Sunday, November 10, 2013

झोपेचं खोबरं!


"काय मग! झोप लागली का नीट?"कुणालाही हा प्रश्न विचारून बघा. बहुतेक लोकांकडून उत्तर मिळेल, " छ्या! का माहिती नाही पण अधून-मधून सारखी जाग येत होती."  पण त्याच माणसाच्या कुटुंबातील इतर लोक, विशेषत: 'बेटर हाफ', म्हणतील, "काय झोप लागली नाही म्हणतोय! रात्रभर चांगला घोरत होता. ह्याच्या घोरण्याने उलट माझीच झोप नीट झाली नाही!!"
तर मग ही झोपेची नक्की काय भानगड आहे? शिवाय त्यात घोरण्याचे महत्व काय? खरं तर '' घोरण्याचे महत्व काय? स्वानुभवातून आलेलं शहाणपण जमेल तितक्या लोकांबरोबर वाटावं हे ह्या लेखाचं प्रयोजन.  लेख वाचल्यावर शांत झोपेचं महत्व पटून जर स्वत:च्या झोपेविषयी कुणाचे डोळे उघडलेआणि त्यांनी शांत झोपेसाठी प्रयत्न सुरू केले तर तेच ह्या लेखाचं फलित!
अत्यंत महत्वाचा डिस्क्लेमर -- मी वैद्यकशास्त्राचा जाणकार नाही!  ह्या लेखाचा उपयोग फक्त सामान्य ज्ञानापुरता ठेवावा. आपल्या झोपेविषयी कृपया स्वत:च्या डॉक्टराशी चर्चा करावी!  'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे झोपेच्या बाबतीतही  खरं आहे.  बाकी मग झोप, स्लीप अ‍ॅप्निआ, सी-पॅप मशिन / मास्क ह्या विषयांबद्दल जनरल बोलायला, प्रोत्साहनासाठी एक मित्र म्हणून आपुन का दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है!

अगदी दीडेक वर्षांपूर्वीपर्यंत मी झोपलो की एखाद्या प्रोफेशनल स्विमरसारखा श्वास घ्यायचो! थोडक्यात म्हणजे स्विमर जसा ठराविक वेळाने श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर डोकं काढतो तसा मी जवळपास दर मिनिटाआड जागा व्हायचो पण मला ते कळायचंच नाही. फक्त इतकंच समजायचं की रात्री आपली झोप नीट  झाली नाहीये, सकाळी उठवत नाहीये, दिवसभर आळसावल्यासारखं वाटतंय, आणि दुपारी साधारण तीनच्या सुमारास कॉफी किंवा चहा नाही घेतला तर राहिलेला दिवस कठीण आहे.  एखाद्या गोष्टीत मन एकाग्र होण्याचे बारा वाजले होते आणि ऐन संध्याकाळी सहा - साडेसहा वाजताही कार चालवताना झोप यायची.  बायको - मुलानेच काय पण मित्रमंडळीनेही माझ्या घोरण्याचा धसका घेतला होता. छोट्या-छोट्या कारणांनीही चिडचीड व्हायची आणि ब्लड प्रेशर कायम वरच्या बाजूला उडी मारायचं! हे सगळं का व्हायचं ते कळण्यासाठी आधी आपण झोपतो तेव्हा नक्की काय होतं ते जरा समजून घेऊ.

झोपेमुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते तर शरीराला छान विश्रांती मिळते आणि दिवसभरात शरीराची झालेली मोडतोड भरून निघते. त्यामुळे दुसऱ्या दिवसासाठी ऊर्जा मिळते. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे म्हणतात ते वाटतं.  लहान मुलांना जवळपास ९-१० तास झोपेची गरज असते तर तरूण / प्रौढ लोकांना साधारण ७-८ तासाची शांत झोप आवश्यक असते. ती जर झोप नीट झाली नाही तर दुसऱ्या दिवशी चिडचीड होणार हे ठरलेलं! आपण झोपतो तेव्हा आपल्या झोपेच्या काही स्लीप सायकल्स होतात.  एक स्लीप सायकल साधारण २-३ तास असते म्हणजे रात्री आपण जर ७-८ तास झोपतो असे मानले तर त्यामध्ये आपल्या साधारण ३ स्लीप सायकल्स होतात. ह्या स्लीप सायकलमध्ये झोपेचे काही टप्पे असतात.  ते टप्पे पाहिले की आपल्याला झोपेचा जरा अंदाज येईल.

पहिल्या टप्प्यात डोळे पेंगुळायला वगैरे लागतात. हलकी हलकी झपकी यायला लागते. दरवाज्यावर कुणी टकटक केले तरी जाग येते.  बायको आपल्याला उत्साहाने काहीतरी सांगत असते आणि आपण नुसतं 'हंहं' करत असतो. "आता झोपतो, आपण उदया बोलू!" हे वाक्य आपण मनातल्या मनात म्हणत असतो. हीच ती बेसावध वेळ असते जेव्हा मधेच कधी तरी आपला आवाज बंद होतो आणि दुसऱ्या दिवशी बायकोचा सुरू होतो!

दुसऱ्या टप्प्यात शरीराचे स्नायू छान सैल पडायला लागतात. हात-पाय वगैरे हलवायची शक्यता कमी होत जाते. 'मेंदू' नावाची आपल्या शरीरातील भन्नाट चीज जागी राहते आणि आपल्याला विश्रांती देऊ लागते.  निद्रा राणी आपल्याला कुशीत वगैरे घ्यायला लागते. हलक्याशा स्वप्नांत सुंदर चेहऱ्यांची झलक मिळायला लागते.

तिसऱ्या टप्प्यात आपण गाढ झोपेत जायला लागतो. गाढ म्हणजे एकदम गाढ झोप! काही जण आपल्याला "घोडे बेच के सो गया" म्हणतात पण आपण लक्ष द्यायला जागेच नसतो. ह्या झोपेतून माणसाला जागं करणं अवघड जातं. कुंभकर्ण त्याच्या झोपेचा बराच वेळ ह्या टप्प्यात घालवत असावा! ह्या झोपेतून माणूस एकदम दचकून जागा होतो. "मैं हॉं हूं?"  प्रश्न विचारणारा माणूस ह्याच झोपेतून जागा झालेला असतो.  ह्या टप्प्यात स्नायू आणि हाडांची डागडुजी सुरू असते. त्यामुळेच म्हणतात की शरीरातील अतिरिक्त चरबी हटवायची असेल, म्हणजे fat burning, तर दिवसातल्या व्यायामप्रकारांत स्नायू कणखर करणारे (strength training) व्यायामही करावेत. ह्या टप्प्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायचं कामदेखील चालू असतं. 

त्यानंतरचा झोपेचा टप्पा म्हणजे 'रेम' -- REM (Rapid Eye Movement) sleep.  ही झोप फारच महत्वाची असते. ह्यात नक्की काय होतं महाराजा? तर दोन गोष्टी होतात.  एक म्हणजे भन्नाट स्वप्नं पडतात. भन्नाट म्हणजे भ-न्ना-ट! आपण झोपेतच डोळे गरागरा फिरवत असतो जणू काही झपाझप हलणाऱ्या चित्रांना डोळ्यांत साठवायला बघतोय. म्हणून तर नाव आहे Rapid Eye Movement! उदाहरणच दयायचं तर ….आपण 'स्पायडर मॅन' आहोत आणि 'जेन'ला वाचवायला न्यू यॉर्कच्या जंगलात इमारतींवरून उड्या मारतोय! भन्नाट स्वप्नं आहे म्हणजे 'जेन' काय 'टारझन'बरोबरच असायला पाहिजे का? बरं, आता लक्षात आलं का मेंदू शरीराला का सैलावून ठेवतो ते? नाहीतर तुम्ही काय हो, खरंच पलंगावरून उड्या मारायला जायचात!  दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही होते की मेंदूतल्या स्मरणशक्तीच्या कप्प्याची साफसफाई सुरू होते. दिवसभरात आपण अनेक गोष्टी डोक्यात साठवतो. त्यातल्या अनावश्यक गोष्टींवर 'डिलिट' बटण दाबले जातं!  जर REM नीट झाली नाही तर स्मरणशक्तीच्या कप्प्यात सावळा गोंधळ व्हायला लागतो.  अर्थात हे काही एक-दोन रात्रीत होत नाही पण काही वर्षांनंतर स्मरणशक्तीच्या तक्रारी सुरू होतात. 'अल्झायमर'सारख्या गंभीर रोगाच्या दिशेने पावले पडण्याची सुरुवात होऊ शकते!

मगाशी लिहिल्या प्रमाणे स्लीप सायकल्स असतात आणि पहिल्या सायकलमधली  REM झोपल्यापासून साधारण दीड तासानंतर सुरू होते. पण ती जेमतेम दहा मिनिटांची असते. गंमत म्हणजे दोन-तीन स्लीप सायकल्समध्ये दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील झोप रिपीट होत असते आणि पहाटे रात्री चारच्या सुमाराची REM साधारण चांगली तासभर टिकते.  रात्रीच्या अंधारात चोऱ्या करणाऱ्यांनाही हे गणित माहिती असतं का ते नक्की ठाऊक नाही पण बघा बहुतेकशा चोऱ्या पहाटे तीन - चारच्या सुमारास होतात. त्यावेळेला आपल्यासारखे बरेचजण 'घोडे बेच के सो गये' असतात किंवा मग 'स्पायडर मॅनसारख्या भन्नाट स्वप्नांत हरवलेले असतात!  

आता बघूया ह्या सगळ्यामध्ये 'घोरणं' ही भानगड कुठे येते? आपण झोपलो तरी श्वसनमार्गातून श्वासोछ्वास चालू असतो. म्हणजे काय? असणारच ना! तर, आठवतंय ना -- झोपेत शरीरातील सगळे स्नायू सैलावलेले असतात? श्वास घ्यायच्या मार्गातील वरच्या बाजूचे स्नायूही असेच सैलावल्याने श्वासाचा मार्ग अरुंद होतो. त्यामुळे श्वास आत घेताना अडथळा होऊन झेंडा फडफडल्यासारखा  आवाज होतो.  हा आवाज म्हणजेच घोरणं!  ह्यात होतं काय की जर हा अडथळा  खूप वाढला तर घोरण्याचा आवाजही खूप वाढतो. अशा वेळेस माणसाला स्लीप अ‍ॅप्निआ असण्याची शक्यता असते. विशेषत: स्थूलपणा, उच्च रक्तदाब वगैरे असेल तर डॉक्टरशी बोलणं चांगलं! 

ह्या सगळ्या भानगडीत एक गोष्ट लक्षात आली असेल की श्वासोच्छ्वास नीट  झाला नसल्याने आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मेंदूला सिग्नल जायला लागतात की बाबा हौ तुझं काय खरं नाही आतामरतोय बघ! मेंदू सावध असतोच त्यामुळे तो माणसाला जिवंत ठेवायची धडपड सुरू करतो आणि तेही अगदी पद्धतीत!  तुम्ही श्वास घायचा खात्रीशीर मार्ग म्हणजे तुम्ही जागं होणं आणि मेंदू तेच करायला सुरुवात करतो! पैलेछूट काय होतं तर आपली चुळबूळ  सुरू होते. कुशी बदलणं वगैरे प्रकार सुरू होतात. 'करवटें बदलते रहें, सारी रात हम' हे काय फक्त प्रेयसीच्या आठवणीनेच होतं असं काय नाय!  तरी जाग आली नाही तर मग तहान लागते! आता काय, पाणी प्यायला तरी उठशील की नाही? तरीसुद्धा जाग आली नाही तर मग मेंदू अजून जोरात प्रयत्न करतो आणि चक्क बाथरूमला जावंसं वाटायला लागतं. जणू मेंदू म्हणतो, "उठ लेका उठ, मरशील नाहीतर!"  पाणी प्यायला किंवा बाथरूमसाठी उठल्यावर आपोआप  थोडा नीट श्वास घेतला जातो.  पण काहीवेळा असंही होऊ शकतो की हे सगळे प्रयत्न वाया जातात. मग मात्र मेंदू त्याच्या भात्यातले ब्रम्हास्त्र काढतो! आपल्या मनाच्या तळाशी दडून बसलेली भीती डोकं वर काढते. मग कुणाला असं वाटतं की आपण खूप उंचावरून अचानक खोल खड्यात पडलोय तर कुणाला वाटतं आपल्यामागे साप लागलाय!  त्यामुळे आपण दचकून जागे होतो. ह्या सगळ्याचं साध्य एकच असतंआपल्याला श्वास घ्यायला भाग पाडणं!! 

स्लीप अ‍ॅप्निआतल्या ‘‍अ‍ॅप्निआशब्दाचा  अर्थ आहे झोपेत किंचितसा वेळ श्वास थांबणं! प्रत्येक माणसाला कसं ब्लड प्रेशर असतंच फक्त ते प्रमाणाबाहेर जात राहिलं की आपण म्हणतो की अमक्या-तमक्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. तसंच प्रत्येकाला हा अ‍ॅप्निआ असतो पण श्वास थांबण्याचं प्रमाण वाढायला लागलं किंवा श्वास थांबण्याचा वेळ वाढायला लागला असं दिसलं की डॉक्टर म्हणतो -- तुला स्लीप अ‍ॅप्निआ आहे रे बाबा! दुर्दैवाने एकंदर भारतीय समाजात ह्या प्रकाराबद्दल फारशी जागरूकता नाही.  उलट आपण म्हणायला मोकळे की च्यायला ही नसती अमेरिकन थेरं आहेत! म्हणे घोरणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं!!  

आता जर कुणाला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का ते कळणार कसं? उत्तर सोपं आहे स्लीप स्टडी! स्लीप स्टडी सेंटरमध्ये एका रात्रीसाठी आपल्याला जावं लागतं किंवा एक यंत्रं एका रात्रीसाठी डॉक्टर आपल्याला घरी वापरायला देतात.  रात्रभरात त्या यंत्रात जमा झालेल्या माहितीतून हे पाहिलं जातं की एखादयाला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का? असल्यास किती प्रमाणात आहे आणि उपाययोजनेसाठी सी-पॅप मशीनचा उपयोग करताना हवेच्या झोताचे प्रमाण किती ठेवायला हवे.  

मग आता स्लीप अ‍ॅप्निआवर उपाय काय? वजन कमी करणं, विशेषत: गळ्याभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करणं उत्तम. त्यासाठी मग ते नियमित व्यायाम करणं, हिरव्या भाज्या खाणं वगैरे सगळं आलंच! शिवाय एका विशिष्ठ प्रकाराच्या प्राणायामाने फायदा होतो असं ऐकलं आहे पण स्वानुभव नाही.  मी घेत असलेला उपचार इथे सांगतोय आणि ह्याचा नक्की फायदा होत असलेला अनुभवतोय!  तर  सी-पॅप मशीन वापरायचं. CPAP म्हणजे continuous positive airway pressure.  'गुगल'बाबाला CPAP असं विचारलं तर बरीच माहिती मिळेल. ह्यामध्ये आपल्या नाकावर लावायला एक मास्क असतो आणि मास्कचं दुसरं टोक एका नळीने मशीनला जोडलेलं असतं.  मशीनमधून ठराविक प्रमाणात हवेचा झोत नाकातून सतत सोडला जातो. त्यामुळे श्वसनमार्ग व्यवस्थित उघडा राहतो आणि झोपेतही ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत राहतो.  मास्कने तोंड बंद असतं त्यामुळे तोंडाने श्वास घेतलाच जात नाही आणि घोरणंही बंद होतं! है शाब्बास आपलं घोरणं बंद झाल्याने आसपासचे लोकही सुखाने झोपू शकतात! व्यवस्थित ऑक्सिजन मिळाल्याने झोपमोड व्हायचा प्रश्नच येत नाही आणि मेंदू आपली सगळी अस्त्रं भात्यात ठेवून देतो. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे काय म्हणतात ते वाटतं. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते.  मी साधारण गेले दीड वर्षं  सी-पॅप मशीन वापरतोय आणि नक्की फायदा झालेला अनुभातोय. बरं हे मशीन प्रवासात वापरायलाही सुटसुटीत असतं त्यामुळे अगदी एका रात्रीसाठीही कुठे जाताना मशीन सहज बरोबर नेता येतं. फक्त झोपण्याच्या जागेजवळ इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट असायला हवा. सुट्टीसाठी भारतात आलो होतो तेव्हा मला पुणे, गोवा अशा ठिकाणी घरी, हॉटेलमध्ये सगळीकडे मशीन व्यवस्थित वापरता आलं.  

अर्थात कुठलीही नवीन गोष्ट वापरायला शिकताना सुरुवातीला जरा त्रास होतो तसाच हे मशीन वापरतानाही होऊ शकतो. पण नेटाने प्रयत्न चालू ठेवले आणि मशीनची  सवय झाली की मग झोपेसारखं सुख नाही!  मगाशी म्हणालो तसं काही मदत / प्रोत्साहन हवं असल्यास आपुनका दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है! खोटं नाही सांगत पण आता रात्र जवळ आली की मनापासून आनंद होतो की चला आता छानपैकी झोपायचं! मग दुसऱ्या दिवशी सकाळी गजर व्हायच्या आधीच जाग येताना मनात 'भटियार'चे प्रसन्न सूर गुंजायला लागतात -- 'पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा…. जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा!'
------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी -- मायबोली दिवाळी अंक २०१३
------------------------------------------------

Saturday, April 13, 2013

खेळ नुसता…. टक टक्काक टक!

"अरे टोण्या, जागचा हाल ना... मूव्ह लेका मूव्ह.. एका जागी उभा काय राहतोस?"
 
टक टक..टक टक....टक टक्काक टकहा आवाज ध्यानीमनी असायचा….कित्येक वर्षं! खेळतानाही मनातल्या मनात स्वत:शीच बोलणं चाललेलं असायचं. कधी कधी मात्र मनातले बोल तोंडातून उमटायचे, "अरे टोण्या, जागचा हाल ना..". जेमतेम ९ X ५ फूट टेबल ते, पण आजूबाजूचं भान सुटून सगळं जग जणू त्या टेबलावर असायचं!
टेबल टेनिसची गोडी लहानपणीच कधी लागली सांगता येत नाही. काहीतरी आठवतंय ते असं की मी साधारण पाच-सहा वर्षांचा असताना कॉलनीतल्या श्यामकाकाकडे टेबल टेनिसची पहिली रॅकेट पाहिली होती. पांढर्‍या शुभ्र कव्हरमधे ठेवलेली, हिरव्या रंगाचं गुळगुळीत रबर लावलेली ती रॅकेट अजूनही जश्शीच्या तश्शी आठवतेय. त्या गुळगुळीत रबरावरून हात फिरवताना वाटायचं हा काहीतरी खूप छानच खेळ असणार... आपल्याला खेळता यायला हवा. लहानपणीची एक गंमत असते की खेळांमधला सगळ्यात चांगला भाग म्हणजे आपल्याला पाहिजे ते कल्पनाविश्व हाताशीच असतं! लहान मुलांना कुठल्याही साधनांतून कुठलाही खेळ मन लावून खेळता येतो. आम्ही पेरूच्या फांदीला क्रिकेटची बॅट म्हणूनही वापरलंय आणि बॅट्समनच्या मागे स्टंप्स म्हणून पाट/लाकूड/विटांची चवड/भिंत ह्यापैकी काहीही चालवून घेतलंय. ह्यातलं काहीच नसेल तर बॅट्समनच्या कंबरेइतक्या उंचीखालून बॅट आणि बॅट्समनच्यामधून बॉल मागे गेला की बॅट्समन आउट हे ही मान्य करून खेळायचो. आम्ही त्या वयात मग मित्रांबरोबर घराच्या व्हरांड्यात चक्क जमिनीवर बसून टेबल टेनिस खेळायचो! हो, बरोबर लिहिलंय ... 'जमिनीवर' बसून 'टेबल' टेनिस खेळायचो. आमच्यासाठी व्हरांड्याची जमीनच टेबल असायची आणि घरातल्या कंपास बॉक्स किंवा चपटे डब्बे म्हणजे टेबलाच्या दोन बाजू करणारे नेट! एखाद्या वहीचा पुठ्ठा ही आमची रॅकेट असायची पण टेबल टेनिसचा बॉल मात्र खरा असायचा.. त्यात तडजोड नाही!
थोडा मोठा व्हायला लागलो तसा मग टेबल टेनिसच्या खर्‍या टेबलासमोर उभा राहिलो की चक्क साक्षात्कार व्हायचा -- अरे व्वा! टेबलाच्या लेव्हलपेक्षा आपली उंची थोडी जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला मधल्या जाळीतून समोरचा खेळाडू दिसतोयसुद्धा! अशातच एक दिवस माझ्या काकाने खास माझ्यासाठी टेबल टेनिसची रॅकेट विकत आणली. माझ्या आठवणीतली ती माझी पहिली सरप्राइज गिफ्ट! काका ऑफिसमधून येताना रॅकेट घेऊन आला पण त्याने आमच्या घराआधी एक घर सोडून अलीकडच्या घराच्या खिडकीवर रॅकेट ठेवून दिली होती. सायकलची घंटी 'ट्रिंग ट्रिंग' वाजवत घरी आलेला तरुण काका आज तीस-पस्तीस वर्षांनंतरही नीट आठवतोय. मग माझ्या छोट्या हाताला धरून तो त्या खिडकीकडे घेऊन गेला जिथे रॅकेट लपवून ठेवली होती. मास्टर कार्डची जाहिरात करणार्‍यांनी तो प्रसंग पाहिला असता तर त्यांनी तो जाहिरातीत नक्की वापरला असता आणि लिहिलं असतं, "जॉय इन नेफ्यूज आइज.. प्राइसलेस!"
माझी आई पुण्याला महाराष्ट्रीय मंडळाच्या कटारिया हायस्कूलमधे शिक्षिका होती. कधी कधी तिच्याबरोबर तिच्या शाळेत थोडा वेळ थांबायला लागायचं. मग आठवी-नववीतली मुलं टेबल टेनिसच्या खोलीत खेळत असली की मी तिथे नक्की पडीक असायचो. तसंच आमचे आप्पा बँक ऑफ इंडियात होते. ते अलका टॉकीजच्या शेजारच्या ब्रँचमधे होते तेव्हा शनिवारी दुपारी बँकेच्या वेळेनंतर तिथे जायला मिळायचं. बँकेतले काही काका टेबल टेनिस खेळत असायचे. त्यांना खेळताना बघतच रहायचो. संध्याकाळी समोरच्या 'दरबार' रेस्टॉरंटमधे 'दरबार स्पेशल' भेळ खायचो आणि मगच घरी यायचो.
सातवी- आठवीच्या सुमारास खर्‍या अर्थाने टेबल टेनिस खेळायला सुरूवात केली. आंतरशालेय स्पर्धांतून आणि मग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून खेळायची मजा भन्नाटच असते. माणूस जसा पहिलं प्रेम जन्मभर विसरत नाही तसाच आंतरशालेय स्पर्धांमधला पहिला प्रतिस्पर्धीही जन्मभर विसरत नसावा. तसं म्हटलं तर पहिल्यांदा केलेल्या बर्‍याच गोष्टी माणूस विसरत नाही पण नाही त्या तपशीलात कशाला शिरा! ह्या आंतरशालेय स्पर्धा म्हणजे माहोल असायचा एकदम! स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो की मोठ्या हॉलमधे सात-आठ टेबल्स मांडलेली असायची. वेगवेगळ्या टेबलवरच्या गेम्सचा स्कोअर वेगळा असायचा. ज्या टेबलवर जो स्कोअर असेल त्या स्कोअरप्रमाणे त्या टेबलसमोरच्या प्रेक्षकांमधून 'बक अप!', 'चिअर अप!', 'कमॉन फाईट, फाईट!' असे असंख्य उद्गार ऐकू यायचे. त्या सगळ्या कोलाहलातून खेळाडू आपापला खेळ खेळत असायचे. आतासुद्धा कुठलीही टेबल टेनिस स्पर्धा बघायला जाल तर हेच दृश्य दिसेल.
माणसाला छंद असावा! त्यातूनही एखादा खेळ खेळण्याचा छंद तर असावाच असावा. नुसता खेळ मन लावून खेळल्याने कित्येक वेगवेगळ्या अनुभवांनी मन समृद्ध होत जातं! सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजते ती म्हणजे हरलो तरी पुन्हा प्रयत्न करायचा. पराभव खुल्या दिलाने पचवायला शिकणं हे तर आयुष्यात ठायीठायी उपयोगी पडतं. जिंकण्याची जिद्द असते पण त्यासाठी शॉर्टकट नसतो हे समजायला लागतं. टेबल टेनिस काय सोप्पं आहे असा सर्वसाधारण गैरसमज असतो. मला तरी वाटतं की एकंदरच मनाची एकाग्रता वाढवायला टेबल टेनिसची खूप मदत होते. एकतर टेबल तसं छोटं असतं आणि खेळण्यात जम बसायला लागल्यावर फटक्यांचा वेगही वाढायला लागतो. मग आपल्याकडून चूक होऊ न देण्याचा प्रयत्न करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे चेंडूचा टप्पा बघणं! "टप्पा बघ रे, टप्पा बघ!" असं म्हणणं खूप सोपं असतं पण तो टप्पा खरंच बघणं ... खरंतर प्रत्येक फटक्याला बघत राहणं अवघड असतं. टप्पा बघायचा म्हणजे पर्यायाने चेंडू सतत बघत रहावा लागतो आणि एकाग्रता ढळली की काम तमाम.. फटका चुकतोच! कुठल्याही खेळात खेळाडूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे स्वतःचं डोकं शांत ठेवणं. त्याशिवाय खर्‍या अर्थाने खेळाची मजाच घेता येत नाही.
स्मरणशक्ती (मसल मेमरी!) ह्या मस्त प्रकाराची नकळत ओळख होत जाते. आपलं शरीर म्हणजे एक फँटास्टिक प्रकार आहे. आता काही दिवसांपूर्वी आमच्या कंपनीत एक टेबल टेनिसची स्पर्धा होती. न्यू यॉर्कमध्ये 'स्पिन न्यू यॉर्क’' नावाची जागा आहे. एकदम अमेरिकन स्टाईलप्रमाणे खेळाला मनोरंजनाची फोडणी दिलेली जागा आहे. बेसमेंटच्या मोठ्या हॉलमधे दहा-बारा टेबल्स, मधूनमधून ठेवलेले सोफा सेट, खायची-प्यायची सोय असं बरंच काही. खायची-प्यायची सोय म्हणजे बार हवाच आणि तो आहेच! बियर/वाईन वगैरे घेत, काहीतरी खात-पीत टेबल टेनिस खेळणारे लोक मी पहिल्यांदा ह्या 'स्पिन न्यू यॉर्क'मधे पाहिले! तर ह्याच ठिकाणी आमच्या कंपनीचाही एक इवेंट होता. मी जवळपास दोन वर्षांनी वगैरे खेळत होतो. काय आहे ना .. लहानपणी खे़ळताना त्रास असा होता की पुढे वाकूनही नेटपर्यंत हात पोचायचा नाही कारण उंची पुरायची नाही. आता मोठेपणी वेगळाच त्रास आहे! नेटपर्यंत हात पोचवायला जावं तर आताही हात पोचत नाही कारण नेमकं पोट मधे येतं आणि टेबलला अडतं! कंपनीच्या स्पर्धेत मला एक फटका मारायचा होता आणि मला कळत होतं की फटका मारण्याआधी आपला डावा पाय टेबलच्या डाव्या बाजूला चेंडूच्या आडव्या रेषेत यायला हवा. आता काय इतक्या पटकन आपल्या हालचाली होणार नाहीत असं वाटत असतानाच माझ्याही नकळत माझा डावा पाय चेंडूच्या आडव्या रेषेत पोचलाही होता. शाळाकॉलेजच्या वयात पायात बसलेल्या हालचाली आता कित्येक वर्षांनंतरही पायाला आठवत होत्या. दॅट्स 'मसल मेमरी' माय फ्रेंड्स... मसल मेमरी!
टेबल टेनिसचं एक बरं असतं! रॅकेट आणि चेंडू दोन्ही छोटे असल्याने सहज बॅगेत वगैरे टाकून कुठेही नेता येतात. शिवाय इनडोअर खेळ असल्याने पावसाची वगैरे फिकीर नॉट! बाहेर बदाबदा पाऊस कोसळत असला तरी टेबल टेनिस खेळणार्‍याला काही फरक पडत नाही. ऐन तारूण्यात ह्या खेळाची नशा चढली ना तर -- बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय, प्रेयसीला बाईकवर घेऊन लोणावळ्याला जायचं, पावसात भिजत एकमेकांच्या हातात हात गुंफून धुंदपणे चालत जायचं -- हे सगळं करण्याआधी टे टे वीर म्हणेल, "थांब जरा! तासभर खेळून येतो!!" अगदी श्रीदेवीचं 'काटें नहीं कटतें ये दिन ये रात...' वगैरे गाणं बघतानाही पैलेछूट त्याच्या मनात येईल - ह्या साडीच्या कापडाचे नेट चांगले होईल! मला तर वाटतं आजकाल बिपाशा, मल्लिका, मलायका वगैरे ललना टेबल टेनिसच्या नेटचीच लांबी-रूंदी (थोडीथोडीच) वाढवून मग त्यालाच आपले कपडे म्हणत असाव्यात.
खेळण्याचा निखळ आनंद ह्याशिवाय टेबल टेनिसने मला दिलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र परिवार! टेबल टेनिस खेळताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत गेले आणि मैत्र वाढत गेलं. एकेका खेळाडूची तर्‍हा निरनिराळी. कुणी स्वतःला जॉन मॅकेन्रोचा अवतार समजत असे आणि तो जो तापटपणा टेनिस कोर्टवर दाखवायचा तसाच तापटपणा काहीजण टे. टे. खेळताना दाखवायचे. शिव्यांच्या शब्दकोशात आपसूकपणे छान वाढ व्हायची. काहीजण त्याच्या अगदी उलटे! ते जणू बियॉन बोर्गच्या डोक्यातल्या बर्फाचे तुकडे आपल्या डोक्यात फिट करवून यायचे. पॉईंट जिंको वा हरो, सामना जिंको वा हरो त्यांच्या चेहर्‍यावरचा शांतपणा बदलायचाच नाही. माझी खात्री आहे की टेबल टेनिस शांतपणे खेळणारा माणूस बायकोबरोबरच्या भांडणातही शांतच असेल. खरं म्हणजे भांडण फारसं होतच नसेल कारण भांडण होण्यासाठी दोन्ही बाजूंनी आवाज व्हायला हवा. इथे तर बायको शेवटी वैतागून म्हणत असेल, "अरे! मी तुझ्याशी बोलतेय, भिंतीशी नाही!
खेळणार्‍यांमधे सगळ्यात बेष्ट प्रकार म्हणजे तावातावाने खेळणारे! तुम्ही बघा -- बॅडमिंटनही इनडोअर खेळ आहे पण शर्ट खुंटीला टांगून, फक्त बनियनवर बॅडमिंटन खेळणारे सहसा कुणी दिसणार नाहीत! आपल्याकडे टेबल टेनिस खेळताना काही जण हा प्रकार फारच आवडीनं करतात. हरलेल्या प्रत्येक पॉइंटनंतर त्यांचे, "थांब रे, आता बघतोच नक्की!" वगैरे उद्गार, रॅकेट धरलेल्या हाताच्या पंजावर फुंकर मारणं वगैरे प्रकार वाढतच जातात. अगदी पायात ठराविक प्रकारचे चांगले स्निकर्स असतील तरच टेबल टेनिस खेळणार्‍यांपासून ते हटकून अनवाणी पायाने खेळणारेही दिसतात! व्यक्ती तितक्या प्रकृती हे टेबल टेनिसबाबतीत पूर्ण सत्य आहे. त्याच्या अगदी उलटा प्रकार म्हणजे फारसे गिमिक्स न करता, ज्या हातात रॅकेट नाहीये त्या हाताची कमीत कमी हालचाल करत, सर्विस केल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या फटक्यालाच 'ओपन' करणारा, प्रत्येक फटका मारताना चेंडूचा टप्पा बघणारा आणि त्याप्रमाणे पायांचीही योग्य ती हालचाल करणारा कुणी दिसला की विचारायचं -- पुण्याला अजेय सिधयेंकडे टेबल टेनिस शिकलास का? एका ओळीत आठपेक्षा जास्त शब्द न लिहू देणार्‍या चितळेमास्तरांप्रमाणे मी आता सांगितली ती अजेय सिधयांची वैशिष्ट्ये!
टेबल टेनिसबद्दल इतकं लिहिल्यावरही आयुष्यातल्या पहिल्या सामन्याबद्दल काहीच बोललो नाही तर हा लेख अपुराच राहील ना! मला आठवतंय आंतरशालेय स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा मी सातवीत होतो. तो पर्यंत टेबल टेनिस म्हणजे अंदाज पंचे दाहोदरसेच होतं. शा़ळेच्या संघातून नाव दिल्यावर काही दिवसांतच समजलं की स्पर्धांमधे 'ड्रॉ' नावाची काहीतरी भानगड असते. एकूण माहितीत एवढी भर पडली होती की माझ्या आयुष्यातला पहिलावहिला सामना 'चौगुले' आडनाव असलेल्या खेळाडूशी होता. ही माहिती समजल्यानंतर रोज शाळेत प्रॅक्टिस करताना मनात 'चौगुले', 'चौगुले' असा जप चालायचा! जणू काही टेबल टेनिसची प्रॅक्टिस करताना मनातल्या मनात 'कबडडी'.. 'कबड्डी' म्हणायचो! असं म्हणतात की मुघलांच्या घोड्यांना तळ्यातलं पाणी पितानाही पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे. तसाच मला कधीही न पाहिलेला 'चौगुले' दिसायचा!
शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस उजाडला. टेबल टेनिसच्या स्पर्धेसाठी नक्की कसं तयार होऊन जायचं इथपासूनच सुरूवात होती! थोडक्यात सगळा आनंदीआनंदच होता. बराच विचार करून मग मी एकदम शहाण्या बाळासारखा हाफ पँट आणि चक्क हाफ शर्ट घालून गेलो! तेही शर्ट व्यवस्थित खोचून बिचून गेलो होतो! तुमच्या डोळ्यांसमोर अजूनही चित्र पूर्ण स्पष्ट झालं नसेल तर 'गटणे' हातात टेबल टेनिसची रॅकेट घेऊन निघालाय इतकंच डोळ्यासमोर आणा! आता बरोब्बर समजलं ना? द्या टाळी! हातात टेबल टेनिसची जी रॅकेट होती ती ही ह्या बाळबोध वळणाला साजेशीच होती. फळकुटावर गोळ्या-गोळ्यांचं रबर चिकटवलेलं असल्याने त्याला रॅकेट म्हणायचो इतकंच! अर्जुन रामपाल सिनेमात असतो म्हणून त्याला अ‍ॅक्टर म्हणतात तसंच! आंतरशालेय स्पर्धांसाठी पेरूगेट भावे स्कूलमधे पोचल्यावर खर्‍या अर्थाने टेबल टेनिसचा माहोल दिसला आणि अगदी मनापर्यंत जाणवला. बस्स..तबियत खुश हो गई इतनाही कहना काफी है! पहिला झटका बसला तो 'चौगुले'बरोबर सामना सुरू करताना पहिले काही सरावासाठीचे फटके मारताना! सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जाणवली की आपल्याकडे बॉल येताना खूप वेगाने येतो आहे. एकदोन फटक्यांतच नक्की काय फरक होता ते समजलं. क्रिकेटमधे आपल्याकडच्या 'पाटा' विकेट्सवर खोर्‍याने धावा काढणारे वीर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान विकेट्सवर धावपळ का करायचे ते एका झटक्यात समजलं! एकूणच प्रॅक्टिस आणि मॅच ह्याच्यात काहीच साम्य नव्हतं!! एवढी कथा सांगितल्यावर 'चौगुले'ने सामन्यात मिटक्या मारत माझा फडशा पाडला हे वेगळं सांगायला हवं का? हां, पण त्या दिवसापासून टेबल टेनिस म्हटल्यावर सुरू होणारी एक्साईटमेंट आजतागायत आहे. हा लेख वाचून तुम्हालाही टेबल टेनिस खे़ळायची इच्छा झाली तर जरूर कळवा. पुन्हा खेळायला मजा येईल, तुम्ही मॅकेन्रोचे अवतार आहात की बोर्गचे ते कळेल आणि मित्र परिवारात भरही पडेल!