Sunday, July 9, 2017

ओरिजनल खान!

  ऐन तारूण्यात तो देखणा होता ह्यात वादच नाही!
तो अभिनेता कसा होता ह्यावर दुमत असू शकतं. 

तो स्टाईलबाज होता ह्यात वादच नाही!
त्याचा स्टाईलबाजपणा कधी धेडगुजरी वाटायचा ह्यावर दुमत असू शकतं. 

त्याच्या दिग्दर्शनाचे काही चित्रपट तुफान चालले ह्यात वादच नाही!
तो किती चांगला दिग्दर्शक होता ह्यावर दुमत असू शकतं. 

तो 'नम्बर १' स्टार नव्हता ह्यात वादच नाही!
पण लोकप्रिय 'खान' स्टार्समधे फिरोज खान नक्की होता ह्यावर दुमत असू शकत नाही!
रईस राहणी, उंची मद्य, खूबसूरतीचा सहवास अशा काही बाबतींत तो असंख्य पुरूषांसाठी "भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी?" अशा कॅटेगरीत होता.  असंख्य बायकांसाठी तो 'ओनिडा' टी व्हीच्या गाजलेल्या जाहिरातीसारखा 'नेबर्स एन्व्ही, ओनर्स प्राईड' होता.फिरोज खानवर लिहायला बरेच विषय मिळतील पण सध्या तरी हा लेख त्याच्या ४-५ सिनेमांपुरता ठेवतो!  'एफ के इंटरनॅशनल' ह्या त्याच्या बॅनरखाली निर्मिलेल्या आणि त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची नावं एका शब्दाची आणि मस्त खटकेदार असायची. 'पाप को जिंदा जलाकर राख कर दूंगा' वगैरे लांबलचक नावांपेक्षा 'कुर्बानी', ‘जांबाज'  अशी पकड घेणारी नावं.

'
अपराध'  पाहिला तेव्हा मी कॉलेजमधे होतो. फिरोज खानने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा! अर्थातच त्याच्या स्टाईलिशपणाला मोकळं रान मिळालं होतं. युरोपमधलं शूटिंग आणि त्यातही रेसर कार्सचं त्या काळातलं दुर्मिळ दर्शन! तसं पाहिलं तर त्याच्या चित्रपटांची काही खास वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे 'क्लास'चं माहिती नाही पण 'मास'ला आवडेल अशी दिलखूष मांडणी. चकाचक बंगले,गाड्या, शानोशौकत असा माहौल! दुसरं म्हणजे त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात एक खास वेगवान / थरारक सीन असायचाच जो प्रेक्षकांना अनपेक्षित असायचा. आपल्या यार-दोस्तांना सिनेमाबद्दल सांगताना माणसं तो सीन रंगवून रंगवून सांगायची आणि वर म्हणायची "येड्या, बाकी सोड! त्या एका सीनसाठी तरी पिच्चर बघ!" 'अपराध'मधे सुरूवातीलाच कार रेसिंग ही खासियत होती. तिसरं म्हणजे दिग्दर्शक फिरोज खानला कुठलं संगीत लोकप्रिय होईल ते ओळखण्याचा कान होता. हमारे सिवा तुम्हारे और कितने दीवाने हैं  आणि तुम मिले… प्यार से… मुझे जीना गवारा हुआ ही गाणी त्याचा पुरावा आहेत. कल्याणजी-आनंदजींनी त्याच्या सिनेमात काही तुफान लोकप्रिय गाणी दिली आहेत. आणि लास्ट बट नॉट लिस्ट -- हॉट हिरॉईन!  अपराध'मधे समुद्रकिनार्‍यावर पहुडलेली, संपूर्ण पडद्यावर अपूर्ण कपड्यांत दिसणारी....मुमताज!  मग समुद्राच्या लाटांसारखी खळखळून हसणारी…. मुमताज!  काळ्या रंगाच्या (चक्क!) टू पीस बिकनीमधली…. मुमताज! मला थेट्रातली एकटक शांतता अजूनही आठवतेय!
(चालले…. आता काही जण लगेच 'यू ट्युब'वर चालले!!)


एखाद्या क्लासिक कादंबरीची आणि तितक्याच क्लासिक सिनेमाची पार वाट लावावी!  तो आपला सिनेमा म्हणून भारतीय रूपड्यात सादर करावा!!  आणि लोकांना तो सिनेमा आवडावा!!!  ह्या सगळ्यांत 'धर्मात्मा' सिनेमाची सर कुणालाही यायची नाही!  मार्लन ब्रांडोने अजरामर केलला 'गॉडफादर'!  त्या भूमिकेत प्रेमनाथ म्हणजे 'धर्मात्मा'!  प्रेमनाथ?!!  पण सिनेमात काही मसाला असा होताच ज्यामुळे 'धर्मात्मा' लोकांना आवडला. सिनेमाचं अफगाणिस्तानमधलं शूटिंग हा एक उत्सुकतेचा भाग होता. मगाशी म्हणालो ना तसा ह्या सिनेमातही वेगवान / थरारक सीन होता तो म्हणजे 'बुझकशी'चा! वार्‍याच्या वगाने दौडणार्‍या घोड्यावर बसून, प्रतिस्पर्ध्याकडून चाबकाचे फटके खाणारा आणि दात-ओठ खात चाबकाचे फटके देणारा डॅनी डेनझोन्गपा लोकांच्या लक्षात राहिला.  सिनेमातल्या रेश्मावर एकतर्फी प्रेम करणारा डॅनी! ('बुझकशी' ह्या खेळाचा थरार नंतर काही वर्षांनी हिंदी सिनेमात पुन्हा बघायला मिळाला तो बच्चनच्या 'खुदा गवाह'मधे! काय योगायोग पण त्यातही डॅनी आहे!)  फिरोजच्या अपराध'मधे मुमताज होती तर 'धर्मात्मा' मधे हेमा मालिनी आणि रेखा! मेरी गलियों से लोगों  की यारी बढ गई , क्या खूब लगती हो, तेरे चेहरे में  वो जादू है  अशा अवीट गोडीच्या गाण्यांमधे 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनीला बघण्यासाठी आणि ‘तुमने कभी किसी से प्यार किया है? ह्या गाण्यात पिवळी साडी आणि हॉल्टर नेकमधल्या रेखाला बघण्यासाठी प्रेक्षक बाकीचा 'धर्मात्मा' सहन करायचे!  आत्ताही खात्रीनं सांगतो की नुसतं 'क्या खूब लगती हो' गाणं ऐका आणि पहिल्या दहा सेकंदात गाणं तुमचा कब्जा घेतं की नही ते सांगा! आणि हे नुसतं ऐकताना हां! आता विचार करा की भर थिएटरमधे हे गाणं चालू आहे आणि पडाद्यावर हेमा मालिनी! हिट् है भाय!

 हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना 'धर्मात्मा' एका वेगळ्या कारणासाठी मात्र नमूद केलाच पाहिजे. 'शोले'तल्या ऑल टाईम क्लासिक गब्बर सिंगच्या भूमिकेतला अमजद खान आपल्याला दिला धर्मात्माने'!  काय, चमकलात? गब्बर डॅनीने साकरावा असं ठरत होतं पण डॅनीने 'धर्मात्मा'साठी तारखा आधीच कबूल केल्या होत्या. अर्थात डॅनीलाही श्रेय द्यायला पाहिजे की 'शोले'सारख्या सिनेमासाठीही आधी केलेली कमिटमेंट तोडली नाही. १९७५ सालीच आणि 'धर्मात्मा'शिवाय अजून एक, हिंदी सिनेमाच्या इतिहासातला महत्वाचा, सिनेमा झळकला होता -- 'दीवार'!  सिर्फ नाम ही काफी है!



सिनेमा दिग्दर्शकाच्या कारकीर्दीत एक असा सिनेमा असतो की बाकी काही नाही तरी तो सिनेमाच दिग्दर्शकाची ओळ्ख बनतो! रमेश सिप्पीचा 'शोले'  होता तर फिरोज खानचा 'कुर्बानी'  !  तो एक दे मार मसाला सिनेमा होता पण तुफान चालला होता. तिकीट खिडकीवर लोकांच्या उड्या पडणं म्हणजे काय असतं ते आमच्या पुण्यात 'अल्पना' टॉकीजला मी स्वतः अनुभवलंय! शाळेत असताना अभ्यासू वगैरे असलेला शिरगोपीकर हा आमचा मित्र कॉलेजच्या दिवसांत 'कुर्बानी'  बघायला गेलो तर लोकांच्या खांद्यावरून वगैरे चढत तिकीट खिडकीपर्यंत पोचला होता आणि धक्का-बुक्की  करत तिकीटं घेऊन आला होता!  तगडा विनोद खन्ना, स्वतः फिरोज खान ह्यांचा 'कुर्बानी'  ! नेहमीच्या खलनायकी भूमिकेपेक्षा वेगळ्या अशा, च्युइंगम चघळत नर्मविनोदी बोलणार्‍या, इन्स्पेकटरच्या भूमिकेतल्या अमजद खानचा 'कुर्बानी' ! एक गाजलेला सीन होता तो म्हणजे नवी कोरी मर्सीडीझ गाडी खिळखिळी करण्याचा! फिरोज खानच्या एन्ट्रीच्या सीनमधे मग्रूर अमरिश पुरीला उद्देशून “भगवान तो हो नहीं सकते, इन्सान तो लगते नहीं, और शैतान से मैं नहीं डरता” असा त्याचा धासू डायलॉग कानावर पडला की मर्सीडीझचा खुळखुळा होताना बघायला पिक्चरच्या रीपीट ऑडियन्समधले प्रेक्षक सावरून बसायचे.  गाण्यांच्या बाबतीत म्हणाल तर 'अपराध', 'धर्मात्मा', आणि 'कुर्बानी'मधे संगीतकार कल्याणजी-आनंदजी ह्या जोडगोळीनं एक से एक लोकप्रिय गाणी दिली आहेत! ‘लैला मैं  लैला’ गाणं सुरू झालं की त्याच्या बीटसवर बसल्या जागीही पाय थिरकायला लागतात! शिवाय त्या गाण्यातला 'ओ लैला.. गुलू गुलू’ म्हणणारा अमजद खान भाव खाऊन गेला होता. ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी में आएहे सॉलिड म्हणजे सॉलिडच हिट झालेलं गाणं होतं. नाझिया हसन ह्या एकदम ताज्या आवाजाची हवा झाली होती. ते गाणं इतकं गाजलं होतं की शा़ळेतली पोरंही बिन्धास्त ते गाणं गुणगुणताना म्हणायची, "आप जैसा कोई मेरी जिंदगी में आयें तो बाप  बन जायें... हां हां हां बाप  बन जायें!"  यारी-दोस्तीबद्दल प्राण-बच्चनच्या 'यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी' ह्या गाण्याची आठवण करून देणारं गाणं म्हणजे ‘कुर्बानी कुर्बानी कुर्बानी’!  प्रेक्षक टाळ्या-शिट्यांनी थिएटर दणाणून टाकायचे! हम  तुम्हे चाहते हैं  ऐसेहे सुद्धा छान गाणं आहे. 'मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे" -- क्या बात है इंदिवरसाब, बहोत खूब लिखा है!क्या देखते हो, सूरत तुम्हारी ह्या गाण्याबद्दल आम्हा मित्रांमधला एक रनिंग जोक होता की ह्या गाण्याचा मुखडा म्हणजे धडधडीतपणे खोटं बोलणं आहे! "क्या देखते हो?" ह्या झीनत अमानच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फिरोज खान म्हणतो "सूरत तुम्हारी!"  काय रे देवा! किती खोटं बोलावं माणसाने?  झीनत अमानकडे बघूनच कळतं नुसती सूरत कसा बघत राहील? 'कुर्बानी'  पिक्चरमधे झीनत अमान म्हणाजे -ऊफ्फ!  एका वाक्यात सांगायचं तर झीनत अमानला बघत एक आख्खी पिढी 'वयात आली'!!!

परंपरेप्रमाणे 'जांबाज'मधेही चकाचक बंगले,गाड्या, शानोशौकत असा माहौल होता. पण अमली पदार्थ (ड्रग्ज) चुकुनही ट्राय करायचे नाहीत हे मनावर बिंबवण्यात 'जांबाज'चा मोठा वाटा होता. (तसंच दूरदर्शनवर पाहिलेली 'सुबह' ही मालिकाही महत्त्वाची होती.) 'जांबाज'मधे घोड्यांची भरधाव रेस आहे आणि शिवाय छातीचे ठोके वाढवणरं 'रशियन रुले'चंही एक दृष्य आहे. रिव्हॉल्वरमधे एकच गोळी भरायची, चेंबर गरागरा फिरवायचं. आता गोळी नक्की कुठे आहे ते सांगता येत नाही. पैज लावायची आणि रिव्हॉल्वर स्वतःच्या डोक्याला लावून ट्रिगर दाबायचा. जगला तर पैज जिंकला! ह्यापेक्षा मोठा जुगार अजून कुठलाही असू शकत नाही!   'हर किसी को नहीं मिलता यहां प्यार जिंदगी में' गाणं इतकं गाजलं होतं की आता त्याचं रीमिक्स रूपही गाजतंय! 'हर किसी को...'मध्ये त्या काळात अनेक जणांच्या दिल की धडकन श्रीदेवी होती तर 'प्यार लो प्यार लो' गाण्यात वेगवेगळ्या काळातल्या अनेक जणांच्या दिल की धडकन रेखा होती!  पण ‘जांबाज'मधला हॉट भाग म्हणजे डिंपल! एक तर तिच्या केसांचा फॉल पाहून बायकाही वेड्या होतात! 'जानेजाना ओ जानेजाना' गाणं बघताना शेवटी असं वाटतं की घोड्यांच्या तबेल्यातलं वाळकं गवत पेट घेईल!

"दयावान’, आणि ‘यल्गार’  एका परिच्छेदात संपवायचे चित्रपट आहेत! 'धर्मात्मा'मधे 'गॉडफादर'ची वाट लावली होती तर ‘दयावान’ची वक्र्दृष्टी 'नायकन'वर पडली होती! तुलना करायची तर कमल हसनने साकारलेल्या 'नायकन'शी विनोद खन्नाचा ‘दयावान’,  कुठेच टक्कर देऊ शकत नव्हता. ‘दयावान’ 'मधे लक्षात राहण्यासारखी एकच म्हणजे मा-धु-री! 'आज फिर तुम पे प्यार आया है' गाण्यात तिला आणि विनोद खन्नाला बघून अनेक जण विनोद खन्नावर जळून कोळसा झाले असतील. 'यल्गार' तर लक्षात राहिलाय तो महेश इनामदार ह्या माझ्या मित्राच्या हजरजबाबी कॉमेंटमुळे. 'निलायम' थिएटरमधे आम्ही काही मित्र गेलो होतो. 'आखिर तुम्हे आना है, जरा देर लगेगी' हे गाणं चालू होतं. भल्या मोठ्या बंगल्यात जांभळ्या साडीतली नगमा आणि बाहेर पावसात चिबं ओला संजय दत्त. दोघांचं आपलं नाचणं-गाणं चालू होतं. अचानक महेश म्हणाला, "च्यायला, हा फिरोज खान म्हातारा झाला. कुणाला पावसात भिजवायचं ते कळत नाही त्याला!"

एक एक करत माणसं काळाच्या पडद्याआड जातात तसा आता फिरोज खानही गेलाय. पण तो असा होता की ज्याच्याबद्दल इंग्लिशमधलं एक वाक्य समर्पक आहे -- यू मे लाइक हिम ऑर हेट हिम, बट यू कॅनॉट इग्नोर हिम!'--------------