Saturday, March 29, 2008

सेहवागचं काय करायचं ?

कसोटी क्रिकेटमधे ३०० धावा .. त्याही फक्त २७८ चेंडूत ! शिवाय एकदा ३०० केल्या आहेतच !

द. आफ्रिकेचे खेळाडू एकच प्रश्न स्वत:ला विचारत असतील – “त्या सेहवागचं काय करायचं?”

सेहवागने मला खोटं ठरवलं आणि मला मनापासून आनंद झालाय !! चमकलात? सोप्पंय हो .. सेहवाग जेव्हा नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागला होता तेव्हा मला वाटायचं की ह्याचं तंत्र के. श्रीकांतपेक्षा बरं आहे बस्स ! बेभरवशेपणात मात्र एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं ! दोन त्रिशतकं आणि कसोटी क्रिकेटमधे, वन डे क्रिकेटपेक्षा, जास्त सरासरी राखून Sehwag proved me wrong !

त्याने काल होळीच्या मोसमात जी दिवाळी साजरी केलीय ना त्याची फक्त एक झलक इथे आहे !

त्याच्या खेळातल्या बेभरवशेपणाचं तर असं आहे की तो त्याच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे ! कुठल्याही परिस्थितीत जर चेंडू फटका मारण्यायोग्य वाटला तर तो फटकावणारच ! बरं, जाफर किंवा द्रविडला जो चेंडू ‘well left’ सदरात जावा असं वाटेल त्यावर सेहवागला ‘sixer’ दिसू शकतेच ! त्याला इलाज नाही ! जो माणूस ३०० धावांच्या जवळ पोचल्यावरही सिक्सर मारण्यासाठी पुढे यायला कचरत नाही त्याला कोण आणि कसं अडवणार ? कसोटीत ३०० धावा करणारा तो एकमेव भारतीय आहे तरीही तीनशे दिसायला लागल्या म्हणून तो मंदावला नाही ! उलट त्याचा प्रयत्न असा दिसतो की शतक, द्विशतक, त्रिशतक हे टप्पे शक्यतो चौकार – षटकार असे रूबाबात पार करायचे ! त्याला ‘नजफगढचा नवाब’ म्हणतात ते का उगाच?

तो खेळताना आपण उत्सुक अधीरतेने सामना पहायचा ! बाकी कुणी काही करू शकत नाही – अगदी नॉन स्ट्राइकर एंडचा खेळाडूही ! षटकार बसला तर आपली प्रार्थना फळाला आली म्हणायचं पण आऊट झाला तर नाही रूसायचं !

मर्चंट, गावसकर आणि तेंडुलकर निर्विवादपणे महान खेळाडू आहेत पण त्यांनीही जो पराक्रम केला नाही तो सेहवागने करून दाखवलाय ! एकदा नाही तर दोनदा !! ‘तेंडल्या’ अजून क्रिकेट खेळतोय .. त्यामुळे आशेला वाव आहे !!!

सेहवागचा खेळ त्याच्या सळसळत्या रक्ताचा आरसा असावा ! नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मायकेल क्लार्क सचिनला म्हणाला होता की आता म्हातारा झालास, तुला तर नीट पळताही येत नाही वगैरे ! (सचिन international cricket खेळायला लागला तेव्हा मायकेल क्लार्क ८-९ वर्षांचा असेल! )त्यावर non striker सेहवागने ताडकन मायकेल क्लार्कला सुनावलं होतं की तुला माहितीये ना तू कोणाशी बोलतोयस? अरे, तो ‘सचिन तेंडुलकर’ आहे !!

सेहवागचा एक अनोखा विक्रम म्हणजे त्याने गेल्या दहा शतकांपैकी प्रत्येक खेळीत किमान दीडशे धावा ठोकल्यात. टेस्ट क्रिकेटमधे हे करणारा तो एकमेव खेळाडू आहे. लक्षात घ्या, इथे एकमेव खेळाडू म्हटलंय; एकमेव भारतीय खेळाडू नाही ! त्याची धावांची भूक अशीच वाढत राहो !!!

अशा खेळी झाल्या की जाणवतं टेस्ट क्रिकेटला इतकं महत्व का आहे ते ! हा खेळ मानसिक आणि शारीरिक कणखरपणा पाहणारा आहे. त्यासमोर T20 म्हणजे अगदीच लुटुपुटीचं क्रिकेट वाटतं ! काल ३०० धावांच्या जवळ पोचल्यावरही सेहवाग एकेरी – दुहेरी धावा घ्यायला उत्सुक होता !

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने योग्य वेळी दाखवलेला संयम ! डावखुरा फिरकी गोलंदाज पॉल हॅरिस सातत्याने लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत होता. अशा नकारात्मक गोलंदाजीचा उद्देश हाच असतो की बॉल्स नुसते वाया जातात, विकेट मिळत नाही पण बॅट्समन फटकेही मारू शकत नाही ! सेहवागसारखे फटकेबाज तर लवकर फ़्रस्ट्रेट होऊन चूक करण्याची शक्यता निर्माण होते. काल वीरू त्याला पुरून उरला. शांत डोक्याने चेंडू सोडून द्यायचा पण योग्य संधी मिळवून चेंडू भिरकवायचा ! अगदी ठरवून मारल्यासारखे रिव्हर्स स्वीपही बिनधास्त मारत होता !

कुठलाही खेळ, मग अगदी पत्ते असोत की कुस्ती, युक्तीने खेळायचा असतो. ‘चक दे इंडिया’ आठवा ! जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या अक्कलहुशारीवर कुरघोडी करावी लागते ! द.अफ्रिकेचे खेळाडू म्हणजे पक्के व्यावसायिक पण काल वीरूने ‘चक दे..’तला धडा जणू तोंडपाठ म्हणून दाखवला !!!

Sunday, March 9, 2008

साहेबलोक !

‘पोटासाठी दाही दिशा, फिरवीशी तू जगदीशा’ !

‘नोकरीठेप’ भोगत, देश-विदेश फिरताना, तरतऱ्हेचे ‘मॅनेजर’ भेटतात / दिसतात. कधी आपले मॅनेजर म्हणून, कधी दुसऱ्या टीमचे मॅनेजर म्हणून, कधी आपल्या मित्र/मैत्रिणींचे मॅनेजर म्हणून तर कधी टी.व्ही, वृत्तपत्रे अशा मिडीयांतील बातम्यांमधून! आपल्या सुदैवाने बरेचजण चांगले असतात पण काही नमुनेही भेटतात !! काहीजण तर नमुनेदार असले तरी मॅनेजर म्हणून चांगले असतात !

तर, ही आहे ‘साहेबलोकांची’ एक ’मिष्किल’ झलक ! थोडं हसायचं आणि सोडून द्यायचं !

गंभीरराव
आपण interview देतानाच अंदाज येतो. ह्यांचा चेहरा अतिशय गंभीर आणि आपल्यावर डोळे रोखून बघायची सवय. बरं, चेहरा इतका निर्विकार की आपल्याला वाटत राहतं, “च्यायल्ला ! काहीतरी झोल आहे..उत्तर चुकलं बहुतेक !” काम करतानाही तेच. सकाळी ‘गुड मॉर्निंग’ म्हणतात पण चेहरा सांगतो की त्यांना जणू म्हणायचंय, “ आलास? आता बस आणि न बोलता जरा काम कर !” आपल्या टीमला award मिळालं तरी हे गंभीर आणि कंपनीत lay off असले की मग तर अगदी धीरगंभीर !

चिंतोपंत
‘चिंता करतो विश्वाची’ असं म्हणण्याची स्फूर्ती समर्थांना ह्यांच्याचसारख्या कोणाकडे तरी पाहून आली असणार ! ह्या जातीचा साहेब सदोदित चिंतातूर चेहरा ( आणि डोळ्यांत भिजलेल्या सशाचे भाव) घेऊन वावरतो. आता चिंता म्हणलं की ती कशाची आहे ते तरी कळायला नको का? आत्ता project deadline जवळ येतेय म्हणून tension असेल तर पाच मिनिटांत त्यांच्या डोक्यांत भुंगा येतो, “आज तरी घरी गेल्यावर बायकोचा मूड बरा असेल का?” ‘To act like being lost at sea’ हा वाकप्रचार चिंतोपंतांना एकदम लागू पडतो ! ‘राशीचक्र’ मधे शरद उपाध्ये म्हणतात तसं हे मॅनेजर बहुतेक ‘कन्या’ राशीचे असावेत!

गोंधळेकर
‘चिंतोपंत’ जर कन्या राशीचे असतील तर ‘गोंधळेकर’ बहुतेक ‘मीन’ राशीचे असावेत ! म्हणजे असं की कामाला सुरूवात वगैरे झोकात होते, बोलणं एकदम polished पण मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि सगळं planning गडगडतं! Conference room मधे मस्तपैकी प्रेझेंटेशन सुरू करायला घेतात आणि शेवटच्या क्षणी लक्षात येतं की पाच नंबरनंतर एकदम सात संबरची स्लाईड आहे. मधली एक स्लाईड गायब ! एकदम धावपळ करतात, शोधाशोध करतात, ब्लड प्रेशर वाढतं आणि मग अचानक ट्यूब पेटते की स्लाईड हरवली नाहीये फक्त slides numbering चुकलं आहे ! साधं कॉफी पीत असताना, जरा स्टाईलीत बसावं म्हणून, थोडं तिरकं बसायला जातात; त्यांच्या धक्क्याने टेबलवरच्या दोन फाईल्स जमिनीवर पडतात आणि आपल्याबरोबर कॉफीचा कपही नेतात…भरलेला !

संस्कृतपंडित
“What the XXXX is this?” !!! ऐकलंयत का कधी? तर, ह्या साहेबांकडे ‘असा’ शब्दसंग्रह भरपूर असतो. एकदा सरबत्ती सुरू झाली की शक्यतो शिवी repeat होत नाही. स्वत:च्या हाताखालचे लोक आणि peers अशा सगळ्या लोकांना कस्पटासमान लेखणं त्यांना छान जमतं. त्यांची जीभ म्यान होते फक्त त्यांचा मॅनेजर आणि त्याच्यावरच्या लोकांसमोर ! शिवाय एकदा शिव्या सुरू झाल्या की मग भाषेचं बंधन नसतं. हिंदी, Enlish, मराठी, फ्रेंच, हाताच्या खुणा (!) सबकुछ चलता है !

गुरुदेव
‘न धरी मी शस्त्र करि, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार !” योगेश्वर कृष्णाचं वाक्यं हे लोक जणू ‘आदेश’ म्हणून पाळतात ! आपल्या software program मधल्या चुका शोधायच्या असतील तर आपल्या बाजूला बसतात आणि,”ही लाईन इकडे का टाकलीय?”, “हा counter कुठे reset करतोयस?”, “अरे सापडलं! तू flag टाकलाच नाहीयेस” वगैरे ‘मौलिक मार्गदर्शन’ करतात. Coaching and Mentoring हे त्यांचे आवडते शब्द ! वागणं-बोलणं, देहबोली म्हणजे जणू एकदम प्रोफेसरची ! आपला कुठलाही प्रॉब्लेम शांतपणे ऐकून घेणार, तेही अशा पोझमधे की एका हाताची घडी, त्यावर दुसऱ्या हाताची अर्धी घडी आणि त्या हाताचा तळवा स्वत:च्या गालावर ठेवलेला, खुर्चीत मागे रेलून बसलेले वगैरे! म्हटलं ना मगाशी की देहबोली एकदम प्रोफेसरसारखी असते म्हणून !

ढकलेश्वर
‘Passing the parcel’ हा खेळ खेळण्यात एकदम पटाईत लोक! आपलं काम दुसऱ्यावर ढकलणं ह्यांच्याकडून शिकावं. Project Manager हे पण project plan आणि इतर documents तयार करणार Project Leader ! तो (किंवा ती) तरी काय करणार? ‘Preparing for future growth’ असं स्वत:ला समजावतो (किंवा समजावते) आणि गुमान Microsoft Project वापरून आयोडेक्सचा खप वाढवतो (किंवा वाढवते) ! स्वत:ची सही दुसऱ्या कुणी करून चालत असतं आणि त्याची जबाबदारी मात्र त्या दुसऱ्यावर पडणार असती तर ‘ढकलेश्वरांनी’ नक्की ते कामही ढकललं असतं !

आनंदराव
तुमचं नशीब थोर असलं की असा मॅनेजर मिळतो. हे लोक अगदी आनंदात जगतात आणि मस्तीत राहतात. भाषेबाबत अगदी ‘संस्कृतपंडित’ नसले तरी आपला मित्र असल्यासारखे ‘संस्कृत’ ऐकवतात. त्यांच्याकडे काम करायला इतकी ऊर्जा कुठून येते? सकाळी ८:३० वाजता असलेली चेहऱ्यावरची ताजगी संध्याकाळी ६:३० वाजताही तशीच कशी राहते? कधी-कधी तर रात्री-अपरात्री काम करतानाही हे लोक ताजेतवाने ! जणू नुकतेच आंघोळ करून आलेत. त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे धमाल असते पण नेमके ते नोकरी सोडतात किंवा काही कारणाने तुम्ही नोकरी सोडता.

चुकारेशास्त्री
‘खोटारडा’ आणि ‘थापाड्या’ ह्यांत जसा फरक आहे ना तसाच ‘चुकारेशास्त्री’ आणि ‘ढकलेश्वर’ ह्या दोघांत आहे ! ‘ढकलेश्वर’ तसे निरूपद्रवी असतात; म्हणजे अगदीच गरज पडली तर आपल्या मदतीला येतातही. ‘चुकारेशास्त्री’ त्यांच्या नावाला दोन्ही अर्थांनी जगतात; एक म्हणजे हक्क असल्यासारखी कामं टाळतात आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या चुका दाखवण्यात एकदम तत्पर असतात !

गुलछबू
हे प्रकरण म्हणजे अगदीच वेगळं ! ह्या जातीचे लोक खूप मोठ्या पदांवर, नाटक-सिनेमा-जाहिरात वगैरे क्षेत्रांत किंवा राजकीय पक्षाचे नेते म्हणून दिसतात. ह्यांच्यात ‘आनंदरावांचे’ बरेच गुण असतात पण काही जास्तीचे ‘गुणही उधळतात!’ लग्नं ह्या संस्थेवर फारसा विश्वास नसल्याने किंवा नुसत्या लग्नाने भागत नसल्याने त्यांचं ’इतर रंग खेळणं’ जोरात असतं. ‘स्टेपनी’ फक्त आपल्या वाहनाला असावी ह्यावर त्यांचा विश्वास नसतो !!!

गोंदवाले
तुमची मॅनेजर स्त्री असल्यास हा प्रकार भेटू शकतो. बाईमाणूस मॅनेजर असेल तर सामान्यपणे एक गोष्ट दिसते की आपलं म्हणणं निदान नीट ऐकून घेतलं जातं. एका जागी बसून सलगपणे काम करण्याची क्षमता पुरूषांपेक्षा बायकांमधे जास्त दिसते. एकदा का सकाळी खुर्चीवर मांड ठोकली की मग फक्त लंचसाठी उठायचं. नंतर परत कामाला लागायचं ते एकदम संध्याकाळी घरी जायलाच उठायचं. तोपर्यंत जणू ‘ये फेविकॉल का जोड है !’ कदाचित पुरूषांपेक्षा बायका जास्त सहनशील आणि एकाग्र असल्यामुळे असेल. सहनशीलतेवरून आठवलं, ‘प्रसूतिवेदना’ हा प्रकार पुरूषांना भोगावा लागत नाही त्यामागे निसर्गाचा नक्की काही विचार असणार ! ये बात ‘बाप’ लोगों के बस की नहीं !

फुलबाजी
नमुनेदार स्त्री मॅनेजरचे मुख्य दोन प्रकार दिसतात. शोभेची फुलबाजी आणि तडतडी फुलबाजी ! शोभेची फुलबाजी नुसतीच इकडून-तिकडे करत असते. चेहऱ्यावर छानसं हसू कायम आणि ओठी “प्लीssज”, “थॅंक्यू sss” अशी गोड भाषा ! भाषेइतकाच ओठांवर तजेलदार असतो लिपस्टिकचा रंग ! कसं जमतं त्यांनाच माहिती पण दिवसभर लिपस्टिक तस्संच लाल राहतं ! तडतडी फुलबाजी असेल तर ह्या सगळ्या बरोबर ‘तोंडाचा पट्टा’ हा एक दागिना असतो. एकतर सारखी फोनवर असते किंवा मग status report चा कीस पाडत असते.

मायक्रोस्कोप
ह्यांचा दुसऱ्यावरच काय पण बहुतेक आरशातील स्वत:च्या प्रतिमेवरही विश्वास नसतो ! प्रत्येक गोष्ट अगदी बारीक-सारीक माहिती करून घ्यायची असते. त्यांच्या लेखी ‘manager’ ह्याचा अर्थ ‘controller’ असा होतो ! Programmer मान खाली घालून काम करत असताना, हलक्या पावलांनी, त्याच्या / तिच्या मागे येऊन काय प्रोग्रॅम लिहितायत ह्याकडेच त्यांचं जास्त लक्ष ! पांढ़ऱ्याशुभ्र पूर्ण कागदापेक्षा त्यावरचा छोटा काळा ठिपका ह्यांना आधी दिसतो !

फणस
हे म्हणजे कोकणातल्या फणसासारखे, वरून काटेरी पण आतून एकदम गोड. दुसरी उपमा द्यायची तर करली माश्यांसारखे. खूप काटेरी पण तितकेच चवदार ! खूप काम असेल तर आपण रात्रभर बसलो तरी एका शब्दाने म्हणणार नाहीत पण आपल्या खायची-प्यायची नीट सोय करतील. प्रॉब्लेम आपण सोडवायचा असल्याने, त्यांना खरं विशेष काही करण्यासारखं नसूनही, रात्रभर आपल्यासाठी थांबतील. रागावले की उभं-आडवं झापतील पण आजारी असलो तर चौकशी करायला घरी येतील ! आपण बरे झाल्यावर ऑफिसमधे गेलो की पुन्हा चौकशीही करणार नाहीत !

शिलेदार
‘एक घाव – दोन तुकडे’ असा बाणा, मग भले ते मराठी नसेना! तडकफडक बोलणं आणि फटाफट निर्णय घेणं ह्यांच्याकडून शिकावं. दोन तास चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळात (अर्थात conference call) हे दहा मिनिटांसाठी येतात आणि सगळं मार्गी लावून जातात. जणू घोड्यावरून येतात आणि तलवार पाजळून जातात. ह्या साहेबांचा ‘learning curve’ वगैरे भानगडींवर विश्वास नसतो ! ‘शिलेदार’ आणि ‘संस्कृत पंडित’ असे गुण एका ठिकाणी असले तर काही विचारायचीच सोय नाही.अशावेळी त्यांच्या टीममधे माणसं गरज असेपर्यंत राहतात आणि पहिली संधी मिळाली की बाहेर पडतात. Senior Management मात्र अशा मॅनेजरला गळ्यातला ताईत करते कारण ‘On Schedule - Under Budget’ हा त्यांचा मंत्र असतो.

बुरखाधारी
हे फारच डेंजरस ! ‘मिठी छुरी’ ह्या कॅटेगरीतले ! तुम्हा चार-पाचजणांत एकदम मस्त गप्पा करतील, तुमच्या बरोबर चहा-कॉफी घेतील आणि त्यांच्या स्वत:च्या मॅनेजरची यथेच्छ निंदा करतील. तुमची reaction आणि तुमच्या comments लक्षात ठेवतील. संध्याकाळी त्यांच्या मॅनेजरबरोबर ड्रिंक्स घेतील आणि दिवसभराचा वृत्तांत तिखट-मीठ लावून सांगतील ! ज्या दिवशी तुम्हाला समजतं की आपण सहज काहीतरी बोललेलंसुद्धा भलताच अर्थ घेऊन, माजोबांकडून boomrang होतंय, तेव्हा तुम्ही शहाणे होता. (टीप : बापाचा बाप – आजोबा तसं मॅनेजरचा मॅनेजर – माजोबा !)

रंगेल रिंगमास्टर
डोळ्यांसमोर आणा – हेफ हेफ़नर किंवा फिरोज खान ! अजून काय सांगायला पायजे राव? ‘प्ले बॉय’ मासिकाचा सर्वेसर्वा हेफ़ हेफनर त्याच्या विलासी राहणी आणि रंगील्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षीही साहेब ‘कार्यरत’ आहेत !!! पण कॉर्पोरेट जगात मात्र हेफची अजून एक ओळख आहे; ती म्हणजे अतिशय organized professional ! कधीतरी एकदा टीव्हीवर त्याचं ऑफिस, कामाची पद्धत वगैरे दाखवत होते. सगळं एकदम टापटीप आणि पद्धतशीर. कदाचित त्यामुळेच ‘इतर’ मॅगझिन्स आणि ‘प्ले बॉय’च्या यशात प्रचंड फरक आहे. आपल्याकडेही रूपेरी पडद्यावर मुमताज, झीनत अमान पासून ते सेलिना जेटलीपर्यंत सगळ्यांना ‘दाखवणारा’ फिरोज खान एक दिग्दर्शक म्हणून शिस्तशीर आणि तापट आहे म्हणतात.

अधारस्तंभ
हे म्हणजे फारच दुर्मिळ लोक ! ‘आखूड शिंगी, बहु दुधी’ म्हणता येतील असे.

बिझनेसचं सखोल ज्ञान, नवनवीन टेक्नॉलॉजीची माहिती, जीभेवर मिठ्ठास, ‘आनंदरावांची’ प्रसन्नता, ‘शिलेदारांची’ आक्रमकता, ‘गुरूदेवांचा’ शांतपणा, ‘गोंदवाल्यांची’ एकाग्रता, ‘रिंगमास्टरचा’ पद्धतशीरपणा आणि रसिकता (रंगेलपणा नाही !), ‘मायक्रोस्कोपची’ चिकित्सक वृत्ती, वागण्यात ‘फणसाचा’ गोडवा आणि ‘गोंधळेकरांचा’ सरळ स्वभाव एवंगुणवैशिष्ठे एकत्र केल्यावर हा तयार होतो ! असा मॅनेजर कधी भेटला तर जरूर कळवा !!!

एकमेवाद्वितीय
ही एक आणि ही दुसरी क्लिप पहा. तुम्हीच काय ते ठरवा !!!