Tuesday, January 15, 2008

क्या लाऊं, साब?

“लाल शर्ट…मस्साला डोसा, कॉफी..उसके बाजूवाला सिर्फ पानी !”

गजबजलेल्या उडुपी रेस्टॉरंटमधले ’वेटर’ म्हणजे साधारणपणे हे चित्र डोळ्यासमोर येतं ना? काय अफाट मेमरी असते हो त्या लोकांची? एका टेबलवर चार लोक, प्रत्येकाच्या ऑर्डरचे चार प्रकार ! शिवाय प्रत्येकाचं बिल वेगळं ! कसं काय लक्षात राहतं ते एक उडिपीचा कृष्णच जाणे !

“काही कामं अशी असतात की ती नीट करण्यासाठी ‘लक्षात ठेवण्याइतकंच’ ‘विसरणं’ महत्वाचं असतं!” गप्पांच्या ओघात मित्र सहज म्हणाला ! “Think of a waiter’s job! नवीन कस्टमरची ऑर्डर लक्षात ठेवताना, त्या टेबलवर आधी बसून गेलेल्या कस्टमर्सची ऑर्डर विसरायला पाहिजे! नाहीतर च्यायला नुसते गोंधळ !”

आपल्याकडे अश्या साध्या रेस्टॉरंटमधे जाणं म्हणजे काय सांगावं? टेबलशी बसल्याबरोबर, न मागता, आधी पाणी मिळतं आणि आपल्या वेटरचं पहिलं दर्शन घडतं. ’युनिफॉर्म’ म्हणजे आकाशी किंवा हलका करडा किंवा बिस्कीट कलरच्या रंगसंगतीचे कपडे ! त्यावर अनुक्रमे गडद निळा, काळा किंवा डार्क ब्राउन रंगाच्या दोऱ्याने शर्टच्या छातीवर “श्रीकृष्ण भुवन”, “संतोष” किंवा “परिवार” वगैरे असं काहीतरी रेस्टॉरंटचं नाव शिवलेलं ! “गरम काय आहे?” ह्या प्रश्नाला “इडली आहे, डोसा ए, सांबार, वडा, भजी ए ! पाहिजे तर राईस प्लेट ए!!” अशी उत्तरांची सरबत्ती मिळते. बरं, इतकं करूनही आपल्याला आणि वेटरला माहिती असलेला ’गरम’ ह्या शब्दाचा अर्थ सारखा असेलच ह्याची गॅरंटी नाही ! पण हां, चवीच्या बाबतीत मात्र तडजोड नसते. पदार्थांच्या नुसत्या दर्शनाने आणि सुवासांनीच भूक खवळते ! त्यानंतर मग आपण हातात बिलाच्या कागदाचा चिटोरा घेऊन काऊंटरवर पैसे द्यायला जाणार. शेट्टी अण्णा, स्थितप्रज्ञ वृत्तीनं, शंभरच्या बंडलांची उलाढाल करत असतो. आपण बडीशेप तोंडात टाकत असताना वेटरचा आवाज येतो, “लाल शर्ट.. मस्साला डोसा… !”

‘वेटर’लोकांपैकी सगळ्यात चुणचुणीत कोण असेल तर टपरीवरचा किंवा अमृततुल्यमधला ‘बारक्या’ ! चालण्या-बोलण्यातला तरतरीतपणा तो ‘रस्त्यावरच्या शाळेत’ शिकतो आणि योग्य तसा वापरतो ! ज्या वयात खेळायचं, हुंदडायचं, कधी आवडीनं तर कधी मारून-मुटकून अभ्यास करायचा आणि मग मायेच्या उबदार कुशीत शांत झोपायचं, त्या वयात बिचारा चहा-कॉफी देतो आणि पेले-बश्या विसळतो ! कधी मालकाचा ओरडा खाताना (हातपाय न आपटता) डोळ्यांतलं पाणी रोखतो, हुंदक्याबरोबर अपमान गिळतो आणि हसऱ्या चेहऱ्यानं पुढच्या गिऱ्हाईकाला म्हणतो, “काय शेठ, आज बरेच दिवसांनी आले? !!”

उडपी रेस्टॉरंट किंवा टपरीवरच्या ह्या तऱ्हा तर ‘पॉश’ रेस्टॉरंटमधे, विशेषत: पंचतारांकित ‘रेस्तरॉं’मधे, एकदम वेगळा प्रकार ! आत शिरल्यावर एक ‘कमनीय बांधा असलेली’ आणि ‘त्यावर आकर्षक साडी नेसलेली’ तरूणी ! (पाहिजे तर ‘साडी नेसलेली आकर्षक तरूणी’ असं वाचलंत तरी चालेल ! तसंही आपण फक्त लिहिण्या-वाचण्यापलीकडे अजून काय करणार हो? !!) तर ती (साडी नेसलेली) तरूणी खळीदार हसून तुमचं स्वागत करते. मग ती विनंतीवजा आवाजात, तिच्या जन्मवेळी इंग्रजांची विमानं गेल्याच्या ऍक्सेंटमधे, हुकूम करते की प्लीssज, निदान १०/१५ मिनिटे तरी थांबाल का? ! हं, आता काय करणार? आपण आपले ’तिच्याकडे पाहून’ हो म्हणतो !!! छान मंद वाद्यसंगीत चालू असतं, वेस्टर्न क्लासिकल पियानो, व्हायोलिन नाहीतर हिंदुस्थानी क्लासिकल संतूर, बासरी किंवा सरोद ! Lunch time असूनही ‘चंद्रकंस’ किंवा dinner चालू असताना ‘तोडी’ ! (आपल्याला काय, ‘क्लासिकल’ आहे ना..मग सीडी लगाव!) जेवणाची ऑर्डर लिहून घ्यायला जो येतो त्याच्याकडे एक छोटी वही किंवा पॅड असतं. बरं, ऑर्डर लिहून घेणारा आणि जेवण आणणारा माणूस वेगळा असतो ! इथे मेन्यू कार्ड हिंदी / Enligh मधे असलं तरी आपण ते ‘उर्दू’ भाषेत वाचतो ! म्हणजे उजवीकडे त्यातल्या त्यात कमी आकडा दिसला की डावीकडे मग पदार्थाचं नाव वाचायचं ! बरं, इथलं मेन्यू कार्ड पण भन्नाट प्रकार असतो ! एखादा फसलेला किंवा भागलेला साहित्यिक बहुतेक अशी कार्डस लिहितो. म्हणजे असं की सरळ ‘मासे’ न म्हणता ‘समुंदर के ऑंगनसे’ किंवा भाज्यांच्या सेक्शनचं हेडिंग काय तर ‘हरियाले खेतोंसे’ वगैरे असलं काहीतरी ! हे तरी परवडलं, English cards म्हणजे तर ‘नाव मोठं - लक्षण खोटं’ असला प्रकार असतो ! अरे, आता मला सांगा ‘Sunny side Up’ वाचल्यावर, डोळ्यांसमोर ‘half fried eggs’ ही डिश कशी काय येईल?

वेटर जरी फक्त पदार्थ आणण्याचं काम करतो तरी, पु.लं. म्हणाले तसं, अशा ठिकाणी ‘चवीचं नातं स्वच्छतेशी व्यस्त प्रमाणात असतं’ हे सिद्ध होतं ! थोडं विषयांतर होतंय पण श्रावणी सोमवारची कहाणी असती तर सांगीतलं असतं -- एक आटपाट नगर होतं. एकदा काय झालं की तिथल्या माणसाने ‘स्वच्छ आणि चांगलंच खायचं’ असं ठरवलं. मग तो ‘पॉश आणि चकचकीत’ रेस्तरॉंची पायरी चढला. दोन-तीन दिवस तिथे जेवूनही त्याचं समाधान झालं नाही. मग त्याने काय करावं? त्याने फाईव्ह-स्टार व्रत केलं. फाईव्ह-स्टार व्रत कसं असतं -- तर -- फाईव्ह-स्टार रेस्टॉरंटमधे जेवल्यासारखं करावं ! हास्य-विनोद करत, चेहरा हसरा ठेवून ‘बिझनेस मिटींग’ किंवा ‘कंपनी पार्टीत’ वावरावं ! ऊतू नये-मातू नये !! रात्री पार्टी संपली की शहाणं होऊन हातगाडीकडे जावं ! गरम-गरम अंडा-भुर्जी आणि पाव किंवा ऑम्लेट-पाव (मराठीत: आम्लेट-पाव), भजी-पाव, वडा-पाव किंवा मग भेळ, मिसळ, पाणी-पुरी असं काही तरी चांगलं-चुंगलं जीभेवर ठेवून पोटातल्या कावळयांना शांत करावं. पानाच्या टपरीवर जाऊन मघई पान किंवा एकशे वीस – तीनशे / फुलचंद असं काही खावं. अशा तऱ्हेने फ़ाईव्ह-स्टार व्रत सोडावं! आपण करावं आणि अजून पाच जणांना सांगावं !!!

तर, आपण कुठे होतो? हां… मेन्यू आणि वेटर ! असं म्हणतात की तुमचा स्वभाव कसा आहे ह्याचा थोडा अंदाज तुम्ही वेटरशी कसे वागता-बोलता ह्यावरून येतो ! अगदी वेटरला बोलावण्याची पद्धतही बरंच काही सांगते. काही जण तर नुसते चुटक्या वाजवतात ! पूर्वीच्या काळी राजे-महाराजे जसे, “कोण आहे रे तिकडे” म्हणायला फक्त दोन टाळ्या वाजवायचे ना, तसे ! काही जण वेटरशी बोलताना चेहऱ्यावर इतके अपराधी भाव घेऊन बोलतात की वाटतं ह्यांनीच काहीतरी चूक केलीय आणि शिक्षा म्हणून वेटरला ऑर्डर सांगायचीय !!! काहीजण ऑर्डर सांगताना वेटरकडे पाहून न पाहिल्यासारखं करतात ! तर काही ‘गोंधळेकर’ पदार्थ सांगताना इतके घोळ घालतात की वेटरचा पार मोरू करतात ! काही जण सहजपणे वेटरला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात तर अशा शुभेच्छा पाहून काही भिवया आश्चर्याने वर जातात !

‘वेटर्स’बद्दल जेव्हा विचार करतो ना तेव्हा पूर्वी कधीतरी इंटरनेटवर वाचलेली खूप touching गोष्ट हमखास आठवते. हा लेख पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टीइतका चांगला शेवट नाही असं मला मनापासून वाटतंय. गोष्ट तशी जुनी, म्हणजे केव्हाची तर अमेरिकेत ‘Ice Cream Sundae’ dollars ऐवजी cents मधे मिळायचं तेव्हाची ! आपण सोयीकरता पैशांत मिळायचं असं म्हणू ! तर गोष्ट अशी –

एक साधारण दहा वर्षांचा मुलगा एका रेस्टॉरंटमधे गेला. त्याने वेट्रेसला विचारलं, “Ice Cream Sundae कितीला?” वेट्रेस म्हणाली, “पन्नास पैसे”.
मुलाने खिशातून पैसे काढले आणि वेट्रेसची नजर चुकवून मोजले.
मग त्याने विचारलं, “साधं Ice Cream कितीला?” उत्तर आलं, “पस्तीस पैसे.”
त्याने परत एकदा आपल्याकडचे पैसे मोजले. आता रेस्टॉरंटमधेही गर्दी वाढायला लागली होती. आधीच काही लोक टेबल मिळण्यासाठी ताटकळत होते. त्या लोकांकडून वेट्रेसला चांगली टिपही मिळाली असती.
ती वेट्रेस मुलाला थोडं त्रासिकपणे म्हणाली, “पटकन सांग रे, नक्की काय हवंय?” तर तो मुलगा चाचरत म्हणाला, “मी साधंच Ice Cream घेईन.”
वेट्रेसनी त्याच्या टेबलवर Ice Cream ची प्लेट ठेवली, त्याचं बिल ठेवलं (अमेरिकन भाषेत त्याचा ’चेक’ ठेवला !) आणि त्या मुलाकडे परत ढुंकूनही न बघता बाकीच्या लोकांकडे वळली. चरफडून मनात म्हणाली, “खिशात नाहीत धड पुरेसे पैसे आणि निघालाय Ice Cream Sundae खायला !”
त्या मुलानं Ice Cream खाल्लं आणि पैसे टेबलवर ठेऊन हळूच निघून गेला. थोड्यावेळानं मग वेट्रेस टेबल साफ करायला आली. तिनं टेबल साफ करण्याआधी बिलाचे पैसे उचलले आणि एकदम हुंदका गिळला ! नकळत तिच्या डोळयांत टचकन पाणी तरारलं ! त्या मुलानं नीटपणे, आइस्क्रीमच्या पस्तीस पैशांशेजारी, पंधरा पैसे वेगळे ठेवले होते. तिची ’टिप’ म्हणून !!!

3 comments:

Tejoo Kiran said...

वा !! वाचताना गरमागरम डोसा, साम्बार, नारळाची चटणि आणि वेटर ने बोटे बुड्वलेल्या पाण्याची आठवण आली. आणि background ला बाकी सर्वांच्या आवाजात radio वर हिन्दी गाणी. college चे दिवस आठवले. त्या filter coffee ची चव अजूनही जिभेवर आहे. superb !!! keep it up... तेजु

Anonymous said...

Five Start vrat zhakas ahe

Anonymous said...

अतिशय अभ्यासू वृत्तिने पण मनोरंजकतेने लिहिलेला हा लेख वाचून खूप बरं वाटलं.
आणि शेवटी त्या लहान मुलाची हृदयस्पर्शी वागणूक वाचून मला पण हुंदका आला.
सामंत