Friday, February 6, 2009

अजितकाका

“बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचा अजित सोमण लाडका बासरीवादक होता”

esakal.com वाचताना, वर दिलेल्या ओळीतला ‘होता’ हा भूतकाळ दर्शवणारा उल्लेख खटकला. मनात शंकेची पाल चुकचुकली…. पण म्हटलं, “हॅ ! तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून !”

दुर्दैवाने काही शंका खऱ्या ठरतात ! ‘निरपेक्ष वृत्तीचा अजित’ या सुधीर गाडगीळांच्या लेखातून समजलं – अजितकाका न परतीच्या प्रवासाला गेले ! इथे सुरूवातीला दिलेले वाक्य त्याच लेखातले.

अजितकाकांशी पहिली भेट झाली तेव्हा मी post graduation करत होतो आणि छंद म्हणून ‘बासरी’ शिकत होतो. कटारिया हायस्कूलमधले काळे सर हे अजितकाकांचे मित्र. त्यांनी मला अजितकाकांना भेटायला सांगितलं. एका सकाळी अजितकाकांची अपाँईंटमेंट घेऊन त्यांच्या घरी पोचलो.

तोपर्यंत अजित सोमण हे नाव पेपरमधे वगैरे वाचून परिचयाचं होतं. प्रसिद्ध माणसाला भेटायला जाताना छातीत जी धडधड होते ती वाढली होती. टिळक रोडवर एका दुमजली बंगल्यात वरच्या बाजूला अजितकाकांचं घर ! मनाचा हिय्या करून दार वाजवलं. दरवाजा उघडल्यावर पहिलेछूट काय जाणवलं तर अजितकाकांचं प्रसन्न हसणं. डोक्यावर मागच्या बाजूने वळवून नीट भांग पाडलेले केस, समोरच्या बाजूल थोडे विरळ झाले होते. दोन्ही डोळ्यांखाली काळी वर्तुळं – सततची जाग्रणं आणि कार्यक्रमांची धावपळ दर्शवत होती. ओठांवर मिशीची अगदी कोरीव अशी बारीक रेघ. अत्यंत शांत आवाजालं बोलणं. बस्स …अजितकाका एकदम आवडले… आता प्रश्न होता ते मला शिकवतील का?

चहा घेताना त्यांनी काही जुजबी प्रश्न विचारले. मग म्हणाले, “थोडं वाजवून दाखवणार का?” अग्गगग ! त्या दिवशी मी जे काही वाजवून (!) दाखवलं होते ते आता आठवलं तरी अंगावर काटा येतो! पण मी मूर्तिमंत सज्जनपणासमोर बसलो होतो. ते न चिडता म्हणाले, “पुढच्या आठवड्यापासून सुरूवात करू.”

अजितकाका म्हणजे अक्षरश: सज्जन माणूस… खरंच दुसरा शब्दच नाही. मला म्हणाले होते की कार्यक्रमांमुळे, रेकॉर्डिंगमुळे वगैरे माझ्या वेळा नक्की नसतात त्यामुळे तुला शिकवण्याचा एक दिवस किंवा एक वेळ असं सांभाळता येणार नाही. कधी एकाच आठवड्यात आपण दोन/तीनदा बसू किंवा कधी पूर्ण महिन्यात एकदाही नाही ! मला ‘सर’, ‘गुरूजी’ वगैरे काही म्हणू नकोस … म्हटलं मग अजितकाका म्हणू का? तर म्हणाले होते, “चालेल.” (नंतर कधीतरी समजलं होतं की अजितकाका इंग्लिशचे प्राध्यापक होते. तरी स्वत:हून म्हणत होते ‘सर’ म्हणू नकोस !) सर्वांत महत्वाचं म्हणजे ते म्हणाले होते मी शिकवण्याची फी / पैसे वगैरे काही घेणार नाही. बासरीवादनाबद्दल माझ्याकडे जेवढं आहे तेवढं द्यायचा प्रयत्न करीन; तुला आवडेल ते घे.
(खरंतर त्यांनी म्हणायला हवं होतं – तुला ‘झेपेल’ ते घे !!)
त्यानंतरची ३-४ वर्षे, जेव्हा कधी ते शिकवायचे, ती सकाळ म्हणजे आनंद सकाळ असायची.

मी साडे-आठ / नऊच्या सुमारास त्यांच्या घरी जायचो. कोवळी उन्हं दरवाजातून खोलीत डोकवायची आणि ऊब पांघरायची. समोरासमोर दोन खुर्च्यांवर बसून आम्ही वाजवायचो. पहिल्या दिवशीच काकांनी एक लांबट आकाराची लाकडी पेटी काढली. छान शिसवी लाकडाची. पेटी उघडली तर आतमधे मखमली मऊसूत कापडावर जपून ठेवलेल्या बासऱ्या. निरनिराळ्या आकारांच्या, निरनिराळ्या सुरांच्या बासऱ्या ! हातभर लांब बांबूपासून ते अगदी वीतभर लांब – अशा वेगवेगळ्या आकारांच्या बासऱ्या.

माझ्या बासरीच्या स्केलप्रमाणे योग्य बासरी त्यांनी पेटीतून घेतली आणि म्हणाले, “मी वाजवतो तसं... माझ्यापाठोपाठ वाजव.” (आँ ! म्हणजे काय ? नोटेशन सांगणार नाहीत? आता आली ना पंचाईत ! ठीक आहे यार... काहीतरी डोकं वापरूच.) अजितकाका हाडाचे शिक्षक होते. त्यादिवशी वाजवणं थांबल्यावर मला मिस्कीलपणे म्हणाले, “सुरूवात चांगली झालीय. पुढच्या वेळेपासून शक्यतो माझी बोटं बघून वाजवू नकोस; सूर ऐकून वाजव !”


त्यानंतर मग मी अधून मधून त्यांना फोन करून विचारायचो – आज येऊ का? काकू फोनवर सांगायच्या, “ते पहाटे अडीच / तीनला आलेत रेकॉर्डिंगहून… झोपले आहेत; उठवू का?” अजितकाकांना उठवायला जीवावर यायचं; मी नको म्हणायचो. एखाद्या दिवशी काकू म्हणायच्या, “त्यांनी सांगितलंय उद्या ये म्हणून” – की मी बासरी पाठुंगळीचा लटकवून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे हजर ! उबदार सकाळी, वाफाळता चहा घेऊन आमचं वाजवणं सुरू व्हायचं. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधूनही इतकं शिकायला मिळायचं – बासरीबद्दलच असं नाही; एकंदरच आनंदात जगण्याबद्दल !

अजितकाका म्हटलं की तीव्रतेने आप्पांची आठवण होते. ‘सज्जनपणा’, ’समोरच्या माणसाच्या आवडीच्या विषयांवर गप्पा करत त्याला आपलंसं करणं’, ‘सगळ्यांना आनंद वाटण्याची वृत्ती’ अशा अनेक गोष्टी शिकण्यासाठी ही आदर्श माणसं! सुदैवाने एक माझे वडील होते आणि दुसरे माझे गुरू ! दुर्दैवाने दोघंही, त्यांच्या, वयाच्या ६२ वर्षांच्या आसपास गेले.
‘त्याला’ नक्की कसली घाई असते म्हणून ‘तो’ अशा माणसांना लवकर बोलावून घेतो? !!!

स्वत:च्या मनाने वाजवायचा प्रयत्न केल्याचा एक खूप मोठा फायदा असा झाला की स्वत:च्या आनंदापुरतं वाजवता येऊ लागलं. कधी एकटं असताना मूड लागला की बासरी घेऊन बसायचो. वाजवणारा मी आणि ऐकणाराही मीच ! दुसरं म्हणजे काका ’तोडी’, ’देस’, ’जैत’, ’हंसध्वनी’, ’भैरवी’ अशा वेगवेगळ्या रागांमधलं काही ना काही वाजवायला प्रोत्साहन द्यायचे. मी म्हणायचो, “काका ! भैरवी? अहो इतके सगळे कोमल सूर वाजवता येतील का मला?” ते म्हणायचे, “प्रयत्न तर करू… आज नाही जमलं तर उद्या जमेल !”

त्यांची सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे – घाई करू नकोस ! एक एक स्वर खूप वेळ वाजवता आला पाहिजे मग द्रुत गतीत वाजवणं जमेल. थोडक्यात -- धावण्याआधी चालायला शीक आणि चालण्याआधी उभं रहायला !

अजितकाकांना शक्य होतं आणि तरीही त्यांनी शिकवणं टाळलंय असं कधी म्हणजे कधीच झालं नाही. खरंतर कार्यक्रम, रेकॉर्डिंग, जाहिरातींच्या जिंगल्स / कॉपी लिहिणं, शास्त्रीय संगीताच्या सीडींमधल्या वेष्टणाच्या कागदावर रागांची माहिती लिहून देणं, असे बरेच व्याप त्यांच्यामागे होते. थोडा रिकामा वेळ ते इतर कशासाठी तरी, त्यांच्या घरच्यांसाठी वगैरे वापरू शकले असते पण जमेल तसं, जमेल तेव्हा मला शिकवायचे. म्हटलं ना – सज्जन माणूस, दुसरा शब्द नाही !

एकदा आम्ही वाजवत असताना माझ्या एका बासरीला matching स्वराची बासरी त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी एक बासरी घेतली. माझ्या बासरीचा ‘षडज’ त्यांच्या बासरीच्या ’पंचम’शी जुळला ! तो ’पंचम’ त्यांनी त्यांचा ‘षडज’ मानला ! माझ्या बासरीच्या सगळ्या सुरांशी, त्या ‘मानलेल्या’ षडजापासून पुढे, जुळवून घेत आमचं वादन सुरू. मला म्हणाले, “तू बिनधास्त नेहमीसारखा वाजव, काळजी करू नकोस !”

एकदा सकाळी आम्ही वाजवत असताना मिलिंद दाते तिथे आला होता. मिलिंद साक्षात हरिजींचा शिष्य ! मिलिंद आणि अजितकाका एकत्र वाजवायला लागले. त्या दिवशी मी जे बासरीवादन ऐकलंय ना ते इथे शब्दांत सांगताच येणार नाही. अजितकाका आणि मिलिंद तल्लीन होऊन एक से एक सुरावटी वाजवत होते आणि त्या खजिन्याचा एकमेव मालक -- मी !

अजितकाका स्वत:बद्दल कधीच बोलायचे नाहीत; म्हणजे मी असं केलं, मी तसं करणार आहे, मी स्टेजवर अमक्याला फाडला वगैरे काही म्हणजे काहीच नाही ! एकदा असंच त्यांच्याकडे सकाळी गेलो होतो. वाजवणं वगैरे झाल्यावर त्यांना विचारलं की उद्यापासून सवाई गंधर्वला जाणार आहात का? तर हो म्हणाले होते. पं. बिरजू महाराज आणि साथीला उ. झाकीर हुसेन असा कार्यक्रम होता ! स्टेजवर बघतोय तर इतर साथीदारांमधे बासरीवादक म्हणून अजितकाका ! म्हटलं, “धन्य आहे !” तो कार्यक्रम नुसता विंगेतून बघायला मिळतोय म्हटलं असतं तरी एखाद्याने चार मित्रांना सांगितलं असतं की बघ मी उद्या स्टेजजवळ असणार आहे ! अजितकाका तर चक्क साथीला होते !!

अमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा अजितकाकांशी भेट झाली ती शेवटची. प्रत्येक भारत भेटीत ठरवायचो की या वेळी तरी अजितकाकांना नक्की भेटायचं पण…राहून जायचं… पुढच्या वेळी भेटू म्हणत ! कधी लक्षातच आलं नाही की ’पुढची वेळ’ अशी काही नसतेच. आला क्षण आपला..बस्स !

या वेळी पुण्याला गेलो होतो तेव्हा चंद्रकांत काळेकांकाबरोबरच्या धावत्या भेटीत त्यांच्याकडून अजितकाकांचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. काय योगायोग आहे… अजितकाकांशी पहिली भेट ज्यांच्यामुळे झाली त्यांचं नाव प्रमोद काळे आणि फोनवर शेवटचं बोलणं ज्यांच्यामुळे झालं त्यांचं नाव चंद्रकांत काळे… एकच आडनाव !

दोन-तीन आठवड्यांपूर्वीच अजितकाकांशी फोनवर बोलणं झालं होतं. सकाळी ऑफिसला जाताना गाडीतून निवांतपणे काकांशी गप्पा झाल्या. इतक्या वर्षांनी बोलताना त्यांना काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. बासरीवादनात खूप म्हणजे खूपच मोठा खंड पडलाय हे सांगताना अपराधी वाटत होतं पण ते म्हणाले कविता, लेखन वगैरे करणं चालू आहे ना मग बास ! मी आपला लहान मुलासारखा काय काय सांगत होतो – नोकरी, BMM अधिवेशन, नवीन वाचलेलं पुस्तक, लेखनाचे प्रयत्न, कविता असं बरंच काहीबाही. त्यांनी तितक्याच उत्साहाने ब्लॉगचा पत्ता, माझा इमेल पत्ता वगैरे लिहून घेतला आणि म्हणाले मी तुझा ब्लॉग नक्की वाचेन. पण पूर्ण वेळात एकदाही म्हणाले नाहीत की ते स्वत: किती आजारी होते. माझ्या लेखनाबद्दल त्यांना काय वाटलं ते आता कधीच कळणार नाही पण त्यांचे आशीर्वाद नक्की जाणवतात. मगाशी म्हटलं ना अजितकाका म्हणजे आमच्या आप्पांसारखे होते… स्वत: कितीही आजारी असले तरी दुसऱ्याला आनंद वाटणारे !

त्या, शेवटच्या ठरलेल्या, गप्पांच्या ओघात कै. सुरेश अलूरकरांचा विषय निघाला. सुरेशकाका आणि अजितकाका खूप चांगले मित्र होते. बोलता बोलता अजितकाका सहज म्हणाले होते ते एक वाक्य आता अँफ्लिफायर लावल्यासारखे मनात घुमत राहिलंय. ते म्हणाले होते, “काय असतं ना ! माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपावं काही सांगता येत नाही.’

8 comments:

abhijit said...

khup surekh lekh !

पूनम छत्रे said...

हृदयस्पर्शी लिहिलं आहेस!
अजितकाकांना श्रद्धांजली!

Anonymous said...

mast

PG said...

अप्रतिम.... त्यांचे नाव ऎकून होतो पण इतका मोठा माणूस होता हे तुझ्या लेखामुळे कळलं. त्या बद्द्ल अनेक आभार....

लिहिलेले सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडल्यासारखे वाटत होते इतके छान लिहिले आहेस...

Gunavardhan Soman said...

Kharokhar Sundar lihala aahet apan.
Je aamhi tyanchya kadun shiklo nahi te tumhala shiknyachi sandhi milali..!! yachya sarkha bhagya nahi...!!

Gunavardhan Soman said...

Khup Sundar lihla aahet apan..!!
Ya sarkhi changli shradhanjali dusri kuthlich nahi..!!

Abhi said...

Very touching!!!

Phadnis said...

फार छान लेख. आपला परिचय नाही पण लेखावरून तुमच्याही व्यक्तिमत्त्वाची कल्पना आली. अभिनंदन