Saturday, August 9, 2014

लॉक ग्रिफिन -- एक भन्नाट कादंबरी!

नावावरून तर वाटतं की हा इंग्लिश कादंबरीचा अनुवाद असणार! त्याशिवाय मराठी कादंबरीचं नाव 'लॉक ग्रिफिन' असं अगम्य का असावं? 'वसंत वसंत लिमये' हे लेखकाचं नाव वाचल्यावर मात्र खात्री पटते की कादंबरी अनुवादित वगैरे नाहीये. आता ज्या लेखकाच्या नावातच वेगळेपणा आहे त्याच्या कादंबरीचं नावही जरा 'हटके' असणारच ना! जोक्स अपार्ट पण 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी जरूर वाचावी अशी आहे.  कादंबरीच्या शीर्षकातल्या 'लॉक' ह्या शब्दाचा स्कॉटलंडमधल्या पौराणिक 'गेलिक' भाषेतला अर्थ म्हणजे 'तलाव'. 'ग्रिफिन' हे  गरूडाचं डोकं आणि सिंहाचे शरीर असलेल्या एका पौराणिक प्राण्याचे नाव.  ग्रिफिनला सामर्थ्य, साहस, आणि शहाणपणाचं प्रतीक मानलं जातं. ही माहिती आणि ग्रिफिनबद्दल अजून थोडी माहितीही कादंबरी वाचायला सुरू करण्याआधी डाव्या पानावर वाचायला मिळते. 'लॉक' आणि 'ग्रिफिन' हे शब्द जरी पौराणिक असले तरी कादंबरीतल्या घटना इसवी सन २००० सालाच्या दहाएक वर्षं अलीकडे-पलीकडे घडणार्‍या आहेत. जसजसे आपण कादंवरी वाचत जाऊ तसतसे 'लॉक ग्रिफिन' ह्या दोन शब्दांचं कादंबरीतलं महत्व समजत जातं. 

नक्की का वाचावी ब्वॉ ही कादंबरी? मराठी साहित्यात इतक्या कथा - कादंबर्‍यांची भर पडत असते मग 'लॉक ग्रिफिन्'चे वेगळेपण कशात आहे?  एक तर ही एक रहस्यमय कादंबरी आहे. पण इंग्लिशमधे आपण 'मर्डर मिस्ट्री' म्हणतो तेवढाच कादंबरीचा आवाका नाहीये. तर हेरगिरी आणि त्या अनुषंगाने येणार्‍या अमेरिकेतील सी.आय्.ए, एन्.एस्.ए, किंवा भारतातील रॉ, एस.पी.जी अशा यंत्रणा ह्या जणू कादंबरीतील महत्वाची पात्रेच आहेत. कादंबरीची सुरूवात होते तेव्हा 'सौभद्र कानिटकर' हा कथानायक कॉलेजमधे शिकत असतो. मुंबईत राहणार्‍या त्याच्या वडिलांच्या बाबतीत आणि अमेरिकेत राहणार्‍या सख्ख्या धाकट्या काकाच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्याने सौभद्रची 'दुनिया इधर की उधर' होते. बरं तसं म्हटलं तर आजोबा, वडिलांचं मध्यमवर्गीय कुटुंब. अचानक उलथापालथ यावी असं काही आयुष्य नाही खरंतर! काका-काकूही अमेरिकेत राहूनही भारताशी असलेली नाळ जपून ठेवलेले. हं, काका मात्र आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर संगणक क्षेत्रात अशा स्थानी पोचलेला असतो की भारताचे एक तरूण पंतप्रधानही त्याच्या नजीकच्या संपर्कात असतात!

सौभद्रच्या वडिलांच्या आणि काका-काकूच्या बाबतीत अगदी थोडक्या दिवसांच्या अंतराने काही दुर्दैवी घटना घडतात. काका-काकू तर चक्क अमेरिकेतले पण त्यांच्या बाबतीत एक घटना घडते ती दिल्लीच्यापुढे उत्तरेला आणि आपले काका-काकू तिथे अचानक आले आहेत ह्याचा सौभद्रला पत्ताच नसतो. त्या घटनांनतर जवळपास आठ-नऊ वर्षांनी सुरू होतो 'लॉक ग्रिफिन'मधल्या तरूण सौभद्रने सुरू केलेला शोध. त्या घटनांबद्दल अशा सत्याचा शोध ज्याबद्दल त्याला काहीच माहिती नसते. टक्कर कुणाशी तर उद्योगजगातील एका बड्या समूहाशी, अंडरवर्ल्डच्या नामचीन गुंडाशी, आणि ऑक्टोपसप्रमाणे अनेक बाजूंनी हल्ला करू शकणार्‍या देशी – परदेशी सरकारी यंत्रणांशी! सत्य काय ते शोधायलाच पाहिजे ही सौभद्रची धडपड कशामुळे तर त्याला झोपेत अस्वस्थ करणार्‍या एका स्वप्नामुळे ज्यातला प्रदेशही सौभद्रला अनोळखी!...आणि त्याला ह्या शोधमोहिमेत साथ कुणाची तर अमेरिकेहून भारतात आलेल्या जुलिया नावाच्या गोर्‍या अमेरिकन तरूणीची जी सौभद्रची बाल- मैत्रिण असते!! बस्स... तिथून पुढे आहे तो सगळा 'लॉक ग्रिफिन'मधला खिळवून ठेवणारा प्रवास!

'लॉक ग्रिफिन्'मधल्या घटना घडतात त्या एका विस्तृत अशा आंतरराष्ट्रीय पटलावर! नाशिक, मुंबई, सातारा, कोकण अशा महाराष्ट्रातल्या जागांपासून ते पार वर उत्तर भारतातल्या हर्सिल, उत्तर काशी, दिल्ली अशा तर भारतातल्याच जागा. त्याशिवाय अमेरिकेतील पूर्व किनार्‍यावरची वर्जिनिया, मेरिलँडपासून ते वर नायगारा फॉल्स आणि पश्चिमेला कॅलिफोर्निया! इंग्लंड, स्कॉटलंड असे युरोपमधील देश तर सांगायलाच पाहिजेत. ह्या बाबतीत प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे सह्याद्री आणि परदेशातील गिर्यारोहणामुळे लेखकाला लाभलेला प्रचंड अनुभव. शिवाय लेखकाने ह्या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन - राहून सग़ळा परिसर अनुभवी नजरेने पाहिल्यामुळे सगळी ठिकाणं नजरेसमोर येतात. ज्या ठिकाणी आपण अनेकदा जाऊन आलोय त्या ठिकाणांबद्दलही नव्याने माहिती मिळते. ह्या सगळ्यात कादांबरीचं कथासूत्र सौभद्रबरोबर पुढे सरकतच राहतं आणि ते ही वेगानं. सौभद्रच्या काका-काकू आणि वडिलांच्या बाबतीत 'नक्की काय झालं असेल?' ही उत्सुकता आपल्याला बांधून ठेवते.  मला तरी 'लॉक ग्रिफिन' वाचताना वाटत होतं की आपण जणू विस्तृत पटलावर घडणारी 'दा विन्चि कोड'सारखी एखादी इंग्लिश कादंबरीच वाचतोय.

कादंबरीत मधेच एखादं वाक्य असं येतं की आपण वाचता-वाचता थोडं थांबून स्वत:शीच म्हणतो की अरे! ह्या वाक्यात तर जणू आपल्याच मनातल्या भावना लिहिल्या आहेत. एक उदाहरण द्यायचं तर एका ठिकाणी साधारण असा उल्लेख आहे -- <<'इंडिया' हा शब्द म्हणजे त्याच्यासाठी लहानपणी वादळी रात्री, वीजांच्या कडकडात आईच्या कुशीत मिळणार्‍या सुरक्षिततेसारखा होता.>> जगभर पसरलेल्या अनेक परदेशस्थ भारतीयांच्या मनात कधी ना कधी उमटणारी ही भावना आहे! पंकज उधासच्या 'चिठ्ठी आयी है....वतन की मिट्टी आयी है' अशासारखीच ही भावना! कितीही वर्षं कर्मभूमीत राहिलो तरी मायभूमीतल्या आपल्या मुळाकडे मनाला ओढणारी भावना!!

भारतीयांची जी पिढी आता साधारण चाळिशीच्या पुढच्या आहे त्यांना ठळकपणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे 'लॉक ग्रिफिन'मधल्या दोन महत्वाच्या पात्रांचे चित्रण हे भारताच्या दोन माजी पंतप्रधानांवर बेतलेले आहे. त्यांच्या वृत्तीबद्दल, कामाच्या आवाक्याबद्दल, माणसे जोडण्याबद्दल, आणि देशासाठी चांगले काही करण्याच्या तळमळीबद्दल वाचताना आपल्या लहानपणी / तरूणपणी ऐकलेली / पाहिलेली त्यांची भाषणे वगैरे मनाच्या एका कोपर्‍यात आठवत राहतात. भारत, अमेरिका अशा देशांचे एकमेकांशी असलेले राजनैतिक संबंध आणि अत्यंत उच्च पातळीवर सरकारी कारभारातली धावपळ / गुप्तता / हेवेदावे ह्याचा अंदाज येऊ लागतो.  सॉफ्टवेअर क्षेत्रातली क्रिप्टॉलॉजी / एनक्रिप्शन म्हणजे साठवलेली माहिती गुप्त राखण्यासाठीचे क्षेत्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातली थोडी माहिती वगैरे 'लॉक ग्रिफिन'मधे येते पण ती कंटाळवाणी होत नाही. उलट त्यामुळे वाचकाची उत्सुकता वाढत जाते.

कादंबरीची उणी बाजू दाखवायची म्हटलं तर मात्र आपल्याही नकळत तपशीलवार वर्णनाकडे बोट जातं. काही पानांवरचं एखाद्या ठिकाणाचं किंवा एखाद्या पात्राच्या आयुष्यातल्या भूतकाळाचं तपशीलवार लेखन अनावश्यक आणि कंटाळवाणं वाटू शकतं. अधून्-मधून येणारी तेवढी पानं चिकाटीने वाचली तर एकंदर 'लॉक ग्रिफिन' वाचत रहावीशी वाटते. कादंबरीची दुसरी आवृत्ती लवकरच दुकानांत यावी असं मला मनापासून वाटतंय. त्या आवृत्तीत जर अनावश्यक तपशीलाची काटछाट करता आली तर मात्र 'लॉक ग्रिफिन' एक जबरदस्त वेगवान अशी रहस्यमय कादंबरी होईल. मग ती एक अशी कादंबरी होईल जी एकदा हातात घेतली की रात्रभर जागून का होईना पण वाचकाला ती पूर्ण वाचल्याशिवाय चैनच पडणार नाही!

साधारणपणे एखाद्या कादंबरीवर चित्रपट निघाला की कादंबरी आवडलेला माणूस त्या चित्रपटाच्या घोषणेपासूनच चित्रपटाच्या क्वॉलिटीबद्दल साशंक असतो. 'लॉक ग्रिफिन'वर एखादा तितकाच अप्रतिम चित्रपट निघावा हे मात्र मनापासून वाटतंय. दिग्दर्शन, अभिनय,संगीत आणि पार्श्वसंगीत, छायाचित्रण, वेषभूषा अशा अनेक बाजूंनी खूप काही भरभरून करण्यासाठी 'लॉक ग्रिफिन' योग्य आहे. अर्थात चित्रपट तयार करताना ह्या रत्नाला एखादी सामान्य काच म्हणून पेश करण्याची दुर्बुद्धी निर्माता - दिग्दर्शकाला होऊ नये म्हणजे मिळवलं!  गरज आहे ती एखाद्या जवाहिर्‍याने ह्या रत्नाला योग्य पैलू पाडून जगभर नेण्याची. तयार होणारा जर मराठी असला तर मग सोन्याहून पिवळं!