Saturday, July 25, 2009

बी एम एम अधिवेशन २००९

बी एम् एम् अधिवेशन सुरू झाले त्याच्या आधी हा लेख लिहिला होता पण पोस्ट करणे जमले नव्हते.
--------------------------------------------------------------------------------------

२ जुलै २००९ उजाडायला असे कितीसे दिवस राहिले आता? बघता बघता “बी एम एम”चं अधिवेशन जवळ आलंच की ! खरंच वाटत नाहीये, म्हणजे अजूनही खरंच वाटत नाहीये. दोन तारखेला बिझनेस कॉन्फरन्स आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. तीन तारखेपासून अधिवेशन सुरू !

आत्ता तर अधिवेशनाच्या पहिल्या मीटिंगसाठी तासभर गाडी दामटवत एका मंदिरात गेलो होतो.
त्याला जवळपास एक वर्ष झालं?

आत्ता तर कुठे भारतातून आणायचे कार्यक्रम निवडण्यासाठी ’इंडिया प्रोग्रॅमिंग कमिटी’मधे आलो.
त्याला जवळपास एक वर्ष झालं?

आत्ता तर कुठे भारतातल्या कार्यक्रमांबद्दल शोधाशोध आणि चर्चा सुरू केली.
त्याला जवळपास एक वर्ष झालं?

Time flies by म्हणतात त्याप्रमाणे अक्षरश: एक वर्ष कधी संपलं कळलंच नाही. २००५ साली माझ्या आयुष्या्तल्या पहिल्या “बी एम एम” अधिवेशनाला हजेरी लावली त्यालाही आता चार वर्ष झाली? ते अधिवेशन ऍटलांटाला झालं आणि आता हे अधिवेशन फिलाडेल्फियाला.. म्हणजे अगदी आपल्या शेजारीच.

तसं पाहिलं तर बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बी एम एम) अधिवेशन दर दोन वर्षांतून एक ह्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे होतंय. बरं, अधिवेशन उभं करणारे सगळेच स्वयंसेवक. स्वत:चे नोकरी, उद्योग सांभाळून, घर-संसार सांभाळून, वेळप्रसंगी संसार तात्पुरते विसरून झोकून दिलेले ! आता जसजशी अधिवेशनाची तारीख जवळ येतीय तसतशी उत्सुकता वाढायला लागलीच आहे शिवाय एक दडपणही जाणवतंय. अधिवेशनाचा डोलारा पण मोठाच आहे ना.

जवळपास ४,५०० लोक एका छताखाली अडीच-तीन दिवस असणार आहेत ! अडीच – तीन दिवसांत एकूण जवळपास ६० च्या आसपास कार्यक्रम आहेत ! नाटक, नृत्य, संगीत, अध्यात्मिक कार्यक्रम, एकांकिका , मराठी सिनेमा, उभ्या उभ्या विनोद, संगीत नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. रसिकांसाठी ’घेता किती घेऊ दो नयनांनी’ अशी आनंदी अवस्था असेल !

भारतातून ऐंशीपेक्षा अधिक संख्येने कलाकार आणि विशेष अतिथींना सन्मानाने आमंत्रित केलं गेलंय! पेशवाई, कोल्हापुरी, नागपुरी आणि मालवणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अस्सल मराठी पदार्थांची दोन दिवसांची मेजवानी यशस्वी व्हावी म्हणून कित्येक लोक कष्ट घेतायत. भारतातील कलाकारांचे visa processing वगैरे ती धावपळ वेगळीच. अधिवेशनाला येणाऱ्या सगळ्यांची नाव नोंदणी नीट पार पडावी म्हणून रजिस्ट्रेशन कमिटी झपाटलीय. ’सगळी सोंगं घेता येतात पण पैशांचं सोंग घेता येत नाही’ ह्या म्हणीची जाणीव ठेवून आर्थिक व्यवहार बघणारे स्वयंसेवक कष्ट करतायत. ’हम भी कुछ कम नहीं’ म्हणत अमेरिकेतील कानाकोपऱ्यातून स्थानिक कलाकार वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येतील. बच्चे कंपनी कंटाळू नये म्हणून त्यांच्यासाठी असंख्य मजेदार प्रकार आणि कार्यक्रम हजर असतील. येणाऱ्या सगळ्यांच्या राहण्याची सोय उत्तमप्रकार व्हावी म्हणून मॅरियॉट, हिल्टन, डबल ट्री अशी दर्जेदार हॉटेल्स सज्ज असतील.

वीकांतला स्वयंसेवकांच्या दिवस दिवसभर मीटींग्ज चालल्यात आणि काहीजण तर रात्रभर मीटिंग्जमधे तळ ठोकून आहेत. सोमवार ते रविवार कुठल्याही दिवशी रात्री अपरात्री गरज पडल्यास स्वयंसेवक एकमेकांना फोन करतायत आणि विशेष म्हणजे ज्याला फोन येतोय तो ही “कटकटच आहे च्यायला” असं म्हणत नाहीये ! घरात एक लग्न असलं तरी केव्हढी धावपळ असते; इथे तर चक्क अधिवेशन आहे !

तर, ह्या अधिवेशनाबद्दल संपूर्ण माहिती www.bmm2009philadelphia.org ह्या संकेतस्थळावर आहेच. अधिवेशनाला येण्यासाठी सस्नेह आमंत्रण आहे. तुम्ही येणार असाल तर आनंदाने स्वागत आहे; जरूर कळवा म्हणजे भेटता येईल. ’जावं की नाही’ हा विचार अजूनही करत असाल तर आता विचार सोडा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची कृती करा !! भेटूया तर मग – २/३ जुलै, २००९!

No comments: