Sunday, January 3, 2010

भेळ ! भेळ !! भेळ !!!


’भेळ’ नक्की कधी आवडायला लागली ते आठवत नाही पण इतकं मात्र आठवतंय की लहान म्हणजे कधीतरी खूपच लहानपणापासून भेळ हा सगळ्यात आवडता पदार्थ झालाय !


काही आवडी-निवडी रक्तातच असतात असं म्हणतात. एखाद्या दिवशी रात्री जेवणाऐवजी ’भेळ’ चालेल असं आई म्हणते तेव्हा माझ्यात भेळेची आवड कुठून आलीय त्याची मला खात्री पटत राहते !


नावाप्रमाणेच ’भेळ’ करायलाही सुटसुटीत, पण पहिला घास तोंडात घेतला की तोंड असं खवळतं की बस्स ! वाटतं जणू खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वगैरे वापरून हा पदार्थ केलाय. भेळेतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ’चिंचेची चटणी’. मस्तपैकी चिंच आणि खजूर घालून केलेली ही काळपट तपकिरी रंगाची चटणी जमली की अर्ध काम फत्ते. मग आंबट-तिखट जोडगोळीतला तिखटपणा पूर्ण करायला येतो मिरचीचा ठेचा ! चांगल्या हिरव्यागार मिरच्या, लसूण, जिरे आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करून ते मिश्रण ठेचून / वाटून घ्यायचं. हिरवाईचे रंग, वास आणि चव अजून खुलवायला पुदिन्याची चटणीही करून घ्यायची।


ह्या चटण्या शेजारी शेजारी ठेवल्या की इतक्या सुरेख दिसतात की भांड्यातले पांढरेशुभ्र कुरमुरे असे अगदी आसूसून त्यांची वाट बघायला लागतात. कुरमुऱ्यांच्या जोडीने मग फरसाण, गाठी, टोमॅटो, पापडी, उकडलेला बटाटा, खारे शेंगदाणे असे सगळे एक एक करत भांड्यात जमतात. आणि हो……नुसतं बघताच तोंडाला पाणी सुटावं अशा आंबटगोड चवीची हिरवीकंच कच्ची कैरी आणि बारीक चिरताना डोळ्यांत पाणी आणणारा कच्चा कांदा !

मला तर भेळ तयार होत असताना मधेच हातावर थोडा नुसता कच्चा कांदा आणि कोथिंबीर खायला आवडतं. तोंडापासून पोटापर्यंत सगळीकडे मस्त दवंडी पिटली जाते – थोडं थांबा … भेळ येतेय !!


ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करताना, त्यात अधूनमधून पाहिजे त्या प्रमाणात चिंचेची चटणी आणि मिरचीचा ठेचा टाकताना, भांड्यात मोठा चमचा / डाव वाजवत भेळवाले जो आवाज करतात तो ऐकत रहावा असं वाटतं. जणू काही पोटोबाची पूजा करण्यासाठी घंटा वाजवली जातेय ! मग भेळवाले थोडी भेळ प्लेटमधे घेऊन त्यावर छान पिवळया रंगाची बारीक शेव आणि अगदी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर असा साज चढवतात ! ती प्लेट हातात आल्यावर मग आपले हात आणि तोंड सुरू होतात. एक घास, अजून एक , अजून एकच घास असं करत बघता बघता त्या चटकदार भेळेची पहिली प्लेट रिकामीही होते।


पुण्यात सारसबाग, संभाजीपार्क, गणेश भेळ अशा ठिकाणी कागदात बांधलेली भेळ पुट्ठ्यांच्या चमच्यानी खाण्यात काय आनंद असतो महाराजा ! पुण्यातले हे माझे वर्षानुवर्षांचे अड्डे आहेत. आता काही ठिकाणी चमचे मिळायला लागले आहेत पण पुठ्ठ्याच्या चमच्याची मजा वेगळी असते. त्यातही थोडी भेळ खाल्यावर तो पुठ्ठ्याचा चमचा एका बाजूने इतका ओला होतो की पार मोडकळीला येतो. मग चमचा फिरवून दुसऱ्या बाजूने खायला सुरू करायचं ! कच्चा भिडू असेल तर चमचा बदलून मागतो पण अट्टल भेळ खाणारा असेल तर एकाच चमच्यात काम भागवतो. पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या प्रकाशात भेळ खातखातच मी लहानाचा मोठा झालो. अजूनही ज्या दिवशी सकाळी पुण्यात पोचतो त्या दिवशी संध्याकाळी ’संतोष भेळ’ खाल्याशिवाय घरी आलोय असं वाटतंच नाही !


असं ऐकलंय की गेल्या काही वर्षांत ’कल्याण भेळ’ नावाची एक खवैय्यांच्या आवडीची जागा पुण्यात सुरू झालीय. अजून तरी तिथे जाणं जमलं नाहीये ! निदान पुढच्या ट्रिपमधे तरी ’कल्याणमस्तु’ व्हावं!


पुण्यात असताना अनंत चतुर्दशीला तर हमखास म्हणजे हमखास भेळ खाणं व्हायचं. मी माझ्याच एका लेखात मागे एकदा लिहिल्याप्रमाणे अनंत चतुर्दशीला आमच्या काकाच्या वाड्यातल्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर – “थोड्या वेळाने कोरड्या भेळीचा कार्यक्रम ठरलेला असायचा. गुलालाचे लालभडक हात धुतल्यासारखं करायचं आणि भेळ हवी तेव्हढी झणझणीत करून घ्यायची. रात्री थोडा वेळ परत लकडी पुलावर गणपतीची मिरवणूक पहायला जायचं. आतापर्यंत तिकडे गर्दीचं रूपांतर जत्रेत झालेलं असायचं. “चर्र…’ आवाज करत भजी-बटाटेवडे आपल्या गाडीकडे बोलावू पहायचे।”


लहानपणी एकतर रेस्टॉरंटसमधे जाणं हा प्रकार फारसा नसायचा. पण जर अलका टॉकिजसमोरच्या ’दरबार’मधे गेलो तर तिथली ’दरबार स्पे. भेळ’ कधी म्हणजे कधीच चुकवली नाही. आमचे अप्पा बँक ऑफ इंडियामधे होते. सुदैवाने काही वर्षं ते अलका टॉकिजशेजारच्या ब्रँचमधे होते. त्यामुळे कधी जर संध्याकाळी त्यांना बँकेत भेटायला गेलो तर ’दरबार’मधे भेळ नक्की मिळायची. नंतर गरवारे कॉलेजमधे जायला लागल्यावर तर ’दरबार’मधे जाण्यासाठी वाट वाकडीही करावी लागायची नाही।


कॉलेजमधे असताना एकदा ’सेव्हन लव्ह्ज’च्या चौकाजवळच्या रेस्टॉरंटमधे आम्ही काही मित्र मैत्रिणी गेलो होतो. तिथे पहिल्यांदा (आणि शेवटचं !) मी ओल्या भेळेत डाळिंबाचे दाणे टाकलेले पाहिले ! त्या रेस्टॉरंटच्या मालकाला जाऊन सांगावंसं वाटलं, “बाबा रे ! काही पदार्थ असे सजवावे लागत नाहीत. त्यांची मूळ चव वाssईट्ट असते.” (तुम्ही पुणेकर नसाल तर ’वाssईट्ट’चा अर्थ पुणेकराला विचारा !)


तुम्ही कधी सकाळी भेळ खाल्लीयेत? हो बरोबर… मी सकाळीच म्हणतोय !! मी खाल्लीय ! एका रात्री मित्राकडे ’अभ्यास’ या नावाखाली चालणाऱ्या टवाळक्या करून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घरी परत येत होतो. ’कमला नेहरू पार्क’च्या बाहेर एक भेळवाला संध्याकाळची तयारी सुरू करायला घेत होता. अजून त्याचं पिशवीतून कांदे वगैरे काढणं चालू होतं तर मी गाडी थांबवून भेळ खायला हजर ! हैराण झाला ना तो बिचारा ! पण त्याने अगदी आनंदाने माझ्यापुरती एक प्लेट भेळ तयार करून दिली ! (अर्थात सकाळी नऊ वाजता भेळ मागणाऱ्या गिऱ्हाईकापेक्षाही विक्षिप्त नमुने त्याने पुण्यात पाहिले असल्याची दाट शक्यता आहेच म्हणा !!)


ही झाली पुण्यातल्या भेळेची तऱ्हा. मुंबईत भेळेचा नखरा थोडा वेगळा असतो. पहिला फरक म्हणजे तिथे भेळवाला ’भैय्या’ असतो ! तिथे म्हणजे लसणाची ओली चटणी असते. कुरमुरे, शेव, ही ओली चटणी अशा ४/५ मोजक्या गोष्टी एकत्र केल्यावर ही भेळ तयार होते. तिथे भेळ प्लेटमधे एकटी येत नाही तर बरोबर २/३ चपट्या पुऱ्यांनाही आणते ! त्या पुऱ्यांचा चमचा म्हणून वापर करायचा आणि मग पुऱ्याही खायच्या ! आजच्या भाषेत सांगायचं तर एकदम ’इको फ्रेंडली’ !


पुण्यात जसं बागेत गवतावर बसून भेळ खाल्ली तर भेळेची चव आपोआप वाढते ना तसंच मुंबईत भेळ खाताना आपल्या समोर नजरेत मावणार नाही असा अथांग समुद्र हवा ! दिवसभर आकाशात खेळल्यावर दमून केशरी-लाल झालेला सूर्य विश्रांतीसाठी क्षितिजापार टेकतोय, संध्याकाळचा असा मंद मंद वारा वाहतोय, तो वारा मोगऱ्याचा धुंदावणारा गंध आणतोय आणि आपल्या हातात हात गुंफवून…..(हॅ !… जाऊ दे ना यार ! आपण आपली भेळ खावी !!)


भेळ म्हटलं की मी स्वत:ला resist करूच शकत नाही ! अगदी टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधे, ते ही अमेरिकेतल्या, मी भेळ खायचं धाडस केलंय ! (मी फक्त असे उद्योग करतो पण ’मग भेळ कशी होती?’ वगैरे खवचट प्रश्नांची उत्तरं देत नाही !) एक मात्र आहे हं… आयुष्यातली सगळ्यात जास्त तिखट भेळ मी अमेरिकेत खाल्लीय.

न्यू जर्सीला पहिल्यांदाच येऊन जेमतेम आठवडा झाला होता. तेव्हा इथे ’कोहिनूर’ नावाचं एक देसी रेस्टॉरंट होतं. भेळ मागवताना वेटरनं विचारलं “How spicy do you want it?” मी विचार केला, “च्यायला ! आपण आत्ता तर भारतातून आलोय ! असून असून भेळ किती spicy असेल !” भेळ खायला सुरूवात केली आणि अग्गग्गग्गग ! तरी मारे हट्टाने भेळ संपवली आणि मग माझं दिवसभर ’रनिंग बिटवीन दि विकेटस’ चालू होतं !


मध्यंतरी एकदा बायको काही दिवस भारतात गेल्याने forced bachelor होतो. घरापासून थोड्या अंतरावर ’पंजाबी रसोई’ नावाचा एका अगदी छोट्या रेस्टॉरंटमधे एकदा जेवायला गेलो होतो. दारूड्याला जसं दारू दिसली राहवत नाही तसं मला मेन्यू कार्डवर ’Bhel’ हा शब्द दिसला की राहवत नाही ! ’ज्यादा से ज्यादा क्या होएगा … इधर फिर कभी भेल नहीं खानेका ये समझेगा’ असा विचार मी (मराठमोळ्या) हिंदीत केला. भेळेचा पहिला घास घेतला आणि एकदम मटकाच लागला ना ! अमेरिकेतल्या रेस्टॉरंटसमधे खाल्लेली (त्यातल्यात्यात) चांगली भेळ (निदान त्या दिवशी तरी) होती ! त्या दिवशी माझ्या दैनिक राशीभविष्यात बहुतेक ’अचानक धनलाभ’ लिहिलं होतं !!


’भेळ’ म्हटलं की खाताना तोंड आणि लिहिताना हात आवरणं जरा अवघडच जातं. भेळेच्या बाबतीत मी इतका अट्टल आहे की शाळेत एकदा ’कार्यानुभव’ ह्या विषयाच्या परीक्षेत “कुठल्याही एका पदार्थासाठी आवश्यक ते साहित्य, कृती लिहा” अशा प्रश्नात भेळेची माहिती लिहून पास झालो होतो !

10 comments:

पंकज इनामदार said...

च्यायला! आता कोणाला हा शब्द आवडला नसेल तर sorry - माझं पुणेरीपण सिद्ध करायलाच फक्त तो आवश्यक आहे असा नाही, पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सकाळी सकाळी हे भेळ-पुराण वाचल्यावर दुसरा कोणता शब्द तोंडात येणार? हं, आता तुम्ही मनावर (आणि मुख्य म्हणजे जीभेवर) ताबा ठेवू शकणारे संत वगैरे असाल तर गोष्ट वेगळी आहे. आता दिवसभर पाणी सुटलेल्या तोंडाने काम कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे.

त्यात परत एक गोची आहे. कोणी काही म्हणो, मला मुंबईची भेळ ही भेळ वाटतच नाही. (कदाचित पुलंनी उल्लेख केलेले मुंबई चौपाटीवरचे भेळवाले - आणि संदीप म्हणतो ते सुद्धा, मनसेच्या मराठी माणसाच्या आंदोलनामुळे परत गावी गेले कि काय कोणास ठावूक). भेळ ही पुण्याचीच.

तात्पर्य काय की, एक पूर्ण आठवडा थांबणं आलं.

अनिकेत वैद्य said...

मस्त लिहील आहे.
वाचताना भेळ खायची ईच्छा तीव्र होत गेली आहे.
आज संध्याकाळी नक्की भेळ खाणार.

Anonymous said...

पोटभर जेऊन बसलो होतो... ब्लॉग्ज वाचायला...
आता परत भूक लागली!

Anonymous said...

Sandeep,

Hi post parat ekada post keli aahe ka? Aadhi wachli aahe.

Nilesh Bhise said...

Made me hungry. Have not been to India since 2005. But I have been making a list of items I want to eat. List is growing and includes Sitafal, Unique flavored ice-creams chikko, tender coconut etc. Faloodas from famous places and vada-pav etc.. All "junk" food. Told my in-laws and parents. Don't bother inviting for dinner/liunch. Order or take me to these specials.

संदीप चित्रे said...

@ पंकज: मनापासून दाद आली की ’च्यायला’ आपसूक येतंच रे; त्याला पर्याय नाही! हा आठवडा पटकन संपून तुला पुण्याला भेळ खायला मिळो ह्या शुभेच्छा !
@ अनिकेत, आल्हाद: प्रतिसादांसाठी धन्स !
@ प्रसन्न: माझा हा लेख मायबोली.कॉमच्या दिवाळी २००९ अंकात प्रथम प्रकाशित झाला होता. ब्लॉगवर कालच टाकलाय.
@ निलेश: लवकर भारतवारी कर आणि पोचलास की लगेच खायला वडा-पाव आणि प्यायला टपरीवरचा चहा मिळावा ह्या शुभेच्छा !

Anonymous said...

अरे खादाड्या, तु तर छुपा खादाड निघालास की? म्हणजे माझा उघड उघड भाउच निघालास की गड्या!
आज घरीच आहे, लगेच भेळ करुन खाते बघ तुझ्या जीभेवर टिच्चून :-D

Anonymous said...

अरे खादाड्या, तु तर छुपा खादाड निघालास की? म्हणजे माझा उघड उघड भाउच निघालास की गड्या!
आज घरीच आहे, लगेच भेळ करुन खाते बघ तुझ्या जीभेवर टिच्चून :-D

janhavi said...

MAST JAMALIY BHEL.
PAN EK AHE,BHEL KUTHALIHI ASO,BHEL TI BHELACH.
EK MAJEDAR KISSA AHE MAZYA NAVRYACHA. ATTAL BHEL KHAU AHE GADI.TUMHCI BHEL KHALLYA NANTAR TO KISSA AIKVAYCHI ICHHA DABUN THEVAN ASHAKYA AHE...
TAR, TO SHALET ASTANACHA KISSA AHE.
MADHLYA SUTTI MADHE SHALECHYA GATE BAHER BHELWALA UBHA ASAYACHA.TEVA KAHI POCKET MONEY VAGAIRE PRAKAR AJUN RUDH NAVATE ZALE.TYAMUL BHEL SATHI PAISE MAGAYCHA SAWALACH NASAYCHA.PAN YALA AGADI RAHAYACH NAI.
BHEL GHENYASATHI SAGLYANCHE HAT VAR ASAYACHE, TYAMADHE YACHAHI.PAISE NA DETACH BHEL CHAPAYCHA HA GADI.TYA BHEL WALYALAHI HI BICHARYALA KALAYCH NAI...
MHANUNACH BAHUDHA AATA COUPON SYSTEM SURU ZALIY SAGLIKAD...
PAN JOB LAGLYAVAR MATRA PAHILI PARTY SAGLYANNA TITHACH MILALI HOTI...
TYA DIVSHI KABULI PAN DILI, APLYA CHORICHI..., TYA BHELWALYALA.
PAN EK AHE...
KOLHAPUR MADHE TYAN ITAR KUTH BHEL KHALLELI ATHAVAT NAI...
FAKT TITHACH BHEL KHATO.
COMMITTED AHE...

ruchi said...

nashib hi post ne off sutana vachali tymule aata gelya gelya aadhi bhel khanar karan tumchi ki post vachun jibver kahi taba nahi maja.. aani amhi mumbikar tymule puny tali bhel khachya kadi yog yetoy hey bagave lagle..