Friday, January 1, 2016

आराध्य मुरलीधर!





बासरीला सूर यावा लागतो

फुंक नाही श्वास द्यावा लागतो





मी एका गझलेत लिहिल्याप्रमाणे बासरीला श्वास देणारे आमचे आराध्य दैवत -- पं. हरिप्रसाद चौरसिया!

दर शनिवारी आमची शाळा दुपारी असायची. बाकी आठवडाभर सूर्य उगवायच्या आधी आम्ही मुलंच कोंबड्यासारखी आरवत शाळेत पोचायचोशनिवारी मात्र सकाळी लवकर उठायची भानगड नसायची. बहुतेकदा शाळेचा गृहपाठही शुक्रवारी दुपारीच करून झालेला असायचा त्यामुळे टिवल्या-बावल्या चालू असायच्या. माझे वडील (आप्पा) बँक ऑफ इंडियात होते. ते सकाळी दाढी करताना रेडियोवर शास्त्रीय संगीत ऐकायचे. आमच्या आप्पांचा आवाजही चांगला होता आणि कुठे शिकताही ते तबला उत्तम वाजवायचेमाझे आजोबा तर संगीत नाटकांतून काम करायचे. त्यामुळे शास्त्रीय संगीत ही आवड रक्तातलीच आहे’. मी आपला एखादं पुस्तक, 'एकच षटकार' किंवा काहीतरी  वाचत असायचो आणि बऱ्याचदा  रेडियोवर माझी आवडती धून सुरू व्हायची. सकाळच्या वातावरणात ती धून ऐकत राहावं असं वाटायचं. सकाळचे राग, रात्रीचे राग वगैरे काही असतं हेच मुळात तेव्हा माहिती नव्हतं. आताही काही फारसं समाजत नाहीच पण निदान 'आपल्याला समजत नाही' हे तरी आता समजतंय’. हळू हळू मग समजलं की ते वाद्य म्हणजे बासरी आहेकलाकार आहेत पं. हरिप्रसाद चौरसियामनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहिलेल्या त्या दोनपैकी एक धून आहे 'भटियाली' आणि दुसरी आहे 'पहाडी'.

कॉलेजमध्ये असताना कधीतरी बासरी हातात घ्यायचं धाडस झालं आणि मग सुरू झालं 'हरिजी' ह्या नुसत्या नावानेही भारून जाणं. तसं पाहिलं तर बासरी हे दिसायला अगदी सोपं आणि सुरात वाजवायला अवघड वाद्य आहे! बासरी शिकायला सुरुवात केली की समजतं -- हरिजी बासरी वाजवत नाहीत, त्यांनी बासरी वाजवण्याची तपश्चर्या अनेक तपे केली आहे.

हरिजींचा जन्म कधी झाला, ते बासरी कशी वाजवायला लागले वगैरे माहिती, जी गुगलबाबाला विचारली की मिळते, ती इथे देण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा अजून थोड्या आठवणी जागवतो. मी कॉलेजमध्ये असताना (म्हणजे कोणे एक काळी, म्हणजे खूप खूप पूर्वी, म्हणजे  फक्त दूरदर्शन असायचे त्या काळी !) एकदा टिस्माला हरिजींचा कार्यक्रम होता. टिस्मा म्हणजे पुण्यातले टिळक स्मारक मंदिर. हरिजींची मी प्रत्यक्ष पाहिलेली ती पहिली मैफिल. रूपक कुलकर्णी ह्या त्यांच्या पट्टशिष्याचे बासरीवादनही मी तेव्हाच पहिल्यांदा ऐकले. त्या मैफिलीपासून मी हंसध्वनी रागाचा वेडा झालोय तो आजतागायत!

सवाई गंधर्व संगीत महोत्सव तर असंख्य कानसेन एकत्र जमण्याची जागा! डिसेंबरच्या गुलाबी थंडीत रात्रभर चालणारा सवाई. अशा सलग तीन रात्री जागवायच्या आणि पुढचं वर्षंभर त्या आठवणी जागवायच्या. सवाईला एकाहून एका दिग्गजांच्या मैफली अनुभवणं हे शब्दातीत आहे. अशा थंडीत गरम गरम वाफाळता चहा किंवा कॉफीने हात उबवत, घसा शेकत असताना एखादी मंद सुगंध दरवळवणारी शाल नाजूक आवाजात काही कुजबुजताना दिसायची! उप्फ..क्या बात, क्या माहौल..!! एका वर्षी सवाईला हरिजी आणि उस्ताद झाकीर हुसेन होते. तेव्हा ऐकलेला चंद्रकंस जादुई ह्या शब्दाच्या पल्याड गेलेला आहे.

तसंच पुण्याच्या गणेश कला - क्रीडा इथे ऐकलेला एक कार्यक्रम! हरिजींनी शेवटी शिवरंजनीतली धून वाजवली होतीतोपर्यंत माझ्या डोक्यात शिवरंजनी म्हणजे जाने कहाँ गये वो दिनचे आर्त सूर हेच फिट्ट बसलं होतं. शिवरंजनी इतका आनंददायीही असू शकतो धून ऐकल्यावर जमजलं. अगदी शेवटी तर हरिजींनी छोटी बासरी वाजवायला घेतली होती. मला तेव्हा वाटलं बासरीचे सूर छप्पर फाडून पार आकाशात जायला  पाहतायतश्रीमंत दगडूशेठ  हलवाई गणपतीच्या शताब्दी महोत्सवात त्यांचा हंसध्वनी पुन्हा एकदा  ऐकायला मिळाला होता. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या त्या भव्य मांडवात घुमणारे बासरीचे सूर त्या गणपतीबाप्पा सारखेच  अद्वितीय होते. त्याच महोत्सवात ऐकलेली उस्ताद विलायत खानांची सतार! पहाटेच्या सुमारास  त्यांची भैरवी ऐकताना डोळ्यातून ओघळलेले अश्रू गालांवर अजूनही जाणवतात. ती देवाची सतार होती!

हरिजींच्या बासरीतली सगळ्यात जास्त भावणारी गोष्ट म्हणजे त्यांचे श्वासावरचे अशक्य नियंत्रण! ती बासरीची नुसती फुंक नसते. ती ध्यानसाधना, योगसाधना असते! श्रावणसरींसारखी रिमझिमत सुखावणारी आलापी असो किंवा आषाढ मेघांतून बरसणाऱ्या पावसाप्रमाणे ताना असो, त्यांचे श्वासावरचे नियंत्रण कमाल म्हणजे कमालच असते. कितीही द्रुत लय चालू असेल तरी सतत जाणवत राहतं की मनात आणलं तर कुठल्याही क्षणी हा माणूस एकाही स्वराला हलकीशीही इजा होऊ देता अलगद थांबू शकतो!  बासरीवर त्यांची बोटं उचलणंही बघत राहण्यासारखी असतात. असं वाटतं की बोटं बासरीवर नजाकतीने नाच करतायत किंवा चित्रकाराच्या ब्रशप्रमाणे सफाईने रागाचं चित्र रंगवतायत. कुठल्या स्वरासाठी किती बोटांचे वजन ठेवायचे आणि किती प्रमाणात फुंक द्यायची ते जमणं सोपं  नाहीये. बासरी शिकणारा कुणीही मान्य करेल की कोमल स्वर वाजवताना तर कष्टं असतातही गोष्ट खोटी आहे हे हरिजींना वाजवताना बघून वाटतं हे मात्र खरं आहे!

खूप वर्षांपुर्वी दूरदर्शनने  राष्ट्रीय एकात्मता ह्या विषयाला दोन प्रकारे अत्यंत सुरेल केले होते. पहिला होता मिले सूर मेरा तुम्हारा…. आणि दुसरा होता  बजे सरगम हर तरफ से, गुंजे बनकर देश राग!’  देस ह्या खूबसूरत रागाचा कल्पकतेने वापर केलेले बजे सरगम  म्हणजे एक से एक बढकर कलाकारांची मांदियाळी आहे. त्यात झाडाखाली बासरीत तल्लीन झालेले हरिजी आहेत आणि नंतर छोट्या बासरीतून निघाणाऱ्या त्यांच्या अशक्य ताना आहेत!

जन्मापासून मृत्युपर्यंत आपण सारे भारतीय वेगवेगळ्या प्रकारे संगीत अनुभवतो. हिंदी चित्रपट संगीत ही खूप जणांसाठी संगीत आवडायला लागण्याची पहिली पायरी असते. शास्त्रीय संगीतातले राग किती खुबीने चित्रपट संगीतात वापरले जातात त्याचा आपल्याला पत्ताही नसतो. हिंदी चित्रपट संगीताबाद्दल लिहिताना शिव - हरि हे नाव वगळताच येणार नाही. आठवतंय ते साक्षात अमिताभ बच्चनच्या भारदस्त आवाजातलं नीला आसमान सो गया”?  पडद्यावरही बच्चन आणि डोळ्यांतून संयत शृंगारभाव दाखवणारी रेखा …. स्वप्नवत रोमान्स! त्यातली नजाकत अचूक टिपणारे संतूर, बासरीचे सूर!  चित्रपट होता सिलसिला आणि संगीत दिग्दर्शक होते  शिव-हरि -- पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया!  त्यांचाच अजून एक सिनेमा -- चांदनी’! त्यातलं तेरे मेरे होठों पे, मीठे मीठे गीत मितवा हे गाणं! ते आठवलं की डोळ्यासामोर येते कंच हिरवाईच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या साडीतली सुरेख श्रीदेवी!  आँखो को ठंडक असे ते सुखद दृष्य आणि कानांत रूंजायला लागतात त्या सौंदर्याइतकेच वळणदार बासरीचे सूर!

चित्रपट संगीत हे लोकरंजनासाठी आहे तर भारतीय शास्त्रीय संगीताचा गाभा म्हणजे अध्यात्म! बासरी आणि श्रीकृष्ण हे अतूट नातं आहे. कृष्ण जन्माष्टमीला हरिजींकडे सलग २४ तास बासरीवादन चालते. रात्री बारा वाजता हरिजी सुरुवात करतात आणि मग पुढे ते स्वत:, त्यांचे शिष्य, शिष्यांचे शिष्य असे सतत वाजवणं चालू असतं. पुण्याचा मिलिंद दाते हा त्यांचा शिष्य तर सुदैवाने माझा चांगला मित्र आहे आणि मार्गदर्शकही आहेमिलिंदकडून हरिजींबद्दल ऐकतानाही भन्नाट वाटतं. त्याच्या एका ब्लॉगमध्ये त्याने जन्माष्टमीबद्दल खूप छान आठवणी लिहिल्यायत. त्याची एक खास आठवण म्हणजे गुरूजींनी एकदा सलग तास यमन वाजवला होता!

रंगदीपच्या २५ ह्या संकल्पनेबद्दल विचार करताना जाणवलं बघता बघता हरिजींची मैफिल पहिल्यांदा अनुभवून २५ वर्षे झाली की! दीपावलीनिमित्त रंगदीप ह्या माध्यमातून हरिजींना उदंड आयुष्य लाभो ह्या शुभेच्छा देतोय. मी स्वत: आत्तापर्यंत हरिजींना फक्त तीन वेळा भेटलोय. न्यू यॉर्क / न्यू जर्सीमध्ये त्यांचा कार्यक्रम असला की त्यांना भेटून, नमस्कार करून परतलोय.

कधीतरी त्यांच्या पायाशी बसून बासरीचा षड्ज लावायचा हे स्वप्नं मनात वर्षानुवर्ष बाळगलेले आहे. ते पुरे होईपर्यंत, विठ्ठलाच्या ओढीने जाऊन कळसाचे दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्यासारखा, हरिजींच्या मैफलींना जाणारा मी एक वारकरी!