Monday, February 16, 2009

श्रावण शृंगार

मालवून टाक दीप
चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात लाभला निवांत संग

कै. सुरेश भटांचे अजरामर गीत.
मध्यंतरी बोलता बोलता ह्या गीताचा विषय निघाला. तेव्हापासून हे गीत, वृत्ताचे नियम वगैरे मनात रेंगाळत राहिले. शेवटी एकदाची ही गझल कागदावर उतरली.

ही गझल लिहायला सुरूवात केल्यावर खऱ्या अर्थाने अनुभवलं की भटसाहेबांनी किती नजाकतीची कलाकुसर अगदी सोपी वाटावी अशी लिहून दाखवली आहे !

ही गझल म्हणजे माझी आदरांजली, भटसाहेबांना आणि त्यांच्या लेखणीला.
-------------------------------------------------------------------------------
धूप छाव खेळ सांजवेळ श्रावणात आज
सांजवेळ आणि गात्र गात्र यौवनात आज…. १

शिंपतात प्रेमरंग कृष्णमेघ, वात, थेंब
मोरपीस होय चिंब चिंब पावसात आज…. २

पाहिलीस वाट गं भिजून तू दवात रोज
भेटलो तुला नि शांत शांत मन्मनात आज… ३

भेटते वसुंधरा तिथेच सागरास जेथ
गुंजतेय गाज ऐक ऐक पैंजणात आज…. ४

बैसलो इथे कधीतरी तुझी घडेल भेट
भेटलीस आणि गंध गंध अत्तरात आज…. ५

लाजतेस तू सखे भिजून पावसात चिंब
घे टिपून लाज थेंब थेंब सांगतात आज…६

घे सुखाकडून ही मिठीच, सोड प्रश्न व्यर्थ
माग श्वासगंध धुंद धुंद जीवनात आज…. ७

राहिले उसासलेच दोन जीव फार काळ
मालवून दीप, रात्र रात्र मीलनात आज… ८

2 comments:

PG said...

गझल झकास आहे. मीटर मध्ये बसत नाही मात्र त्यामुळे चाल लावायला कठीण आहे... अशक्य नाही. मेरा कुछ सामानला चाल लागू शकते तर हे तितके अवघड जाउ नये ;-)

एक आव्हान म्हणून सध्या मी याचा विचार करतोय. बघू काही निघते का....

Anonymous said...

Sandeep Dada, this is great.. Pan Marathi vachayla vel logtoy... :( and am not proud to say this!

Pan Me Aai La hi link deyin...she will be thrilled!!!