Sunday, May 2, 2010

चित्रकलेचा दोर

चित्रकलेचा दोर मी कधीच कापून टाकला आहे’ – कै. पु..देशपांडे.

मिळवलेले ज्ञान कधी वाया जात नाही’ – एक सुविचार !

ही दोन वाक्यं एकत्र लिहिण्याचं कारण म्हणजे आमचे चिरंजीव ! वय वर्षं जेमतेम पाच, त्यामुळे बालहट्टापुढे कधी कधी शरणागती पत्करावी लागते.

(“ ! कोण आहे रे तिकडे? स्त्रीहट्टापुढेही शरणागती पत्करावी लागते असं हळूच कोण म्हणतोय?”)

तर, झालं असं की आदित्यने अगदी लाडात येऊन, चेहऱ्यावर लहान मुलांचे टिपीकल निरागस टाइप्स वगैरे भाव आणत विचारलं, “बाबा, मला तू शिवाजीचं हे चित्रं काढून देशील का?” आता मला काय माहिती की त्याने आधी त्याच्या आईलाही हाच प्रश्न विचारलाय आणि तिने,”बाबाला सांगम्हणून परस्पर मला लटकवलंय ते ! आदित्यने जे चित्रं दाखवलं होतं ते एका सीडीच्या कव्हरचं होतं आणि शिवाजी महाराजांचा चेहरा निदान काढणेबल वाटत होता.

आता खरंतर मी चित्रकलेची एलिमेंटरी परीक्षा अडखळलेला माणूस ! पण त्याचं मन मोडायला नको म्हणूनहोम्हणालो. आदित्यला माहिती नव्हतं की त्याने नक्की कोणालाचित्र काढतोस का?” म्हणून विचारलं आहे आणि मला माहिती नव्हतं की आपण नक्की कशात पाय टाकतोय !

तरी थोडावेळ जरा टाळाटाळ करून पाहिली पण अशावेळी लहान मुलांची चिकाटी दसपटीने वाढते ! शेवटी एकदाचं आम्हाला शाळेत चित्रकला शिकवणाऱ्या खाडिलकरबाईंचं नाव घेतलं आणि कागदावर पेन्सिल टेकवली. व्होह ! शाळा सुटल्यानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा चित्र काढायला घेतलं होतं.

मगाशी म्हणाल्याप्रमाणे मी आधीच चित्रकलेचा औरंगजेब आणि त्यात चेहरे-बिहरे काढण्यात शाहिस्तेखान ! त्यातल्यात्यात तेस्टिल लाईफनावाचं प्रकरण, म्हणजे भांडी-कुंडी, घमेली, त्यात ठेवलेली फळं, असं काहीतरी काढायला जमायचंअगदी त्यावर पडणाऱ्या प्रकाशानी येणारी थोडी चकाकी दाखवणं आणिभांडी खोलगट आहेतहे दाखवणंही जमायचं पण ते मेमरी ड्रॉईंग आलं की आधी डोकं आणि मग हात चालणं बंद व्हायचं। एकवेळ कसातरी माणूस काढता यायचा पण त्याचे हात आणि पाय ? ते कसे काढायचे? पाय तर कायम चार्ली चॅप्लिनच्या पोझमधे असायचे ! हे कमी होतं म्हणून की काय पण त्या चित्रकलेच्या परीक्षेतगावातली जत्राकिंवाशहरातली बाग आणि खेळणारी मुलंवगैरे असले वस्त्रहरण करणारे विषय यायचे ! इथे च्यायला एक माणूस काढताना फेफे उडतेय आणि तुम्ही जत्रा कसली काढायला सांगताय !

हं तर, आदित्यचा शिवाजी ! त्याच्याबद्दल सांगत होतो नाही का?

त्या सीडीवरच्या चित्राकडे बघत शिवाजी काढायला सुरूवात केली. बरेचदा आपलं काय होतं की कुठल्याही गोष्टीची सुरूवात सापडत नाही. एकदा वाटायचं महारांजांच्या मंदिलापासून चित्र काढायला सुरू करावं, मग वाटायचंत्यापेक्षा दाढीपासून सुरूवात करू’ ! मग शेवटी हो-ना करत करता, महाराजांच्या दाढीसारखंच त्यांचं दुसरं एक लक्षणीय फीचर आठवलं ते म्हणजे त्यांचं नाक. तर मग नाकापासून सुरूवात केली. त्यातल्या त्यात एक बरं होतं की शिवाजी महाराजांचा चेहरा साईड प्रोफाईल असल्याने नाक पूर्ण काढायचं नव्हतं, मराठीतलाहा आकडा उलटा काढून चालणार होतं!

मग एकदा नाक हा रेफरन्स पॉइंट मिळाल्यावर त्या अंदाजाने बाकीचा चेहरा कागदावर उमटायला लागला. सीडीवरचं चित्रं बघत बघत काढायचं होतं त्यामुळेआठवणीतले शिवाजी महाराजकाढायचा त्रास नव्हता ! असं करत करत एकदाचा महाराजांचा चेहरा पूर्ण झाला, अगदी डोक्यावरचा मंदिल आणि त्याच्या झिरमिळ्यांसहीत ! हुश्श !! एकंदर चित्रं कसं जमलं होतं त्यापेक्षा आदित्यला झालेला आनंदच बघण्यासारखा होता ! तो लगेच ते चित्रं हातात घेऊन, आनंदाने अगदीय्ये ! मम्मा चित्रं बघ हेवगैरे करत दीपाकडे गेला. ही लहान मुलं किती छोट्या छोट्या गोष्टींनी खूष होतात ना !

पणमला माहिती नव्हतं की आपण नक्की कशात पाय टाकतोयअसं मगाशी म्हणालो ते उगीच नाही !

चिरंजीव दुसऱ्या दिवशी अजून एका सीडीचं कव्हर घेऊन आले.
आताअफझल खान वधहे चित्र काढून हवं होतं !!

मग काय ! पुन्हा एकदा कागद, पेन्सिल, खोडरबर (अमेरिकन भाषेप्रमाणेइरेजरम्हणायचं....’रबरम्हणायची सोय नाही !) सगळं गोळा केलं. पुन्हा एकदा खाडिलकरबाईंचा धावा केला आणि अफझलखानाचा वध करायला घेतला ! तुम्ही आजकाल कुठलीही नोकरीसाठीची जाहिरात बघा, ’अटेन्शन टू डिटेल्सही ओळ नक्की सापडेल. आमच्या चित्राच्या बाबतीत आदित्यचीअटेन्शन टू डिटेल्सही नजर एकदम तेज असते. ’अरे बाबा ! तू शिवाजीच्या गळ्यातली माळ मोठी काढलीसकिंवाखांद्यावरचं डिझाईन नाही काढलंसवगैरे अशा सगळ्या भानगडींसकट त्याला चित्रं काढून हवं असतं !

पहिल्या चित्रात शिवाजी महाराजांचं नाक हा रेफरन्स पॉईंट मिळाल्यापासून आमचं प्रत्येक चित्रं नाकापासूनच सुरू होतं ! अफझल खान वधाचं चित्रं काढून होतं ना होतंय तर आदित्य म्हणाला तेबाजूला जे लिहिलंय ते तूही लिही हां” ! मग तिथेच बाजूला एक षटकोन काढून त्यातपराक्रामी सुर्याचा जन्महे शब्दही लिहून देणं आलं !

त्या दिवसापासून आजकाल जवळपास रोजच खाडिलकरबाईंचा धावा करतोय ! कारण जवळपास रोज एक शिवाजी काढावा लागतोय ! आधी नुसता शिवाजीचा चेहरा, दुसऱ्या दिवशी अफझल खान वध, तिसऱ्या दिवशी सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज, चौथ्या दिवशी पुण्यातला कोथरूडचा शिवाजी पुतळाम्हणजे अश्वारूढ महाराज, हातातल्या तलवारीसकट ! त्यामुळे आता सीडीच्या कव्हरवरून सीमोल्लंघन करून आम्ही गुगल इमेजेसपर्यंत पोचलो आहोत. आपलं लॅपटॉपवर त्याला गुगल इमेजेसमधले शिवाजी दाखवायचे आणि मग जणू बाळराजे फर्मान सोडतात, “आज ये चित्र बनाओ !” चित्रांचा अवघडपणा वाढतच चाललाय ! कालच संध्याकाळी तानाजी मालुसरे आणि उदेभान राठोड हे दोघं एकमेकांशी लढतानाचं चित्र काढलंय ! (आदित्य उदेभानचा उच्चारउभेभानअसा करतोय !) चित्रांच्या अवघडपणाचा आलेख वरच्या दिशेने जातच राहिला तर एक ना एक दिवस पावनखिंड किंवा पुरंदरची लढाई नक्की काढायला लागणार आहे ! मग आहेच मजाचार्ली चॅप्लिनचे पाय लावून सगळे मावळे आणि मुघल लढाई करत असतील !

तर साहिबान, कदरदान ! पेश--खिदमत आहेत्या दिवशी पहिल्यांदा काढलेला शिवाजी महाराजांचा चेहरा आणि मग केलेला अफझल खानाचा वध ! खरंतर मी(ही) चित्रकलेचा दोर कधीच कापला होता पण सध्यातरी बालहट्टापुढे त्या दोराला गाठी मारून घेतल्या आहेत !10 comments:

Anonymous said...

ha, ha, Sahi lihila aahes. Baki thet Shivarajyabhishekacha chitra kaaDhaNyachi paaLi lavkarach yenar asa disatay :)

- Nandan

PG said...

वा ! शिवाजी महाराज अगदी शिवाजी महाराजच वाटत आहेत आणि शाहिस्तेखान पण एकदम व्यवस्थित आहे.... काढत रहा चित्र ...आडनाव चित्रे आणि चित्र काढता येत नाही असेल होईल कसे? नाही का?

संदीप चित्रे said...

@नंदन: धन्स मित्रा, शिवराज्याभिषेकाचे चित्र काढावं लागेलच बहुधा !
@प्रशांत: अर्र.. मला वाटत होतं अफझलखान काढलाय... तो शाहिस्तेखान दिसतोय हे माझ्या चित्रकलेचं यश (!) समजावं का? ;)

सुरेश पेठे said...

संदीपजी,
चित्रे ह्या आडनावाशी चांगलेच ईमान राखलंयत की. काही नाही चित्रे उत्तम आहेत. आता बालहट्टामुळे तरी हा छंद जोपासत रहा.

Anonymous said...

Dorala gaath nahi Navinach Daur (NayaDaur) chalu zala aahe ase watate. Likhan sudha chan zale aahe.

पूनम छत्रे said...

hehehe, mast khuskhishit lihila ahes :) direct portraits ch ka? aikat nahi!! :D

जयदीप said...

वा वा चित्रे.. तुमच्या पूर्वी खाडिलकरबाईंच्या तासाला मारलेल्या गाठी पक्क्या आहेत की. छानच जमली आहेत चित्रे ! BTW, तुझ्या लेखाची मुद्रितप्रत काढून सौ. खाडिलकरबाईंकडे रवाना होईल आज सायंकाळी.

Unknown said...

Hey Mast ahe ...Mag mulane chitra kadhyala lavale tar, Pan chan kadhale ahe .....Keep it Up :)

Unknown said...

chitre chhan cha aahet aani tyachi mahiti pan lekhat mast lihiliy.
http://savadhan.wordpress.com
NY-USA
31-7-10

**** said...

लेकाला एवढा quality time देताय, हेच एक केवढं अवघड युद्ध खेळताय. उत्तरोत्तर अधिकाधिक जटिल होत जाणार्‍या युद्धांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !