Thursday, July 9, 2020

कृतज्ञता

पाहता पाहता
कोविड पसरे
जगभर सारे
धास्तावले….

शहराचा पैस
आडवा तिडवा
पालिकेची सेवा
घरोघरी….

कुठे कुठे जाती
घडामोडींसाठी
वार्ता पोचविती
संजय जे….

कुटुंबाच्या आधी
लोकांसाठी धावी
काळ वेळ नाही
पोलिसांना….

इस्पितळांतून
रुग्ण शय्यांवर
यमाशी संगर
डॉक्टरांचा….

पंढरीला काही
गेलो नाही जरी
असा भेटे तरी
पांडुरंग`….
______________
(देवद्वार छंद)
______________

मधुरा वेलणकर -साटमचा सुप्रसिद्ध कार्यक्रम 'मधुरव'!   ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा विसावा भाग म्हणजे सांगता सोहळा. शुक्रवार, शनिवार, आणि रविवार असे तीन दिवस फेसबुक लाईव्ह ह्या माध्यमातून शेवटचे तीन भाग म्हणजे भाग मधुराने सादर केले. ह्या तीन भागात मुंबई महानगर पालिका, वार्ताहर, पोलीस , आणि डॉक्टर अशा चार क्षेत्रांचे प्रतिनिधी म्हणून त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींना तिने कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. इथे लिहिलेली कविता ही खरं तर मधुरवच्या सांगता सोहळ्यानिमित्त या चार क्षेत्रांत अहोरात्र काम करणाऱ्या सर्वाना कृतज्ञता म्हणून मी लिहिली आणि मधुराने ती खूप सुरेख अशी सादर केली.

तो कार्यक्रम इथे क्लिक करून पाहता येईल.
________________________________

Wednesday, April 8, 2020

हा काय खेळ आहे?


जावेद अख्तर.... बस्स नाम ही काफी है! 

जावेदसाहेबांची एक सुरेख कविता गेले काही दिवस मनात घुटमळत होती. त्या हिंदी कवितेला मराठी रूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न.  चूकभूल माफ असावी!  हा काय खेळ आहे?माझा प्रतिस्पर्धी त्याची चाल खेळलाय

आणि तो वाट बघतोय मी चाल करण्याची


पण मी कधीचा नुसता बघत बसलोय

काळ्या पांढऱ्या चौकटींत ठेवलेले

ते काळे पांढरे मोहरे….


मी  विचार करतोय

नक्की काय आहेत हे मोहरे

जर ह्या मोहऱ्यांना समजलो फक्त लाकडी खेळणी

तर हार काय आणि जीत काय

ना कशाची  गरज , ना कसलं महत्व

पण....

जिंकण्याची मजा नाही

आणि हरण्याचं दुःख  नाही

मग हा कसला खेळमी विचार करतोय की खेळायचं आहेच तर

आतल्या आवाजावर विश्वासून खेळावं

हे मोहरे आहेत खरोखरीचे राजा, प्रधान, शिपाई

आणि त्यांच्यासमोर ठाकलीय शत्रूची फौज

माझा नायनाट करायचा त्या फौजेचा इरादा पक्का आहे

अगदी असं जरी समजून चाललो तरी पण मग

हा खेळ म्हणजे खेळ कुठे राहतोय

हे तर आहे युद्ध, जे मला जिंकायचंय

आणि युद्धात सारं माफ असतं!कुणी सांगतो मला

हे युद्धही  आहे, हा खेळही आहे

हे युद्ध आहे खेळाडूंचं

हा खेळ आहे युद्धासारखामी विचार करतोय की

शिपाई हा शिपाईच राहावा

राजा मात्र सुरक्षित राहावा

असा नियम ह्या खेळात का आहे

मन चाहेल त्या दिशेला जाण्याची

मुभा फक्त प्रधानाला

मी विचार करतोय की ह्या खेळात

असाही नियम का आहे

ज्यामुळे शिपाई घर सोडून पुढे निघाला की त्याला परतीचा मार्ग बंद आहे


मी विचार करतोय

जर हाच नियम आहे, तर नियम काय आहे?

जर हाच खेळ आहे, तर खेळ काय आहे?

ह्या सगळ्या प्रश्नांच्या गुंत्यात मी कधीचा अडकलोय 


माझा प्रतिस्पर्धी त्याची चाल खेळलाय

आणि तो वाट बघतोय मी चाल करण्याची
-----------------------------------------------

(मूळ हिंदी कविता 'मनभाया' ह्या ब्लॉगवर इथे वाचता येईल.)
------------------------------------------------
इथे असलेलं चित्र कुणी काढलंय ते माहिती नाही त्यामुळे श्रेय देऊ शकलो नाही पण वाचकांपैकी कुणाला माहिती असेल तर जरूर कळवा. 
------------------------------------------------
माझा मित्र राजेंद्र बापट ह्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती ज्यात त्याने हे चित्र आणि मूळ हिंदी कविता एकत्र आणले होते. ती कल्पना आवडली म्हणून मी त्या कवितेला मराठी रूप देण्याच्या प्रयत्न केला. धन्यवाद राजन!
----------------------------------------------------------

Tuesday, November 13, 2018

दिवाळीचा फराळ आणि ऍजाइल!


दुनिया गोल आहे.... 
कालचक्र अव्याहत असतं....
काल जे नवं होतं ते आज जुनं झालंय....
परवा जे जुनं होतं ते आता नव्यानं आलंय….

आपण असं काही सहज बोलत / ऐकत असतो. दिवाळी म्हणजे ‘फराळ सत्यं, बाकी मिथ्या!' हे लहानपणापासून वाटत आल्याने आणि अस्मादिक ऍजाइल (Agile) प्रोसेस संदर्भात काम करत असल्याने म्हटलं बघावं आपल्या आजी / आईच्या पिढीतल्या बायकांची दिवाळी फराळ करायची पद्धत आणि संगणक क्षेत्रात लोकप्रिय होत चाललेली ऍजाइल ही कामाची पद्धत ह्यात काय साम्य दिसतंय! (रस्त्याच्या कडेने म्हणजे बाय दि वे - ह्या लेखात इंग्लिश शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द लिहीण्यापेक्षा वापरातले इंग्लिश शब्दच वापरतोय.)

आधी जरा ऍजाइल ही काय भानगड आहे ते बघुया! तर काही नाही ओ, काम करायची संगणक क्षेत्रात वापरली ही एक विशिष्ठ पद्धत आहे. आता बाकीची क्षेत्रंही ह्या पद्धतीचा स्वीकार करतायत पण ही फक्त सुरुवात आहे.

ऍजाइलबद्दल एका वाक्यात सांगायचं तर ---- थोडं कर पण पूर्ण कर!  

एखादं प्रॉजेक्ट वर्षभर चालणार आहे असं समजा आणि मग एका वर्षाने प्रॉडक्ट वापरायला मिळणार आहे. तर ऍजाइल पद्धतीने काम करायचं म्हणजे त्या प्रॉडक्टचे भाग अशाप्रकारे तयार करायचे की ग्राहकांना (युजर्स) पाहिजे असेल तर भाग जसे तयार होतील तसे वापरता यावे. मिसाल के तौर पे ये लो! (मराठी लेखात एखादं हिंदी वाक्य लिहिलं की लेखाचं वजन वाढतं असं ऐकलंय! लक्षात घ्या मी लेखाच्या वजनाबद्दल म्हणतोय, लेखकाच्या नाही.  ते तर असंही वाढतच जातंय!)  रोजच्या वापरातलं उदाहरण देतोय नाहीतर संगणक क्षेत्रात समोरच्याला टेक्निकल शब्दांच्या जाळयात गुंतवून ठेवायचे(च)तर पैसे मिळतात!  हं तर समजा बॉल पेन हे प्रॉडक्ट आहे. ऍजाइल पद्धत काय म्हणते तर पूर्णं पेन तयार व्हायची वाट बघण्यापेक्षा आधी फक्त रिफील तयार करा जी वापरून ग्राहकाला पाहिजे असेल तर लिहिणं सुरू करता यईल. मग टप्प्या-टप्याने पेनची बॉडी, टोपण, खटका वगैरे तयार करत जा. 

कुठलीही प्रॉसेस म्हटलं की त्यात कुणाचा काय रोल आहे ते माहिती पाहिजे.  ऍजाइल पद्धतीत मुख्यपणे तीन / चार रोल्स असतात -- प्रॉडक्ट ओनर, स्क्रम मास्टर, डेव्हलपमेंट टीम, आणि टेस्टर! 

-- प्रॉडक्ट ओनर: काय हवं आहे आणि कधी हवं आहे ते सांगणार
-- स्क्रम मास्टर:  डेव्हलपमेंट टीम, टेस्टरना काय पाहिजे काय नको, त्यांच्या कामात काही अडथळे येत नाहीत   ना ते बघणार
-- डेव्हलपमेंट टीम: सिर्फ नाम ही काफी है! 
-- टेस्टर: प्रॉडक्ट पाहिजे तसं चालतंय का ते बघणार

हेच रोल्स दिवाळीचा फराळ तयार करताना कोण करायचं ते बघुया.

-- प्रॉडक्ट ओनर: आजी / सासुबाई 
-- स्क्रम मास्टर:  मोठी सून
-- डेव्हलपमेंट टीम: धाकट्या सुना आणि शेजारणी
-- टेस्टर: घरची आणि शेजार-पाजारची बच्चेकंपनी

(टेस्टिंग क्षेत्रात असाल तर तुम्हाला बच्चेकंपनी म्हणतोय असा गैरसमज अजिबात करून घेऊ नये!  आजोबा, बाबा, काका वगैरे ‘एक्स्टर्नल स्टेकहोल्डर्स’ म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा!)

प्रॉडक्ट ओनरचं म्हणजे आपल्या आजीचं महत्वाचं काम काय तर, काय हवंय आणि कधी हवंय त्याची प्रायॉरिटी ठरवायची. सगळे पदार्थ दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत तयार असावे लागतात पण येत्या काही दिवसांत कुठला पदार्थ तयार हवा आणि कुठला पदार्थ दिवाळीच्या अगदी जस्ट आधी तयार हवा ते सांगायचं. डेव्हलपमेंट टीम पदार्थ कसा तयार करायचा ते ठरवेल पण बदलत्या काळाप्रमाणे काय बदल हवेत (चेंजिंग बिझनेस कंडिशन्स) ते प्रॉडक्ट ओनरनं सांगायचं! 

गणपतीत आमच्या (वन अँड ओन्ली) पुणे इथे  कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग, आणि केसरीवाडा हे जसे पाच मानाचे गणपती असतात तसे घरोघरी दिवाळीत चकली, चिवडा, शेव, लाडू, आणि करंज्या हे मानाचे पदार्थ! अनारसे आणि चिरोटे म्हणजे जणू दिमाखात सजलेले दगडूशेठ हलवाई आणि मंडईचे गणपती!  ह्यातला कुठला पदार्थ आधी आणि कुठला नंतर हवाय ते घरोघरच्या आजी ठरवायच्या. (सीकेपी लोकांकडे करंज्या नसतात तर 'खाजाचे कानवले' हा एक मानाचा म्हणजे अगदीच मानाचा पदार्थ असतो! तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे म्हणून इथे काही लिहिण्याचा मोह आवरतो.)

स्क्रम मास्टर म्हणजे मोठी सून आपल्या जावांना आणि शेजारणींना बरोबर घेऊन काम करायची. ऍजाइलमध्ये दिवसातून एकदा १५ मिनिटे सगळ्यांची एक मिटींग (डेली स्टॅन्ड अप) होणं अपेक्षित असतं. दिवसभरात काय काम करायचं आणि कुठलं काम करताना अडचण येऊ शकते ते ठरवायचं. मोठी सून आणि बाकीच्यांची स्टॅण्ड अप मिटींग - चार जणी एकत्र जमून - तांदूळ निवडताना, चिवड्याचे पोहे पाखडताना वगैरे बसल्या-बसल्याच होऊन जायची. बाजूला आम्ही लहान मुलं मातीचा किल्ला करत असायचो आणि समजायचं नाही पण त्या बायकांचं बोलणं कानावर पडायचं. आज दुपारी काय करायचं आणि एखादा जिन्नस नसेल तर काही अडचण होणार नाही ना त्याबद्दल बायकांचं बोलणं व्हायचं. (ह्या सगळ्या बायका गप्पा-गोष्टी करत, उत्साहाने कामं करत असताना कुणा बाईला अचानक कसली अडचण यायची ते मात्र तेव्हा अजिबात कळायचं नाही.)

डेव्हलपमेंट टीम एका लयीत कामं हातावेगळी करायची. कुणी रवा / बेसन भाजतेय तर कुणी चकली / शेवेच्या सोऱ्याला तेल लावतेय, कुणी चिवडा कुरकुरीत व्हावा म्हणून पोह्यांना ऊन दाखवतेय तर कुणी चकलीसाठी मोहन योग्य प्रमाणात आहे ना बघतेय. (मोहन कोण? आणि दिसत तर नाहीये पण कमी / जास्त आहे म्हणजे काय ते एक लहान मुलांना कळायचं नाही!) चकल्या खुसखुशीत पडतायत असं दिसायला लागलं की बायकांचा जीवही भांड्यात पडायचा. खुसखुशीत चकली खाणाराही खुशीत दिसतो. चकलीची भाजणी तयार होताना, चिवड्याचं तळण होताना, लाडू करण्यासाठी रवा / बेसन भाजलं जाताना कुणी कुणाला काही सांगतंय असं दिसायचं नाही पण घरात जो एक, भूक चाळवणारा, घमघमाट सुटायचा तो बरोब्बर सांगायचा की आतापर्यंत कुठला फराळ तयार होत आलाय.

एका बाजुला बच्चेकंपनीची धावपळ चालू असायची. मातीचा किल्ला मस्ट डू! (सार्वजनिक गणेशोत्सवातून जसं प्रॉजेक्ट मॅनेजर्स घडतात तसंच घरोघरी गणपतीचं मखर करताना आणि दिवाळीत मातीचे किल्ले करताना अनेक मुलांना त्यांच्या हातातली कला सापडते.) लाडू, चिवडा असे एक एक पदार्थ तयार व्हायला लागले की मुलं एका हाकेत टेस्टिंगसाठी यायची. किल्ला करताना हाताला लागलेला चिखल घाईघाईत धुतल्यासारखा करत, कपडयांवर उडलेली माती एखाद्या फडक्याने झटकत मुलं जमायची. फराळ चाखण्यापुरता मिळायचा पण मिळायचा हे नक्की. दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवासमोर नैवेद्य दाखवून मगच घरातले सगळे मोठे लोक फराळ करणार पण बच्चेकंपनीला मात्र त्यातून सूट होती. "द्या ग मुलांना फराळ! मुलांनी खाल्लं की नैवेद्य दाखवला नसेल तरी देवाला पोचतं." घरोघरच्या आजी असं म्हणायच्या. आता आठवतं की लहानपणी वाचलेल्या, श्रावणी सोमवारच्या खुलभर दुधाच्या, कहाणीतली आजीही अशीच तर होती.

कहाणी साधारण अशी -- आटपाट नगरात एका शिवभक्त राजाने महादेवाचा गाभारा दुधाने भरून काढायचं फर्मान काढलं. राजाची लहर, केला कहर! नगरातल्या सगळ्यांनी आपापल्या घरचं दूध आणून ओतलं तरी गाभारा भरेना. दुपारी एका आजीने फक्त खुलभर दूध वाहिलं आणि काय आश्चर्य! त्या खुलभर दुधाने महादेवाचा गाभारा पूर्ण भरला. मग राजाला समजलं की घरच्या मुला-बाळांना खाऊ-पिऊ घालून, त्यांचा आत्मा थंड करून राहिलेलं खुलभर दूध म्हातारीनं आणलं आणि ते देवाला पोचलं, गाभारा भरला!

नरक चतुर्दशी म्हणजे रिलीज डेट! पहाटे अभ्यंग स्नान करून, फटाके वाजवायचे. (लहान मुलांना फटाके वाजवण्याचे वेध तर कॉलेजमधल्यांना फटाकड्या बघण्याचे!) सकाळी सगळे फराळ करायला जमायचे. एकसारख्या वळणाच्या, एका रंगाच्या चकल्या, कुरकुरीत शेव आणि चिवडा, तोंडात विरघळणारे खाजाचे कानवले आणि लाडू ह्यांनी सजवून मांडलेली ताटं! ह्या फराळाबरोबर कांदे-पोहे, सांजा, किंवा इडली - सांबार असा एखादा गर्रम गरम पदार्थ आणि जोडीला छानपैकी वेलचीची पूड, केशर, बदाम–पिस्ते वगैरे घातलेलं मसाला दूध! बाहेरून ऐकू येणारे फटाक्यांचे आवाज आणि घरात निनादणारे उ. बिस्मिल्ला ख़ाँ ह्यांच्या सनईचे किंवा पं. हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे सूर!  ह्या सगळ्याला साजेसा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा, दिवाळीचा आनंद! काया – वाचा - मनाने सगळ्याचा आस्वाद घेत आतापर्यंत नुसते चाखलेले पदार्थ मनसोक्त खाता यायचे.  वर्षं सरतात, काळ बदलतो पण मनाच्या सुगंधी कप्यातल्या, लहानपणीच्या आठवणी, चाळिशीनंतर ठळकपणे आठवायला लागतात हे मात्र खरंय! 

Sunday, November 4, 2018

दुश्मन दोस्त

माझा मामेभाऊ (डॉक्टर सलील बेंद्रे) ह्याने लिहिलेली एक इंग्लिश कविता मला नुकतीच पाठवलीकविता आवडली म्हणून विचार केला की कवितेचा स्वैर अनुवाद करता आला तर बघावा. तर मूळ इंग्लिश कविता आणि त्याचा मी केलेला अनुवाद इथे लिहितोय
--------------------------------------------------------------
Better to have a sworn enemy
Than a friend who stabs your back !!
Fighting the former will make you proud ;
The Later spells a poignant attack.

Leaning on that gentle shoulder,
A secret of heart you unpack
The nasty friend entertains himself
With the story of your setback.

Then the fool goes door to door
With a gossip-filled sack ;
Sprinkling more spicy thoughts,
He passes arround a delicious snack !

Your foe can go for a safari ride !!
On a fine camelback :
He has now ,  no role to play ;
Your "friend" takes his track...

 --------------------------------------------------
खुली दुश्मनी करणारा शत्रू बरा
पाठीत वार करणाऱ्या मित्रापेक्षा
वाटतो अभिमान पाहिल्याशी लढून
फसवा मित्र ठेवतो जखमी करून

खांदा विश्वासाचा समजून तुम्ही
रडता अगदी मन मोकळे करून
तुमचा फसवा मित्र घेतो फक्त
मजा सगळ्याची..मनापासून

मग तो जातो घरोघरी
वाटत खिरापत अफवांची
चहा टाकायला सांगत म्हणतो
"घ्या चव, तिखटामिठातल्या वावड्यांची!"

तुमचा शत्रू जाऊ शकतो सफरीला
उंटावर सवार होऊन मस्त
त्याच्या दुश्मनीची गरजच काय?
असताना विश्वासघातकी दोस्त!!!
---------------------------------------Saturday, April 14, 2018

आठ

आठ काय वय आहे का?
आयुष्यच संपून जायचं
वासनांध नराधमांच्या
भक्ष्यस्थानी पडायचं!

एका धर्माची होती तर काय
एका धर्मस्थळीच कोंडायचं?
गोळ्या, बिस्किट, चॉकलेटपेक्षा
तिला गुंगीचं औषध द्यायचं?

आठ काय नि ऐंशी काय
कुठलंही वय आहे का?
बुरखा, साडी, ड्रेस, स्कर्टने
बलात्कार सोसायचं!

Monday, February 26, 2018

स्पर्शात्मके देवे!

माणसाने माणसाला मनमोकळी घट्ट मिठी मारणं ही खूप छान गोष्ट आहे! वय, रंग, लिंग, जात, धर्म हे आणि अनेक भेद पार करून माणसाने माणसाला मनमोकळी घट्ट मिठी मारणं ही खूप छान गोष्ट आहे! गरज आहे ती प्रत्येक नात्याच्या संदर्भातील निर्मळपणाची आणि अनाठायी संकोच दूर ठेवण्याची

आपली देहबोली ही आपल्या कल्पनेच्या पलीकडे बोलत असते. भाषा हे जरी संवादाचं मुख्य साधन असलं तरी शब्दांपेक्षा हावभाव जास्त बोलत असतात. दोन माणसांनी एकमेकांशी बोलायला, विशेषतः ज्याला डिफिकल्ट कनवरसेशन्स म्हणतात त्यासाठी, सगळ्यांत उत्तम मार्ग म्हणजे माणसांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे. आजच्या टेक्स्ट आणि व्हॉटसऍप मेसेजेसच्या जमान्यात तर माणसांनी प्रत्यक्ष नाही तर निदान फोनवर तरी बोलणं आवश्यक आहे. टेक्स्ट, -मेलव्हॉटसऍप मेसेज खऱ्या अर्थाने भावना पोचवू शकत नाहीत. कुणाशीही प्रत्यक्ष बोलताना आपण नुसते शब्द ऐकत नसतो तर डोळ्यांतले भावही वाचत असतो. जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा स्पर्श मदत करतो. आपुलकीने हातात हात घेणं असो किंवा गालावर अलगद थोपटणे असो, पाठीवर शाबासकीची थाप देताना असो की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांतील पाणी आपल्या बोटांनी अलगद बाजूला करणं असो, आश्वासक स्पर्श असला की शब्दांची गरजच नसते. इंग्लिशमध्ये जसं म्हणतात -- पिक्चर स्पीकस फॉर थाउजंड वर्ड्स -- ते स्पर्शाच्या बाबतीतही खरं आहे. 

मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर माणसांचे व्यक्तिमत्व चारपैकी एका रंगाच्या प्रकारचे असते. ते रंग म्हणजे लाल, निळा, पिवळा, आणि हिरवा. ह्या प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिण्याचा ह्या लेखाचा उद्देश्य नाही आणि माझे तेवढे ज्ञानही नाही. (ह्या चार रंगांच्या व्यक्तिमत्वांबद्दल थोडी माहिती हवी असेल ती इथे वाचता येईल.) ढोबळ मानाने इतकं तर म्हणता येईल की निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती स्पर्शाच्या बाबतीत मोकळ्या असतात. अर्थात मानसशास्त्रीय गोष्टी जशाच्या तश्या प्रत्येक व्यक्तीबाबत खऱ्या  असतातच असं नाही. त्यामुळे लाल किंवा हिरव्या व्यक्तिमत्वाची काही माणसे स्पर्शाच्या बाबतीत मोकळी असू शकतात तर निळ्या किंवा पिवळ्या व्यक्तिमत्वाचे कुणी संकोची असू शकतात. 

भारतीय संस्कृतीच्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत पण एक वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे स्पर्शाच्या बाबतीतला संकोच. आपल्या एकूणच नातेसंबंधात स्पर्शाला दुय्यम स्थान असतं! खरं पाहिलं तर असं असायचं कारण नाही. आपल्या ध्यानधारणेतही स्पर्शाला महत्व आहे फक्त आपल्याला ते जाणवत नाही किंवा माहिती नसतं. ध्यान करताना आपल्या हातांचे अंगठे आणि तर्जनी जुळवलेले असतात. पाहिजे तर हे आवर्जून करून बघा. एखादं महत्वाचे काम करायला सुरुवात करताना फक्त काही मिनिटे ध्यान करायला शांत बसून दीर्घ श्वास घेत राहा. अवघ्या काही मिनिटांमध्ये मनावरचं दडपण कमी होतं. ह्यासाठी दीर्घ श्वास() कारण आहे असं आपल्याला वाटतं पण श्वासाबरोबर दुसरा घटक जो मदत करतो तो म्हणजे अंगठे आणि तर्जनीचा स्पर्श. एकप्रकारे आपण आपल्या मनाला सांगत असतो -- ऑल  इज वेल! 

जगात कित्येक गोष्टी अशा आहेत ज्यांना भल्या आणि बुऱ्या अशा दोन्ही बाजू आहेत. मग स्पर्श तरी ह्याला कसा अपवाद असेल? चांगला स्पर्श असतो तसा वाईट स्पर्श असतो. मी सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे गरज आहे ती प्रत्येक नात्याच्या संदर्भातील निर्मळपणाची. विशेतः स्त्री-पुरुष ह्यांच्या संबंधात असं असतं की बायकांना वाईट स्पर्श ओळखण्याची उपजत जाणीव असते किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात तसा सिक्स्थ सेन्स असतो, अशावेळेला तर वाईट स्पर्श प्रत्यक्ष होण्याच्याआधीच वाईट नजरेचा स्पर्श झालेला असतो. वाईट स्पर्शाची कुठल्याही प्रकाराने भलावण करणं  योग्य नाही म्हणजे नाहीच. ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांची ताकद मोठी आहेच पण अशा ठिकाणीसुद्धा 'मी टू' (#MeToo) म्हणायला धाडस लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात बायकांना  #MeToo म्हणावं लागणं ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.#MeToo ह्या चळवळीसाठी काही मदत करायची असेल तर इथे माहिती बघता येईल.

(ह्या विषयाचा एक वेगळा पैलू असा की एखादी चळवळ सुरू होते आणि अजाणतेपणी त्याचा भलताच परिणामही सुरू होतो. #MeToo चळवळ  महत्वाची आहे ह्यात वादच नाही पण नकळत त्याचा एक उलटा परिणाम असा झालाय की कॉर्पोरेट जगतात पुरुषांनी बायकांना मेंटॉर करण्याच्या प्रमाणात घट झाली! 'मेन्टॉरिंग करायला जायचो आणि फट्ट म्हणता काही तरी अंगलट यायचं त्यापेक्षा कशाला नाही त्या भानगडीत पडा?' अशी सावध भूमिका अनेक  चांगले पुरुष घेऊ लागले. फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्ग ह्यांनी ह्या प्रकारात बायकांचे  नुकसान होऊ शकण्याचा धोका ओळखला आणि  'लीन इन' ही  वेबसाइट सुरू केली. त्या माध्यमातून विमेन एम्पॉवरमेंटसाठी #MentorHer ही चळवळ सुरू झालीये. त्याबद्दलचा वेंडी के ह्या स्त्री पत्रकाराचा लेख इथे वाचता येईल. तसंच  #MentorHer ह्याबद्दल अजून माहिती 'लीन इन 'च्या वेबसाईटवर इथे वाचता येईल.)

ह्या लेखात चांगल्या स्पर्शाचा फक्त विचार करायचा म्हटलं तरी त्याला काही कंगोरे आहेत. दोन व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत असताना स्पर्श ह्या महत्वाच्या गोष्टीकडे दोघांनीही लक्ष ठेवणं आवश्यक असतं. विशेषतदोन वेगवेगळे रंग असलेल्या व्यक्तिमत्वाचे कुणी संवाद करत असतील तर त्या दोघांनीही ह्या बाबींकडे लक्ष ठेवणं आवश्यक असतं. एकाचा स्पर्शाच्या संदर्भात मोकळेपणा जसा दुसऱ्यासाठी घुसमट ठरू शकतो तसाच एखाद्या व्यक्तीचा स्पर्शाप्रति संकोच हा स्पर्शाच्या बाबतीत मोकळ्या व्यक्तीची घुसमट असू शकतो. तसं पाहिलं तर हे म्हणजे इन्ट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट अशा भिन्न स्वभावप्रकृतीच्या व्यक्तीना एकमेकांशी नुसतं बोलतानाही जी अडचण जाणवते तसंच स्पर्शाच्या बाबतीतही होतं. हा तिढा सोडवायचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तींचा एकमेकांशी मनमोकळा संवाद आणि स्पर्शाच्या बाबतीत मधल्या वाटेत कुठे भेटायचं ह्याचं एकमेकांसाठीचं समंजस भान!

आयुष्याच्या एका टप्प्यावर तर जाणवायला लागतं  की आतापर्यंत आपण स्पर्शाबद्दल एकतर बेफिकीर मोकळे होतो किंवा उगीच संकोची होतो. 'जिंदगी एक सफर है सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना' ह्या गाण्याप्रमाणे आयुष्यात खूप अनिश्चितीता असते फक्त आपण त्याकडे डोळेझाक करतो. आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि आपण अनेकांच्या आयुष्यात असतो. नातं कुठलंही असो पण जेव्हा आपली एखादी जिवलग व्यक्ती 'न परतीच्या प्रवासाला' जाते तेव्हा काही गोष्टी आपल्या पुढच्या आयुष्यभर नक्की लक्षात राहतात. त्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीचा जिव्हाळा, आवाज आणि स्पर्श!