Sunday, May 11, 2008

डिच !

“खबरदार जर पुन्हा डिचकडे गेलास तर !”

हे वाक्य ऐकणारा विद्यार्थी आणि ऐकवणारे शिक्षक वेगळे असायचे पण डिच तशीच होती … वर्षानुवर्षे !

आमच्या शाळेचं मैदान खूप खूप म्हणजे खूपच मोठं आहे. आता मोठं म्हणजे किती तर मधल्या सुट्टीत जर मैदानाच्या दुसऱ्या टोकाला गेलो तर सुट्टी संपल्याची घंटा ऐकूच यायची नाही … इतकं मोठं !! Football, Hockey, Volleyball, Basketball, खो-खो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, full size athletics track, Rifle shooting range, पाच-सातशे सायकलींचा स्टॅंड, पाण्याची गोल टाकी हे सगळे आहेच पण त्याशिवाय एकावेळी किमान दोन टीम्स क्रिकेट खेळू शकतील इतकी मोकळी जागा ! त्याशिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक्सचा हॉल वेगळेच ! हे सगळं .. डिचने व्यापलेली जागा सोडून !!!

अरे हो .. पण ही ’डिच’ काय भानगड आहे ते सांगायचेच राहिले. अर्थात जे कोणी आमच्या शाळेत, म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ - गुलटेकडी, पुणे इथे शिकले..निदान साधारण एकोणीसशे नव्वदच्या मध्यापर्यंत – त्यांना डिच म्हणजे काय ते सांगायलाच नको पण इतरांठी थोडी माहिती सांगायला हवी.

तर डिच म्हणजे – अगदी सोप्या भाषेत म्हणजे -- मैदानामधे असलेला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा खड्डा! त्या डिचला प्रदक्षिणा घालायची तर शाळेतल्या मुलांना साधारण दहा-एक मिनिटे लागायची; त्यावरून डिचच्या परीघाचा अंदाज यावा !

काय होतं त्या डिचमधे ? खरं तर प्रश्न असा हवा की काय नव्हतं त्या डिचमधे ? !! झाडी-झुडुपं, डिचमधे उतरत्या जमिनीच्या एका कडेला बांबूचं छोटं रान, डिचच्या मध्यभागी पाणी, त्यात पुरूषभर उंचीचं गवत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पाण्यात मधोमध दलदल आणि खूपसं ऍसिड !!!

तरतऱ्हेचे पक्षी, पाणकोंबड्या आणि खारी तर होत्याच पण कधी कधी सापही दिसायचे ! काहीजण तर शपथेवर सांगायचे की त्यांनी डिचमधे अजगर पाहिला ! खरं-खोटं काय ते फक्त छातीठोकपणे सांगणारी मुलं, देव आणि असलाच तर तो अजगरच जाणे !

दिवसा काही विशेष नाही पण संध्याकाळ व्हायला लागली की डिच अजूनच गहिरी आणि भीतीदायकही वाटायची. ते संदीप खरेचं ‘खतरनाक’ बालगीत ऐकलयंत – बुंबुंबा म्हणून ! त्याने लिहिलंय ’आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून, पडका वाडा बसला आहे दबा धरून!’ तर त्यातच पुढे पडक्या वाड्यामागच्या विहिरीचं वर्णन करताना त्याने लिहिलंय ’कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी… उच्चारावे जसे अघोरी मंत्र कुणी, दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ .. काठावरती येऊन बसते संध्याकाळ!’ ह्या ओळी वाचताना जशी भीती वाटते ना तशीच आम्हाला संध्याकाळी डिचकडे बघताना यायची.

बाकी सगळ्यापेक्षा मुलांना खरी भीती वाटायची ती दलदलीची. हो ना, क्रिकेट खेळताना जर बॉल तिकडे गेला तर बॉल पाण्यात असेपर्यंत काठ्या वगैरे वापरून आम्ही तो काढायचो पण एकदा तो पुढे दलदलीत गेला की मी मी म्हणणारे हरायचे !!! कधी कधी तर चक्क आम्ही ३-४ मुलं एकमेकांच्या कंबरेला धरून साखळी करत असू की उगाच बॉल काढणारा मुलगा दलदलीत पडला पडायला नको.

समाजसेवेचा कॅंप असला की दोन दिवस शाळेतच मुक्काम असायचा पण संध्याकाळनंतर डिचकडे फिरकायची अजीबातच परवानगी नसायची. पोरांच्या पैजा लागायच्या की सगळ्यांची नजर चुकवून रात्री पटकन डिचमधे उतरून लगेच परत यायचं पहिली गोष्ट म्हणजे सहसा कोणी अशी पैज कबूल करत नसे आणि केलीच तरी जिंकण्यासाठी फारसे कष्ट करत नसे.

हे असं असलं तरी डिच म्हणजे आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य होतं. डिचच्या काठावर पिंपळ आणि निलगिरीची झाडं होती. त्या झाडांच्या थंडगार सावलीत बसून एकमेकांची चेष्टामस्करी करणं, खोड्या करणं आणि कधीकधी चक्क अभ्यासही करणं ह्याची मजा शब्दांत पकडू म्हणता पकडता येत नाही.

सकाळी साधारण दहाच्या सुमारास मधली सुट्टी व्हायची. बांबूच्या शांत आडोशाला बसायला खूप छान वाटायचं. कधी अचानक एखादा off period मिळायचा. तेव्हा तर त्या बांबूच्या वनात झडलेल्या गप्पांच्या मैफिली काय वर्णाव्या महाराजा? एकमेकांना सिनेमाची स्टोरी सांगायला खूप धमाल यायची. हिंदी सिनेमाचा प्रभावामुळे असेल पण आम्ही पोरं त्या जागेला ’अड्डा’ म्हणायचो.

डिचच्या काठावरल्या पिंपळाच्या पानांची सळसळ आम्ही फक्त पुस्तकातच वाचली नव्हती, तर रोज ती पहायचो. पिंपळपानांपैकी अखंड पानं पुस्तकांमधे ठेवून वाळवायची. ती वाळली की त्यांची छान तलमदार जाळी व्हायची. हातावर चुरगळलेल्या निलगिरीच्या पानांचा सुगंध तर अजूनही मनात ताजा आहे.

डिचच्या उतरत्या काठाला घसरगुंडी करून बरोबर पाण्याच्या काठाशी थांबायचं आणि युनिफ़ॉर्मची पॅंट फाटू द्यायची नाही. कितीतरी मुलांबरोबर मीसुद्धा हे कसब् तिथेच शिकलो. त्या सगळ्या झाडांमधून, डिचच्या काठावरून, त्या घसरगुंडीवरून, पाण्यात न पडता सूर-पारंब्या खेळताना वेळ कसा जायचा ते कळायचंही नाही.

आम्हा पोरांचा अजून एक खेळ आवडता होता. तीन-चार मुलं एकत्र असलो की डिचमधे उतरायचं आणि पाण्याच्या काठी मस्तपैकी मांडी घालून निवांत बसायचं. मग आसपासच्या दगडांपैकी त्यातल्या त्यात चपटे दगड घ्यायचे. एकेकाने पाण्यात ते चपटे दगड असे मारायचे की दगडांनी पाण्यावर २-३ टप्पे घेत गेलं पाहिजे ! ज्याचा दगड जास्तीत जास्त टप्पे घेईल तो त्या दिवशीचा winner !!

कधीकधी नशीब जोरदार असलं तर तीन-चार महिन्यात सायकलचं टायर पंक्चर व्हायचं नाही. मग पंक्चरसाठी लागले तर असू दे म्हणून खिशात ठेवायला मिळालेले पैसे सत्कारणी लागायचे. शाळेच्या कॅंटीनमधून आम्ही पोरं वडा-पाव घ्यायचो आणि बांबूच्या वनात निवांत बसून खायचो. सटीसहामही कधीतरी होणारी ती चैन असायची त्यामुळे त्याची मजाही वेगळीच होती. आताही मधेच कधीतरी वाटतं की काही तासांसाठी लहान व्हावं, यार-भिडू जमवावेत आणि डिचमधे उतरून वडा-पावची पार्टी करावी !!!

काही वर्षांपूर्वी कधीतरी समजलं की शाळेने भराव वगैरे घालून डिच पूर्णपणे बुजवलीय ! वाईट वाटलं; खरंच सांगतो खूप वाईट वाटलं। पहिलं कारण म्हणजे आमच्या शाळकरी आठवणींतला एक खूप मोठा भाग आता परत कधीच बघता येणार नव्हता. दुसरं म्हणजे आता शाळॆत शिकणाऱ्या मुलांना डिचचा आनंद कधीच मिळणार नाही.

शाळेत असताना समजलं नाही पण वर्गात जसं शिकलो तसंच चार भिंतींबाहेरही खूप गोष्टी शिकलो. खूप गोष्टी तर शिकलो डिचमधे किंवा डिचकडूनही !! अगदीच काही नाही तर ’खड्ड्यात जाणं’ ह्याला इंग्लिशमधे ’to be ditched’ असं का म्हणतात, ते मराठी शाळेत शिकूनही खूप लवकर समजलं होतं !!!