Saturday, December 22, 2012

त्याची भीती, त्याचा करिष्मा!

"सूअर के बच्चों!”

त्या सिनेमाच्या पडद्यावर तो पहिल्यांदा दिसतो तेव्हाच कानफटात मारल्यासारखे हे शब्दही आपल्या डोक्यात घुमतात. सिनेमा पहिल्यांदाच बघणारे एकदम खुर्चीत सावरून बसतात आणि लहान मुलं घाबरून आई-बापाचे हात घट्ट धरतात!!

तसं पाहिलं तर त्या सिनेमात तो प्रत्यक्ष पडद्यावर येतो तेच मुळात सिनेमा सुरू होऊन जवळपास दीड तासानंतर! मात्र तोपर्यंत त्याच्याबद्दलच्या नुसत्या संवांदातून त्याची दहशत जाणवायला लागलेली असते. थिएटरच्या काळ्यामिट्ट अंधारात असं वाटत राहतं की तो आपल्या आसपासच कुठेतरी वावरतोय. आपण त्याच्या नुसत्या अस्तित्वाच्या कल्पनेचंही दडपण घेतोय. सिनेमात त्याची पहिली ओळख होते ती "वो मशहूर डाकू?" ह्या साध्या प्रश्नाने. पण मग सिनेमाचं कथानक जसजसं वेग घेऊ लागतं तसतसं त्याचे क्रौर्य दिसू लागतं आणि त्याची दहशतही वाढायला लागते.

हिंदी सिनेमाच्या चाहत्यांनी त्याच्याआधी त्याच्यासारखा व्हिलन पाहिला नव्हता आणि कदाचित त्याची बरोबरी करणारा दुसरा व्हिलन होणारही नाही. खलनायकपदाच्या सर्वोच्च शिखरावर तो गेल्या तीन दशकाहूंन जास्त काळापासून आहे आणि तो अजरामर झालाय. व्यक्तिशः मला 'अग्निसाक्षी'च्या विश्वनाथमधे, 'चायना गेट'च्या जगीरामधे, आणि 'परिंदा'च्या अन्नामधे थोड्याफार प्रमाणात ‘त्याचा’ खुनशीपणा जाणवला. हां.. आणि अजून एकदा तो खुनशी थंडपणा जाणवला होता तो 'सत्ते पे सत्ता'तल्या बाबूच्या एन्ट्रीच्या वेळेला. पाठीतून भीती जाणवलेली अजूनही आठवतेय. (आणि बॉस..त्या एन्ट्रीतलंही आर. डी. बर्मनचे खत्तरनाक पार्श्वसंगीत!) बाकी 'शान'च्या शाकाल पासून ते 'मि. इंडिया'च्या मोगॅम्बोपर्यंत, 'कर्मा'च्या डॉ. डँगपासून ते अगदी आत्ता आत्ता 'दबंग'च्या छेदी सिंग किंवा 'सिंघम'च्या जयकांत शिक्रेपर्यंत कुणी म्हणजे कुणीच त्याची उंची गाठू शकलं नाहीये. दोनच उदाहरणं देतो म्हणजे खात्रीच पटेल!

पहिलं -- आत्तापर्यंत कुठल्याही सिनेमाचे फक्त संवाद इतके अजरामर झाले नाहीयेत की ज्याच्यामुळे ऑडियो रेकॉर्ड्स कंपनीने त्या संवादांची रेकॉर्ड काढलीये आणि त्या संवादातही खलनायकाच्या एन्ट्रीच्या प्रसंगातले संवाद सर्वात जास्त गाजलेत. शिवाय खलनायक इतका जास्त लोकप्रिय झालाय की त्याच भूमिकेवर आणि त्याच एन्ट्रीच्या प्रसंगावर बेतलेली चक्क बिस्कीटांची जाहिरात निघाली. बरं जाहिरात निघाली तर निघालीच पण सिनेमाच्या मध्यंतरात ती जाहिरात दाखवली जायची आणि बच्चेकंपनीपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळे आवडीने ती जाहिरात बघायचे!

दुसरं -- अगदी आत्ताचं उदाहरण! काही दिवसांपूर्वी घरी बेसमेंटमधे प्रॉजेक्टरच्या मोठ्या पडद्यावर तो सिनेमा बघत होतो. बच्चेकंपनीत माझा मुलगा आणि भाचा असे दोघं होते. दोन्ही मुलं सात - साडेसात वर्षांची. त्यापैकी आमच्या चिरंजीवांचा तो सिनेमा तीन वेळा बघून झाला होता आणि आता ते चौथ्यांदा बघत होते. ह्या बाबतीत एकदम बापावर गेलाय! आमचा भाचा मात्र पहिल्यांदाच तो सिनेमा बघत होता. बेसमेंटच्या अंधारात त्या मोठ्या पडद्यावर 'तो' आला आणि आमच्या भाच्याने आपल्या बाबाचा हात घट्ट धरून ठेवला. बरं आमचा भाचा अगदी जन्मापासून सातेक वर्ष पुण्यात वाढलाय. त्यामुळे 'दबंग', 'सिंघम' वगैरे कधीच बघून झाले आहेत पण त्या व्हिलनच्या एन्ट्रीने मात्र त्याला नक्की हादरवलं होतं. खरंतर माझ्या मुलगा काय किंवा भाचा काय, त्या दोघांनाही सत्तरच्या दशकातले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इ. कुठलेही संदर्भ नाहीत. तरीही त्या खलनायकाला पडद्यावर बघताना ते टरकले ते थेट सत्तरच्या दशकातल्या प्रेक्षकांसारखेच!! अर्थात त्याची सिनेमातली एन्ट्रीच असली जब्बरी आहे ना भिडू की पूछो मत!

आपल्या डोळ्यांसमोर डोंगराळ भागातले मोठमोठे खडक दिसायला लागतात. सुरूवातीला कॅमेरा अशा कोनातून फिरत असतो की वाटतं जणू आपणच त्या डोंगराळ भागातल्या थोड्या खोलगट जागी आहोत आणि उंच मोठ्या खडकांकडे बघत आहोत. आपल्या कानांवर धीम्या चालीतल्या बुटांचा आवाज येतो -- खाड खाड खाड! पाठोपाठ मोठाल्या ढोल किंवा नगार्‍यावर ठाय लयीत टिपरी पडायला लागते. त्यापाठोपाठ सुरू होतं ते विचित्र आवाजात भेसूरपणे कुत्रं रडल्यासारखं पार्श्वसंगीत…ऊंsss..ऊंsss..ऊंsss..!! त्याचसुमारास दिसतात संपूर्ण पडदा व्यापून टाकत थोड्या छोट्या खडकावरून दुसर्या खडकावर चालत जाणारे त्याचे पाय! अक्षरश: पाय दिसतायत हं फक्त. पाय म्हणजे गुडघ्याच्या आसपासच्या भागापासून खालचा भाग.. बस्स. पैलेछूट नजरेत येते ती मिलिटरी ऑलिव ग्रीन रंगाची, पिदडून वापरलेली त्याची पँट आणि नजरेत खुपणारे दणकट काळे बूट. त्याचबरोबर नजर खिळवून ठेवतो तो पायांच्या जोडीने एखाद्या जहरी सापासारखा वळवळत, खडक घासत फिरणारा काडतुसांचा चामडी पट्टा! आधीच अंगावर येणार्या पार्श्वसंगीतात भर म्हणजे त्या पट्ट्याचे बक्कल खडकांवर आपटत गेल्यामुळे होत असलेला आवाज! ते दृष्य भन्नाट ... म्हणजे भन्नाटच, खंग्री, कडक, एक नंबर, बेस्ट, अल्टिमेट, केवळ, वाईट्ट, टोटल, विषय संपला… ह्यापैकी कुठलंही विशेषण वापरायचं! भावना पोचतातच!!

त्या दृष्यापासून पुढे मग त्याचा क्रूरपणा उलगडतच जातो. मगाशी म्हणालो तसं "सूअर के बच्चों" ह्या शब्दांबरोबर तो पडद्यावर पूर्ण दिसतो. स्वतःच्या दहशतीबद्दलचा माज दाखवत तो बोलायला लागतो. त्याच्या कपड्यांचंही डिटेलिंग इतकं नीट आहे की त्याच्या खांद्यावरची तुटकी कापडी पट्टीही आपल्या नजरेतून सुटत नाही. अट्टल डाकू कपड्यांच्या नीटनेटकेपणाकडे कशाला लक्ष देणार? संबंधच काय? त्याच्या खदखदून हसण्यातसुद्धा खुनशीपणा आहे. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचंही कौशल्य असं की पूर्ण सिनेमाभर आपण खलनायकाच्या एका वरचढ एक खुनशीपणामुळे, हलकटपणामुळे दचकत राहतो, चुकचुकत राहतो. सिनेमातली नाच-गाणी, रोमान्स, विनोदी प्रसंग हे सगळं बघत असतानाही मनाच्या कोपर्यात कुठे तरी वाटत असतं की तो कधीही, कुठूनही अचानक आपल्यासमोर येईल. लहान मुलांना जसं रात्रीच्या अंधारात भुताची गोष्ट सांगताना मधेच एकदम 'भ्भॉ!' केलं की ती दचकतात अक्षरश: तसेच आपणही दचकू असं वाटत राहतं!

वारकरी जसा वर्षातून एकदा वारी करतो तसे आपणही वर्ष-सहा महिन्यांतून एकदा(तरी) तो सिनेमा बघतोच. पण हा लेख वाचत असलेल्यांपैकी (मोजक्या) कुणालाही जर असा प्रश्न पडला असेल की हे नक्की कुणाचं पुराण आहे तर त्यांना 'गुगल' करण्यासाठी तरी त्याचं नाव सांगावंच आता! अजून दोन-चारशे वर्षांनंतर भारतीय संस्कृतीतल्या 'लार्जर दॅन लाईफ' अशा खलनायकांबद्दल जेव्हा कधीही गप्पा होत असतील तेव्हा त्यात चार नावं नक्की असतील -- रावण, दुर्योधन, कंस, आणि गब्बर सिंग!
----------------------------

2 comments:

Unknown said...

अजरामर खलनायक
तू नळीवर तुम्ही शोले सिनेमाच्या काही प्रदर्शित न झालेल्या दृश्याची झलक पाहू शकतात ,त्यात शोलेचा दुसरा शेवट
किंवा सचिनच्या खुनाचे सविस्तर चित्रण असे बरेच काही शोधले तर सापडेल.
व त्यात गब्बर तुम्हाला आधी न पाहिलेल्या दृश्यात पहिला मिळेल.

Unknown said...

अजरामर खलनायक
तू नळीवर तुम्ही शोले सिनेमाच्या काही प्रदर्शित न झालेल्या दृश्याची झलक पाहू शकतात ,त्यात शोलेचा दुसरा शेवट
किंवा सचिनच्या खुनाचे सविस्तर चित्रण असे बरेच काही शोधले तर सापडेल.
व त्यात गब्बर तुम्हाला आधी न पाहिलेल्या दृश्यात पहिला मिळेल.