Saturday, September 29, 2007

बित्तंबातमी

वृत्तपत्राने दिन आरंभी । तो जाणावा येक ’मऱ्हाठी’ ।
चहासवे ‘सकाळ’ हाती । तोचि ओळखावा ’पुणेरी’ ।।

आमची महाराष्ट्रीय मंडळ शाळा सकाळी ६.५५ ते दुपारी १२.१० अशी असायची. (तेव्हा प्रश्न पडायचा की सकाळी ७ ते दुपारी १२ अशी का नाही करत?) साधारण ६:३०च्या सुमारास आमचे रिक्षावाले पायगुडेकाका यायचे. त्यांच्या आधी ५-१० मिनिटे पेपरवालेकाका ‘सकाळ’ आणायचे. वसंत ऋतुची सुगंधित पहाट असो, दात वाजवणारी थंडी असो किंवा झिमझिमता पाऊस; पेपरवालेकाका आणि डोक्याला मुंडासं बांधलेले, दुधाची चरवी आणणारे उंचपुरे ‘गवळीबाबा’ वेळ चुकवायाचे नाहीत. अगदीच मुसळधार पाऊस असला तर मात्र त्यांचाही नाइलाज असणार. पेपर हातात आल्यापासून रिक्षा येईपर्यंत पटापट पहिल्या आणि शेवटच्या पानावरच्या बातम्यांच्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या, अनुक्रमे मुख्य आणि क्रीडा विषयक बातम्यांसाठी. ‘पेज थ्री’ एकतर नव्हतं किंवा ते कळायचं वय नव्हतं. काही वर्षांनंतर सायकलने शाळेत जायला लागल्यावर ‘हेड लाइन्स’ वाचूनच घरून निघायचं. मग शाळेची वेळ गाठायला सायकल जोरजोरात हापसायला लागली तरी चालायचं.

दुपारी घरी आल्यावर दप्तर टाकायचं आणि हात-पाय धुवून पेपर उचलायचा. दुपारभर मी आणि आजीच घरी असायचो. देवासमोर वेगवेगळी स्तोत्रं, आरत्या म्हणणारी किंवा कहाण्या वाचणारी आजी आणि ’शेषशायी’ विष्णूसारखा कॉटवर लवंडून ‘सकाळ’ वाचणारा मी !!! आधी सगळ्या पानांवरच्या नुसत्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या. नंतर मनात नोंदवलेल्या बातम्या पूर्ण वाचायच्या. तासभर मनासारखा पेपर वाचून झाल्यावरच शाळेचा युनिफ़ॉर्म बदलून जेवायचो. ‘रविवार सकाळ’ म्हणजे तर मेजवानीच असायची. ‘सकाळ’ मधली ‘वाचकांची पत्रे’ हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. क्रिकेटच्या बातम्या वाचाताना खूप एक्साइट्मेंट असायची. ‘मुदस्सर नझर त्रिo कपिल देव ५’ किंवा ‘प्रतिकूल स्थितीत सुनीलचं जिद्दी शतक’ वगैरे वाचताना आपलीच छाती वीतभर वाढायची. साध्या-सोप्या पण छान छान गोष्टींचं मासिक ‘चांदोबा’ आणि संदीप पाटीलचं पाक्षिक ‘एकच षटकार’ ह्याची तर चातकासारखी वाट पहायचो. मुळात आवड होतीच पण द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, मकरंद वायंगणकर ह्यांच्यामुळे क्रिकेटची ‘नजर’ यायला लागली. मग ‘चंदेरी’ मिळायला लागलं. चित्रपट विषयक दर्जेदार लेखन वाचायची सवय लागली. कॉलेजला असताना ‘सवाई गंधर्व’साठी रात्रभर जागून आलं की, कार्यक्रमांची नशा डोक्यात असतानाच, ‘सकाळ’च्या वृत्तांतातून मनात पुन्हा आदल्या रात्रीचं चांदणं फुलायचं.

नववी-दहावीत एकदम साक्षात्कार झाला की ‘केसरी’ आणि ‘तरूण भारत’ मध्ये दहावीच्या अभ्यासाबद्दल बरंच काही चांगलं येतं. नमुना प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायच्या. त्यातही, लोकमान्यांचा ‘केसरी’ हातात घेताना प्रत्येक वेळी मनात आदरभाव असायचा.

ते वय बरेच मानसिक आणि शारीरिक साक्षात्कार व्हायचं असतं. कॉलेजमधे असताना हिंदी चित्रपट बघायचं वेड लागलं. (ते अजूनही आहे म्हणा.) ताजे चित्रपट कुठल्या टॉकीजला लागले आहेत ते शोधायला शुक्रवारच्या ‘प्रभात’ सारखा दुसरा पेपर नव्हता. पुण्यात बऱ्याच ठिकाणी ‘सार्वजनिक वाचनालयं’ आहेत. म्हणजे रस्त्याच्या कडेला भिंतीवर लाकडी फळ्यांचे कप्पे ठोकून त्यात मराठी पेपर फुकटात वाचायला ठेवलेले असतात आणि बसायला एखादा बाक. काही ठिकाणी बाजूलाच १-२ उभे रांजण आणि साखळीनं बांधून ठेवलेले स्टीलचे ग्लास अशी पाणपोई. एकाच पेपरची पानं चार-पाच वेगवेगळ्या लोकांकडे. आपलं पान वाचून झालं की दुसऱ्याला द्यायचं. ’प्रभात’ नक्की वाचायला मिळणारी दुसरी ठिकाणं म्हणजे ’अमृततुल्य’ ! चहा, क्रीम रोल आणि ’प्रभात’ साठी ’अमृततुल्य’चा कट्टा बेस्ट. वीस-एक वर्षांपूर्वी तरी ‘प्रभात’चे वाचक तीन प्रकारचे होते. एक म्हणजे “हे…आपलं जरा टाईमपास” म्हणणारे ’रिकामटेकाडचे किल्लेदार’. दुसरे म्हणजे ’कल्याण बाजार’ वगैरेचे सांकेतिक आकडे समजणारे ‘मटकाबहाद्दर’ आणि तिसरे आमच्या सारखे ’सिनेदार’. कुठला सिनेमा कुठे लागला आहे ते बघून ठेवायचं. टॉकीज शोधण्यासाठी पुण्याचे गल्ली-बोळ आणि कँप ते पार खडकी-दापोडी पर्यंतचे रस्ते पालथे घातले. रस्ता चुकलो किंवा माहिती नाही असं वाटलं तर जवळपासच्या रिक्षावाल्यांना विचारायचं; एकदम perfect directions मिळायच्या. ‘प्रभात’ मध्ये तर चित्रपटाचं नाव आणि फोटोबरोबर १-२ ओळींत जाहिरातही असायची. म्हणजे काहीतरी असं --
“संपूर्ण कुटुंबाने पहावा असा -- हम आपके हैं कौन” !
“अभिनयाच्या ’शहेनशाह’चा आता ‘अग्निपथ’ !
“कुर्बानी ! तुफान दन्नादन्नी !! विनोद खन्ना, फिरोज खान आणि ’चिकणी झीन्नी’ झीनत अमान”!

काही वर्षांनंतर रोज संध्याकाळी बातम्या आणि गावगप्पा (gossips) कळायला लागल्या; पुण्यात ‘संध्यानंद’ मिळायला लागला. (जाहिरात असायची -- आज का आनंद ‘संध्यानंद’). आता माहिती नाही पण ‘तीन डोक्यांच्या कुत्र्याचा अमेरिकेत जन्म’ किंवा ‘बर्म्युडा ट्रॅंगलचा अजून एक रहस्यमय बळी’ वगैरे अशा प्रकारच्या (बीबीसीलाही न मिळणाऱ्या) बातम्या असायच्या !!!

सुट्टीत मुंबईला गेलो की ‘महाराष्ट्र टाइम्स’ (जाहिरात -- ‘पत्र’ नव्हे, ‘मित्र’), ‘लोकसत्ता’, ‘नवा काळ’ किंवा ‘सामना’ (हिंदूह्रुदयसम्राटांचा) असे पेपर्स वाचायला मिळायचे. तीन घड्या घातलेले ह्या पेपर्सपैकी एक किंवा Indian Express / Times of India मुंबईकरांच्या काखोटीला हमखास असायचे. मुंबईतल्या पेपर्सचे fonts पुण्यातल्या पेपर्सच्या फॉंट्सपेक्षा वेगळे असायचे. (मुंबईतला कुत्रासुध्दा जागेअभावी शेपटी उभीच हलवतो ना, तसंच काहीसं !! Just kidding J ) खरं सांगायचं तर मुंबईचे पेपर्स तेव्हा कधीही ‘आपले’ वाटले नाहीत. अर्थात मुंबईच्या आत्या, मामा, मावशी ह्यांपैकी कोणीही पुण्याला आले की त्यांना ‘लोकसत्तेत’ किंवा ‘मटा’मधे काय आलंय ते वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही !!

Enligsh वर्तमानपत्रांशी आपला संबंध म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’! नाही म्हणायला मधेच कधीतरी हुक्की यायची आणि ‘Times of India’ किंवा ‘Indian Express’चं दर्शन घ्यायचो. जुन्या मॅट्रिकपर्यंतच शिकूनही अप्पांचं English खूप छान होतं; विशेषत: English grammer. त्यांना कुठलाही शब्द विचारला की नक्की म्हणायचे, “पूर्णं वाक्य काय आहे?” शब्दांपेक्षा वाक्य आणि वाक्यांपेक्षा अर्थ पाहायला त्यांनी नकळत शिकवलं! मला किंवा मंदारला शब्द अडला की त्यांचा आधी भर असायचा dictionary उघडून आम्हीच अर्थ शोधण्यावर. कधी कधी कळायचंच नाही, आपण पेपर वाचतोय की डिक्शनरी? नवीन शब्द अडला की त्याचा अर्थ साधारणपणे कुठल्या पानावर सापडेल ते मात्र पक्कं समजायला लागलं. ‘Practice makes a man perfect’, दुसरं काय!

अमेरिकेत आल्यावर तर गेल्या काही वर्षांत electronic media ने जणू ‘अलिबाबाची गुहा’ उघडून दिली. ‘तिळा तिळा, दार उघड’ च्या चालीवर नुसतं ‘गुगल गुगल, साईट उघड’ म्हणायचं !!! सकाळ, लोकसत्ता, मटा, सामना !!! सगळ्यांच्या वेब साईट्स आहेत. नागपूरच्या मित्रांची ‘येतो नं बे तू?’ अशी प्रेमळ धमकी ऐकतानाच त्यांचा ‘लोकमत’ सापडला. दर आठवड्याला ‘लोकप्रभा’ मिळायला लागला. Rediff, BBC, CNN वगैरे तर मिळालंच पण फक्त क्रिकेटसाठी ‘क्रिक इन्फो’ किंवा ‘क्रिक बझ’ मिळाले. You Tube’ ही तर जणू ‘अलिबाबाची दुसरी गुहा’ सापडली.

मध्यंतरी कुठेतरी एक फार छान लेख वाचला होता. वृत्तपत्रच काय पण जगभर सगळ्यांचं एकंदर वाचन कमी झालं आहे असा ओरडा आपण नेहमीच ऐकतो. त्या लेखात होतं की वाचन कमी झालं नाहीये तर वाचनाचं माध्यम बदलत चाललंय. छापील वृत्तपत्र नाही वाचलं तरी लोक web sites बघतातच. पुस्तक ‘वाचायला’ वेळ मिळत नसेल तर आपण अट्टल लोक ‘audio book’ ऐकतो ना तसंच! अमेरिकेतून भारतातल्या बातम्या वाचणं म्हणजे तर जणू ‘उद्याची बातमी आजच मिळणं’ !!!

Wednesday, September 26, 2007

धमाल-मस्ती: ट्वेंटी२०

जिंकलो रेsss !!! जीत गए याsssर !!! WE DID IT MAN !!!

भारतातल्याच काय पण जगभरच्या भारतीय क्रिकेटरसिकांनी ऐन गणपतीत दिवाळी साजरी केली. बघता बघता तरूण भारतीय संघ ‘under dogs’ चा ‘World Chapions’ झाला. भारत-पाकिस्तानचा सामना नेहमीच World Cup Final पेक्षाही महत्वाचा असल्यासारखा पाहिला जातो. इथे तर साक्षात ‘Dream Final’ होती. भारताचा इतका कमी स्कोअर पाहून मन खट्टू झालं होतं पण इंटरनेटच्या text commentary मधे “Irfan is on fire” ही अक्षरं झळकली आणि सुखद विजयाची चाहूल लागली. शेवटच्या ओव्हरमधे तर पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकने सिक्स मारल्यावर प्राण कंठाशी आले होते. तेव्हढ्यात त्याचा पुढचा फटका श्रीशांतच्या हातात विसावला ! आपला भारत विश्वविजेता !!! चोवीस वर्षांनंतर ते सोनेरी क्षण परत आपल्या दारी !!! 1983 साली कपिलच्या संघानेही सगळ्यांना धक्का दिला आणि आता धोनीच्या ‘young Indian team’ ने क्रिकेटच्या भल्या-भल्यांना चकित केलं. आजपर्यंत झालेल्या सगळ्या विश्वचषकाच्या सामन्यांप्रमाणे आपण परत एकदा पाकिस्तानला हरवलं.

हा विजय मिळवलाय सळसळत्या तारूण्यानं ! हा विजय मिळवलाय ठासून भरलेल्या आत्मंविश्वासानं! हा विजय मिळवलाय, एकट्या-दुकट्यानं नव्हे, संपूर्णं संघानं !!!!

सि़क्स, सि़क्स, सि़क्स, सि़क्स, सि़क्स आणि… सि़क्स !!!

युवराज सिंगने ‘Twenty20’ मध्ये इंग्लंडविरूद्ध एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारून आधीच एक इतिहास घडवला. बऱ्यांच वर्षांपूर्वी सर गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री ह्यांनी फ़र्स्ट क्लास क्रिकेटमधे हा पराक्रम केला. त्यानंतर हर्शेल गिब्सनं एक दिवसीय सामन्यांत ह्या विक्रमावर आपले नाव कोरले. आता युवराजने Twenty20 क्रिकेटच्या इतिहासात स्वत:च्या नावाचे पान तयार केले. (पहा -- http://www.youtube.com/watch?v=bob85WbW8cU ) पायाशी आलेला चेंडू नुसता फ्लिक करून त्याने विनासायास मारलेला दुसरा षटकार म्हणजे तर ‘टायमिंगचं’ उत्तम उदाहरण आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर, क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात, ओळीनं सहा षटकार मारणं अतिशय अवघड असतं. दुसरं म्हणजे त्याचे सहाही फटके एकदम खणखणीत होते. ‘चुकून लागला’, ‘पट्टा फिरवला’ किंवा ‘आंधळी मारली’ वगैरे भानगडी नव्हत्या. अजून एक म्हणजे ‘युवी’च्या आधी तिघांनीही फिरकी गोलंदाजांना षटकार मारले होते. वेगवान गोलंदाजीला सलग सहा वेळा छपरावर किंवा प्रेक्षकांत भिरकावणं, ते ही मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना, अजूनच अवघड. युवराजचा विक्रम खरंच खूप मोठा आहे.

Twenty20 मधील एक विचित्र प्रकार म्हणजे ‘बॉल-आऊट’ ! भारताने पाकिस्तानविरूद्ध ‘टाय ‘ झालेला पहिला सामना विनोदी पद्धतीनं, अर्थात ‘बॉल-आउट’ पद्धतीनं, जिंकून अजून एक पराक्रम (!) केला होता. त्या व्हिडियोसाठी पहा http://www.youtube.com/watch?v=Pmx7rFwIYec&NR=1

अर्थात हे सगळं चालू असतानाच मनात मनात येतं ‘च्यायला, हे खरंच क्रिकेट आहे का?’. त्याच सुमारास ‘संबित बाल’ने लिहिलेला हा लेख वाचला.
http://content-usa.cricinfo.com/columns/content/current/story/311578.html
तो म्हणतो तसं खरंच , काय चूक आहे एखादी मॅच टाय झाली तर? फुटबॉलची (किंवा हॉकीची) copy क्रिकेटने आंधळ्यासारखी का करावी? उलट ती मॅच अमूल्य असायला हवी. सव्वाशेहून जास्त वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्याच मॅचेस ‘टाय’ झाल्या आहेत.

T20 हा क्रिकेटचा ‘छोटा charger’ दिवसेंदिवस लोकप्रिय होत जाणार आहे त्यात शंकाच नाही. T20 सामने म्हणजे ‘कल्ला’ चालला होता. भारतात फोन केला की दहावीतला भाचा विक्रम एकदम एक्साईट झालेला असायचा. शेंडी तुटो वा पारंबी -- दिसला बॉल की मार उचलून. नुसती हाणामारी, चौकार-षटकारांची आतषबाजी. आता वीस षटकांत दीडशे धावा वगैरे म्हणजे अगदीच मापातलं टार्गेट वाटतं.

निराशावादी सूर आळवतोय हा गैरसमज नसावा पण ‘ट्वेंटी२०’ चे साधारण नियम, खेळाचा ढाचा पाहिला की वाटतं बॉलिंग ही ‘कला’ संपत जाईल का? किती फिरकी गोलंदाज चेंडूला flight द्यायला धजावतील? किती वेगवान गोलंदाज तीन स्लिप्स लावण्याची ‘चैन’ करून बेमालूम ‘आऊट स्विंगर’ने फलंदाजाला मागे झेल द्यायला भाग पाडतील? अर्थात हे प्रश्न तर एक दिवसाचं क्रिकेट मूळ धरू लागलं तेव्हासुद्धा विचारले जातच होते. जेव्हा एखाद्या ‘ट्वेंटी२०’ सामन्यात न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी (फिरकी खेळण्यात comfortable समजल्या जाणाऱ्या) भारतीय फलंदाजांना नाचवतो, ऑस्ट्रेलियाचा ‘तेजतर्रार’ ब्रेट ली हॅट-ट्रिक घेतो, आपला श्रीशांत ‘हाणा-मारी क्रिकेट’च्या अंतिम सामन्यात चक्क निर्धाव षटक (maiden over) टाकतो किंवा हरभजनसारखा फिरकी गोलंदाज एखाद्या सामन्यातलं शेवटचं षटक टाकून प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवतो आणि विकेटही काढतो तेव्हा आशादायक चित्र दिसतं.

नुसती बॉलिंगच नाही पण बॅटिंगचं काय? प्रत्येक चेंडू उचलावा असंच जर वाटणार असेल तर लेट कट, ग्लान्स असे नाजूक आणि कलात्मक फटके कोण दाखवेल? डेव्हीड गावर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, ह्यांच्यासारखे कलाकार पैदा होतील? की सगळेच जण ‘शाहीद आफ्रिदी’?!!! ऑफ साईडला बाहेर पडलेले चेंडू सोडून देण्यासाठी आपला चौथा स्टंप नक्की कुठे आहे हे फलंदाजांना माहिती असेल? की चेंडू सोडून देणं हीच चूक समजली जाईल? एकेरी-दुहेरी ‘चिकी’ धावांनीही धावफलक हलता ठेवून, प्रतिस्पर्ध्यांच्या नकळत, षटकामागे ८-९ धावांची गती राखणाऱ्यांना संघात जागा असेल? योग्य ‘calling’ मधून दोन फलंदाजांचा एकमेकांवरचा विश्वास दिसेल? (सौरव गांगुली एकेरी धावा काढणं टाळेल; म्हणजे त्याचे कष्टं वाचतील आणि आपल्याही जीवाची ‘धाकधूक’ आपोआप वाचेल!!) सचिन, सौरव किंवा सेहवागच्या आक्रमकतेबद्दल प्रश्नच नाही पण हां, राहुलचं ‘तंत्र’ जेव्हा आक्रमण करेल ना तेव्हा मात्र मॅच पहायला अजून धमाल येईल. आठवा, भारत वि. न्यूझीलंड – १९८७. वन डेजचा वर्ल्ड कप, नागपूर मॅच. सुनील गावसकरने खुद्द श्रीकांतलाही ‘बघ्यांपैकी एक’ केलं होतं !!

एक मात्र आहे. T20 मुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा सुधारेल. किंबहुना प्रत्येक संघाला तो सुधारावाच लागेल. एक-एक धाव प्राणमोलाची असेल आणि ती अडवण्यासाटी जिवापाड धडपड करावी लागेल. ‘catches win matches’ ह्याचा खरा अर्थ भारतीय संघाला आता समजायला लागेल.

पण आता जाणवतं, one day cricket जेव्हा लोकांना आवडायला लागलं तेव्हा आमच्या आधीची पिढी का म्हणायची, “छ्या… वन डे वगैरे आपलं टाईमपासला ठीक आहे हो पण टेस्ट मॅचेस हेच खरं क्रिकेट”!!! वयाच्या तिशीतच असे म्हाताऱ्यासारखे विचार का मनात यावेत? क्रिकेटचा सामना चार तासांचा झाला म्हणून वाईट वाटावं की क्रिकेटचा समावेश Olympic Games मधे करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यात आनंद मानावा?

कुणी सांगावं, बेसबॉल आणि अमेरिकन फूटबॉलमधून डोकं बाहेर काढलं तर, उद्या अमेरिकन्सनाही क्रिकेट आवडायला लागेल!! ‘Super Bowl Party’ सारख्या ‘Cricket Party’ ‘देसी’ घरांच्या सोबतीनं ‘फिरंग’ घरीही झडतील. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांतसुद्धा, मोजक्या देशांच्या World Cup पेक्षा, Olympic Games Cricket हा नशा अजून मोठा असेलही.

सध्यातरी म्हणूया “The party is on with T20”.

कालाय तस्मै नम:! How’s That?

Saturday, September 15, 2007

गणपती बाप्पा, मोरयाsss

‘ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण… ढडाढाण…टडाढाण…
ढडाढाण…टडाढाण… ढाण्ण !!!’

ढोलाचा असा आवाज कानात रूंजी घालू लागला की जाणवतं, आता गणपती येणार मन आठवणींच्या राज्यात रमतं.

फ्लॅश बॅक – पुणे

गणपतीच्या आठवणींची सुरुवात अगदी लहानपणापासून होते. गणेश चतुर्थीला घरोघरी उकडीचे मोदक. वाफेभरला मोदक फोडून, त्यावर साजूक तुपाची पातळ धार धरायची आणि मग गट्टम !! कसं माहीत नाही पण दुपारी मोदकांचं जेवण झाल्यावरही थोड्याच वेळात क्रिकेट किंवा टेबल टेनिस खेळण्याचा उत्साह त्या वयात असायचा.

अगदी लहानपणी आम्ही सगळी पोरं एक मात्र कटाक्षाने पाळायचो ते म्हणजे गणेश चतुर्थीला रात्री चुकूनही चंद्राकडे बघायचे नाही. लहानपणी ऐकलेली गोष्ट अशी होती की एकदा गणपती मूषकावर स्वार होऊन निघाला होता. काहीतरी गडबड झाली आणि गणपती खाली पडला. नेमके ते चंद्राने पाहिले आणि गणपतीच्या फजितीला तो हसला. गणपतीला आला राग आणि त्याने चंद्राला दिला शाप,”जो कुणी गणेश चतुर्थीला तुझे दर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आळ येईल आणि तुझ्यावर कायमचा डाग राहील”. तेंव्हापासून चंद्रावर, अगदी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रावरही, डाग पडले ते कायमचेच !!!

पुण्यातल्या आमच्या ‘बॅंक ऑफ इंडिया सोसायटी’मधे सोळा घरं आहेत. त्यापैकी बहुतेक सर्वं घरांत गणपती यायचे. आमच्या घरचा गणपती अप्पांच्या जन्मगावी पालघरला असतो. त्यामुळे आमच्या घरी पुण्याला गणपती आणत नाहीत पण आई मोदकाचा नैवेद्य वगैरे साग्रसंगीत करते. कधी कधी खूप वाटायचं आपल्या घरीही गणपती असावा. आमच्या सोसायटीत मात्र ही उणीव बऱ्याच प्रमाणात भरून निघायची. रोज संध्याकाळी प्रत्येक घरी आरतीला जायचो. ‘सुखकर्ता, दु:खहर्ता..’ सुरु व्हायचं आणि ‘घालीन लोटांगण…’ पर्यंत अंगात एक छान ताल भिनायचा. ‘त्वमेव माता च, पिता त्वमेव..’ काय छान ओळी आहेत ना? आरत्यांनंतर सुरु व्हायची धीरगंभीर ‘मंत्रपुष्पांजली’. आरती कुणाकडेही असली तरी फुलं वाटायचं काम आम्हा मुलांचं. गणपतीसमोर आरतीचं तबक घेऊन उभे असलेले काका ते तबक सगळ्या गर्दीतून फिरवायचे. मंदपणे तेवणाऱ्या ज्योतीवर आई किंवा आजी तिच्या हातांचे तळवे फिरवायची. लगेच ते ऊबदार हात आमच्या चेहऱ्यावरून अलगद फिरायचे. आरतीची ती ऊब वेगळीच असते. तीर्थं पिताना दोन थेंब डोळ्यांना लावले की मिळणारा गारवाही वेगळाच असतो ना! हाती एक फूल घेऊन शांतपणे ‘ओssम यज्ञेssन यज्ञsमयजंssत देवाss…’ मधे आपला सूर मिसळायचा आणि सरतेशेवटी फूल बाप्पांच्या पायाशी ‘अर्पणमस्तु’. एकाएकी कुणीतरी ओरडायचं, “गणपती बाप्पाsss”. आम्ही सगळी पोरं मग बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडायचो, “मोरयाssss”. अर्थात बालवयाला अनुसरून, एक डोळा ‘आज प्रसाद काय मिळणार?’ ह्यावर असायचा.

आमच्या कॉलनीतील नाटकांमध्ये भाग घ्यायचा, कविता म्हणायचा किंवा नकला करायचा उत्साह दांडगा असायचा. आमची बॅंक ऑफ इंडिया सोसायटी, समोरची एल. आय. सी. कॉलनी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया सोसायटी असे सगळे मिळून कॉलनीमध्ये मोकळ्या मैदानावर गणपतीच्या निमित्त २/३ हिंदी सिनेमा आणायचो. जमिनीत दोन मोठे बांबू रोवून त्यांना मोठ्ठा पांढरा पडदा ताणून बसवायचे. समोरच्या बाजूने प्रोजेक्टरवर रीळे बसवून सिनेमा लावायचे. थोड्या थोड्या वेळाने रीळ बदलावे लागे आणि पुढचा भाग सुरू होण्याआधी पडद्यावर आकड्यांचा ‘count down’ यायचा. त्यावेळी DVD / VCR तर सोडाच पण T.V. सुद्धा चैनीची गोष्ट होती. मोकळ्या ग्राउंडवर सतरंजीवर बसून, अंगाभोवती चादर गुंडाळून पाहिलेले ‘जंजीर’, ‘सीता और गीता’, ‘शंकर-शंभू’ वगैरे चित्रपट वाऱ्याचा गारवा, गवताचा वास आणि मित्रांचा सहवास ह्यांसकट मनात ताजे आहेत.

गणपतीच्या दिवसांत पुण्याचे गणपती पहायला जाणं म्हणजे आनंद असायचा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे देखावे असायचे. कुठे ‘दशावतार’ तर कुठे ‘तुकारामांचे सदेह वैकुंठगमन’. कुठे ‘कीचक-वध’ तर कुठे ‘कालिया मर्दन’. अगदी ‘आग्र्याहून सुटका’, ‘अफझलखान वध’ असायचंच पण ‘चले जाव’ चळवळ किंवा ‘मिठाचा सत्याग्रह’ सुद्धा असायचे. सगळ्यात मजा यायची ती हिराबागेचा गणपती पहायला. कित्येक वर्षांपर्यंत फक्त हिराबागेसमोर हलता देखावा असायचा. ते हलणारे अवाढव्य पुतळे आणि मोठ्ठया स्पीकर्समधून ऐकू येणारे संवाद परत कधी अनुभवता येतील?

काही वर्षांनंतर आमचा सख्खा काका डेक्कन जिमखाना इथे एका वाड्यात राहू लागला. वाड्याच्या मध्यभागी एक चौक होता. त्याचे छत म्हणजे एकदम मोकळं आकाशच. त्या चौकात वाड्याचा सार्वजनिक गणपती असायचा. कधीकधी आरती करताना पावसाचा हलका शिडकवा व्हायचा आणि सचैल स्नानात आरती व्हायची. सगळा वाडा संध्याकाळच्या आरतीला हजर असायचा. सुरेशभाई आणि प्रवीणभाई हे शहा बंधू असले की आरती अजूनच खुलायची. वरच्या पट्टीत ‘येsssई ओsss विठ्ठलss माssझेss माsssऊssलीss येssss’ म्हणत ताना लांबवताना मजा यायची. ‘गणपती बाप्पा, मोरयाsss’ चा गजर झाल्यावर प्रवीणभाई हमखास चढ्या आवाजात ‘मोरया…मोरया… मोरया…मोरया…’ असं बराच वेळ एका दमात म्हणायचे. त्यांच्याबरोबरीनं म्हणताना दम निघायचा पण जाम धमाल असायची.

अनंत चतुर्दशी म्हणजे तर मजाच मजा असायची. शोभाआत्याकडे अनंताची पूजा असते. माझे आजोबा आणि शाळकरी मी अशी जोडगोळी चित्र्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दरवर्षी आत्याकडे पूजेला जायचो. दुपारी जेवण झालं की लगबगीनं आत्याच्या बाजीरावरोडवरच्या घरून निघायचो. तीन वाजता अलका टॉकीजच्या चौकात पोलीस ट्रॅफिक अडवायचे. आम्ही मग रिक्शातून उतरून लकडीपुलावरून वन-टू, वन-टू करत काकाच्या घरी जायचो. पांढरा शुभ्र लेंगा, लांब बाह्यांचा शुभ्र सदरा आणि कोनदार पांढरी गांधी टोपी घातलेले, झपझप पावले टाकत चालणारे आजोबा तस्सेच डोळ्यांपुढे येतात. आजोबा एके काळी हौस म्हणून संगीत नाटकांमधून काम करायचे. चालताना ते कधी-कधी छानपैकी ’प्रभू अजि गमला…’ सारखं एखादं नाट्यगीत गुणगुणायचे. ते ऐकत मी माणसांच्या गर्दीतून वाट काढायचो. लकडी पुलावर फुगेवाले, भेळवाले जमू लागत. त्यात ‘व्यास भेळ’ ही पाटी दरवर्षी हमखास दिसायची. बासरी, पिपाणीवाले म्हणजे तर खास आकर्षण होते. साधारण चार वाजण्याच्या सुमारास मानाचे पाच गणपती लकडी पुलावरून विसर्जनासाठी जायचे. पहिला असायचा – पुण्याचं ग्रामदैवत – कसबा गणपती. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा असे एकापाठोपाठ जायचे. रस्त्याच्या दुतर्फा हीsss गर्दी असायची. मानाच्या गणपतींसमोर ‘ज्ञान प्रबोधिनी’ शाळेचं पथक असायचं. त्यांचं लेझीम बघताना आपोआप पाय ताल धरायचे. काय लयीत पडायची त्यांची पाऊलं !! असं वाटायचं जणू प्रत्येकाचं अंग म्हणजे एक-एक लेझीमच झालंय. पथकाच्या पुढे एक जण झेंडा उंच उंच उडवत असायचा. शिवाय प्रत्येक मंडळाच्या गाडीसमोर ढोल आणि मोठ्या झांजांचा तो वेडावणारा आवाज, “ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!! ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!” दुपारी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी मिरवणूक संपेपर्यंत तो आवाज कानात घुमत राहयचा.

संध्याकाळी काकाच्या वाड्यातल्या गणपतीचं विसर्जन. आरत्या झाल्या की मस्तपैकी नाचत-नाचत, गुलाल उधळत आणि लाल रंग मिरवत नदीपर्यंत जायचं. “गणपती बाप्पा, मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना आमचे आवाज टिपेला जायचे. मध्येच अप्पा मुलायम आवाजात गायचे, “मार्गे हळू-हळू चाला, मुखाने गजानन बोला” आणि मग आमचेही आवाज संयत व्हायचे. नदीवर पुन्हा एकदा आरत्या, पण मोजक्याच. मग दोन-तीन लोक चांगल्या कंबरभर पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उभे राहयचे. बाप्पांना तीन वेळा पाण्यात स्नान करवून नदीबरोबर द्यायचे. विसर्जन झाल्यावर पाटात नदीवरची थोडी वाळू भरून घ्यायची. परत येतान पावलं ओढल्यासारखं व्हायचं. वाड्यात आल्यावर बाप्पांच्या रिकाम्या मखराकडे पाहताना कससंच व्हायचं. आता भारतातून चार-सहा महिन्यांसाठी आलेले वडिलधारे परत गेले की त्यांना एअरपोर्टवर सोडून घरी आल्यावर त्यांची रिकामी खोली पाहताना तसंच वाटतं.

थोड्या वेळाने वाड्यात कोरड्या भेळीचा कार्यक्रम ठरलेला असायचा. गुलालाचे लालभडक हात धुतल्यासारखं करायचं आणि भेळ हवी तेव्हढी झणझणीत करून घ्यायची. रात्री थोडा वेळ परत लकडी पुलावर गणपतीची मिरवणूक पहायला जायचं. आतापर्यंत तिकडे गर्दीचं रूपांतर जत्रेत झालेलं असायचं. “चर्र…’ आवाज करत भजी-बटाटेवडे आपल्या गाडीकडे बोलावू पहायचे. ओळखीचा एखादा मोठा मुलगा एन.सी.सी.च्या ड्रेसमध्ये गर्दी सांभाळताना दिसायचा. गर्दीत न हरवता, काकाच्या घरी परतायचं आणि आंघोळ करून थोडा वेळ झोप काढायची. पहाटे काकी किंवा वंदनाआत्या उठवायची, “चला, चला..लायटींगचे गणपती आले.” मग झोप झटकून मी आणि मंदार त्यांच्याबरोबर निघायचो. हे गणपती म्हणजे ज्यांच्या मिरवणूक रथावर लायटींग केलेले असायचे ते. रात्रीच्या अंधारात एक एक मिरवणूक रथ रोषणाईने नुसता उजळललेला असायचा; पण त्या सगळ्यांचा राजा म्हणजे ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’. तो रथ म्हणजे जयपूर, उदयपूर वगैरे ठिकाणच्या एखाद्या राजवाड्याची प्रतिकृती असायचा. त्यावर छोटे छोटे जणू लक्ष लक्ष पिवळे दिवे उजळलेले असायचे. ‘झगमगाट’ ह्या शब्दाचा अर्थं समजण्यासाठी दगडूशेठ हलवाईचा रथ नक्की बघावा. दगडूशेठ हलवाईचा गणपतीची ’नवसाला पावणारा’ अशी ख्याती आहे आणि त्या मूर्तीचं दर्शनही अतिशय प्रसन्न करणारं आहे.

दुसऱ्या दिवशी पहावं तर गरवारे पूल, लकडी पूल, टिळक रोड, लक्ष्मी रोड वगैरे गुलालाच्या सड्यांनी आणि फुलांच्या पाकळ्यांनी नुसते रंगलेले असायचे.

कॉलेजमध्ये असतानाच्या तर आठवणी अशाही छान असतात. त्यातही गणपतीच्या आठवणी काय सांगाव्या? एक तर कॉलनीच्या सार्वजनिक गणपतीचा मांडव घालणे वगैरे असायचं. वर्गणीसाठी सगळीकडे विनासंकोच फिरणं असायचं. चार ठिकाणी चौकशी करून हव्या त्या वस्तू घ्यायच्या. मांडव घातल्यावर मांडवाखाली, मोकळ्या जागेत गप्पांच्या रात्री जागवायच्या. आता वळून पाहताना जाणवतं की सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे नकळत ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’चे धडे गिरवणं होतं. फारसे रिसोर्सेस आणि फ़ंडिंग हाताशी नसताना, सगळे गोंधळ अणि वाद निस्तरत, क्वॉलिटी प्रॉडक्ट योग्य खर्चात आणि मुख्य म्हणजे वेळेत तयार करायचं. हो ना..नाहीतर गणपतीचा मांडव आणि आरास अनंत चतुर्दशीला तयार होऊन काय उपयोग? ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ तरी काय वेगळं असतं?

कॉलनी किंवा कॉलेजच्या मित्रांबरोबर रात्र-रात्रभर गणपती बघत फिरणे म्हणजे धमाल असायची. खिशात फार पैसे नसायचे. त्यामुळे ‘चैतन्यकांडी’ (पुणेरी भाषेत) ओढणाऱ्यांसाठी पैसे उरावे म्हणून अर्ध्या चहातही आनंद असायचा. ‘रॉंव..रॉंव’ करत बाइक्सवरून बुंगाट जाण्यात धुंदी होती. गणपती पहाण्यापेक्षा इतर ‘प्रेक्षणीय’ स्थळांकडे नजर जास्त वळायची. डेक्कन किंवा योग्य ठिकाणी, म्हणजे जे पहायचे ते नजरेच्या टप्प्यात आपसूक दिसेल तिथे, गाड्या लावून धत्तिंग करण्यात चहाचे ग्लास संपायचे. अर्थात मित्रांबरोबरच मैत्रिणीही असतील तर त्यांना गर्दीतील हुल्लडबाजांकडून त्रास होत नाही ना ते सांभाळलं जायचं.

कॉलेजमध्ये असताना मग मुंबईला आणि पालघरला चक्कर व्हायची. अंधेरीला भाईमामा किंवा मुलुंडला दिलीपमामाकडे आलटून पालटून गणपती असत. दुपारी जेवणं झाली की गाणी, गप्पा आणि मिमिक्रीची मैफल व्हायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मग मुंबईहून पालघर गाठायचं. कधी बरोबर आतेभावांपैकी श्रीराम किंवा निलेश असायचे तर कधी मी एकटाच. पालघर जवळ येतंय हे आजूबाजूच्या दृश्यातल्या बदलानेच कळायचं. मोठ्या नदीवरून ट्रेन धडधडत जायची. पाण्यात पैसे टाकण्यासाठी खिडकीजवळ गर्दी व्हायची. नुकत्या सरलेल्या श्रावणाची हिरवाई दूर दूर पर्यंत दिसायची. मध्येच, जणू छोटे पांढरेशुभ्र डोंगर दिसणारी, मिठागरे असायची. सकाळी साडेनऊच्या सुमारास पालघर यायचं. कधी कोवळं ऊन असायचं तर कधी नुकत्या पडलेल्या पावसामुळे आसमंत छान कुंद असायचं. स्टेशनसमोर एक यू.पी.वाल्या भैय्याचं ‘स्वीट मार्ट’ टाइप रेस्टॉरंट होतं. मस्त गरमागरम कचोरी, समोसे मिळायचे. गरम कचोरी आणि समोसे फोडून त्यात चिंचेची आंबट-गोड चटणी, हिरव्या मिरच्यांची तिखट चटणी भरायची, त्यावर पिवळीधम्मक कुरकुरीत बारीक शेव घ्यायची आणि जोडीला वाफाळता चहा. अहाहा…सुख!!! आबाकाकाचं नाव रिक्षावाल्यांना सांगितलं की ते डायरेक्ट काकाच्या घरी सोडायचे. घरच्या गणपतीची आरती वगैरे झालं की बाजारातून काही ना काही आणायला काकाबरोबर त्याच्या बुलेटवरून रूबाबात गावात चक्कर मारून यायचं. जाणारे-येणारे काकाला हात करायचे. तो ही दमदार आवाज द्यायचा, ’दर्शनाला येऊन जा’, किंवा ’आप्पाचा मुलगा आलाय’!!! तेव्हा कळायचं अप्पांनी पालघर सोडून इतकी वर्षं झाली तरी अजून कितीतरी लोक त्यांच्या आठवणी काढतात. दुपारी जेवण करून दोनच्या गाडीने मुंबईला परत. पालघर तेव्हा निवांत गाव होतं. दुपारी दोनला गाडी गुजरातहून पालघरला यायची तर काका दोन-पाच, दोन-दहाला कुणाला तरी पिटाळायचा, ”जा रे , बघ जरा गाडी कधीपर्यंत येईल?” मग गाडी यायच्या वेळेला तिथल्या तीन काकांपैकी कुणीतरी एक बुलेटवर बसवून स्टेशनवर सोडायचा. जातानाही वाटेत भेटणाऱ्यांना आवाज द्यायचे, “जरा आप्पाच्या मुलाला सोडून येतो!!”
मुंबईहून मग पुण्याला घरी परत.

पुण्यातल्या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य महणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलेचेल. अगदी गल्लीपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत काही ना काही चालू असायचं. काही वर्षांनंतर ‘पुणे फेस्टिवल’ सुरु झाला आणि ह्या कार्यक्रमांत भरच पडली. पुण्यातल्या गणपती उत्सवाने असंख्य कार्यकर्ते, नेते घडवले. कित्येक कलाकारांना लोकांनी डोक्यावर घेतलं.

मला विशेष आठवणारा एक कार्यक्रम म्हणजे मल्लिका साराभाईंच्या नृत्याचा. एक पांढरा पडदा स्टेजवर आडवा टाकून त्यावर त्यांनी नृत्य केलं. नृत्य करताना अधूनमधून त्या हातातले रंग पडद्यावर टाकत होत्या. शेवटी जेंव्हा पडदा उभा केला तेंव्हा आम्ही सगळे चक्रावून पहात होतो की त्यांनी नृत्य आणि रंग ह्या मिलाफातून पडद्यावर गणपती चितारला होता !!

असेच लक्षात राहणारे कार्यक्रम झाले ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’ गणपतीच्या शताब्दीपूर्तीवेळी. दहा दिवस रोज शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत्या आणि त्याही विनामूल्य. सारसबागेजवळच्या मैदानात प्रचंड मोठा मांडव टाकला गेला होता. एका रात्री पं. हरिप्रसाद चौरसिया ह्यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम होता. ‘जा तो से नहीं बोलू कन्हैया’ – हरिजींचा प्रसिध्द ‘हंसध्वनी’ सुरु झाला आणि काही श्रोत्यांनी तालावर टाळ्या वाजवायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीत मनापासून आवडणारे आम्ही काही लोक इतरांना खुणा करू लागलो की प्लीज टाळ्या थांबवा. सगळा प्रकार अगदीच असह्य झाल्यावर हरिजी वाजवायचे थांबले आणि शांत आवाजात त्यांनी चक्क खडसावलं, “यहॉं मदारी का खेल नहीं चल रहा !!”. क्षणात सगळीकडे शांतता पसरली. त्यानंतर मात्र हरिजींनी श्रोत्यांना अगदी मनमुराद बासरी ऐकवून धुंद करून टाकले.

त्याच ठिकाणी दोन/तीन दिवसांनंतर कार्यक्रम होता स्व. उ. विलायत खॉंसाहेबांचा. रात्री ११ ते पहाटे जवळपास ४:३० पर्यंत खॉंसाहेब वाजवत होते. रात्री उशिरा आम्ही कॉलेजच्या मैत्रिणींना पटकन त्यांच्या घरी सोडायला गेलो. बाकीचे मित्रही घरी गेले आणि मी परत कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. आता मांडवात अगदी तुरळक लोक होते पण आम्ही सगळे जणू बेहोष झालो होतो. गायकी अंगाने वाजणाऱ्या सतारीचे सूर जास्त गोड होते की वाजवताना खॉंसाहेब मधूनच बंदिश गायचे ते जास्त मधाळ होतं हे ठरवताच येत नव्हतं. मी मांडवात मागच्या बाजूला उभा राहून ऐकत होतो. खॉंसाहेबांनी पहाटे “भैरवी” सुरु केली. काळजाचा ठाव घेणारी ती अजोड ‘भैरवी’ ऐकता-ऐकता डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. वादन संपल्यावर भानावर येऊन पाहिलं तर आजूबाजूचे लोकही त्याच अत्यानंदाच्या अनुभूतीने डोळे पुसत होते.

माझं भाग्यं मोठं म्हणून गणपती उत्सवात त्यादिवशी मी देवाची सतार अनुभवली.
- गणेश चतुर्थी, २००७

Saturday, September 8, 2007

शब्दस्नेह

मनस्वी अंतरीचे
धुमारे, ताटवे फुलावे
सोबतीला एकटेपणी
शब्द चार असावे…!!!