Sunday, November 10, 2013

झोपेचं खोबरं!


"काय मग! झोप लागली का नीट?"कुणालाही हा प्रश्न विचारून बघा. बहुतेक लोकांकडून उत्तर मिळेल, " छ्या! का माहिती नाही पण अधून-मधून सारखी जाग येत होती."  पण त्याच माणसाच्या कुटुंबातील इतर लोक, विशेषत: 'बेटर हाफ', म्हणतील, "काय झोप लागली नाही म्हणतोय! रात्रभर चांगला घोरत होता. ह्याच्या घोरण्याने उलट माझीच झोप नीट झाली नाही!!"
तर मग ही झोपेची नक्की काय भानगड आहे? शिवाय त्यात घोरण्याचे महत्व काय? खरं तर '' घोरण्याचे महत्व काय? स्वानुभवातून आलेलं शहाणपण जमेल तितक्या लोकांबरोबर वाटावं हे ह्या लेखाचं प्रयोजन.  लेख वाचल्यावर शांत झोपेचं महत्व पटून जर स्वत:च्या झोपेविषयी कुणाचे डोळे उघडलेआणि त्यांनी शांत झोपेसाठी प्रयत्न सुरू केले तर तेच ह्या लेखाचं फलित!
अत्यंत महत्वाचा डिस्क्लेमर -- मी वैद्यकशास्त्राचा जाणकार नाही!  ह्या लेखाचा उपयोग फक्त सामान्य ज्ञानापुरता ठेवावा. आपल्या झोपेविषयी कृपया स्वत:च्या डॉक्टराशी चर्चा करावी!  'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे झोपेच्या बाबतीतही  खरं आहे.  बाकी मग झोप, स्लीप अ‍ॅप्निआ, सी-पॅप मशिन / मास्क ह्या विषयांबद्दल जनरल बोलायला, प्रोत्साहनासाठी एक मित्र म्हणून आपुन का दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है!

अगदी दीडेक वर्षांपूर्वीपर्यंत मी झोपलो की एखाद्या प्रोफेशनल स्विमरसारखा श्वास घ्यायचो! थोडक्यात म्हणजे स्विमर जसा ठराविक वेळाने श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर डोकं काढतो तसा मी जवळपास दर मिनिटाआड जागा व्हायचो पण मला ते कळायचंच नाही. फक्त इतकंच समजायचं की रात्री आपली झोप नीट  झाली नाहीये, सकाळी उठवत नाहीये, दिवसभर आळसावल्यासारखं वाटतंय, आणि दुपारी साधारण तीनच्या सुमारास कॉफी किंवा चहा नाही घेतला तर राहिलेला दिवस कठीण आहे.  एखाद्या गोष्टीत मन एकाग्र होण्याचे बारा वाजले होते आणि ऐन संध्याकाळी सहा - साडेसहा वाजताही कार चालवताना झोप यायची.  बायको - मुलानेच काय पण मित्रमंडळीनेही माझ्या घोरण्याचा धसका घेतला होता. छोट्या-छोट्या कारणांनीही चिडचीड व्हायची आणि ब्लड प्रेशर कायम वरच्या बाजूला उडी मारायचं! हे सगळं का व्हायचं ते कळण्यासाठी आधी आपण झोपतो तेव्हा नक्की काय होतं ते जरा समजून घेऊ.

झोपेमुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते तर शरीराला छान विश्रांती मिळते आणि दिवसभरात शरीराची झालेली मोडतोड भरून निघते. त्यामुळे दुसऱ्या दिवसासाठी ऊर्जा मिळते. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे म्हणतात ते वाटतं.  लहान मुलांना जवळपास ९-१० तास झोपेची गरज असते तर तरूण / प्रौढ लोकांना साधारण ७-८ तासाची शांत झोप आवश्यक असते. ती जर झोप नीट झाली नाही तर दुसऱ्या दिवशी चिडचीड होणार हे ठरलेलं! आपण झोपतो तेव्हा आपल्या झोपेच्या काही स्लीप सायकल्स होतात.  एक स्लीप सायकल साधारण २-३ तास असते म्हणजे रात्री आपण जर ७-८ तास झोपतो असे मानले तर त्यामध्ये आपल्या साधारण ३ स्लीप सायकल्स होतात. ह्या स्लीप सायकलमध्ये झोपेचे काही टप्पे असतात.  ते टप्पे पाहिले की आपल्याला झोपेचा जरा अंदाज येईल.

पहिल्या टप्प्यात डोळे पेंगुळायला वगैरे लागतात. हलकी हलकी झपकी यायला लागते. दरवाज्यावर कुणी टकटक केले तरी जाग येते.  बायको आपल्याला उत्साहाने काहीतरी सांगत असते आणि आपण नुसतं 'हंहं' करत असतो. "आता झोपतो, आपण उदया बोलू!" हे वाक्य आपण मनातल्या मनात म्हणत असतो. हीच ती बेसावध वेळ असते जेव्हा मधेच कधी तरी आपला आवाज बंद होतो आणि दुसऱ्या दिवशी बायकोचा सुरू होतो!

दुसऱ्या टप्प्यात शरीराचे स्नायू छान सैल पडायला लागतात. हात-पाय वगैरे हलवायची शक्यता कमी होत जाते. 'मेंदू' नावाची आपल्या शरीरातील भन्नाट चीज जागी राहते आणि आपल्याला विश्रांती देऊ लागते.  निद्रा राणी आपल्याला कुशीत वगैरे घ्यायला लागते. हलक्याशा स्वप्नांत सुंदर चेहऱ्यांची झलक मिळायला लागते.

तिसऱ्या टप्प्यात आपण गाढ झोपेत जायला लागतो. गाढ म्हणजे एकदम गाढ झोप! काही जण आपल्याला "घोडे बेच के सो गया" म्हणतात पण आपण लक्ष द्यायला जागेच नसतो. ह्या झोपेतून माणसाला जागं करणं अवघड जातं. कुंभकर्ण त्याच्या झोपेचा बराच वेळ ह्या टप्प्यात घालवत असावा! ह्या झोपेतून माणूस एकदम दचकून जागा होतो. "मैं हॉं हूं?"  प्रश्न विचारणारा माणूस ह्याच झोपेतून जागा झालेला असतो.  ह्या टप्प्यात स्नायू आणि हाडांची डागडुजी सुरू असते. त्यामुळेच म्हणतात की शरीरातील अतिरिक्त चरबी हटवायची असेल, म्हणजे fat burning, तर दिवसातल्या व्यायामप्रकारांत स्नायू कणखर करणारे (strength training) व्यायामही करावेत. ह्या टप्प्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायचं कामदेखील चालू असतं. 

त्यानंतरचा झोपेचा टप्पा म्हणजे 'रेम' -- REM (Rapid Eye Movement) sleep.  ही झोप फारच महत्वाची असते. ह्यात नक्की काय होतं महाराजा? तर दोन गोष्टी होतात.  एक म्हणजे भन्नाट स्वप्नं पडतात. भन्नाट म्हणजे भ-न्ना-ट! आपण झोपेतच डोळे गरागरा फिरवत असतो जणू काही झपाझप हलणाऱ्या चित्रांना डोळ्यांत साठवायला बघतोय. म्हणून तर नाव आहे Rapid Eye Movement! उदाहरणच दयायचं तर ….आपण 'स्पायडर मॅन' आहोत आणि 'जेन'ला वाचवायला न्यू यॉर्कच्या जंगलात इमारतींवरून उड्या मारतोय! भन्नाट स्वप्नं आहे म्हणजे 'जेन' काय 'टारझन'बरोबरच असायला पाहिजे का? बरं, आता लक्षात आलं का मेंदू शरीराला का सैलावून ठेवतो ते? नाहीतर तुम्ही काय हो, खरंच पलंगावरून उड्या मारायला जायचात!  दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही होते की मेंदूतल्या स्मरणशक्तीच्या कप्प्याची साफसफाई सुरू होते. दिवसभरात आपण अनेक गोष्टी डोक्यात साठवतो. त्यातल्या अनावश्यक गोष्टींवर 'डिलिट' बटण दाबले जातं!  जर REM नीट झाली नाही तर स्मरणशक्तीच्या कप्प्यात सावळा गोंधळ व्हायला लागतो.  अर्थात हे काही एक-दोन रात्रीत होत नाही पण काही वर्षांनंतर स्मरणशक्तीच्या तक्रारी सुरू होतात. 'अल्झायमर'सारख्या गंभीर रोगाच्या दिशेने पावले पडण्याची सुरुवात होऊ शकते!

मगाशी लिहिल्या प्रमाणे स्लीप सायकल्स असतात आणि पहिल्या सायकलमधली  REM झोपल्यापासून साधारण दीड तासानंतर सुरू होते. पण ती जेमतेम दहा मिनिटांची असते. गंमत म्हणजे दोन-तीन स्लीप सायकल्समध्ये दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील झोप रिपीट होत असते आणि पहाटे रात्री चारच्या सुमाराची REM साधारण चांगली तासभर टिकते.  रात्रीच्या अंधारात चोऱ्या करणाऱ्यांनाही हे गणित माहिती असतं का ते नक्की ठाऊक नाही पण बघा बहुतेकशा चोऱ्या पहाटे तीन - चारच्या सुमारास होतात. त्यावेळेला आपल्यासारखे बरेचजण 'घोडे बेच के सो गये' असतात किंवा मग 'स्पायडर मॅनसारख्या भन्नाट स्वप्नांत हरवलेले असतात!  

आता बघूया ह्या सगळ्यामध्ये 'घोरणं' ही भानगड कुठे येते? आपण झोपलो तरी श्वसनमार्गातून श्वासोछ्वास चालू असतो. म्हणजे काय? असणारच ना! तर, आठवतंय ना -- झोपेत शरीरातील सगळे स्नायू सैलावलेले असतात? श्वास घ्यायच्या मार्गातील वरच्या बाजूचे स्नायूही असेच सैलावल्याने श्वासाचा मार्ग अरुंद होतो. त्यामुळे श्वास आत घेताना अडथळा होऊन झेंडा फडफडल्यासारखा  आवाज होतो.  हा आवाज म्हणजेच घोरणं!  ह्यात होतं काय की जर हा अडथळा  खूप वाढला तर घोरण्याचा आवाजही खूप वाढतो. अशा वेळेस माणसाला स्लीप अ‍ॅप्निआ असण्याची शक्यता असते. विशेषत: स्थूलपणा, उच्च रक्तदाब वगैरे असेल तर डॉक्टरशी बोलणं चांगलं! 

ह्या सगळ्या भानगडीत एक गोष्ट लक्षात आली असेल की श्वासोच्छ्वास नीट  झाला नसल्याने आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मेंदूला सिग्नल जायला लागतात की बाबा हौ तुझं काय खरं नाही आतामरतोय बघ! मेंदू सावध असतोच त्यामुळे तो माणसाला जिवंत ठेवायची धडपड सुरू करतो आणि तेही अगदी पद्धतीत!  तुम्ही श्वास घायचा खात्रीशीर मार्ग म्हणजे तुम्ही जागं होणं आणि मेंदू तेच करायला सुरुवात करतो! पैलेछूट काय होतं तर आपली चुळबूळ  सुरू होते. कुशी बदलणं वगैरे प्रकार सुरू होतात. 'करवटें बदलते रहें, सारी रात हम' हे काय फक्त प्रेयसीच्या आठवणीनेच होतं असं काय नाय!  तरी जाग आली नाही तर मग तहान लागते! आता काय, पाणी प्यायला तरी उठशील की नाही? तरीसुद्धा जाग आली नाही तर मग मेंदू अजून जोरात प्रयत्न करतो आणि चक्क बाथरूमला जावंसं वाटायला लागतं. जणू मेंदू म्हणतो, "उठ लेका उठ, मरशील नाहीतर!"  पाणी प्यायला किंवा बाथरूमसाठी उठल्यावर आपोआप  थोडा नीट श्वास घेतला जातो.  पण काहीवेळा असंही होऊ शकतो की हे सगळे प्रयत्न वाया जातात. मग मात्र मेंदू त्याच्या भात्यातले ब्रम्हास्त्र काढतो! आपल्या मनाच्या तळाशी दडून बसलेली भीती डोकं वर काढते. मग कुणाला असं वाटतं की आपण खूप उंचावरून अचानक खोल खड्यात पडलोय तर कुणाला वाटतं आपल्यामागे साप लागलाय!  त्यामुळे आपण दचकून जागे होतो. ह्या सगळ्याचं साध्य एकच असतंआपल्याला श्वास घ्यायला भाग पाडणं!! 

स्लीप अ‍ॅप्निआतल्या ‘‍अ‍ॅप्निआशब्दाचा  अर्थ आहे झोपेत किंचितसा वेळ श्वास थांबणं! प्रत्येक माणसाला कसं ब्लड प्रेशर असतंच फक्त ते प्रमाणाबाहेर जात राहिलं की आपण म्हणतो की अमक्या-तमक्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. तसंच प्रत्येकाला हा अ‍ॅप्निआ असतो पण श्वास थांबण्याचं प्रमाण वाढायला लागलं किंवा श्वास थांबण्याचा वेळ वाढायला लागला असं दिसलं की डॉक्टर म्हणतो -- तुला स्लीप अ‍ॅप्निआ आहे रे बाबा! दुर्दैवाने एकंदर भारतीय समाजात ह्या प्रकाराबद्दल फारशी जागरूकता नाही.  उलट आपण म्हणायला मोकळे की च्यायला ही नसती अमेरिकन थेरं आहेत! म्हणे घोरणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं!!  

आता जर कुणाला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का ते कळणार कसं? उत्तर सोपं आहे स्लीप स्टडी! स्लीप स्टडी सेंटरमध्ये एका रात्रीसाठी आपल्याला जावं लागतं किंवा एक यंत्रं एका रात्रीसाठी डॉक्टर आपल्याला घरी वापरायला देतात.  रात्रभरात त्या यंत्रात जमा झालेल्या माहितीतून हे पाहिलं जातं की एखादयाला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का? असल्यास किती प्रमाणात आहे आणि उपाययोजनेसाठी सी-पॅप मशीनचा उपयोग करताना हवेच्या झोताचे प्रमाण किती ठेवायला हवे.  

मग आता स्लीप अ‍ॅप्निआवर उपाय काय? वजन कमी करणं, विशेषत: गळ्याभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करणं उत्तम. त्यासाठी मग ते नियमित व्यायाम करणं, हिरव्या भाज्या खाणं वगैरे सगळं आलंच! शिवाय एका विशिष्ठ प्रकाराच्या प्राणायामाने फायदा होतो असं ऐकलं आहे पण स्वानुभव नाही.  मी घेत असलेला उपचार इथे सांगतोय आणि ह्याचा नक्की फायदा होत असलेला अनुभवतोय!  तर  सी-पॅप मशीन वापरायचं. CPAP म्हणजे continuous positive airway pressure.  'गुगल'बाबाला CPAP असं विचारलं तर बरीच माहिती मिळेल. ह्यामध्ये आपल्या नाकावर लावायला एक मास्क असतो आणि मास्कचं दुसरं टोक एका नळीने मशीनला जोडलेलं असतं.  मशीनमधून ठराविक प्रमाणात हवेचा झोत नाकातून सतत सोडला जातो. त्यामुळे श्वसनमार्ग व्यवस्थित उघडा राहतो आणि झोपेतही ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत राहतो.  मास्कने तोंड बंद असतं त्यामुळे तोंडाने श्वास घेतलाच जात नाही आणि घोरणंही बंद होतं! है शाब्बास आपलं घोरणं बंद झाल्याने आसपासचे लोकही सुखाने झोपू शकतात! व्यवस्थित ऑक्सिजन मिळाल्याने झोपमोड व्हायचा प्रश्नच येत नाही आणि मेंदू आपली सगळी अस्त्रं भात्यात ठेवून देतो. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे काय म्हणतात ते वाटतं. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते.  मी साधारण गेले दीड वर्षं  सी-पॅप मशीन वापरतोय आणि नक्की फायदा झालेला अनुभातोय. बरं हे मशीन प्रवासात वापरायलाही सुटसुटीत असतं त्यामुळे अगदी एका रात्रीसाठीही कुठे जाताना मशीन सहज बरोबर नेता येतं. फक्त झोपण्याच्या जागेजवळ इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट असायला हवा. सुट्टीसाठी भारतात आलो होतो तेव्हा मला पुणे, गोवा अशा ठिकाणी घरी, हॉटेलमध्ये सगळीकडे मशीन व्यवस्थित वापरता आलं.  

अर्थात कुठलीही नवीन गोष्ट वापरायला शिकताना सुरुवातीला जरा त्रास होतो तसाच हे मशीन वापरतानाही होऊ शकतो. पण नेटाने प्रयत्न चालू ठेवले आणि मशीनची  सवय झाली की मग झोपेसारखं सुख नाही!  मगाशी म्हणालो तसं काही मदत / प्रोत्साहन हवं असल्यास आपुनका दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है! खोटं नाही सांगत पण आता रात्र जवळ आली की मनापासून आनंद होतो की चला आता छानपैकी झोपायचं! मग दुसऱ्या दिवशी सकाळी गजर व्हायच्या आधीच जाग येताना मनात 'भटियार'चे प्रसन्न सूर गुंजायला लागतात -- 'पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा…. जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा!'
------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी -- मायबोली दिवाळी अंक २०१३
------------------------------------------------

Saturday, April 13, 2013

खेळ नुसता…. टक टक्काक टक!

"अरे टोण्या, जागचा हाल ना... मूव्ह लेका मूव्ह.. एका जागी उभा काय राहतोस?"
 
टक टक..टक टक....टक टक्काक टकहा आवाज ध्यानीमनी असायचा….कित्येक वर्षं! खेळतानाही मनातल्या मनात स्वत:शीच बोलणं चाललेलं असायचं. कधी कधी मात्र मनातले बोल तोंडातून उमटायचे, "अरे टोण्या, जागचा हाल ना..". जेमतेम ९ X ५ फूट टेबल ते, पण आजूबाजूचं भान सुटून सगळं जग जणू त्या टेबलावर असायचं!
टेबल टेनिसची गोडी लहानपणीच कधी लागली सांगता येत नाही. काहीतरी आठवतंय ते असं की मी साधारण पाच-सहा वर्षांचा असताना कॉलनीतल्या श्यामकाकाकडे टेबल टेनिसची पहिली रॅकेट पाहिली होती. पांढर्‍या शुभ्र कव्हरमधे ठेवलेली, हिरव्या रंगाचं गुळगुळीत रबर लावलेली ती रॅकेट अजूनही जश्शीच्या तश्शी आठवतेय. त्या गुळगुळीत रबरावरून हात फिरवताना वाटायचं हा काहीतरी खूप छानच खेळ असणार... आपल्याला खेळता यायला हवा. लहानपणीची एक गंमत असते की खेळांमधला सगळ्यात चांगला भाग म्हणजे आपल्याला पाहिजे ते कल्पनाविश्व हाताशीच असतं! लहान मुलांना कुठल्याही साधनांतून कुठलाही खेळ मन लावून खेळता येतो. आम्ही पेरूच्या फांदीला क्रिकेटची बॅट म्हणूनही वापरलंय आणि बॅट्समनच्या मागे स्टंप्स म्हणून पाट/लाकूड/विटांची चवड/भिंत ह्यापैकी काहीही चालवून घेतलंय. ह्यातलं काहीच नसेल तर बॅट्समनच्या कंबरेइतक्या उंचीखालून बॅट आणि बॅट्समनच्यामधून बॉल मागे गेला की बॅट्समन आउट हे ही मान्य करून खेळायचो. आम्ही त्या वयात मग मित्रांबरोबर घराच्या व्हरांड्यात चक्क जमिनीवर बसून टेबल टेनिस खेळायचो! हो, बरोबर लिहिलंय ... 'जमिनीवर' बसून 'टेबल' टेनिस खेळायचो. आमच्यासाठी व्हरांड्याची जमीनच टेबल असायची आणि घरातल्या कंपास बॉक्स किंवा चपटे डब्बे म्हणजे टेबलाच्या दोन बाजू करणारे नेट! एखाद्या वहीचा पुठ्ठा ही आमची रॅकेट असायची पण टेबल टेनिसचा बॉल मात्र खरा असायचा.. त्यात तडजोड नाही!
थोडा मोठा व्हायला लागलो तसा मग टेबल टेनिसच्या खर्‍या टेबलासमोर उभा राहिलो की चक्क साक्षात्कार व्हायचा -- अरे व्वा! टेबलाच्या लेव्हलपेक्षा आपली उंची थोडी जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला मधल्या जाळीतून समोरचा खेळाडू दिसतोयसुद्धा! अशातच एक दिवस माझ्या काकाने खास माझ्यासाठी टेबल टेनिसची रॅकेट विकत आणली. माझ्या आठवणीतली ती माझी पहिली सरप्राइज गिफ्ट! काका ऑफिसमधून येताना रॅकेट घेऊन आला पण त्याने आमच्या घराआधी एक घर सोडून अलीकडच्या घराच्या खिडकीवर रॅकेट ठेवून दिली होती. सायकलची घंटी 'ट्रिंग ट्रिंग' वाजवत घरी आलेला तरुण काका आज तीस-पस्तीस वर्षांनंतरही नीट आठवतोय. मग माझ्या छोट्या हाताला धरून तो त्या खिडकीकडे घेऊन गेला जिथे रॅकेट लपवून ठेवली होती. मास्टर कार्डची जाहिरात करणार्‍यांनी तो प्रसंग पाहिला असता तर त्यांनी तो जाहिरातीत नक्की वापरला असता आणि लिहिलं असतं, "जॉय इन नेफ्यूज आइज.. प्राइसलेस!"
माझी आई पुण्याला महाराष्ट्रीय मंडळाच्या कटारिया हायस्कूलमधे शिक्षिका होती. कधी कधी तिच्याबरोबर तिच्या शाळेत थोडा वेळ थांबायला लागायचं. मग आठवी-नववीतली मुलं टेबल टेनिसच्या खोलीत खेळत असली की मी तिथे नक्की पडीक असायचो. तसंच आमचे आप्पा बँक ऑफ इंडियात होते. ते अलका टॉकीजच्या शेजारच्या ब्रँचमधे होते तेव्हा शनिवारी दुपारी बँकेच्या वेळेनंतर तिथे जायला मिळायचं. बँकेतले काही काका टेबल टेनिस खेळत असायचे. त्यांना खेळताना बघतच रहायचो. संध्याकाळी समोरच्या 'दरबार' रेस्टॉरंटमधे 'दरबार स्पेशल' भेळ खायचो आणि मगच घरी यायचो.
सातवी- आठवीच्या सुमारास खर्‍या अर्थाने टेबल टेनिस खेळायला सुरूवात केली. आंतरशालेय स्पर्धांतून आणि मग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून खेळायची मजा भन्नाटच असते. माणूस जसा पहिलं प्रेम जन्मभर विसरत नाही तसाच आंतरशालेय स्पर्धांमधला पहिला प्रतिस्पर्धीही जन्मभर विसरत नसावा. तसं म्हटलं तर पहिल्यांदा केलेल्या बर्‍याच गोष्टी माणूस विसरत नाही पण नाही त्या तपशीलात कशाला शिरा! ह्या आंतरशालेय स्पर्धा म्हणजे माहोल असायचा एकदम! स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो की मोठ्या हॉलमधे सात-आठ टेबल्स मांडलेली असायची. वेगवेगळ्या टेबलवरच्या गेम्सचा स्कोअर वेगळा असायचा. ज्या टेबलवर जो स्कोअर असेल त्या स्कोअरप्रमाणे त्या टेबलसमोरच्या प्रेक्षकांमधून 'बक अप!', 'चिअर अप!', 'कमॉन फाईट, फाईट!' असे असंख्य उद्गार ऐकू यायचे. त्या सगळ्या कोलाहलातून खेळाडू आपापला खेळ खेळत असायचे. आतासुद्धा कुठलीही टेबल टेनिस स्पर्धा बघायला जाल तर हेच दृश्य दिसेल.
माणसाला छंद असावा! त्यातूनही एखादा खेळ खेळण्याचा छंद तर असावाच असावा. नुसता खेळ मन लावून खेळल्याने कित्येक वेगवेगळ्या अनुभवांनी मन समृद्ध होत जातं! सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजते ती म्हणजे हरलो तरी पुन्हा प्रयत्न करायचा. पराभव खुल्या दिलाने पचवायला शिकणं हे तर आयुष्यात ठायीठायी उपयोगी पडतं. जिंकण्याची जिद्द असते पण त्यासाठी शॉर्टकट नसतो हे समजायला लागतं. टेबल टेनिस काय सोप्पं आहे असा सर्वसाधारण गैरसमज असतो. मला तरी वाटतं की एकंदरच मनाची एकाग्रता वाढवायला टेबल टेनिसची खूप मदत होते. एकतर टेबल तसं छोटं असतं आणि खेळण्यात जम बसायला लागल्यावर फटक्यांचा वेगही वाढायला लागतो. मग आपल्याकडून चूक होऊ न देण्याचा प्रयत्न करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे चेंडूचा टप्पा बघणं! "टप्पा बघ रे, टप्पा बघ!" असं म्हणणं खूप सोपं असतं पण तो टप्पा खरंच बघणं ... खरंतर प्रत्येक फटक्याला बघत राहणं अवघड असतं. टप्पा बघायचा म्हणजे पर्यायाने चेंडू सतत बघत रहावा लागतो आणि एकाग्रता ढळली की काम तमाम.. फटका चुकतोच! कुठल्याही खेळात खेळाडूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे स्वतःचं डोकं शांत ठेवणं. त्याशिवाय खर्‍या अर्थाने खेळाची मजाच घेता येत नाही.
स्मरणशक्ती (मसल मेमरी!) ह्या मस्त प्रकाराची नकळत ओळख होत जाते. आपलं शरीर म्हणजे एक फँटास्टिक प्रकार आहे. आता काही दिवसांपूर्वी आमच्या कंपनीत एक टेबल टेनिसची स्पर्धा होती. न्यू यॉर्कमध्ये 'स्पिन न्यू यॉर्क’' नावाची जागा आहे. एकदम अमेरिकन स्टाईलप्रमाणे खेळाला मनोरंजनाची फोडणी दिलेली जागा आहे. बेसमेंटच्या मोठ्या हॉलमधे दहा-बारा टेबल्स, मधूनमधून ठेवलेले सोफा सेट, खायची-प्यायची सोय असं बरंच काही. खायची-प्यायची सोय म्हणजे बार हवाच आणि तो आहेच! बियर/वाईन वगैरे घेत, काहीतरी खात-पीत टेबल टेनिस खेळणारे लोक मी पहिल्यांदा ह्या 'स्पिन न्यू यॉर्क'मधे पाहिले! तर ह्याच ठिकाणी आमच्या कंपनीचाही एक इवेंट होता. मी जवळपास दोन वर्षांनी वगैरे खेळत होतो. काय आहे ना .. लहानपणी खे़ळताना त्रास असा होता की पुढे वाकूनही नेटपर्यंत हात पोचायचा नाही कारण उंची पुरायची नाही. आता मोठेपणी वेगळाच त्रास आहे! नेटपर्यंत हात पोचवायला जावं तर आताही हात पोचत नाही कारण नेमकं पोट मधे येतं आणि टेबलला अडतं! कंपनीच्या स्पर्धेत मला एक फटका मारायचा होता आणि मला कळत होतं की फटका मारण्याआधी आपला डावा पाय टेबलच्या डाव्या बाजूला चेंडूच्या आडव्या रेषेत यायला हवा. आता काय इतक्या पटकन आपल्या हालचाली होणार नाहीत असं वाटत असतानाच माझ्याही नकळत माझा डावा पाय चेंडूच्या आडव्या रेषेत पोचलाही होता. शाळाकॉलेजच्या वयात पायात बसलेल्या हालचाली आता कित्येक वर्षांनंतरही पायाला आठवत होत्या. दॅट्स 'मसल मेमरी' माय फ्रेंड्स... मसल मेमरी!
टेबल टेनिसचं एक बरं असतं! रॅकेट आणि चेंडू दोन्ही छोटे असल्याने सहज बॅगेत वगैरे टाकून कुठेही नेता येतात. शिवाय इनडोअर खेळ असल्याने पावसाची वगैरे फिकीर नॉट! बाहेर बदाबदा पाऊस कोसळत असला तरी टेबल टेनिस खेळणार्‍याला काही फरक पडत नाही. ऐन तारूण्यात ह्या खेळाची नशा चढली ना तर -- बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय, प्रेयसीला बाईकवर घेऊन लोणावळ्याला जायचं, पावसात भिजत एकमेकांच्या हातात हात गुंफून धुंदपणे चालत जायचं -- हे सगळं करण्याआधी टे टे वीर म्हणेल, "थांब जरा! तासभर खेळून येतो!!" अगदी श्रीदेवीचं 'काटें नहीं कटतें ये दिन ये रात...' वगैरे गाणं बघतानाही पैलेछूट त्याच्या मनात येईल - ह्या साडीच्या कापडाचे नेट चांगले होईल! मला तर वाटतं आजकाल बिपाशा, मल्लिका, मलायका वगैरे ललना टेबल टेनिसच्या नेटचीच लांबी-रूंदी (थोडीथोडीच) वाढवून मग त्यालाच आपले कपडे म्हणत असाव्यात.
खेळण्याचा निखळ आनंद ह्याशिवाय टेबल टेनिसने मला दिलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र परिवार! टेबल टेनिस खेळताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत गेले आणि मैत्र वाढत गेलं. एकेका खेळाडूची तर्‍हा निरनिराळी. कुणी स्वतःला जॉन मॅकेन्रोचा अवतार समजत असे आणि तो जो तापटपणा टेनिस कोर्टवर दाखवायचा तसाच तापटपणा काहीजण टे. टे. खेळताना दाखवायचे. शिव्यांच्या शब्दकोशात आपसूकपणे छान वाढ व्हायची. काहीजण त्याच्या अगदी उलटे! ते जणू बियॉन बोर्गच्या डोक्यातल्या बर्फाचे तुकडे आपल्या डोक्यात फिट करवून यायचे. पॉईंट जिंको वा हरो, सामना जिंको वा हरो त्यांच्या चेहर्‍यावरचा शांतपणा बदलायचाच नाही. माझी खात्री आहे की टेबल टेनिस शांतपणे खेळणारा माणूस बायकोबरोबरच्या भांडणातही शांतच असेल. खरं म्हणजे भांडण फारसं होतच नसेल कारण भांडण होण्यासाठी दोन्ही बाजूंनी आवाज व्हायला हवा. इथे तर बायको शेवटी वैतागून म्हणत असेल, "अरे! मी तुझ्याशी बोलतेय, भिंतीशी नाही!
खेळणार्‍यांमधे सगळ्यात बेष्ट प्रकार म्हणजे तावातावाने खेळणारे! तुम्ही बघा -- बॅडमिंटनही इनडोअर खेळ आहे पण शर्ट खुंटीला टांगून, फक्त बनियनवर बॅडमिंटन खेळणारे सहसा कुणी दिसणार नाहीत! आपल्याकडे टेबल टेनिस खेळताना काही जण हा प्रकार फारच आवडीनं करतात. हरलेल्या प्रत्येक पॉइंटनंतर त्यांचे, "थांब रे, आता बघतोच नक्की!" वगैरे उद्गार, रॅकेट धरलेल्या हाताच्या पंजावर फुंकर मारणं वगैरे प्रकार वाढतच जातात. अगदी पायात ठराविक प्रकारचे चांगले स्निकर्स असतील तरच टेबल टेनिस खेळणार्‍यांपासून ते हटकून अनवाणी पायाने खेळणारेही दिसतात! व्यक्ती तितक्या प्रकृती हे टेबल टेनिसबाबतीत पूर्ण सत्य आहे. त्याच्या अगदी उलटा प्रकार म्हणजे फारसे गिमिक्स न करता, ज्या हातात रॅकेट नाहीये त्या हाताची कमीत कमी हालचाल करत, सर्विस केल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या फटक्यालाच 'ओपन' करणारा, प्रत्येक फटका मारताना चेंडूचा टप्पा बघणारा आणि त्याप्रमाणे पायांचीही योग्य ती हालचाल करणारा कुणी दिसला की विचारायचं -- पुण्याला अजेय सिधयेंकडे टेबल टेनिस शिकलास का? एका ओळीत आठपेक्षा जास्त शब्द न लिहू देणार्‍या चितळेमास्तरांप्रमाणे मी आता सांगितली ती अजेय सिधयांची वैशिष्ट्ये!
टेबल टेनिसबद्दल इतकं लिहिल्यावरही आयुष्यातल्या पहिल्या सामन्याबद्दल काहीच बोललो नाही तर हा लेख अपुराच राहील ना! मला आठवतंय आंतरशालेय स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा मी सातवीत होतो. तो पर्यंत टेबल टेनिस म्हणजे अंदाज पंचे दाहोदरसेच होतं. शा़ळेच्या संघातून नाव दिल्यावर काही दिवसांतच समजलं की स्पर्धांमधे 'ड्रॉ' नावाची काहीतरी भानगड असते. एकूण माहितीत एवढी भर पडली होती की माझ्या आयुष्यातला पहिलावहिला सामना 'चौगुले' आडनाव असलेल्या खेळाडूशी होता. ही माहिती समजल्यानंतर रोज शाळेत प्रॅक्टिस करताना मनात 'चौगुले', 'चौगुले' असा जप चालायचा! जणू काही टेबल टेनिसची प्रॅक्टिस करताना मनातल्या मनात 'कबडडी'.. 'कबड्डी' म्हणायचो! असं म्हणतात की मुघलांच्या घोड्यांना तळ्यातलं पाणी पितानाही पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे. तसाच मला कधीही न पाहिलेला 'चौगुले' दिसायचा!
शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस उजाडला. टेबल टेनिसच्या स्पर्धेसाठी नक्की कसं तयार होऊन जायचं इथपासूनच सुरूवात होती! थोडक्यात सगळा आनंदीआनंदच होता. बराच विचार करून मग मी एकदम शहाण्या बाळासारखा हाफ पँट आणि चक्क हाफ शर्ट घालून गेलो! तेही शर्ट व्यवस्थित खोचून बिचून गेलो होतो! तुमच्या डोळ्यांसमोर अजूनही चित्र पूर्ण स्पष्ट झालं नसेल तर 'गटणे' हातात टेबल टेनिसची रॅकेट घेऊन निघालाय इतकंच डोळ्यासमोर आणा! आता बरोब्बर समजलं ना? द्या टाळी! हातात टेबल टेनिसची जी रॅकेट होती ती ही ह्या बाळबोध वळणाला साजेशीच होती. फळकुटावर गोळ्या-गोळ्यांचं रबर चिकटवलेलं असल्याने त्याला रॅकेट म्हणायचो इतकंच! अर्जुन रामपाल सिनेमात असतो म्हणून त्याला अ‍ॅक्टर म्हणतात तसंच! आंतरशालेय स्पर्धांसाठी पेरूगेट भावे स्कूलमधे पोचल्यावर खर्‍या अर्थाने टेबल टेनिसचा माहोल दिसला आणि अगदी मनापर्यंत जाणवला. बस्स..तबियत खुश हो गई इतनाही कहना काफी है! पहिला झटका बसला तो 'चौगुले'बरोबर सामना सुरू करताना पहिले काही सरावासाठीचे फटके मारताना! सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जाणवली की आपल्याकडे बॉल येताना खूप वेगाने येतो आहे. एकदोन फटक्यांतच नक्की काय फरक होता ते समजलं. क्रिकेटमधे आपल्याकडच्या 'पाटा' विकेट्सवर खोर्‍याने धावा काढणारे वीर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान विकेट्सवर धावपळ का करायचे ते एका झटक्यात समजलं! एकूणच प्रॅक्टिस आणि मॅच ह्याच्यात काहीच साम्य नव्हतं!! एवढी कथा सांगितल्यावर 'चौगुले'ने सामन्यात मिटक्या मारत माझा फडशा पाडला हे वेगळं सांगायला हवं का? हां, पण त्या दिवसापासून टेबल टेनिस म्हटल्यावर सुरू होणारी एक्साईटमेंट आजतागायत आहे. हा लेख वाचून तुम्हालाही टेबल टेनिस खे़ळायची इच्छा झाली तर जरूर कळवा. पुन्हा खेळायला मजा येईल, तुम्ही मॅकेन्रोचे अवतार आहात की बोर्गचे ते कळेल आणि मित्र परिवारात भरही पडेल!

 

Saturday, December 22, 2012

त्याची भीती, त्याचा करिष्मा!

"सूअर के बच्चों!”

त्या सिनेमाच्या पडद्यावर तो पहिल्यांदा दिसतो तेव्हाच कानफटात मारल्यासारखे हे शब्दही आपल्या डोक्यात घुमतात. सिनेमा पहिल्यांदाच बघणारे एकदम खुर्चीत सावरून बसतात आणि लहान मुलं घाबरून आई-बापाचे हात घट्ट धरतात!!

तसं पाहिलं तर त्या सिनेमात तो प्रत्यक्ष पडद्यावर येतो तेच मुळात सिनेमा सुरू होऊन जवळपास दीड तासानंतर! मात्र तोपर्यंत त्याच्याबद्दलच्या नुसत्या संवांदातून त्याची दहशत जाणवायला लागलेली असते. थिएटरच्या काळ्यामिट्ट अंधारात असं वाटत राहतं की तो आपल्या आसपासच कुठेतरी वावरतोय. आपण त्याच्या नुसत्या अस्तित्वाच्या कल्पनेचंही दडपण घेतोय. सिनेमात त्याची पहिली ओळख होते ती "वो मशहूर डाकू?" ह्या साध्या प्रश्नाने. पण मग सिनेमाचं कथानक जसजसं वेग घेऊ लागतं तसतसं त्याचे क्रौर्य दिसू लागतं आणि त्याची दहशतही वाढायला लागते.

हिंदी सिनेमाच्या चाहत्यांनी त्याच्याआधी त्याच्यासारखा व्हिलन पाहिला नव्हता आणि कदाचित त्याची बरोबरी करणारा दुसरा व्हिलन होणारही नाही. खलनायकपदाच्या सर्वोच्च शिखरावर तो गेल्या तीन दशकाहूंन जास्त काळापासून आहे आणि तो अजरामर झालाय. व्यक्तिशः मला 'अग्निसाक्षी'च्या विश्वनाथमधे, 'चायना गेट'च्या जगीरामधे, आणि 'परिंदा'च्या अन्नामधे थोड्याफार प्रमाणात ‘त्याचा’ खुनशीपणा जाणवला. हां.. आणि अजून एकदा तो खुनशी थंडपणा जाणवला होता तो 'सत्ते पे सत्ता'तल्या बाबूच्या एन्ट्रीच्या वेळेला. पाठीतून भीती जाणवलेली अजूनही आठवतेय. (आणि बॉस..त्या एन्ट्रीतलंही आर. डी. बर्मनचे खत्तरनाक पार्श्वसंगीत!) बाकी 'शान'च्या शाकाल पासून ते 'मि. इंडिया'च्या मोगॅम्बोपर्यंत, 'कर्मा'च्या डॉ. डँगपासून ते अगदी आत्ता आत्ता 'दबंग'च्या छेदी सिंग किंवा 'सिंघम'च्या जयकांत शिक्रेपर्यंत कुणी म्हणजे कुणीच त्याची उंची गाठू शकलं नाहीये. दोनच उदाहरणं देतो म्हणजे खात्रीच पटेल!

पहिलं -- आत्तापर्यंत कुठल्याही सिनेमाचे फक्त संवाद इतके अजरामर झाले नाहीयेत की ज्याच्यामुळे ऑडियो रेकॉर्ड्स कंपनीने त्या संवादांची रेकॉर्ड काढलीये आणि त्या संवादातही खलनायकाच्या एन्ट्रीच्या प्रसंगातले संवाद सर्वात जास्त गाजलेत. शिवाय खलनायक इतका जास्त लोकप्रिय झालाय की त्याच भूमिकेवर आणि त्याच एन्ट्रीच्या प्रसंगावर बेतलेली चक्क बिस्कीटांची जाहिरात निघाली. बरं जाहिरात निघाली तर निघालीच पण सिनेमाच्या मध्यंतरात ती जाहिरात दाखवली जायची आणि बच्चेकंपनीपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळे आवडीने ती जाहिरात बघायचे!

दुसरं -- अगदी आत्ताचं उदाहरण! काही दिवसांपूर्वी घरी बेसमेंटमधे प्रॉजेक्टरच्या मोठ्या पडद्यावर तो सिनेमा बघत होतो. बच्चेकंपनीत माझा मुलगा आणि भाचा असे दोघं होते. दोन्ही मुलं सात - साडेसात वर्षांची. त्यापैकी आमच्या चिरंजीवांचा तो सिनेमा तीन वेळा बघून झाला होता आणि आता ते चौथ्यांदा बघत होते. ह्या बाबतीत एकदम बापावर गेलाय! आमचा भाचा मात्र पहिल्यांदाच तो सिनेमा बघत होता. बेसमेंटच्या अंधारात त्या मोठ्या पडद्यावर 'तो' आला आणि आमच्या भाच्याने आपल्या बाबाचा हात घट्ट धरून ठेवला. बरं आमचा भाचा अगदी जन्मापासून सातेक वर्ष पुण्यात वाढलाय. त्यामुळे 'दबंग', 'सिंघम' वगैरे कधीच बघून झाले आहेत पण त्या व्हिलनच्या एन्ट्रीने मात्र त्याला नक्की हादरवलं होतं. खरंतर माझ्या मुलगा काय किंवा भाचा काय, त्या दोघांनाही सत्तरच्या दशकातले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इ. कुठलेही संदर्भ नाहीत. तरीही त्या खलनायकाला पडद्यावर बघताना ते टरकले ते थेट सत्तरच्या दशकातल्या प्रेक्षकांसारखेच!! अर्थात त्याची सिनेमातली एन्ट्रीच असली जब्बरी आहे ना भिडू की पूछो मत!

आपल्या डोळ्यांसमोर डोंगराळ भागातले मोठमोठे खडक दिसायला लागतात. सुरूवातीला कॅमेरा अशा कोनातून फिरत असतो की वाटतं जणू आपणच त्या डोंगराळ भागातल्या थोड्या खोलगट जागी आहोत आणि उंच मोठ्या खडकांकडे बघत आहोत. आपल्या कानांवर धीम्या चालीतल्या बुटांचा आवाज येतो -- खाड खाड खाड! पाठोपाठ मोठाल्या ढोल किंवा नगार्‍यावर ठाय लयीत टिपरी पडायला लागते. त्यापाठोपाठ सुरू होतं ते विचित्र आवाजात भेसूरपणे कुत्रं रडल्यासारखं पार्श्वसंगीत…ऊंsss..ऊंsss..ऊंsss..!! त्याचसुमारास दिसतात संपूर्ण पडदा व्यापून टाकत थोड्या छोट्या खडकावरून दुसर्या खडकावर चालत जाणारे त्याचे पाय! अक्षरश: पाय दिसतायत हं फक्त. पाय म्हणजे गुडघ्याच्या आसपासच्या भागापासून खालचा भाग.. बस्स. पैलेछूट नजरेत येते ती मिलिटरी ऑलिव ग्रीन रंगाची, पिदडून वापरलेली त्याची पँट आणि नजरेत खुपणारे दणकट काळे बूट. त्याचबरोबर नजर खिळवून ठेवतो तो पायांच्या जोडीने एखाद्या जहरी सापासारखा वळवळत, खडक घासत फिरणारा काडतुसांचा चामडी पट्टा! आधीच अंगावर येणार्या पार्श्वसंगीतात भर म्हणजे त्या पट्ट्याचे बक्कल खडकांवर आपटत गेल्यामुळे होत असलेला आवाज! ते दृष्य भन्नाट ... म्हणजे भन्नाटच, खंग्री, कडक, एक नंबर, बेस्ट, अल्टिमेट, केवळ, वाईट्ट, टोटल, विषय संपला… ह्यापैकी कुठलंही विशेषण वापरायचं! भावना पोचतातच!!

त्या दृष्यापासून पुढे मग त्याचा क्रूरपणा उलगडतच जातो. मगाशी म्हणालो तसं "सूअर के बच्चों" ह्या शब्दांबरोबर तो पडद्यावर पूर्ण दिसतो. स्वतःच्या दहशतीबद्दलचा माज दाखवत तो बोलायला लागतो. त्याच्या कपड्यांचंही डिटेलिंग इतकं नीट आहे की त्याच्या खांद्यावरची तुटकी कापडी पट्टीही आपल्या नजरेतून सुटत नाही. अट्टल डाकू कपड्यांच्या नीटनेटकेपणाकडे कशाला लक्ष देणार? संबंधच काय? त्याच्या खदखदून हसण्यातसुद्धा खुनशीपणा आहे. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचंही कौशल्य असं की पूर्ण सिनेमाभर आपण खलनायकाच्या एका वरचढ एक खुनशीपणामुळे, हलकटपणामुळे दचकत राहतो, चुकचुकत राहतो. सिनेमातली नाच-गाणी, रोमान्स, विनोदी प्रसंग हे सगळं बघत असतानाही मनाच्या कोपर्यात कुठे तरी वाटत असतं की तो कधीही, कुठूनही अचानक आपल्यासमोर येईल. लहान मुलांना जसं रात्रीच्या अंधारात भुताची गोष्ट सांगताना मधेच एकदम 'भ्भॉ!' केलं की ती दचकतात अक्षरश: तसेच आपणही दचकू असं वाटत राहतं!

वारकरी जसा वर्षातून एकदा वारी करतो तसे आपणही वर्ष-सहा महिन्यांतून एकदा(तरी) तो सिनेमा बघतोच. पण हा लेख वाचत असलेल्यांपैकी (मोजक्या) कुणालाही जर असा प्रश्न पडला असेल की हे नक्की कुणाचं पुराण आहे तर त्यांना 'गुगल' करण्यासाठी तरी त्याचं नाव सांगावंच आता! अजून दोन-चारशे वर्षांनंतर भारतीय संस्कृतीतल्या 'लार्जर दॅन लाईफ' अशा खलनायकांबद्दल जेव्हा कधीही गप्पा होत असतील तेव्हा त्यात चार नावं नक्की असतील -- रावण, दुर्योधन, कंस, आणि गब्बर सिंग!
----------------------------

Saturday, June 9, 2012

कस्सली साली जिंदगानी!

कस्सली साली जिंदगानी 
सगळी नुसती ओढा-ताणी
भेटत नाहीत आई -बाप नि
छोट्या डोळ्यांत पाणी.... १

कधी शाळेत बोलगाणी
ऐन दुपारी, मधल्या वारी
बाप अडके नोकरीवर नि
जरा आईचीही मजबूरी.... २

वाट बघून थकती डोळे
आशा मात्र दमत नाही
दिसत नाहीत आई - बाबा नि
थांबत नाही गालांवर पाणी.... ३

येतच नाहीत आई-बाबा
डोंगर कामांचा संपत नाही
त्यांची असते पाठ इथे नि
बालपण एक उडून जाई.... ४

घुसमटती आई-बापही 
कस्सली साली जिंदगानी
शरीराने दुसरीकडे नि
मनात रूंजती बोलगाणी.... ५
















Saturday, April 21, 2012

पत्रातला मजकूर!


तुझ्या नेत्री विखारच जर प्रिये सामावला होता

तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता?.... १



पहाटे जाग येते ही तुझी सय, अन्य ना काही

मला झुरता बघूनी चंद्रही रोडावला होता.... २



खिसेकापू इथे धन्वंतरी झाले पहा आता!

"जपुन देहास ठेवा", मंत्र मजला गावला होता.... ३



तिच्या केसांत माझे श्वास गुंतावे म्हणूनी का

तिचा गजरा फिरूनी एकदा सैलावला होता?.... ४



सुरेच्या वर्णनाने आज गझलेला नशा आली

तिचा प्रत्येक मिसरा वाटते धुंदावला होता... ५

Saturday, November 12, 2011

जरासे जरासे


गुपित राहिले ना इशारे जरासे
कशाला हवे मग अडोसे जरासे?....

तयांच्या तशा त्याच गप्पांमधूनी
मनाने कसे ह्या रिझावे जरासे?

मला भेटताना लपूनी-छपूनी
तुझे नेहमीचे बहाणे जरासे.... ३

असा स्पर्श व्हावा तुझा वाटते की
तुलाही मिळावे दिलासे जरासे.... ४

असो पावसाळे वयाचे कितीही
धनुष्यात रंगच दिसावे जरासे.... ५

'इथे' सर्व काही मिळाले तरीही
मिळावे 'तिथे'ही जरासे जरासे.... ६
------------------------------------------------------
वृत्त  -- भुजंगप्रयात
लगावली -- लगागा  लगागा लगागा  लगागा
------------------------------------------------------
 

Sunday, April 24, 2011

तेंडल्या!


हा लेख म्हणजे सचिनबद्दलच्या काही चांगल्या लेखांची, विडियो क्लिप्सची एक साठवणही असावा अशी प्रामाणिक इच्छा होती.  हा लेख वाचायला घेताना जरा निवांत बसावं. भेळ, पकोडे वगैरे काहीतरी चटपटीत खायला घ्यावं, आणि त्याबरोबर मस्तपैकी गरम-गरम चहाचे घुटके घेत ह्या लेखाची आणि ह्या लेखात दिलेल्या ध्वनि-चित्रफितींची लज्जत घ्यावी !
------------------------------------------------------------------------------


तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है?” – वसिम अक्रम

त्याने गेली एकवीस वर्षे आपल्या सगळ्यांच्या अपेक्षांचे ओझे स्वत:च्या खांद्यांवर पेलले आहे. त्यामुळे आता आम्ही त्याला उचलून घेणंच योग्य होतं.” – विराट कोहली 


मी देव पाहिलाय! तो भारतासाठी कसोटी सामन्यांमधे चौथ्या क्रमांकावर खेळतो!” – मॅथ्यू हेडन

त्याच्यासारख्या खेळाडूला कापसात गुंडाळून जपलं पाहिजे.” – सर विव्ह रिचर्डस

हा माणूस २४१ धावा ठोकल्यानंतरही भपका न दाखवता उलट ड्रेसिंगरूममधे आल्यावर आपण कसे बाद झालो हे पुन्हा पुन्हा बघतो, म्हणजे पुढच्या वेळी ती चूक नको व्हायला.” – रवी शास्त्री

अग ऐकलंस का! हा बॅट्समन बघ. ह्याची बॅटींग बरीचशी माझ्या बॅटींगसारखीच आहे.”   -- सर डॉन ब्रॅडमन

वेगवेगळ्या काळात क्रिकेट खेळलेले आणि वेगवेगळ्या क्षमता असणारे हे सगळेजण. पण प्रत्येकाचं त्याच्याबद्दल एकमत आहे.  ’सचिन रमेश तेंडुलकर’ – सिर्फ नाम ही काफी है!

आपल्याकडे मूल चार-पाच वर्षांचं झालं की त्याला क्रिकेटचं वारं लागतंच आणि गेली एकवीस वर्षें सचिन  झपाटल्यासारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय.  त्यामुळे भारतामधले साधारणपणे वयाची पंचविशी पार केलेले सगळेजण अक्षरश: नशीबवान आहोत कारण आपल्या आपण आपल्यासमोर सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द बहरताना पाहिलीय. सचिनबद्दल लेख लिहायचा(च) असं ठरवत होतो पण योग्य वेळच कळत नव्हती. ज्या माणसाबद्दल सतत काही ना काहीतरी वाचनीय लिहिलं जातं त्याच्याबद्दल अजून वेगळं काय लिहिणार ! आणि लिहायचं तरी नक्की कशाकशाबद्दल
वर्ल्डकप जिंकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या निरागस आनंदाबद्दल?..

त्याच्या देशप्रेमाबद्दल?.. धावांच्या भुकेबद्दल?.. रनिंग बिटवीन दि विकेट्सबद्दल? ..

डोंगरापार गेलेल्या आकड्यांबद्दल? ..  विक्रमांनंतरच्या विक्रमांबद्दल? ..

त्याच्या सामाजिक जाणिवेबद्दल?..

बघणाऱ्याच्या मनात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या देखण्या ड्राइव्हजबद्दल? ..

फक्त सोळा वर्षांचा असताना त्याने वकार युनिस इम्रान खान वसिम अक्रम ह्या तोफखान्यासमोर केलेल्या कसोटी पदार्पणाबद्दल?..

शिरीष कणेकर म्हणाले होते तसं ज्या वयात आई-वडील मुलाला (एकट्याला) मॅच बघायलाही जाऊ देणार नाहीत”, त्या वयात त्याने अब्दुल कादिरसारख्या दिग्गजाला मारलेल्या षटकारांबद्दल?..

तो नॉन स्ट्रायकर एन्डला जरी उभा असला तरी तो आहेह्यामुळेच आपल्या मनात येणाऱ्या आश्वस्त भावनेबद्दल? ..

फलंदाजाला  गंडवणाऱ्या त्याच्या गोलंदाजीबद्दल? ..

सदतीसाव्या वर्षीही विशीतल्या झपाटलेपणाने फिल्डींग करण्याबद्दल? ..

बाई-बाटलीची कुठलीही भानगड न करता इतकी वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे उच्च स्थानावर राहण्याबद्दल? ..

न्यूझीलंडमधे १९९४ साली, होळीच्या दिवशी खेळताना, वन-डे सामन्यात पहिल्यांदाच सलामीला येऊन त्याने होळी खेळल्यासारख्या ४९ चेंडूंत ठोकलेल्या ८२ धांवाबद्दल?..

त्यानंतर आधी काही वर्षे गांगुलीबरोबर आणि मग वीरूबरोबर सलामीच्या जोडीत येऊन आपल्या सगळ्यांना त्याने जो आनंद वाटलाय त्या आनंदाबद्दल?...

कसोटी, एक दिवसाचा, ट्वेंटी-ट्वेंटी (आय.पी. एल) --- कुठल्याही प्रकारच्या सामन्यात त्याने ठोकलेल्या शतकांबद्दल?...

सचिन सेन्च्युरी मारतो पण आपण सामना हरतो त्याचं काय !”  असे तारे तोडणं म्हणजे फुकाची बडबड ठरते त्याबद्दल? …त्याच्या संघभावनेबद्दल? …

की सगळ्यात महत्वाचं म्हणजे -- तुमच्या वयाच्या प्रमाणात तो तुम्हाला तुमच्याच एखाद्या मित्रासारखा / धाकट्या भावासारखा / मोठ्या भावासारखा / मुलासारखा / नातवासारखा वाटतो त्याबद्दल? ..

एक दिवसाच्या सामन्यांमधले पहिले द्विशतक झळकवण्याचा मान सचिनने मिळवला तेव्हाच खरंतर हा लेख लिहायला पाहिजे होता पण सचिनप्रमाणेच मीही वाट बघत होतो त्याचं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होण्याची! आता ते स्वप्नं पूर्ण झालंय आणि २४ एप्रिल २०११ हा त्याचा अडतीसावा वाढदिवस! त्यामुळे हा लेख अजून थांबणं शक्यच नव्हतं.

ह्या लेखाच्या सुरूवातीला दिलेल्या उद्गारांपैकी तीन वाक्यं मला खूप महत्वाची वाटतात. 
ब्रॅडमन, अक्रम आणि कोहलीची वाक्यं!

डॉन ब्रॅडमन हे नाव धारण केलेला फलंदाजीतला अंतिम शब्दजेव्हा म्हणतो की सचिनच्या बॅटिंगमधे त्याला  स्वत:च्या खेळाची प्रतिमा दिसते तेव्हा आपल्यासारख्या सामान्य लोकांना बोलायला काही उरतं का

कुठल्याही खेळामधे प्रतिस्पर्ध्याने दिलेली दाद ही सगळ्यात मोठी दाद मानण्यात येते. २००३ सालच्या वर्ल्ड कपमधे भारत-पाक सामन्यात सचिनला बाद करण्यासाठी वयाची पस्तिशी पार केलेला वसिम अक्रम जीवाचं रान करत होता. शोएब अख्तर, वकार युनिस आणि वसिम अक्रमच्या धारदार आक्रमणावर सचिन सेहवाग ह्या दुकलीने चढवलेला प्रतिहल्ला तर नुसता टीव्हीवर बघतानाही आपल्या हाताच्या तळव्यांना घाम आला होता! आणि त्या धामधुमीत…..अक्रमच्या बॉलिंगवर अब्दुल रझ्झाकने सचिनचा कॅच सोडला!  अक्रमच्या डोकं वापरूनबॉलिंग करण्याच्या पद्धतीने मी नेहमी वेडा झालोय. (असे मला आवडणारे अजून काही तेज गोलंदाज म्हणजे कपिल देव, मायकल होल्डिंग, डेनिस लिलीइम्रान खान, कर्टनी वॉल्श, ग्लेन मॅकग्रा आणि रिचर्ड हॅडली. खरंतर ह्यातल्या प्रत्येकावर किमान एक लेख लिहिता येईल!) अक्रमचे ते खत्तरनाक स्विंग, रिव्हर्स स्विंग, आणि यॉर्कर्स! उगाच नाही त्याला सुलतान ऑफ स्विंगम्हणत! तर असा हा अक्रमत्याने पद्धतशीरपणे सचिनसाठी सापळा लावला होता पण…. ऐनवेळी रझ्झाकने स्वत:चं डोकं चालवलं आणि अक्रमने सांगिततेली जागा सोडून थोडा आतल्या बाजूला फिल्डिंगसाठी उभा राहिला. सचिनचा सुस्साट पण हवेतून जाणारा फटका रझ्झाकच्या हातून सुटला आणि…. गल्ली क्रिकेट खेळत असल्यासारखा खवळून अक्रम रझ्झाकवर ओरडला, तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है?”  मला वाटतं अक्रमसारख्या कसलेल्या प्रतिस्पर्ध्याने सचिनला नकळत दिलेली दाद नक्की समजण्यासाठी त्या वाक्यातला किसका हा शब्द पुरेसा बोलका आहे! (हे वाक्य इथे लिहिताना-वाचतानाही आपल्या अंगावर मूठभर मांस चढतंय च्यायला, तर त्या मॅचमधे स्वत:बद्दल हे वाक्य ऐकताना सचिनला नक्की काय वाटलं असेल?) त्या मॅचमधल्या सचिनच्या भन्नाट बॅटिंगची ही बघा झलक

ह्या वर्षीच्या वर्ल्डकपमधला भारत पाक सामना बघताना तर वाटत होतं जणू पाकिस्तानचे खेळाडू त्यांच्या कृतीतून दाखवून देतायत की सचिनने अजून खेळत राहवं, कॅच-बिच आले तर आम्ही सोडूच! पाकिस्तानी लेखक उस्मान समिउद्दीनने ह्या लेखात लिहिल्याप्रमाणे सचिनचे ४ झेल सोडल्यावर सामना जिंकण्याची अपेक्षा करणंच चूक ठरतं!

२५ जून १९८३ आणि २ एप्रिल २०११! जगभरातले भारतीय क्रिकेटप्रेमी ह्या तारखा कधीच विसरणार नाहीत. आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा विराट कोहली जन्मलाही नव्हता आणि दुसऱ्यांदा जिंकला तेव्हा तो जेमतेम तेवीस वर्षांचा होता.  म्हणजे तो एक-दोन वर्षांचा असताना सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू झाली! वर्ल्ड कप जिंकल्यावर कोहली सचिनबद्दल जे म्हणाला ते वाक्यं त्याचं होतं पण त्यातली भावना मात्र तुमच्या-माझ्यासारख्या असंख्य भारतीयांची होती. ह्यापुढे विराट कोहलीचं क्रिकेटमधलं करीयर कसंही असलं (आणि ते भरभराटीचं असावं  ह्या मनापासून शुभेच्छा) तरी त्या एका वाक्यामुळे जागतिक क्रिकेटच्या इतिहासात कोहलीचं नाव आत्ताच अजरामर झालंय ह्याबद्दल दुमत नसावं! विराट कोहलीला ते वाक्य म्हणताना पुन्हा एकदा बघायचंय?

विराट कोहली तर कालचा बच्चा आहे पण सेहवाग तर सचिनमुळे(च) क्रिकेट खेळायला लागला. मला आठवतंय मी पहिल्यांदा सचिन-सेहवागला एकत्र खेळताना पाहिलं तेव्हा इंग्लिशमधल्या अनुक्रमे मेन्टरआणि मेन्टीह्या शब्दांचा अर्थ अगदी बरोब्बर समजला. वीरूसारखा खेळाडू जेव्हा प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत असतो तेव्हा मला खूप वेळा वाटतं की खेळपट्टीच्या मधल्या भागात येऊन सचिन आणि सेहवाग एकमेकांशी नक्की काय बोलतायत ते ऐकायची सोय असायला हवी होती!

सेहवागने सांगितलेल्या एका आठवणीप्रमाणे -- ऑस्ट्रेलियात सिडनेला सचिनने नाबाद २४१ धावा ठोकल्या होत्या त्या सामन्याआधी तो वीरूला म्हणाला होता की त्या सुमारास तो कव्हर ड्राईव्ह मारताना बाद होतोय तर आता पुढच्या सामन्यात कव्हर ड्राईव्हला छुट्टी ! सेहवाग म्हणतो की आधी त्याला वाटलं सचिन मस्करी करतोय पण सिडनेला सचिन द्विशतकाच्या जवळ पोचल्यावर सेहवागच्या लक्षात आलं खरंच ह्या माणसाने कित्येक वेळा संधी मिळूनही अजून एकही कव्हर ड्राईव्ह मारला नाहीये !

खरं म्हणजे सचिनच्या बॅटिंगबद्दल वगैरे बोलायचीही आपली हैसियत नाही पण तरी मला स्वत:ला त्याच्या बॅटिंगमधल्या आवडणाऱ्या सगळ्यात मोठ्या तीन गोष्टी म्हणजे टायमिंग, प्लेसमेंट, आनंद!  त्याचे ड्राइव्ह्ज, फ्लिक्स बघणं म्हणजे अक्षरश: आनंद असतो! टायमिंग असं भन्नाट की कधी कधी तर अक्षरश: चेंडूला त्याची बॅट जणू थोपटून म्हणते, “अरे मित्रा! जा ना जरा तेवढं सीमारेषेच्या बाहेर काय आहे ते बघून ये!

क्षेत्ररक्षणाचे व्यूह कसेही बदलले तरी नक्की कुठला फिल्डर कुठे उभा आहे हे त्याला प्रत्येक वेळी माहिती असतं.! तुम्ही कुठेही फिल्डिंग लावा हो पण हा पठ्ठ्या बरोब्बर मोकळ्या जागा हेरून फटके मारणारच. शेवटी कितीही म्हणलं तरी तुमच्या गोलंदाज आणि यष्टीरक्षक सोडून नऊच क्षेत्ररक्षक ! आणि हा तर सगळं मैदान त्याचंच असल्यासारखा चेंडू फटकवणार…..तुम्ही कुठे कुठे फिल्डर उभे कराल? तुम्ही लहानपणी  ’कॅरमखेळताना, स्ट्रायकरवर हात नीट बसावा म्हणून, ’चोर-पोलिसखेळलायत? काळ्या आणि पांढऱ्या अशा सगळ्याच सोंगट्यांपैकी कुठल्याही सोंगटीला जराही धक्का लागू न देता, स्ट्रायकरने क्वीनअलगद पुढे नेत, शेवटी क्वीनपॉकेटमधे न्यायची!  सचिन जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांमधून आरामात गॅप्स काढत चौकार मारतो तेव्हा तेव्हा मला हमखास ह्या चोर-पोलिसखेळाची आठवण येते!

आनंदाचं म्हणाल तर त्याला खेळताना बघून जाणवतं की ह्याचं क्रिकेट ह्या खेळावरच जीवापाड प्रेम आहे आणि बॅटिंगचा हा मनमुराद आनंद लुटतोय. अगदी कठीण परिस्थितीत, जिथे धावा करणं अवघड जातंय, अशा ठिकाणीही तो पाय रोवून उभा राहिल पण त्याची देहबोली सांगत असते की कुठल्याही परिस्थितीत बॅटिंग करणं त्याला आवडतंय.  ज्या माणसाला इतक्या वर्षांच्या क्रिकेटनंतरही सरावही गोष्ट सुद्धा त्रासदायक वाटत नाही, त्याला प्रत्यक्ष सामन्यातील फलंदाजी आनंद देणारच ना!

सचिनबद्दल लिहायला खरं तर खूप म्हणजे खूपच आहे पण हा लेख कुठेतरी  थांबवायलाही हवा. एक मात्र जरूर जरूर लिहावंस वाटतं आणि ते म्हणजे त्याला देवमानण्यापेक्षा, तो तुमच्या-आमच्यासारखाच माणूस आहे हे मान्य करूया ! म्हणजे निदान त्याच्यावर आपल्या अवास्तव अपेक्षांचं ओझं लादणं तरी बंद होईल ! अर्थात हेसुद्धा मान्य करूया की तो माणूसच आहे पण........ न भूतो, न भविष्यतीअसा माणूस!  त्यामुळेच तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या शतकांच्या शतकाच्या उंबरठ्यावर तो उभा आहे.  आता तो कसोटी सामन्यात किंवा एक दिवसाच्या सामन्यात फलंदाजीला आला की तुमच्या-माझ्यासारखे असंख्य लोक देव पाण्यात ठेऊन बसतील!

एक धक्का और दो सचिन .... आम्ही जगभरातले क्रिकेट रसिक, तुझ्या शंभराव्या शतकानंतर टाळ्या-शिट्टया वाजवायला, तयारच आहोत.
आणि आता….. आवर्जून बघाव्या अशा सचिनबद्दलच्या काही विडियो क्लिप्स!
'मित्र म्हणजे एक असा माणूस ज्याच्याबद्दल आपल्याला खूप आपुलकी वाटते आणि जो आपल्या आयुष्यात निखळ आनंद आणतो', अशी जर मित्राची व्याख्या केली तर
तेंडल्या ... धन्यवाद मित्रा !
-----------------------------------------
ह्या लेखात संदर्भासाठी वापरलेल्या विडियो क्लिप्स, लेख, फोटो  इ.च्या मूळ कर्त्यांचे मन:पूर्वक आभार. 
लेखाच्या सुरुवातीला वापरलेला सचिनचा फोटो ह्या संकेतस्थळावरून साभार.