Tuesday, December 25, 2007

बोंबील आख्यान !

पुणेरी विनंती:
’मासे तुमचं अन्न असेल’ किंवा ’मासे खाण्याविषयी वाचायला हरकत नसेल’ तरच कृपया हे वाचावे.
-- आज्ञेवरून !!!
---------------------------------------------------------------------
झर्र…झर्र…झर्र…झर्र…

ऑफीसमधे काम करताना खिशातला मोबाईल फोन थरथर करून थांबला. मनात म्हणलं समस (SMS) दिसतोय. फोन पाहिला तर दीपाचा समस होता “I got bombeel” ! कामाच्या गडबडीत त्या वाक्याचा अर्थ समजायला १-२ मिनिटे लागली. मग एकदम हजार tube lights पेटल्यासारखा डोक्यात प्रकाश पडला. सगळ्या लिंक्स लागल्या. ठरल्याप्रमाणे साधारण ह्या वेळी आज दीपा चायनीज स्टोअरमधे मासे आणायला जाणार होती नाही का ! आता समस आलाय की अचानक आज तिला ओले बोंबील मिळालेत !!! I wish आत्ता मी न्यू यॉर्कमधे नसतो ! I wish ५ मिनिटांत घरी पोचता आलं असतं !! I hope संध्याकाळ लवकर होईल !!! पाहिलंत, नुसतं ‘बोंबील‘ म्हणल्यावर मनात किती विचार डोकावले !

संध्याकाळी घरी पोचलो तर दीपा म्हणाली तुझ्या चेहऱ्यावर “बोंबील” असं लिहिलेलं दिसतंय ! छ्या, बायकोचं आपलं कायच्या काहीच म्हणणं असतं! असं चेहऱ्यावर “बोंबील” लिहिलेलं असतं का कधी? आणि जर लिहिलेलं वगैरे असलंच तर, “कधी जेवायचं” असं असेल की नाही?

अचानक बोंबील मिळाले पण प्रयोग म्हणून दीपाने फक्त थोडेच घेतले होते. (चांगले निघाले नसते तर पैसे शब्दश: पाण्यात गेले असते !) आता एक प्रॉब्लेम असा होता की चायनीज दुकानातून आल्यामुळे बोंबील आख्खे होते. ते साफ कसे करायचे? (आपल्या वाट्याला फक्त सुख यावं म्हणून अनावश्यक भाग आणि काटे आई परस्पर काढून टाकते ना त्यातलीच ही एक गोष्ट…छोटी पण महत्वाची !) मग काय, आम्ही दोघंही घड्याळावर नजर ठेवून होतो. भारतात सकाळचे सहा वाजले ना वाजले तेवढ्यात लगेच आईला फोन केला. बोंबील मिळालेत ह्याचा आनंद आमच्यापेक्षा तिलाच जास्त झाला ! आईकडून नीट समजावून घेतले आणि लगेच मासे साफ करायला सरसावलो !! आईचं एक आवडतं वाक्य आहे, “डोळे भितात..हात करतात” ! बघता बघता बोंबील साफ करून झालेही !

मला तरी असं वाटतं की बोंबील हा एक मासा असा आहे जो वाटीपेक्षा ताटात यावा ! मंद आचेवर तळलेले बोंबील समोर आले की भले भले जीभ सैल सोडतात !! “पुराव्यानिशी शाबीत करीन”, पुलंचे हरितात्या म्हणायचे तसं ! दीपा बोंबील तळताना गालात हसत होती असं मला अजूनही वाटतंय ! किचनच्या कट्ट्यावर बसलेला आदित्यही confused होता की बाबा आज इतका खूश का दिसतोय?

(बहुतेक माझ्या येरझाऱ्या पाहून) दीपा म्हणाली जरा चाखून तर बघ ना ! “कशाला उगीच !”, “जेवतानाच घेतो गं”, “आता तू म्हणतेयस तर..” वगैरे वाक्य निरर्थकपणे म्हणल्यासारखं केलं आणि हळूच एक तुकडी उचलली !! अहाहा…जीभेवर ठेवली आणि अलगद विरघळली !!! जेवायला बसल्यावर मात्र बोलत बसायला, गप्पा करायला वगैरे वेळ नव्हता हां ! गरम गरम चपाती, त्यावर पातळ धारेचं तूप आणि ताजे फडफडीत ओले बोंबील !! किंवा मग गरम आणि छान मऊ-मऊ असा पांढरा भात आणि चवदार बोंबिलांचं कालवण ! पण जेवणानंतर ’….जाणिजे यज्ञकर्म’ पूर्ण करण्यासाठी, नारळाचं दूध आणि आमसुलांचा रंग अशा रंगसंगतीने गुलाबी झालेली, आंबट-गोड सोलकढी ! बस्स…आपली मागणी एवढीच ! स्वर्ग ताटात येतो, दुसरं काय ! देव तरी कुठल्या रूपात भेटेल कधी सांगता येतं का? पुलं म्हणाले तसं “परमेश्वराचा प्रथमावतार आपल्या ताटात येतो” ! (पुलंचे असंख्य उपकार मानायचे की त्यांनी काळ-वेळ किंवा इतर संदर्भांच्या पलीकडली वाक्यं लिहून ठेवली आहेत! ते बागा फुलवून गेले; आपण पाहिजे तेव्हढी फुलं वेचायची !) तुम्हाला सांगतो, खूप कमी प्रकारचे पदार्थ असे आहेत की जे पोटात उतरताना शरीरातील सगळे senses जागे करत जातात ! त्या यादीत बोंबील खूपच वर !

तसं पाहिलं तर ’मासे खाणं’ हा प्रकार आयुष्यभर काहीनकाही शिकवत असतो बरं का ! बोंबील तर अगदी लहानपणापासून साथ देतो. नमुन्यादाखल बघा हं…
१) रंग: आपण रंगबिंग शिकायला लागतो तेव्हा हिरवी पानं, निळं आकाश वगैरे छान वाटतं पण golden brown रंगासाठी योग्य reference म्हणजे ‘तळलेला बोंबील’ !
२) वचन: एकवचन, अनेकवचन वगैरे शिकलो की नाही? ते गाणं आठवतंय? “चंदा एक, सूरज एक, तारे अनेक !” तसं मासा आणि त्यातले काटे लक्षात ठेवायचे. “बोंबील – एक, पापलेट – एक, करली - अनेक !” शिवाय मासे असल्याने, लक्षात ठेवायले सोपे !
३) लिंग: तो बोंबील, तो रावस, ती कोलंबी, ती सुरमई !
४) सामान्य-विज्ञान: पदार्थ ताजा नसेल तर तो गरम केला की लगेच कोरडा होतो. ओले बोंबील ताजे नसतील तर तळल्यावर लगेच कोरडे पडतात !
५) आकार आणि दर्जा: मोठा आकार म्हणजेच उत्तम दर्जा हे प्रत्येक वेळी खरं असेलच असं नाही. Sometimes best things come in small packages. छोट्या तिसऱ्या (शिंपले) जास्त रूचकर असतात !
६) Economics: Optimum utilization of available resources! म्हणजे बघा हं ….
- एक दिवस पुरेल इतक्या खापरी पापलेटच्या किंमतीत दोन दिवस पुरतील इतके बोंबील मिळतात ! (अमेरिकेत हे समीकरण बरोबर उलटे आहे !)
- कोलंबी, बोंबील ताजे तर छान लागतातच पण ते सुकवून अनुक्रमे सोडे, काड्या ह्या नावाने येतात तेव्हाही टेस्टीच असतात! पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा मासे पकडले जात नाहीत तेव्हा मग सोड्याची चटणी / खिचडी / कालवण किंवा सुट्टीच्या दिवशी breakfast म्हणजे मस्तपैकी सोडे घालून गरमागरम पोहे !!!
७) संयम आणि एकाग्रता: खेकडे (aka चिंबोऱ्या) खाल्लेत ना? संयम आणि एकाग्रता म्हणजे असं काय वेगळं असते हो?
८) प्रगती: टप्या-टप्याने झालेली प्रगती वेगळंच समाधान देते. लहान मूल कोळंबी आवडीनं खातं कारण कोलंबीत काटेच नसतात. त्यामुळे play school मधे खेळल्यासारखं वाटतं. बोंबलात काटे असतात पण ते कसे “जीभेची चाचपणी” करायला असल्यासारखे. मधे एक मोठा काटा असतो आणि बाकी मग बारीक काटे. चुकून मोठा काटा पोटात गेलाच तरी तो जीभ, घसा इथे फक्त जाणवत जातो. घशात अडकून जीव घाबरा करत नाही ! ही झाली Primary शाळा ! त्यानंतर ’पापलेट’, ’हलवा’, ’सुरमई’ वगैरे काटेवाले मासे म्हणजे High school म्हणाना ! एकदा आपण बारीक, बोचरे आणि असंख्य असे काटे व्यवस्थित काढत ’करली’ खायला शिकलो आणि फारसं काही वाया न जाऊ देता खेकडे खायला शिकलो की Graduation झालं समजायचं ! ह्या पुढची पायरी Post Graduation किंवा परदेशात येऊन M.S. करणं म्हणजे Salmon, Tilapia, raw Oyster वगैरे प्रकार आवडीनं खायचे !!!

तर मंडळी, असं हे आपलं ’बोंबील आख्यान’. पुन्हा कधी असेच अचानक बोंबील मिळाले तर भरपूर घेऊन ठेऊ. “पुढच्या वेळी आमच्याकडे नक्की जेवायला यायचं हं !” वाक्यं पुणेरी आहे पण आग्रह नागपुरी आहे !!!

Tuesday, December 11, 2007

आयुष्यावर खूप काही…

‘जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही…चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…’

कवी संदीप खरे, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि तबल्यावर आदित्य आठले ह्या तिघांनी एकाच दिवशी लागोपाठ ३/३ तास प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवले. ‘आयुष्यावर बोलू काही..’ हा कविता-गाण्यांचा कार्यक्रम आपल्या MVCC इथे हाऊसफ़ुल्ल सक्सेसफुल झाला. रसिकांमधे तरूण वर्ग मोठया प्रमाणात होता हे ठळकपणे जाणवलं. कार्यक्रम इतका successful झाला की संदीप, सलील आणि आदित्यने रसिकांना पुढील वर्षी इथे सलग सहा तासांचा कार्यक्रम करण्याचा ‘वादा’ केला.

संदीप, सलील आणि आदित्य ! शिक्षणाने अनुक्रमे इलेक्ट्रिकल इंजिनीयर, डॉक्टर आणि कॉंप्युटर तज्ज्ञ! ह्या तीन तरूणांच्या शब्द-सूर-तालानी सगळ्यांना भारलं. संदीपच्या मनस्वी कविता ‘समजून घेऊन’ योग्य चाली लावायला प्रतिभावान संगीतकार सलील भेटला आणि ‘आयुष्यावर बोलू काही…’ साकारला. कार्यक्रमातल्या काही गाण्यांना सलीलचं संगीत होतं तर काहींना संदीपचं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, “रंगमंचावर कुणीही स्त्री नसतानाही तुम्ही आला आहात म्हणजे तुम्हाला गाणं खरंच ‘ऐकायला’ आवडतं” अशी खसखस पिकवत सलीलनं श्रोत्यांना आपलंसं केलं. (इथे तिघांचाही उल्लेख एकेरी आहे; ‘सचिन आज काय मस्त खेळला’ असं आपण आपलेपणानं म्हणतो ना तसाच.) ‘जरा चुकीचे…’नं सुरू झालेला कार्यक्रम पुढे रंगतच गेला.

‘दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर…निळे निळे गार गार पावसाचे घरदार..सरीवर सर.’.
दुसऱ्याच कवितेपासून सगळे ठेका धरू लागले. ‘पाऊस असा रुणझुणता..’ साठी सलीलनं ‘मल्हार’ आणि ‘जयजयवंती’ अशा मिश्र रागांची सुरेख चाल लावली तर ‘मनाचे श्लोक’ ज्या ‘भुजंगप्रयात’ वृत्तात आहेत त्यात संदीपने ‘पावसाचे श्लोक’ बांधले. सलीलच्या शब्दांत म्हणजे, “मनातलीचे श्लोक आहेत.“
वानगीदाखल पहा -- प्रिये ये निघोनी, घनांच्या कडेनी….मला एकटेसे अता वाटताहे !!
‘लहान मुलांसाठी सोपं लिहिणं अवघड असतं’ ह्याचा प्रत्यय देणारी बालगीतं आली. खूप ताकदवान पण एकटा, एकाकी सुपरमॅन आणि मग त्याला भेटलेला हनुमान सगळ्यांना खूपच भावला. ‘अग्गोबाई, डग्गोबाई..’ला सलील लहान मुलांचं item song म्हणतो तर ‘मी पप्पांचा ढापून फोन…फोन केले एकशे दोन’ हसवता हसवता टचकन डोळ्यांत पाणी आणतं.

त्यानंतर गझलच्या आकृतिबंधात प्रेमकविता आली. ‘मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले…जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले…!’ इथे संदीपच्या शब्दांतून प्रेम इतकं नाजूकपणे येतं की ‘रंग देखील पाकळ्यांना भार वाटू लागले’ !

शेतकरी आणि भाजीवाल्याच्या गाण्यात, प्रेम व्यक्त करायला त्यांनी दिलेल्या उपमांनी, हसताना ‘डिब्बाडी…ढिप्पांग’ ह्या तालावर टाळ्या-शिट्ट्यांनी मन नाचू लागलं. एका कवितेत गाडी सुटल्यावर ‘फलाटावर निश्वासांचा कचरा झाला’ हे लिहिणारा संदीप हळवा असतो. सगळ्या नवऱ्यांना आवडलेलं (किंबहुना पटलेलं !), ‘जीवनातलं प्रखर वास्तव’ हे विशेषण सलीलनं बायकोबद्दल वापरलं तरी कधी खोडकर, कधी कटकटी वाटणारी बायको आसपास नसली की मात्र नवरा अस्थिर होतो. ’नसतेस घरी तू जेव्हा , जीव तुटका तुटका होतो…जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो’.

चाकोरीबध्द कारकुनी मनोवृत्तीवर, ‘कंटाळरसा’मधे, ‘आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो…’ असं संदीप लिहितो तर माणसांच्या आत्मकेंद्रीपणावर तो म्हणतो ‘मी धुकेही पाहिले, मी धबधबेही पाहिले….पण शेवटी मी, माझाच फोटो काढला’ !! ‘मी मोर्चा नेला नाही..’ कवितेत, माणसांच्या सामान्यच राहण्याच्या वृत्तीवर तो मार्मिकपणे म्हणतो.. “मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो…मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही, मी कांदा झालो नाही! आंबाही झालो नाही!”

‘भल्या पहाटे.. छातीमध्ये..जळजळणारे अल्कोहोल’ हे अमेरिकन ‘हिप हॉप’ स्टाइलमधे होतं तर ‘दीवानों की बाते हैं.. इनको लब पे लाए कौन? इतना गहरा जाए कौन? खुदको यूँ उलझाए कौन?’ ही अस्सल उर्दू गझल होती. ‘दिख जाए तू गर पलभर..मयखानेमें जाए कौन !” वाह जनाब ! क्या बात है! ह्या गझलला खास आदित्यच्या तबल्यासाठी जोरदार टाळ्या पडल्या.

सलील म्हणाला त्याप्रमाणे ‘जरीची साडी नेसून, गोड आवाजाने आपल्यावर जणू मोरपीस फिरवणारी निवेदिका’ अशा टिपिकल ढाच्यात कार्यक्रम न अडकवता श्रोत्यांशी मस्त गप्पा करत, विनोदी चुटके आणि पुणेरी किस्से सांगत, एकमेकांना कोपरखळ्या मारत, त्यांनी जादूगाराच्या पोतडीसारखी एकाहून एक सरस कविता, गाणी काढली. ६ ऑक्टोबर हा सलीलचा वाढदिवस असल्याने, त्याने खास स्वत:च्या आवडीची कविता घेतली, ‘आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते….बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दांत येते’.

अशा रंगलेल्या मैफिलीची सांगता हे नक्की कशी करतील ही खूप उत्सुकता होती. जादूगारांनी पोतडी पुन्हा उघडली आणि बाहेर आली, सहसा न भेटणारी, मराठी साजातली....कव्वाली !! बेधुंद आयुष्य जगताना, मोहासाठी देह तारण ठेवत सुंदरतेवर जगणे चक्काचूर करणाऱ्या वृत्तीची…कव्वाली !!
“जपत किनारा शीड सोडणे नामंजूर, अन वाऱ्याची वाट पहाणे नामंजूर,
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर झुलणे नामंजूर , नामंजूर !!!”