Sunday, May 24, 2009

निशाणी डावा अंगठाकधी कधी बोलता बोलता सहज एखाद्या पुस्तकाविषयी समजतं. आपल्याला कुणीतरी सांगतं की ते पुस्तक नक्की वाच. आपण हरप्रयत्नाने पुस्तक मिळवतो आणि पुस्तक भन्नाट म्हणजे भन्नाटच निघतं. अशा वेळी पुस्तक नक्की वाचायला सांगणाऱ्याचे आभार कसे मानायचे तेही कळत नाही !
‘निशाणी डावा अंगठा’ या पुस्तकाबद्दल असं म्हणजे सेम असंच झालं !

आधी तर चक्क आप्पा बळवंत चौकात चार-पाच दुकानं फिरूनही ते पुस्तक मिळत नव्हतं. बरं, हातात फार वेळही नव्हता, त्यामुळे आता पुढच्या सुट्टीतच पुण्याला आल्यावर ‘निशाणी..’ वाचायला मिळणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. घरी येताना शेवटचा प्रयत्न म्हणून अत्रे सभागृहातल्या पुस्तक प्रदर्शनाबाहेर रिक्षा थांबवली. रिक्षावाल्यांना म्हटलं, “दोन मिनटांत अलोच”. नुसतं आत जाऊन पुस्तक आहे का विचारायचं आणि नकार घेऊन परतायचं. दोन मिनटं खूप झाली की त्यासाठी ! आत गेल्यावर आश्च्यर्याचा धक्काच ना एकदम… चक्क पुस्तक मिळालं तिथे !

या कादंबरीच्या सुरूवातीला ओळी आहेत – “घटना व प्रसंग काल्पनिक वाटू नयेत इतक्या हुबेहूब गोष्टी आपल्या भोवताली घडत असतात, पात्रे काल्पनिक वाटू नयेत इतकी हुबेहूब माणसे भोवताली वावरत असतात.” एरवी आपल्याला वापरून गुळमुळीत झालेली वाक्यं वाचायची / पहायची सवय असते – “या कादंबरीतील पात्रे….योगायोग समजावा !” ‘निशाणी…’च्या वेगळेपणाची ही पहिली खूण !!

गावांमधले ‘प्रौढ साक्षरता अभियान’ हा या कादंबरीचा विषय. ‘निशाणी डावा अंगठा’ .. काय पर्फेक्ट नाव आहे ना कादंबरीचं? ‘रंगनाथ भास्कर डुकरे’ हा गावाकडचा एक तरूण शिक्षक स्वेच्छेने (आणि स्वार्थासाठी !) अभियानात पूवेका (पूर्ण वेळ कार्यकर्ता) म्हणून नाव नोंदवतो. डुकरेच्या प्रवेशापासून आणि ’पूवेका’ म्हणून बदललेल्या कामाच्या स्वरूपातून उलगडत जातो ‘निशाणी डावा अंगठा’ नावाचा भन्नाट प्रकार. कादंबरीतला खूपसा भाग बोलीभाषेतला असल्याने, वाचताना जरी तो लहेजा पकडायला थोडा वेळ लागला तरी, कादंबरी जास्तच खुमासदार होते.

साक्षरता प्रसार अभियानातले घोळ हा विषय घेऊन एकूणच सरकारी व्यवस्थेचा भोंगळ कारभार, नोकरशाहीच्या अजब तऱ्हा, कागदी घोड्यांचे महत्व (आणि त्यांचे पराक्रम !), आकडेवारीचा बडेजाव, माणसांचे ‘कातडी बचाओ’ स्वभाव असे एक ना अनेक प्रकार गमतीजमतीतून दाखवले आहेत. ‘निशाणी…’मधले साक्षरता अभियान म्हणजे एक प्रकारचा फार्सच म्हणाना.

शाब्दिक, प्रासंगिक, उपरोधिक, उपहासात्मक अशी विनोदाची वेगवेगळी रूपं आपल्याला ‘निशाणी…’मधून भेटायला येतात. रोजच्या जीवनात काही ठराविक घटना घडत असतात, आपण गृहित धरलेली काही ठराविक वाक्यं / शब्द असतात. रमेश इंगळे-उत्रादकरांनी ‘निशाणी…’मधे या सगळ्यांचे संदर्भ इतके सहज वापरले आहेत की एकदम मनापासून हसू येतं. नमुन्यादाखल बघा ….

>>>> गटशिक्षणाधिकारी खासबागेसाहेब ऑफिसात आले तेव्हा नेमके सहा वाजले होते. सूर्य आपला नेहमीसारखा चित्रातल्या दोन डोंगरांच्या मधात गडप झाला होता. पाखरंही नेहमीसारखी चारचे आकडे घेऊन घरट्याकडे परतत होती.
>>>> गध्याच्या मागून आणि साहेबाच्या पुढून कधी जाऊ नये. गधं लाथ मारतं आणि साहेब तोंड मारतं. दोन्ही गोष्टी लागल्या की माणसाले काही सुचत नाही.
>>>> आपल्याकडं कसं, आपण कम्प्युटरचा क्लास टाकला तरी सत्यनारायणाची पूजा करणार. घरी टीव्ही, फ्रिझ किंवा फोन घेतल्यावर त्याला हळद-कुंकू लावून, वाहून, नारळ फोडून शेरणी वाटणारे किंवा मोबाईल घेतल्यावर पहिला एस.एम.एस. देवाला करणारे लोक आपण.

काही ठिकाणी तर हसून हसून डोळ्यांत पाणी आलं तरी मूळ विषयाचं गांभीर्य सतत जाणवत राहतं…. चार्ली चॅप्लिनच्या विनोदासारखं ! बरं, मराठी भाषाही इतकी वळणदार आहे की शब्दाशब्दांतच विनोद दडलेला असतो. आता कुणी म्हणेल की हो, पण ‘निशाणी…’त काही ठिकाणी अश्लील शब्द आणि अश्लील विनोद सहज वापरले आहेत. पण बोलीभाषेची तीच तर मजा असते. त्यात श्लील / अश्लील असं काही नसतंच.. असतं ते फक्त मनातले विचार सरळसोट पोचवणं. ’निशाणी डावा अंगठा’मधली अस्सल नमुनेदार पात्रं तेच तर करतात.

२००५ साली ‘निशाणी डावा अंगठा’ प्रकाशित झाली. गेल्या चार वर्षांत कादंबरीच्या एकूण पाच आवृत्त्या निघाल्या आहेत ! ’निशाणी…’ हा इतका अस्सल प्रकार आहे की माझी खात्री आहे आज कै. पु.लं. असते तर त्यांनी या कादंबरीचं आणि लेखकाचं भरपूर कौतुक केलं असतं.

परवा २२ तारखेला या कादंबरीवर आधारित मराठी सिनेमा झळकलाय -- ‘निशाणी डावा अंगठा’ याच नावाने. पुरूषोत्तम बेर्डे दिग्दर्शक आहेत. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांना, अनुक्रमे त्या सिनेमाचे गीतकार आणि संगीतकार म्हणून, झी गौरव पुरस्कारही मिळालाय. अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, संजय नार्वेकर असे एक से एक कलाकार या सिनेमात आहेत. मी कादंबरी तर तीन वेळा वाचलीय, आता वाट बघतोय सिनेमा पहायची -- ‘निशाणी डावा अंगठा !’

8 comments:

Dhananjay said...

u missed telling the author name? or i missed reading it?

संदीप चित्रे said...

धनंजय,
लेखक आहेत रमेश इंगळे-उत्रादकर. या लेखात त्यांचे नाव दिले आहे.
>> रमेश इंगळे-उत्रादकरांनी ‘निशाणी…’मधे या सगळ्यांचे संदर्भ इतके सहज वापरले आहेत की एकदम मनापासून हसू येतं. >>

Tejoo Kiran said...

खुपच छान लिहिला आहेस लेख! तू सांगितल्या पासून प्रत्येक वेळी कुणीही भारतातून येत असताना माझी ही एकच मागणी आहे , पण अजुन मिळाली नाही कादम्बरी. आता तर हा लेख वाचल्यावर उत्सुकता खुपच वाढली आहे. तुझा लेखच मी दोन वेळा वाचून काढला...छानच आहे.

भानस said...

संदीप, खरेच आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. गेल्या वर्षी मायदेशातून येताना काही पुस्तके आणली त्यात हे व शाळाही आणले. डुकरेपासून सगळी पात्र इतकी झकास व चपखल आहेत . सिनेमाही छान झाला आहे. अगदी कालच माझ्या आईबाबांनी पाहिला. रमेश इंगळे-उत्रादकरांनी उभी केलेली पात्रे भन्नाट आहेत.
तुझे परिक्षण आवडले. ज्यांना याबद्दल काहीच माहित नसेल ते तुझ्या नेमक्या मुद्देसूद लेखाने वाचण्यास नक्की प्रवृत्त होतील.

Asha Joglekar said...

माहीत नसलेल्यां पैकी मा ही एक. पण आता पुस्तक ही वाचायचं अन् सिनेमा तर पाहियचाच.

जयदीप said...

संदीप,

खूपच छान आणि मनाला भावणारे आहे हे पुस्तक. मी काही महिन्यांपूर्वी वाचले, अगदी एका बैठकीत म्हण ना.. आता त्यावर सिनेमाही काढला आहे. तो मात्र अजून पहायचाय..

तुझा 'लेख' नेहमीप्रमाणेच 'छान'

जयदीप

श्रेया महाजन. said...

काल आपली मराठी वर सिनेमा पाहिला. कुणाची पटकथा असावी म्हणून आज गुगल वर शोधले तर हा लेख सापडला, छान आहे. कादंबरीतले वर्णन तर फारच वास्तव आहे. खूप जवळून यातील भ्रष्टाचाराचे दर्शन मी घेतले आहे. त्यामुळे चित्रपट स्पर्श करून गेला. मुंबईत गेल्यावर पुस्तक मिळाले तर जरूर पाहायला हवे.

संदीप चित्रे said...

श्रेया,
मी अजून सिनेमा पाहिला नाहीये पण पुस्तक मात्र मिळवून जरूर वाचा.