Monday, November 15, 2010

शिरवळकर नावाचं गारूड


१५ नोव्हेंबर -- कै. सुहास शिरवळकरांचा जन्मदिन ! 

ह्या लेखाचे पूर्वप्रकाशन ’सुहास शिरवळकर – असे आणि तसे’ ह्या पुस्तकात झाले आहे पण ब्लॉगवर हा लेख प्रकाशित करण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस कुठला?

---------------------------------------------------------------------------
‘८५२, रविवार पेठ, पुणे’ हा पत्ता कधीच विसरणार नाही. तो सुहास शिरवळकरांच्या घराचा होता !

सुशिंची पुस्तकं वाचायला सुरूवात नक्की कुठल्या पुस्तकाने केली ते आठवत नाही, पण झपाटल्यासारखी सगळी वाचून काढली होती. एकदा / दोनदा  आणि काही पुस्तकं तर कित्येकदा ! साधारण नववीत वगैरे असेन जेव्हा मनावर ‘शिरवळकर’ नावाचं गारूड पडणं सुरू झालं होतं.

एकदा अशीच हुक्की आली की त्यांना पत्रं लिहावं.  तो पर्यंत पहिल्या फटक्यातच दहावी पास करून अकरावी सुरू झाली होती. त्यामुळे डोक्यावर दोन अदृश्य शिंगंही फुटली होती ! मग काय, मनात आलं ना , लिहिलं पत्रं आणि टाकलं बिनधास्त. मनात म्हटलं, “फारतर काय होईल? पत्राचं उत्तर येणार नाही, बास ! निदान ‘पत्र टाकायला हवं होतं’ ही रूखरूख तरी राहणार नाही. ”

पण एका दिवशी पोस्टमन पत्र  देऊन गेला. आपल्या नावाचं पत्र आलं ह्याचंच खूप अप्रूप असायचं तेव्हा ! मजकूर वाचण्याआधी नजर वेधून घेतली ती पत्राखालच्या लफ्फेदार सहीनं -  स्नेहांकित, सुहास शिरवळकर !
त्या पत्रातलं ’दुनियादारी मात्र जरूर वाच’ हे त्यांचं वाक्यं अजूनही आठवतंय.  ‘आनंद पोटात माझ्या माईना’ या ओळीचा अर्थ एका झटक्यात समजला.  

आपलं काय असतं ना, एक गोष्ट मिळाली की दुसरी मिळावी असं वाटायला लागतं ! आता वाटायला लागलं होतं की शिरवळकर प्रत्यक्ष भेटले तर काय धमाल होईल ना? पुन्हा एकदा पत्रापत्री झाली. त्यातही किडा म्हणजे साधारण १९७७ सालाच्या सुमारास त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातला काहीतरी प्रश्न विचारला होता.  शिरवळकरांनी सांगितलं एखादा रविवार गाठून साधरण चारच्या सुमारास ये.  

आम्ही चार मित्र चार वाजता म्हणजे चारच्या ठोक्याला त्यांच्या घरी हजर !  ‘रविवार दुपारची झोप’ हा काय मस्त प्रकार असतो आणि त्या झोपेतून कुणाला उठवणं म्हणजे काय पाप असतं हे कळायचं वय नव्हतं हो ते !  चार म्हणाले ना… मग आम्ही चारला हजर !  रविवारच्या झोपेतून उठायला लागूनही, चहाबरोबर आमच्याशी छान हसत, जोक्स वगैरे करत बोलणारे सुशि आवडले म्हणजे आवडलेच होते !

मग पुढे अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या  पण त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो ते कधीच विसरणार नाही. क्वचित कधीतरी अचानकही त्यांच्याकडे चक्कर व्हायची.  ते घरी असल्याची खूण म्हणजे घराबाहेर उभी असलेली त्यांची मोटरसायकल. ’बॉबी’ सिनेमातली ऋषी कपूरची मोटरसायकल आठवतीये?  सुशिंची बाईक सेम तशीच होती. अशा प्रकारच्या मोटरसायकलला, त्यांनी ’जाता-येता’ या पुस्तकात, ’बुटकं’ हे पर्फेक्ट नाव दिलंय !

अमेरिकेहून एकदा मी सुट्टीवर गेलो असताना झालेल्या धावत्या-पळत्या भेटीत तर त्यांनी ‘जाता-येता’ हे पुस्तक प्रेमाने भेट दिलं होतं ! तसंच कधी विसरणार नाही ते त्यांनी दिवाळीला पाठवलेलं ग्रिटींग कार्ड. एकतर मजकूर मराठीत होता आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वत: लिहिलेला होता !
‘मागे वळून पाहू नकोस, काजळरात्री सरल्या आहेत
सरल्या क्षणाशी रेघ मार, खिन्न दिवस लोपले आहेत….’
अशी त्या शुभेच्छांची सुरूवात होती आणि  शुभेच्छा पूर्ण करायला
‘मागे वळून पाहू नकोस, 
दिवाळीच्या स्वागताला
पाठमोरा होऊ नकोस !’  या ओळी होत्या !

शिरवळकरांच्या पुस्तकांत असं काय असायचं ज्यामुळे वाचक, विशेषत: तरूण वाचक, त्यांचे कट्टर फॅन व्हायचे? (खरंतर अजूनही होतात !)  मला स्वत:ला जाणवलं ते हे की शिरवळकरांची पात्रं तुमच्याशी बोलतायत असं वाटतं. त्यांच्या लेखनशैलीमुळे वाचकाला वाटतं आपणही या पुस्तकातलं एक पात्रं आहोत, या सगळ्या घटना जणू आपल्या आजूबाजूला घडतायत ! त्यांची भाषा ओघवती तर होतीच पण आपल्या बोलण्यातले नेहमीचे शब्द, विराम चिन्हे वगैरे या सगळ्यांसकट भाषा कागदावर यायची. ते जरी ‘लिहीत’ होते तरी वाचकाला असं वाटतं की कागदावरचा मजकूर आपल्याशी ‘बोलतोय.’  त्यामुळे बघा, त्यांच्या पुस्तकांत प्रसंगाप्रमाणे योग्य शब्दच वापरलेले दिसतील.

अगदी ढोबळ मानाने म्हणायचं तर त्यांनी दोन प्रकारचे लेखन केलं, राईट? म्हणजे बघा हं -– सामाजिक कादंबरी हा एक प्रकार आणि रहस्यकथा / थरारकथा हा दुसरा प्रकार.  फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन आणि दारा ’बुलंद’ ह्यांच्या करामतींचं लेखन दुसऱ्या प्रकारचं.  तर दुनियादारी, कल्पांत, क्षितीज, झूम वगैरे पहिल्या प्रकारचं लेखन. (अजून ’य’ नावं देता येतील पण तुम्हाला माहितीच आहेत की ती !)

लेखनाचा प्रकार कुठलाही असो, त्यांच्या पुस्तकांची नावं एक से एक आहेत. नुसतं ’दुनियादारी’ म्हटलं की खलास ! तसंच ’जाता-येता’, ’बरसात चांदण्याची’, ’थरारक’, ’तुकडा तुकडा चंद्र’, ’सॉरी सर’, ’ओ ! गॉड’, ’टेरिफिक’, ’गिधाड’, ‘एक… फक्त एकच’, ’तलखी’, ’म्हणून’, ’अखेर’, ’गुणगुण’, ‘थर्राट’, ’गढूळ’, ‘इथून तिथून’, ’समांतर’ ….. हॅ ! यादी पुन्हा वाढायला लागली.  एक मात्र नक्की, त्यांच्या पुस्तकाचं नाव ऐकूनच पुस्तक वाचावंस वाटायला लागतं. जसं हिंदी सिनेमा दिग्दर्शक एन. चंद्राच्या सुरूवातीच्या काळात सिनेमाच्या नावावरूनच तो पहावासा वाटायचा, म्हणजे ‘अंकुश’, ‘तेजाब’, ‘प्रतिघात’ वगैरे, तसंच !

शिरवळकरांच्या पात्रांची नावंही ’सही’ आहेत ! नायकाचे नाव आणि आडनाव एकाच अद्याक्षरावरून  किंवा नायक – नायिकेची पहिली नावं एकाच अद्याक्षरावरून हा विचित्र प्रकार त्यांनी केल्याचं आठवत नाहीये ! त्यांच्या काही पात्रांच्या नावांवरून नुसती नजर टाका -- फिरोज, अमर, मंदार, दारा, डॅनी, गोल्डी, बादल, मधुर, सलोनी, शिल्पा, रश्मी, मोहिनी, श्रेयस, दिग्या (डी.एस.पी), चंद्रवदन, गंधाली…. आणि कितीतरी अगणित नावं ! ही सगळी नावं त्या त्या पात्रासाठी चपखल आहेत… अगदी बॅ. दीक्षितही !

त्यांच्या लेखनशैलीतला मला भावलेला अजून एक भाग म्हणजे कथानकाचा वेग. कथानक उलगडताना, वातावरणनिर्मितीसाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी, ते पुस्तक कधी रेंगाळत ठेवायचे नाहीत. एकदा पुस्तक वाचायला घेतलं की ‘आता पुढे काय होणार आता’ ही उत्सुकता कायम ताणलेली राहते – मग भलेही ते पुस्तक म्हणजे एखादी सामाजिक कादंबरी असली तरी.  तसंच एखाद्या पात्राचं वेगळेपण नक्की किती एक्स्पोज करायचं आणि कुठे थांबायचं ते शिरवळकरांना चांगलं माहिती होतं. म्हणूनच तर फिरोज इराणी मोजक्या पुस्तकांत ‘बैदुल’ वापरतो किंवा बॅ. अमर विश्वास अगदी म्हणजे अगदीच मोजक्या पुस्तकांत ‘रातों का राजा’ म्हणूनही दिसतो ! एका वयात तर वाटायचं की राजस्थानला गेलो तर दारा ‘बुलंद’ भेटेलही कदाचित !!

त्यांच्या  पुस्तकांतल्या प्रस्तावना वाचणंही एक वेगळाच आनंद असतो.  प्रस्तावनेतून तर चक्क आपल्याशी one on one गप्पा करतायत असं वाटतं.  पण लोकांना आपल्या प्रस्तावना आवडतायत म्हणून त्यांनी स्वत:च्या भारंभार पुस्तकांना प्रस्तावना अजिबात लिहिल्या नाहीयेत. मगाशी म्हटलं ना की कुठे थांबायचं ते शिरवळकरांना नक्की माहिती होतं.

रसिक नजर आणि कलात्मक सौंदर्यदृष्टी ही त्यांची अजून एक खासियत. तुम्ही जर अट्टल सुशि फॅन असाल तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते लगेच कळेल. एखादी हवेली, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा एखादं हिल स्टेशन मांडताना त्यांच्यातला रसिक भरात असायचा. ही तर झाली निर्जीव ठिकाणं मग मोहक नायिकेचं वर्णन किंवा डॅशिंग नायकाचं वर्णन वाचताना तर असं वाटतं की आत्ता या पात्राला भेटून/बघून यावं !

सुशिंची पुस्तकं वाचता-वाचता कित्येक वर्षं कशी गेली कळलंच नाही.  अमेरिकेला आल्यावर त्यांच्याशी अधून-मधून फोनवर बोलणं व्हायचं किंवा पुण्याला गेल्यावर एखादी धावती भेट.  एक दिवस दै. लोकसत्ताच्या वेबसाईटवरच्या बातमीतून समजलं -- सुशि गेले!! दोन हजार तीनच्या जुलै महिन्यात – अचानक, ध्यानीमनी नसताना ! आमचे अजितकाका म्हणाले होते तसं, “माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपेल ते सांगता येत नाही’ हेच खरं !  अजितकाका म्हणजे सुप्रसिद्ध बासरीवादक आणि अत्यंत सज्जन माणूस -- कै. अजित सोमण. या लेखाच्या निमित्ताने, पुन्हा एकदा, मनात अजितकाकांच्याही आठवणी आल्या.

शिरवळकरांची आठवण येत असतेच पण दीडएक वर्षापूर्वी मी मराठी ब्लॉग लिहायला सुरूवात केली तेव्हा सुशिंची खूपच आठवण आली होती.  त्यांना माझे लेखनाचे प्रयत्न दाखवायला आवडलं असतं आणि माझी खात्री आहे, त्यांनीही खूप प्रोत्साहन दिलं असतं.  सुशि जरी आता आपल्यात नसले तरी एक मात्र नक्की – त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी इतकं भरभरून लिहून ठेवलंय की ते वाचकांच्या अनेक पिढ्यांना पुरेल !

(कै. अजितकाकांबद्दलच्या सुरेल आठवणी ह्या ब्लॉगवर इथे आहेतच.)