगळेकर ह्यांचा सुरेल कार्यक्रम आयोजित केला होता. जवळपास हजार-बाराशे लोकांनी ह्या संगीतोत्सवाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम म्हणजे नुसते सुरेल गाणंच नाही तर उत्कृष्ठ ‘सादरीकरण’ (performance) कसे असावे ह्याचा वस्तुपाठच होता. एकाहून एक सरस गाणी सादर करताना पद्मजाताईंचं पं. जसराजजी आणि पं.
हृदयनाथ मंगेशकर ह्या दिग्गजांकडचं शिक्षण आणि अथक रियाझ ठायी-ठायी दिसत होतं. ’केंव्हातरी पहाटे…’ ह्या अप्रतिम गाण्यातील ’उरले उरात काही, आवाज चांदण्याचे’ ही ओळ! ’आवाज’ हा शब्द दोन वेगवेगळ्या पद्धतीनं गाऊन त्यातला फरक त्यांनी इतका छान दाखवला की नकळत उद़्गार निघाले, “क्या बात है!”. पद्मजाताई ह्या किती ’विचारी’ गायिका आहेत ह्याची ती एक छोटीशी झलक होती.
पद्मजाताईंचा सुरेल आवाज ह्याशिवाय त्यांच्या सादरीकरणाची दोन मोठी वैशिष्ट्ये होती. पहिले म्हणजे त्या श्रोत्यांनाही आपल्याबरोबर नेत होत्या. संत ज्ञानेश्वरांच्या रचना सादर करताना ’घनु वाजे….’ मधील ’घनु’ हा शब्द पाण्याने भरलेल्या कुंभातून आल्यासारखा गाताना त्यांनी समजावून सांगीतले की ह्याला शास्त्रीय संगीताच्या भाषेत ’कुंभक’ म्हणतात तर ’रुणुझुणु, रुणुझुणु रे भ्रमरा..’चा खूप सुंदर अर्थही सांगीतला. लोकप्रिय गाणी सादर करताना सगळ्यांनी त्यांच्याबरोबर गाण्याचा आग्रह करताना गाण्यांच्या मधेच त्या गोड आवाजात म्हणायच्या, “गाणार?” त्याहून मोठे वैशिष्ट्यं म्हणजे त्या आपल्या साथीदारांनाही मनापासून दाद द्यायच्या. व्हायोलीनची साथ करणाऱ्या श्री. महेश खानोलकर ह्या गुणी वादकांना त्यांनी दोन गाणी व्हायोलीनवर वाजवण्याचा आग्रह केला. व्हायोलीनवर सादर झालेल्या ’भेटी लागे जीवा…’ आणि ’गोरी गोरी पान, फुलासारखी छान’ ह्या गाण्यांनंतर रसिकांनी अक्षरश: टाळ्या-शिट्यांचा पाऊस पाडून महेशजींना डोक्यावर घेतलं.
पद्मजाताईंचं श्रध्दास्थान लतादीदींची खेळकर नक्कल किंवा तबलासाथ करणारे श्री. पटवर्धन ह्यांच्याबद्दल ’ते हाय कोर्टात वकील म्हणून थापा मारतात आणि इथे तबल्यावर ’थाप’ मारतात’ असं नर्मविनोदी कौतुक असो, पद्मजाताईंनी श्रोत्यांशी सुरेख संवाद साधला.
’दिवे लागले रे दिवे लागले..’ हे अप्रतिम ऊषा:सूक्तं असो किंवा ’तेरे सूर और मेरे गीत’ हे हिंदी चित्रपटगीत, रसिकांच्या लक्षात राहील पद्मजाताईंचा सुरेल आवाज, तबल्याचा दमदार ठेका, सुरांची मैत्रीण संवादिनी (हार्मोनियम) आणि ’कंठसंगीताच्या (human vocal cords) सर्वांत जवळ पोहोचणारं वाद्य’ ही सार्थ कीर्ती मिळालेलं व्हायोलीन.

Saturday, September 29, 2007

बित्तंबातमी

वृत्तपत्राने दिन आरंभी । तो जाणावा येक ’मऱ्हाठी’ ।
चहासवे ‘सकाळ’ हाती । तोचि ओळखावा ’पुणेरी’ ।।

आमची महाराष्ट्रीय मंडळ शाळा सकाळी ६.५५ ते दुपारी १२.१० अशी असायची. (तेव्हा प्रश्न पडायचा की सकाळी ७ ते दुपारी १२ अशी का नाही करत?) साधारण ६:३०च्या सुमारास आमचे रिक्षावाले पायगुडेकाका यायचे. त्यांच्या आधी ५-१० मिनिटे पेपरवालेकाका ‘सकाळ’ आणायचे. वसंत ऋतुची सुगंधित पहाट असो, दात वाजवणारी थंडी असो किंवा झिमझिमता पाऊस; पेपरवालेकाका आणि डोक्याला मुंडासं बांधलेले, दुधाची चरवी आणणारे उंचपुरे ‘गवळीबाबा’ वेळ चुकवायाचे नाहीत. अगदीच मुसळधार पाऊस असला तर मात्र त्यांचाही नाइलाज असणार. पेपर हातात आल्यापासून रिक्षा येईपर्यंत पटापट पहिल्या आणि शेवटच्या पानावरच्या बातम्यांच्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या, अनुक्रमे मुख्य आणि क्रीडा विषयक बातम्यांसाठी. ‘पेज थ्री’ एकतर नव्हतं किंवा ते कळायचं वय नव्हतं. काही वर्षांनंतर सायकलने शाळेत जायला लागल्यावर ‘हेड लाइन्स’ वाचूनच घरून निघायचं. मग शाळेची वेळ गाठायला सायकल जोरजोरात हापसायला लागली तरी चालायचं.

दुपारी घरी आल्यावर दप्तर टाकायचं आणि हात-पाय धुवून पेपर उचलायचा. दुपारभर मी आणि आजीच घरी असायचो. देवासमोर वेगवेगळी स्तोत्रं, आरत्या म्हणणारी किंवा कहाण्या वाचणारी आजी आणि ’शेषशायी’ विष्णूसारखा कॉटवर लवंडून ‘सकाळ’ वाचणारा मी !!! आधी सगळ्या पानांवरच्या नुसत्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या. नंतर मनात नोंदवलेल्या बातम्या पूर्ण वाचायच्या. तासभर मनासारखा पेपर वाचून झाल्यावरच शाळेचा युनिफ़ॉर्म बदलून जेवायचो. ‘रविवार सकाळ’ म्हणजे तर मेजवानीच असायची. ‘सकाळ’ मधली ‘वाचकांची पत्रे’ हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. क्रिकेटच्या बातम्या वाचाताना खूप एक्साइट्मेंट असायची. ‘मुदस्सर नझर त्रिo कपिल देव ५’ किंवा ‘प्रतिकूल स्थितीत सुनीलचं जिद्दी शतक’ वगैरे वाचताना आपलीच छाती वीतभर वाढायची. साध्या-सोप्या पण छान छान गोष्टींचं मासिक ‘चांदोबा’ आणि संदीप पाटीलचं पाक्षिक ‘एकच षटकार’ ह्याची तर चातकासारखी वाट पहायचो. मुळात आवड होतीच पण द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, मकरंद वायंगणकर ह्यांच्यामुळे क्रिकेटची ‘नजर’ यायला लागली. मग ‘चंदेरी’ मिळायला लागलं. चित्रपट विषयक दर्जेदार लेखन वाचायची सवय लागली. कॉलेजला असताना ‘सवाई गंधर्व’साठी रात्रभर जागून आलं की, कार्यक्रमांची नशा डोक्यात असतानाच, ‘सकाळ’च्या वृत्तांतातून मनात पुन्हा आदल्या रात्रीचं चांदणं फुलायचं.

नववी-दहावीत एकदम साक्षात्कार झाला की ‘केसरी’ आणि ‘तरूण भारत’ मध्ये दहावीच्या अभ्यासाबद्दल बरंच काही चांगलं येतं. नमुना प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायच्या. त्यातही, लोकमान्यांचा ‘केसरी’ हातात घेताना प्रत्येक वेळी मनात आदरभाव असायचा.

ते वय बरेच मानसिक आणि शारीरिक साक्षात्कार व्हायचं असतं. कॉलेजमधे असताना हिंदी चित्रपट बघायचं वेड लागलं. (ते अजूनही आहे म्हणा.) ताजे चित्रपट कुठल्या टॉकीजला लागले आहेत ते शोधायला शुक्रवारच्या ‘प्रभात’ सारखा दुसरा पेपर नव्हता. पुण्यात बऱ्याच ठिकाणी ‘सार्वजनिक वाचनालयं’ आहेत. म्हणजे रस्त्याच्या कडेला भिंतीवर लाकडी फळ्यांचे कप्पे ठोकून त्यात मराठी पेपर फुकटात वाचायला ठेवलेले असतात आणि बसायला एखादा बाक. काही ठिकाणी बाजूलाच १-२ उभे रांजण आणि साखळीनं बांधून ठेवलेले स्टीलचे ग्लास अशी पाणपोई. एकाच पेपरची पानं चार-पाच वेगवेगळ्या लोकांकडे. आपलं पान वाचून झालं की दुसऱ्याला द्यायचं. ’प्रभात’ नक्की वाचायला मिळणारी दुसरी ठिकाणं म्हणजे ’अमृततुल्य’ ! चहा, क्रीम रोल आणि ’प्रभात’ साठी ’अमृततुल्य’चा कट्टा बेस्ट. वीस-एक वर्षांपूर्वी तरी ‘प्रभात’चे वाचक तीन प्रकारचे होते. एक म्हणजे “हे…आपलं जरा टाईमपास” म्हणणारे ’रिकामटेकाडचे किल्लेदार’. दुसरे म्हणजे ’कल्याण बाजार’ वगैरेचे सांकेतिक आकडे समजणारे ‘मटकाबहाद्दर’ आणि तिसरे आमच्या सारखे ’सिनेदार’. कुठला सिनेमा कुठे लागला आहे ते बघून ठेवायचं. टॉकीज शोधण्यासाठी पुण्याचे गल्ली-बोळ आणि कँप ते पार खडकी-दापोडी पर्यंतचे रस्ते पालथे घातले. रस्ता चुकलो किंवा माहिती नाही असं वाटलं तर जवळपासच्या रिक्षावाल्यांना विचारायचं; एकदम perfect directions मिळायच्या. ‘प्रभात’ मध्ये तर चित्रपटाचं नाव आणि फोटोबरोबर १-२ ओळींत जाहिरातही असायची. म्हणजे काहीतरी असं --
“संपूर्ण कुटुंबाने पहावा असा -- हम आपके हैं कौन” !
“अभिनयाच्या ’शहेनशाह’चा आता ‘अग्निपथ’ !
“कुर्बानी ! तुफान दन्नादन्नी !! विनोद खन्ना, फिरोज खान आणि ’चिकणी झीन्नी’ झीनत अमान”!

काही वर्षांनंतर रोज संध्याकाळी बातम्या आणि गावगप्पा (gossips) कळायला लागल्या; पुण्यात ‘संध्यानंद’ मिळायला लागला. (जाहिरात असायची -- आज का आनंद ‘संध्यानंद’). आता माहिती नाही पण ‘तीन डोक्यांच्या कुत्र्याचा अमेरिकेत जन्म’ किंवा ‘बर्म्युडा ट्रॅंगलचा अजून एक रहस्यमय बळी’ वगैरे अशा प्रकारच्या (बीबीसीलाही न मिळणाऱ्या) बातम्या असायच्या !!!

सुट्टीत मुंबईला गेलो की ‘महाराष्ट्र टाइम्स’ (जाहिरात -- ‘पत्र’ नव्हे, ‘मित्र’), ‘लोकसत्ता’, ‘नवा काळ’ किंवा ‘सामना’ (हिंदूह्रुदयसम्राटांचा) असे पेपर्स वाचायला मिळायचे. तीन घड्या घातलेले ह्या पेपर्सपैकी एक किंवा Indian Express / Times of India मुंबईकरांच्या काखोटीला हमखास असायचे. मुंबईतल्या पेपर्सचे fonts पुण्यातल्या पेपर्सच्या फॉंट्सपेक्षा वेगळे असायचे. (मुंबईतला कुत्रासुध्दा जागेअभावी शेपटी उभीच हलवतो ना, तसंच काहीसं !! Just kidding J ) खरं सांगायचं तर मुंबईचे पेपर्स तेव्हा कधीही ‘आपले’ वाटले नाहीत. अर्थात मुंबईच्या आत्या, मामा, मावशी ह्यांपैकी कोणीही पुण्याला आले की त्यांना ‘लोकसत्तेत’ किंवा ‘मटा’मधे काय आलंय ते वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही !!

Enligsh वर्तमानपत्रांशी आपला संबंध म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’! नाही म्हणायला मधेच कधीतरी हुक्की यायची आणि ‘Times of India’ किंवा ‘Indian Express’चं दर्शन घ्यायचो. जुन्या मॅट्रिकपर्यंतच शिकूनही अप्पांचं English खूप छान होतं; विशेषत: English grammer. त्यांना कुठलाही शब्द विचारला की नक्की म्हणायचे, “पूर्णं वाक्य काय आहे?” शब्दांपेक्षा वाक्य आणि वाक्यांपेक्षा अर्थ पाहायला त्यांनी नकळत शिकवलं! मला किंवा मंदारला शब्द अडला की त्यांचा आधी भर असायचा dictionary उघडून आम्हीच अर्थ शोधण्यावर. कधी कधी कळायचंच नाही, आपण पेपर वाचतोय की डिक्शनरी? नवीन शब्द अडला की त्याचा अर्थ साधारणपणे कुठल्या पानावर सापडेल ते मात्र पक्कं समजायला लागलं. ‘Practice makes a man perfect’, दुसरं काय!

अमेरिकेत आल्यावर तर गेल्या काही वर्षांत electronic media ने जणू ‘अलिबाबाची गुहा’ उघडून दिली. ‘तिळा तिळा, दार उघड’ च्या चालीवर नुसतं ‘गुगल गुगल, साईट उघड’ म्हणायचं !!! सकाळ, लोकसत्ता, मटा, सामना !!! सगळ्यांच्या वेब साईट्स आहेत. नागपूरच्या मित्रांची ‘येतो नं बे तू?’ अशी प्रेमळ धमकी ऐकतानाच त्यांचा ‘लोकमत’ सापडला. दर आठवड्याला ‘लोकप्रभा’ मिळायला लागला. Rediff, BBC, CNN वगैरे तर मिळालंच पण फक्त क्रिकेटसाठी ‘क्रिक इन्फो’ किंवा ‘क्रिक बझ’ मिळाले. You Tube’ ही तर जणू ‘अलिबाबाची दुसरी गुहा’ सापडली.

मध्यंतरी कुठेतरी एक फार छान लेख वाचला होता. वृत्तपत्रच काय पण जगभर सगळ्यांचं एकंदर वाचन कमी झालं आहे असा ओरडा आपण नेहमीच ऐकतो. त्या लेखात होतं की वाचन कमी झालं नाहीये तर वाचनाचं माध्यम बदलत चाललंय. छापील वृत्तपत्र नाही वाचलं तरी लोक web sites बघतातच. पुस्तक ‘वाचायला’ वेळ मिळत नसेल तर आपण अट्टल लोक ‘audio book’ ऐकतो ना तसंच! अमेरिकेतून भारतातल्या बातम्या वाचणं म्हणजे तर जणू ‘उद्याची बातमी आजच मिळणं’ !!!

Wednesday, September 26, 2007

धमाल-मस्ती: ट्वेंटी२०

जिंकलो रेsss !!! जीत गए याsssर !!! WE DID IT MAN !!!

भारतातल्याच काय पण जगभरच्या भारतीय क्रिकेटरसिकांनी ऐन गणपतीत दिवाळी साजरी केली. बघता बघता तरूण भारतीय संघ ‘under dogs’ चा ‘World Chapions’ झाला. भारत-पाकिस्तानचा सामना नेहमीच World Cup Final पेक्षाही महत्वाचा असल्यासारखा पाहिला जातो. इथे तर साक्षात ‘Dream Final’ होती. भारताचा इतका कमी स्कोअर पाहून मन खट्टू झालं होतं पण इंटरनेटच्या text commentary मधे “Irfan is on fire” ही अक्षरं झळकली आणि सुखद विजयाची चाहूल लागली. शेवटच्या ओव्हरमधे तर पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकने सिक्स मारल्यावर प्राण कंठाशी आले होते. तेव्हढ्यात त्याचा पुढचा फटका श्रीशांतच्या हातात विसावला ! आपला भारत विश्वविजेता !!! चोवीस वर्षांनंतर ते सोनेरी क्षण परत आपल्या दारी !!! 1983 साली कपिलच्या संघानेही सगळ्यांना धक्का दिला आणि आता धोनीच्या ‘young Indian team’ ने क्रिकेटच्या भल्या-भल्यांना चकित केलं. आजपर्यंत झालेल्या सगळ्या विश्वचषकाच्या सामन्यांप्रमाणे आपण परत एकदा पाकिस्तानला हरवलं.

हा विजय मिळवलाय सळसळत्या तारूण्यानं ! हा विजय मिळवलाय ठासून भरलेल्या आत्मंविश्वासानं! हा विजय मिळवलाय, एकट्या-दुकट्यानं नव्हे, संपूर्णं संघानं !!!!

सि़क्स, सि़क्स, सि़क्स, सि़क्स, सि़क्स आणि… सि़क्स !!!

युवराज सिंगने ‘Twenty20’ मध्ये इंग्लंडविरूद्ध एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारून आधीच एक इतिहास घडवला. बऱ्यांच वर्षांपूर्वी सर गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री ह्यांनी फ़र्स्ट क्लास क्रिकेटमधे हा पराक्रम केला. त्यानंतर हर्शेल गिब्सनं एक दिवसीय सामन्यांत ह्या विक्रमावर आपले नाव कोरले. आता युवराजने Twenty20 क्रिकेटच्या इतिहासात स्वत:च्या नावाचे पान तयार केले. (पहा -- http://www.youtube.com/watch?v=bob85WbW8cU ) पायाशी आलेला चेंडू नुसता फ्लिक करून त्याने विनासायास मारलेला दुसरा षटकार म्हणजे तर ‘टायमिंगचं’ उत्तम उदाहरण आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर, क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात, ओळीनं सहा षटकार मारणं अतिशय अवघड असतं. दुसरं म्हणजे त्याचे सहाही फटके एकदम खणखणीत होते. ‘चुकून लागला’, ‘पट्टा फिरवला’ किंवा ‘आंधळी मारली’ वगैरे भानगडी नव्हत्या. अजून एक म्हणजे ‘युवी’च्या आधी तिघांनीही फिरकी गोलंदाजांना षटकार मारले होते. वेगवान गोलंदाजीला सलग सहा वेळा छपरावर किंवा प्रेक्षकांत भिरकावणं, ते ही मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना, अजूनच अवघड. युवराजचा विक्रम खरंच खूप मोठा आहे.

Twenty20 मधील एक विचित्र प्रकार म्हणजे ‘बॉल-आऊट’ ! भारताने पाकिस्तानविरूद्ध ‘टाय ‘ झालेला पहिला सामना विनोदी पद्धतीनं, अर्थात ‘बॉल-आउट’ पद्धतीनं, जिंकून अजून एक पराक्रम (!) केला होता. त्या व्हिडियोसाठी पहा http://www.youtube.com/watch?v=Pmx7rFwIYec&NR=1

अर्थात हे सगळं चालू असतानाच मनात मनात येतं ‘च्यायला, हे खरंच क्रिकेट आहे का?’. त्याच सुमारास ‘संबित बाल’ने लिहिलेला हा लेख वाचला.
http://content-usa.cricinfo.com/columns/content/current/story/311578.html
तो म्हणतो तसं खरंच , काय चूक आहे एखादी मॅच टाय झाली तर? फुटबॉलची (किंवा हॉकीची) copy क्रिकेटने आंधळ्यासारखी का करावी? उलट ती मॅच अमूल्य असायला हवी. सव्वाशेहून जास्त वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्याच मॅचेस ‘टाय’ झाल्या आहेत.

T20 हा क्रिकेटचा ‘छोटा charger’ दिवसेंदिवस लोकप्रिय होत जाणार आहे त्यात शंकाच नाही. T20 सामने म्हणजे ‘कल्ला’ चालला होता. भारतात फोन केला की दहावीतला भाचा विक्रम एकदम एक्साईट झालेला असायचा. शेंडी तुटो वा पारंबी -- दिसला बॉल की मार उचलून. नुसती हाणामारी, चौकार-षटकारांची आतषबाजी. आता वीस षटकांत दीडशे धावा वगैरे म्हणजे अगदीच मापातलं टार्गेट वाटतं.

निराशावादी सूर आळवतोय हा गैरसमज नसावा पण ‘ट्वेंटी२०’ चे साधारण नियम, खेळाचा ढाचा पाहिला की वाटतं बॉलिंग ही ‘कला’ संपत जाईल का? किती फिरकी गोलंदाज चेंडूला flight द्यायला धजावतील? किती वेगवान गोलंदाज तीन स्लिप्स लावण्याची ‘चैन’ करून बेमालूम ‘आऊट स्विंगर’ने फलंदाजाला मागे झेल द्यायला भाग पाडतील? अर्थात हे प्रश्न तर एक दिवसाचं क्रिकेट मूळ धरू लागलं तेव्हासुद्धा विचारले जातच होते. जेव्हा एखाद्या ‘ट्वेंटी२०’ सामन्यात न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी (फिरकी खेळण्यात comfortable समजल्या जाणाऱ्या) भारतीय फलंदाजांना नाचवतो, ऑस्ट्रेलियाचा ‘तेजतर्रार’ ब्रेट ली हॅट-ट्रिक घेतो, आपला श्रीशांत ‘हाणा-मारी क्रिकेट’च्या अंतिम सामन्यात चक्क निर्धाव षटक (maiden over) टाकतो किंवा हरभजनसारखा फिरकी गोलंदाज एखाद्या सामन्यातलं शेवटचं षटक टाकून प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवतो आणि विकेटही काढतो तेव्हा आशादायक चित्र दिसतं.

नुसती बॉलिंगच नाही पण बॅटिंगचं काय? प्रत्येक चेंडू उचलावा असंच जर वाटणार असेल तर लेट कट, ग्लान्स असे नाजूक आणि कलात्मक फटके कोण दाखवेल? डेव्हीड गावर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, ह्यांच्यासारखे कलाकार पैदा होतील? की सगळेच जण ‘शाहीद आफ्रिदी’?!!! ऑफ साईडला बाहेर पडलेले चेंडू सोडून देण्यासाठी आपला चौथा स्टंप नक्की कुठे आहे हे फलंदाजांना माहिती असेल? की चेंडू सोडून देणं हीच चूक समजली जाईल? एकेरी-दुहेरी ‘चिकी’ धावांनीही धावफलक हलता ठेवून, प्रतिस्पर्ध्यांच्या नकळत, षटकामागे ८-९ धावांची गती राखणाऱ्यांना संघात जागा असेल? योग्य ‘calling’ मधून दोन फलंदाजांचा एकमेकांवरचा विश्वास दिसेल? (सौरव गांगुली एकेरी धावा काढणं टाळेल; म्हणजे त्याचे कष्टं वाचतील आणि आपल्याही जीवाची ‘धाकधूक’ आपोआप वाचेल!!) सचिन, सौरव किंवा सेहवागच्या आक्रमकतेबद्दल प्रश्नच नाही पण हां, राहुलचं ‘तंत्र’ जेव्हा आक्रमण करेल ना तेव्हा मात्र मॅच पहायला अजून धमाल येईल. आठवा, भारत वि. न्यूझीलंड – १९८७. वन डेजचा वर्ल्ड कप, नागपूर मॅच. सुनील गावसकरने खुद्द श्रीकांतलाही ‘बघ्यांपैकी एक’ केलं होतं !!

एक मात्र आहे. T20 मुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा सुधारेल. किंबहुना प्रत्येक संघाला तो सुधारावाच लागेल. एक-एक धाव प्राणमोलाची असेल आणि ती अडवण्यासाटी जिवापाड धडपड करावी लागेल. ‘catches win matches’ ह्याचा खरा अर्थ भारतीय संघाला आता समजायला लागेल.

पण आता जाणवतं, one day cricket जेव्हा लोकांना आवडायला लागलं तेव्हा आमच्या आधीची पिढी का म्हणायची, “छ्या… वन डे वगैरे आपलं टाईमपासला ठीक आहे हो पण टेस्ट मॅचेस हेच खरं क्रिकेट”!!! वयाच्या तिशीतच असे म्हाताऱ्यासारखे विचार का मनात यावेत? क्रिकेटचा सामना चार तासांचा झाला म्हणून वाईट वाटावं की क्रिकेटचा समावेश Olympic Games मधे करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यात आनंद मानावा?

कुणी सांगावं, बेसबॉल आणि अमेरिकन फूटबॉलमधून डोकं बाहेर काढलं तर, उद्या अमेरिकन्सनाही क्रिकेट आवडायला लागेल!! ‘Super Bowl Party’ सारख्या ‘Cricket Party’ ‘देसी’ घरांच्या सोबतीनं ‘फिरंग’ घरीही झडतील. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांतसुद्धा, मोजक्या देशांच्या World Cup पेक्षा, Olympic Games Cricket हा नशा अजून मोठा असेलही.

सध्यातरी म्हणूया “The party is on with T20”.

कालाय तस्मै नम:! How’s That?

Saturday, September 15, 2007

गणपती बाप्पा, मोरयाsss

‘ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण… ढडाढाण…टडाढाण…
ढडाढाण…टडाढाण… ढाण्ण !!!’

ढोलाचा असा आवाज कानात रूंजी घालू लागला की जाणवतं, आता गणपती येणार मन आठवणींच्या राज्यात रमतं.

फ्लॅश बॅक – पुणे

गणपतीच्या आठवणींची सुरुवात अगदी लहानपणापासून होते. गणेश चतुर्थीला घरोघरी उकडीचे मोदक. वाफेभरला मोदक फोडून, त्यावर साजूक तुपाची पातळ धार धरायची आणि मग गट्टम !! कसं माहीत नाही पण दुपारी मोदकांचं जेवण झाल्यावरही थोड्याच वेळात क्रिकेट किंवा टेबल टेनिस खेळण्याचा उत्साह त्या वयात असायचा.

अगदी लहानपणी आम्ही सगळी पोरं एक मात्र कटाक्षाने पाळायचो ते म्हणजे गणेश चतुर्थीला रात्री चुकूनही चंद्राकडे बघायचे नाही. लहानपणी ऐकलेली गोष्ट अशी होती की एकदा गणपती मूषकावर स्वार होऊन निघाला होता. काहीतरी गडबड झाली आणि गणपती खाली पडला. नेमके ते चंद्राने पाहिले आणि गणपतीच्या फजितीला तो हसला. गणपतीला आला राग आणि त्याने चंद्राला दिला शाप,”जो कुणी गणेश चतुर्थीला तुझे दर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आळ येईल आणि तुझ्यावर कायमचा डाग राहील”. तेंव्हापासून चंद्रावर, अगदी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रावरही, डाग पडले ते कायमचेच !!!

पुण्यातल्या आमच्या ‘बॅंक ऑफ इंडिया सोसायटी’मधे सोळा घरं आहेत. त्यापैकी बहुतेक सर्वं घरांत गणपती यायचे. आमच्या घरचा गणपती अप्पांच्या जन्मगावी पालघरला असतो. त्यामुळे आमच्या घरी पुण्याला गणपती आणत नाहीत पण आई मोदकाचा नैवेद्य वगैरे साग्रसंगीत करते. कधी कधी खूप वाटायचं आपल्या घरीही गणपती असावा. आमच्या सोसायटीत मात्र ही उणीव बऱ्याच प्रमाणात भरून निघायची. रोज संध्याकाळी प्रत्येक घरी आरतीला जायचो. ‘सुखकर्ता, दु:खहर्ता..’ सुरु व्हायचं आणि ‘घालीन लोटांगण…’ पर्यंत अंगात एक छान ताल भिनायचा. ‘त्वमेव माता च, पिता त्वमेव..’ काय छान ओळी आहेत ना? आरत्यांनंतर सुरु व्हायची धीरगंभीर ‘मंत्रपुष्पांजली’. आरती कुणाकडेही असली तरी फुलं वाटायचं काम आम्हा मुलांचं. गणपतीसमोर आरतीचं तबक घेऊन उभे असलेले काका ते तबक सगळ्या गर्दीतून फिरवायचे. मंदपणे तेवणाऱ्या ज्योतीवर आई किंवा आजी तिच्या हातांचे तळवे फिरवायची. लगेच ते ऊबदार हात आमच्या चेहऱ्यावरून अलगद फिरायचे. आरतीची ती ऊब वेगळीच असते. तीर्थं पिताना दोन थेंब डोळ्यांना लावले की मिळणारा गारवाही वेगळाच असतो ना! हाती एक फूल घेऊन शांतपणे ‘ओssम यज्ञेssन यज्ञsमयजंssत देवाss…’ मधे आपला सूर मिसळायचा आणि सरतेशेवटी फूल बाप्पांच्या पायाशी ‘अर्पणमस्तु’. एकाएकी कुणीतरी ओरडायचं, “गणपती बाप्पाsss”. आम्ही सगळी पोरं मग बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडायचो, “मोरयाssss”. अर्थात बालवयाला अनुसरून, एक डोळा ‘आज प्रसाद काय मिळणार?’ ह्यावर असायचा.

आमच्या कॉलनीतील नाटकांमध्ये भाग घ्यायचा, कविता म्हणायचा किंवा नकला करायचा उत्साह दांडगा असायचा. आमची बॅंक ऑफ इंडिया सोसायटी, समोरची एल. आय. सी. कॉलनी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया सोसायटी असे सगळे मिळून कॉलनीमध्ये मोकळ्या मैदानावर गणपतीच्या निमित्त २/३ हिंदी सिनेमा आणायचो. जमिनीत दोन मोठे बांबू रोवून त्यांना मोठ्ठा पांढरा पडदा ताणून बसवायचे. समोरच्या बाजूने प्रोजेक्टरवर रीळे बसवून सिनेमा लावायचे. थोड्या थोड्या वेळाने रीळ बदलावे लागे आणि पुढचा भाग सुरू होण्याआधी पडद्यावर आकड्यांचा ‘count down’ यायचा. त्यावेळी DVD / VCR तर सोडाच पण T.V. सुद्धा चैनीची गोष्ट होती. मोकळ्या ग्राउंडवर सतरंजीवर बसून, अंगाभोवती चादर गुंडाळून पाहिलेले ‘जंजीर’, ‘सीता और गीता’, ‘शंकर-शंभू’ वगैरे चित्रपट वाऱ्याचा गारवा, गवताचा वास आणि मित्रांचा सहवास ह्यांसकट मनात ताजे आहेत.

गणपतीच्या दिवसांत पुण्याचे गणपती पहायला जाणं म्हणजे आनंद असायचा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे देखावे असायचे. कुठे ‘दशावतार’ तर कुठे ‘तुकारामांचे सदेह वैकुंठगमन’. कुठे ‘कीचक-वध’ तर कुठे ‘कालिया मर्दन’. अगदी ‘आग्र्याहून सुटका’, ‘अफझलखान वध’ असायचंच पण ‘चले जाव’ चळवळ किंवा ‘मिठाचा सत्याग्रह’ सुद्धा असायचे. सगळ्यात मजा यायची ती हिराबागेचा गणपती पहायला. कित्येक वर्षांपर्यंत फक्त हिराबागेसमोर हलता देखावा असायचा. ते हलणारे अवाढव्य पुतळे आणि मोठ्ठया स्पीकर्समधून ऐकू येणारे संवाद परत कधी अनुभवता येतील?

काही वर्षांनंतर आमचा सख्खा काका डेक्कन जिमखाना इथे एका वाड्यात राहू लागला. वाड्याच्या मध्यभागी एक चौक होता. त्याचे छत म्हणजे एकदम मोकळं आकाशच. त्या चौकात वाड्याचा सार्वजनिक गणपती असायचा. कधीकधी आरती करताना पावसाचा हलका शिडकवा व्हायचा आणि सचैल स्नानात आरती व्हायची. सगळा वाडा संध्याकाळच्या आरतीला हजर असायचा. सुरेशभाई आणि प्रवीणभाई हे शहा बंधू असले की आरती अजूनच खुलायची. वरच्या पट्टीत ‘येsssई ओsss विठ्ठलss माssझेss माsssऊssलीss येssss’ म्हणत ताना लांबवताना मजा यायची. ‘गणपती बाप्पा, मोरयाsss’ चा गजर झाल्यावर प्रवीणभाई हमखास चढ्या आवाजात ‘मोरया…मोरया… मोरया…मोरया…’ असं बराच वेळ एका दमात म्हणायचे. त्यांच्याबरोबरीनं म्हणताना दम निघायचा पण जाम धमाल असायची.

अनंत चतुर्दशी म्हणजे तर मजाच मजा असायची. शोभाआत्याकडे अनंताची पूजा असते. माझे आजोबा आणि शाळकरी मी अशी जोडगोळी चित्र्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दरवर्षी आत्याकडे पूजेला जायचो. दुपारी जेवण झालं की लगबगीनं आत्याच्या बाजीरावरोडवरच्या घरून निघायचो. तीन वाजता अलका टॉकीजच्या चौकात पोलीस ट्रॅफिक अडवायचे. आम्ही मग रिक्शातून उतरून लकडीपुलावरून वन-टू, वन-टू करत काकाच्या घरी जायचो. पांढरा शुभ्र लेंगा, लांब बाह्यांचा शुभ्र सदरा आणि कोनदार पांढरी गांधी टोपी घातलेले, झपझप पावले टाकत चालणारे आजोबा तस्सेच डोळ्यांपुढे येतात. आजोबा एके काळी हौस म्हणून संगीत नाटकांमधून काम करायचे. चालताना ते कधी-कधी छानपैकी ’प्रभू अजि गमला…’ सारखं एखादं नाट्यगीत गुणगुणायचे. ते ऐकत मी माणसांच्या गर्दीतून वाट काढायचो. लकडी पुलावर फुगेवाले, भेळवाले जमू लागत. त्यात ‘व्यास भेळ’ ही पाटी दरवर्षी हमखास दिसायची. बासरी, पिपाणीवाले म्हणजे तर खास आकर्षण होते. साधारण चार वाजण्याच्या सुमारास मानाचे पाच गणपती लकडी पुलावरून विसर्जनासाठी जायचे. पहिला असायचा – पुण्याचं ग्रामदैवत – कसबा गणपती. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा असे एकापाठोपाठ जायचे. रस्त्याच्या दुतर्फा हीsss गर्दी असायची. मानाच्या गणपतींसमोर ‘ज्ञान प्रबोधिनी’ शाळेचं पथक असायचं. त्यांचं लेझीम बघताना आपोआप पाय ताल धरायचे. काय लयीत पडायची त्यांची पाऊलं !! असं वाटायचं जणू प्रत्येकाचं अंग म्हणजे एक-एक लेझीमच झालंय. पथकाच्या पुढे एक जण झेंडा उंच उंच उडवत असायचा. शिवाय प्रत्येक मंडळाच्या गाडीसमोर ढोल आणि मोठ्या झांजांचा तो वेडावणारा आवाज, “ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!! ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!” दुपारी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी मिरवणूक संपेपर्यंत तो आवाज कानात घुमत राहयचा.

संध्याकाळी काकाच्या वाड्यातल्या गणपतीचं विसर्जन. आरत्या झाल्या की मस्तपैकी नाचत-नाचत, गुलाल उधळत आणि लाल रंग मिरवत नदीपर्यंत जायचं. “गणपती बाप्पा, मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना आमचे आवाज टिपेला जायचे. मध्येच अप्पा मुलायम आवाजात गायचे, “मार्गे हळू-हळू चाला, मुखाने गजानन बोला” आणि मग आमचेही आवाज संयत व्हायचे. नदीवर पुन्हा एकदा आरत्या, पण मोजक्याच. मग दोन-तीन लोक चांगल्या कंबरभर पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उभे राहयचे. बाप्पांना तीन वेळा पाण्यात स्नान करवून नदीबरोबर द्यायचे. विसर्जन झाल्यावर पाटात नदीवरची थोडी वाळू भरून घ्यायची. परत येतान पावलं ओढल्यासारखं व्हायचं. वाड्यात आल्यावर बाप्पांच्या रिकाम्या मखराकडे पाहताना कससंच व्हायचं. आता भारतातून चार-सहा महिन्यांसाठी आलेले वडिलधारे परत गेले की त्यांना एअरपोर्टवर सोडून घरी आल्यावर त्यांची रिकामी खोली पाहताना तसंच वाटतं.

थोड्या वेळाने वाड्यात कोरड्या भेळीचा कार्यक्रम ठरलेला असायचा. गुलालाचे लालभडक हात धुतल्यासारखं करायचं आणि भेळ हवी तेव्हढी झणझणीत करून घ्यायची. रात्री थोडा वेळ परत लकडी पुलावर गणपतीची मिरवणूक पहायला जायचं. आतापर्यंत तिकडे गर्दीचं रूपांतर जत्रेत झालेलं असायचं. “चर्र…’ आवाज करत भजी-बटाटेवडे आपल्या गाडीकडे बोलावू पहायचे. ओळखीचा एखादा मोठा मुलगा एन.सी.सी.च्या ड्रेसमध्ये गर्दी सांभाळताना दिसायचा. गर्दीत न हरवता, काकाच्या घरी परतायचं आणि आंघोळ करून थोडा वेळ झोप काढायची. पहाटे काकी किंवा वंदनाआत्या उठवायची, “चला, चला..लायटींगचे गणपती आले.” मग झोप झटकून मी आणि मंदार त्यांच्याबरोबर निघायचो. हे गणपती म्हणजे ज्यांच्या मिरवणूक रथावर लायटींग केलेले असायचे ते. रात्रीच्या अंधारात एक एक मिरवणूक रथ रोषणाईने नुसता उजळललेला असायचा; पण त्या सगळ्यांचा राजा म्हणजे ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’. तो रथ म्हणजे जयपूर, उदयपूर वगैरे ठिकाणच्या एखाद्या राजवाड्याची प्रतिकृती असायचा. त्यावर छोटे छोटे जणू लक्ष लक्ष पिवळे दिवे उजळलेले असायचे. ‘झगमगाट’ ह्या शब्दाचा अर्थं समजण्यासाठी दगडूशेठ हलवाईचा रथ नक्की बघावा. दगडूशेठ हलवाईचा गणपतीची ’नवसाला पावणारा’ अशी ख्याती आहे आणि त्या मूर्तीचं दर्शनही अतिशय प्रसन्न करणारं आहे.

दुसऱ्या दिवशी पहावं तर गरवारे पूल, लकडी पूल, टिळक रोड, लक्ष्मी रोड वगैरे गुलालाच्या सड्यांनी आणि फुलांच्या पाकळ्यांनी नुसते रंगलेले असायचे.

कॉलेजमध्ये असतानाच्या तर आठवणी अशाही छान असतात. त्यातही गणपतीच्या आठवणी काय सांगाव्या? एक तर कॉलनीच्या सार्वजनिक गणपतीचा मांडव घालणे वगैरे असायचं. वर्गणीसाठी सगळीकडे विनासंकोच फिरणं असायचं. चार ठिकाणी चौकशी करून हव्या त्या वस्तू घ्यायच्या. मांडव घातल्यावर मांडवाखाली, मोकळ्या जागेत गप्पांच्या रात्री जागवायच्या. आता वळून पाहताना जाणवतं की सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे नकळत ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’चे धडे गिरवणं होतं. फारसे रिसोर्सेस आणि फ़ंडिंग हाताशी नसताना, सगळे गोंधळ अणि वाद निस्तरत, क्वॉलिटी प्रॉडक्ट योग्य खर्चात आणि मुख्य म्हणजे वेळेत तयार करायचं. हो ना..नाहीतर गणपतीचा मांडव आणि आरास अनंत चतुर्दशीला तयार होऊन काय उपयोग? ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ तरी काय वेगळं असतं?

कॉलनी किंवा कॉलेजच्या मित्रांबरोबर रात्र-रात्रभर गणपती बघत फिरणे म्हणजे धमाल असायची. खिशात फार पैसे नसायचे. त्यामुळे ‘चैतन्यकांडी’ (पुणेरी भाषेत) ओढणाऱ्यांसाठी पैसे उरावे म्हणून अर्ध्या चहातही आनंद असायचा. ‘रॉंव..रॉंव’ करत बाइक्सवरून बुंगाट जाण्यात धुंदी होती. गणपती पहाण्यापेक्षा इतर ‘प्रेक्षणीय’ स्थळांकडे नजर जास्त वळायची. डेक्कन किंवा योग्य ठिकाणी, म्हणजे जे पहायचे ते नजरेच्या टप्प्यात आपसूक दिसेल तिथे, गाड्या लावून धत्तिंग करण्यात चहाचे ग्लास संपायचे. अर्थात मित्रांबरोबरच मैत्रिणीही असतील तर त्यांना गर्दीतील हुल्लडबाजांकडून त्रास होत नाही ना ते सांभाळलं जायचं.

कॉलेजमध्ये असताना मग मुंबईला आणि पालघरला चक्कर व्हायची. अंधेरीला भाईमामा किंवा मुलुंडला दिलीपमामाकडे आलटून पालटून गणपती असत. दुपारी जेवणं झाली की गाणी, गप्पा आणि मिमिक्रीची मैफल व्हायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मग मुंबईहून पालघर गाठायचं. कधी बरोबर आतेभावांपैकी श्रीराम किंवा निलेश असायचे तर कधी मी एकटाच. पालघर जवळ येतंय हे आजूबाजूच्या दृश्यातल्या बदलानेच कळायचं. मोठ्या नदीवरून ट्रेन धडधडत जायची. पाण्यात पैसे टाकण्यासाठी खिडकीजवळ गर्दी व्हायची. नुकत्या सरलेल्या श्रावणाची हिरवाई दूर दूर पर्यंत दिसायची. मध्येच, जणू छोटे पांढरेशुभ्र डोंगर दिसणारी, मिठागरे असायची. सकाळी साडेनऊच्या सुमारास पालघर यायचं. कधी कोवळं ऊन असायचं तर कधी नुकत्या पडलेल्या पावसामुळे आसमंत छान कुंद असायचं. स्टेशनसमोर एक यू.पी.वाल्या भैय्याचं ‘स्वीट मार्ट’ टाइप रेस्टॉरंट होतं. मस्त गरमागरम कचोरी, समोसे मिळायचे. गरम कचोरी आणि समोसे फोडून त्यात चिंचेची आंबट-गोड चटणी, हिरव्या मिरच्यांची तिखट चटणी भरायची, त्यावर पिवळीधम्मक कुरकुरीत बारीक शेव घ्यायची आणि जोडीला वाफाळता चहा. अहाहा…सुख!!! आबाकाकाचं नाव रिक्षावाल्यांना सांगितलं की ते डायरेक्ट काकाच्या घरी सोडायचे. घरच्या गणपतीची आरती वगैरे झालं की बाजारातून काही ना काही आणायला काकाबरोबर त्याच्या बुलेटवरून रूबाबात गावात चक्कर मारून यायचं. जाणारे-येणारे काकाला हात करायचे. तो ही दमदार आवाज द्यायचा, ’दर्शनाला येऊन जा’, किंवा ’आप्पाचा मुलगा आलाय’!!! तेव्हा कळायचं अप्पांनी पालघर सोडून इतकी वर्षं झाली तरी अजून कितीतरी लोक त्यांच्या आठवणी काढतात. दुपारी जेवण करून दोनच्या गाडीने मुंबईला परत. पालघर तेव्हा निवांत गाव होतं. दुपारी दोनला गाडी गुजरातहून पालघरला यायची तर काका दोन-पाच, दोन-दहाला कुणाला तरी पिटाळायचा, ”जा रे , बघ जरा गाडी कधीपर्यंत येईल?” मग गाडी यायच्या वेळेला तिथल्या तीन काकांपैकी कुणीतरी एक बुलेटवर बसवून स्टेशनवर सोडायचा. जातानाही वाटेत भेटणाऱ्यांना आवाज द्यायचे, “जरा आप्पाच्या मुलाला सोडून येतो!!”
मुंबईहून मग पुण्याला घरी परत.

पुण्यातल्या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य महणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलेचेल. अगदी गल्लीपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत काही ना काही चालू असायचं. काही वर्षांनंतर ‘पुणे फेस्टिवल’ सुरु झाला आणि ह्या कार्यक्रमांत भरच पडली. पुण्यातल्या गणपती उत्सवाने असंख्य कार्यकर्ते, नेते घडवले. कित्येक कलाकारांना लोकांनी डोक्यावर घेतलं.

मला विशेष आठवणारा एक कार्यक्रम म्हणजे मल्लिका साराभाईंच्या नृत्याचा. एक पांढरा पडदा स्टेजवर आडवा टाकून त्यावर त्यांनी नृत्य केलं. नृत्य करताना अधूनमधून त्या हातातले रंग पडद्यावर टाकत होत्या. शेवटी जेंव्हा पडदा उभा केला तेंव्हा आम्ही सगळे चक्रावून पहात होतो की त्यांनी नृत्य आणि रंग ह्या मिलाफातून पडद्यावर गणपती चितारला होता !!

असेच लक्षात राहणारे कार्यक्रम झाले ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’ गणपतीच्या शताब्दीपूर्तीवेळी. दहा दिवस रोज शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत्या आणि त्याही विनामूल्य. सारसबागेजवळच्या मैदानात प्रचंड मोठा मांडव टाकला गेला होता. एका रात्री पं. हरिप्रसाद चौरसिया ह्यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम होता. ‘जा तो से नहीं बोलू कन्हैया’ – हरिजींचा प्रसिध्द ‘हंसध्वनी’ सुरु झाला आणि काही श्रोत्यांनी तालावर टाळ्या वाजवायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीत मनापासून आवडणारे आम्ही काही लोक इतरांना खुणा करू लागलो की प्लीज टाळ्या थांबवा. सगळा प्रकार अगदीच असह्य झाल्यावर हरिजी वाजवायचे थांबले आणि शांत आवाजात त्यांनी चक्क खडसावलं, “यहॉं मदारी का खेल नहीं चल रहा !!”. क्षणात सगळीकडे शांतता पसरली. त्यानंतर मात्र हरिजींनी श्रोत्यांना अगदी मनमुराद बासरी ऐकवून धुंद करून टाकले.

त्याच ठिकाणी दोन/तीन दिवसांनंतर कार्यक्रम होता स्व. उ. विलायत खॉंसाहेबांचा. रात्री ११ ते पहाटे जवळपास ४:३० पर्यंत खॉंसाहेब वाजवत होते. रात्री उशिरा आम्ही कॉलेजच्या मैत्रिणींना पटकन त्यांच्या घरी सोडायला गेलो. बाकीचे मित्रही घरी गेले आणि मी परत कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. आता मांडवात अगदी तुरळक लोक होते पण आम्ही सगळे जणू बेहोष झालो होतो. गायकी अंगाने वाजणाऱ्या सतारीचे सूर जास्त गोड होते की वाजवताना खॉंसाहेब मधूनच बंदिश गायचे ते जास्त मधाळ होतं हे ठरवताच येत नव्हतं. मी मांडवात मागच्या बाजूला उभा राहून ऐकत होतो. खॉंसाहेबांनी पहाटे “भैरवी” सुरु केली. काळजाचा ठाव घेणारी ती अजोड ‘भैरवी’ ऐकता-ऐकता डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. वादन संपल्यावर भानावर येऊन पाहिलं तर आजूबाजूचे लोकही त्याच अत्यानंदाच्या अनुभूतीने डोळे पुसत होते.

माझं भाग्यं मोठं म्हणून गणपती उत्सवात त्यादिवशी मी देवाची सतार अनुभवली.
- गणेश चतुर्थी, २००७

Saturday, September 8, 2007

शब्दस्नेह

मनस्वी अंतरीचे
धुमारे, ताटवे फुलावे
सोबतीला एकटेपणी
शब्द चार असावे…!!!