Sunday, May 11, 2008

डिच !

“खबरदार जर पुन्हा डिचकडे गेलास तर !”

हे वाक्य ऐकणारा विद्यार्थी आणि ऐकवणारे शिक्षक वेगळे असायचे पण डिच तशीच होती … वर्षानुवर्षे !

आमच्या शाळेचं मैदान खूप खूप म्हणजे खूपच मोठं आहे. आता मोठं म्हणजे किती तर मधल्या सुट्टीत जर मैदानाच्या दुसऱ्या टोकाला गेलो तर सुट्टी संपल्याची घंटा ऐकूच यायची नाही … इतकं मोठं !! Football, Hockey, Volleyball, Basketball, खो-खो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, full size athletics track, Rifle shooting range, पाच-सातशे सायकलींचा स्टॅंड, पाण्याची गोल टाकी हे सगळे आहेच पण त्याशिवाय एकावेळी किमान दोन टीम्स क्रिकेट खेळू शकतील इतकी मोकळी जागा ! त्याशिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक्सचा हॉल वेगळेच ! हे सगळं .. डिचने व्यापलेली जागा सोडून !!!

अरे हो .. पण ही ’डिच’ काय भानगड आहे ते सांगायचेच राहिले. अर्थात जे कोणी आमच्या शाळेत, म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ - गुलटेकडी, पुणे इथे शिकले..निदान साधारण एकोणीसशे नव्वदच्या मध्यापर्यंत – त्यांना डिच म्हणजे काय ते सांगायलाच नको पण इतरांठी थोडी माहिती सांगायला हवी.

तर डिच म्हणजे – अगदी सोप्या भाषेत म्हणजे -- मैदानामधे असलेला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा खड्डा! त्या डिचला प्रदक्षिणा घालायची तर शाळेतल्या मुलांना साधारण दहा-एक मिनिटे लागायची; त्यावरून डिचच्या परीघाचा अंदाज यावा !

काय होतं त्या डिचमधे ? खरं तर प्रश्न असा हवा की काय नव्हतं त्या डिचमधे ? !! झाडी-झुडुपं, डिचमधे उतरत्या जमिनीच्या एका कडेला बांबूचं छोटं रान, डिचच्या मध्यभागी पाणी, त्यात पुरूषभर उंचीचं गवत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पाण्यात मधोमध दलदल आणि खूपसं ऍसिड !!!

तरतऱ्हेचे पक्षी, पाणकोंबड्या आणि खारी तर होत्याच पण कधी कधी सापही दिसायचे ! काहीजण तर शपथेवर सांगायचे की त्यांनी डिचमधे अजगर पाहिला ! खरं-खोटं काय ते फक्त छातीठोकपणे सांगणारी मुलं, देव आणि असलाच तर तो अजगरच जाणे !

दिवसा काही विशेष नाही पण संध्याकाळ व्हायला लागली की डिच अजूनच गहिरी आणि भीतीदायकही वाटायची. ते संदीप खरेचं ‘खतरनाक’ बालगीत ऐकलयंत – बुंबुंबा म्हणून ! त्याने लिहिलंय ’आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून, पडका वाडा बसला आहे दबा धरून!’ तर त्यातच पुढे पडक्या वाड्यामागच्या विहिरीचं वर्णन करताना त्याने लिहिलंय ’कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी… उच्चारावे जसे अघोरी मंत्र कुणी, दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ .. काठावरती येऊन बसते संध्याकाळ!’ ह्या ओळी वाचताना जशी भीती वाटते ना तशीच आम्हाला संध्याकाळी डिचकडे बघताना यायची.

बाकी सगळ्यापेक्षा मुलांना खरी भीती वाटायची ती दलदलीची. हो ना, क्रिकेट खेळताना जर बॉल तिकडे गेला तर बॉल पाण्यात असेपर्यंत काठ्या वगैरे वापरून आम्ही तो काढायचो पण एकदा तो पुढे दलदलीत गेला की मी मी म्हणणारे हरायचे !!! कधी कधी तर चक्क आम्ही ३-४ मुलं एकमेकांच्या कंबरेला धरून साखळी करत असू की उगाच बॉल काढणारा मुलगा दलदलीत पडला पडायला नको.

समाजसेवेचा कॅंप असला की दोन दिवस शाळेतच मुक्काम असायचा पण संध्याकाळनंतर डिचकडे फिरकायची अजीबातच परवानगी नसायची. पोरांच्या पैजा लागायच्या की सगळ्यांची नजर चुकवून रात्री पटकन डिचमधे उतरून लगेच परत यायचं पहिली गोष्ट म्हणजे सहसा कोणी अशी पैज कबूल करत नसे आणि केलीच तरी जिंकण्यासाठी फारसे कष्ट करत नसे.

हे असं असलं तरी डिच म्हणजे आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य होतं. डिचच्या काठावर पिंपळ आणि निलगिरीची झाडं होती. त्या झाडांच्या थंडगार सावलीत बसून एकमेकांची चेष्टामस्करी करणं, खोड्या करणं आणि कधीकधी चक्क अभ्यासही करणं ह्याची मजा शब्दांत पकडू म्हणता पकडता येत नाही.

सकाळी साधारण दहाच्या सुमारास मधली सुट्टी व्हायची. बांबूच्या शांत आडोशाला बसायला खूप छान वाटायचं. कधी अचानक एखादा off period मिळायचा. तेव्हा तर त्या बांबूच्या वनात झडलेल्या गप्पांच्या मैफिली काय वर्णाव्या महाराजा? एकमेकांना सिनेमाची स्टोरी सांगायला खूप धमाल यायची. हिंदी सिनेमाचा प्रभावामुळे असेल पण आम्ही पोरं त्या जागेला ’अड्डा’ म्हणायचो.

डिचच्या काठावरल्या पिंपळाच्या पानांची सळसळ आम्ही फक्त पुस्तकातच वाचली नव्हती, तर रोज ती पहायचो. पिंपळपानांपैकी अखंड पानं पुस्तकांमधे ठेवून वाळवायची. ती वाळली की त्यांची छान तलमदार जाळी व्हायची. हातावर चुरगळलेल्या निलगिरीच्या पानांचा सुगंध तर अजूनही मनात ताजा आहे.

डिचच्या उतरत्या काठाला घसरगुंडी करून बरोबर पाण्याच्या काठाशी थांबायचं आणि युनिफ़ॉर्मची पॅंट फाटू द्यायची नाही. कितीतरी मुलांबरोबर मीसुद्धा हे कसब् तिथेच शिकलो. त्या सगळ्या झाडांमधून, डिचच्या काठावरून, त्या घसरगुंडीवरून, पाण्यात न पडता सूर-पारंब्या खेळताना वेळ कसा जायचा ते कळायचंही नाही.

आम्हा पोरांचा अजून एक खेळ आवडता होता. तीन-चार मुलं एकत्र असलो की डिचमधे उतरायचं आणि पाण्याच्या काठी मस्तपैकी मांडी घालून निवांत बसायचं. मग आसपासच्या दगडांपैकी त्यातल्या त्यात चपटे दगड घ्यायचे. एकेकाने पाण्यात ते चपटे दगड असे मारायचे की दगडांनी पाण्यावर २-३ टप्पे घेत गेलं पाहिजे ! ज्याचा दगड जास्तीत जास्त टप्पे घेईल तो त्या दिवशीचा winner !!

कधीकधी नशीब जोरदार असलं तर तीन-चार महिन्यात सायकलचं टायर पंक्चर व्हायचं नाही. मग पंक्चरसाठी लागले तर असू दे म्हणून खिशात ठेवायला मिळालेले पैसे सत्कारणी लागायचे. शाळेच्या कॅंटीनमधून आम्ही पोरं वडा-पाव घ्यायचो आणि बांबूच्या वनात निवांत बसून खायचो. सटीसहामही कधीतरी होणारी ती चैन असायची त्यामुळे त्याची मजाही वेगळीच होती. आताही मधेच कधीतरी वाटतं की काही तासांसाठी लहान व्हावं, यार-भिडू जमवावेत आणि डिचमधे उतरून वडा-पावची पार्टी करावी !!!

काही वर्षांपूर्वी कधीतरी समजलं की शाळेने भराव वगैरे घालून डिच पूर्णपणे बुजवलीय ! वाईट वाटलं; खरंच सांगतो खूप वाईट वाटलं। पहिलं कारण म्हणजे आमच्या शाळकरी आठवणींतला एक खूप मोठा भाग आता परत कधीच बघता येणार नव्हता. दुसरं म्हणजे आता शाळॆत शिकणाऱ्या मुलांना डिचचा आनंद कधीच मिळणार नाही.

शाळेत असताना समजलं नाही पण वर्गात जसं शिकलो तसंच चार भिंतींबाहेरही खूप गोष्टी शिकलो. खूप गोष्टी तर शिकलो डिचमधे किंवा डिचकडूनही !! अगदीच काही नाही तर ’खड्ड्यात जाणं’ ह्याला इंग्लिशमधे ’to be ditched’ असं का म्हणतात, ते मराठी शाळेत शिकूनही खूप लवकर समजलं होतं !!!

37 comments:

Tejoo Kiran said...

खूपच सुरेख. अख्खं जग पाहीलं तरी बालपणीच्या ठिकाणांना आणि आठवणींना काही वेगळाच रंग असतो नाही ? तुला सुचतात तरी कसे एवढे निरनिराळे विषय ? असंच चांगलं चांगलं लिहीत रहा... तेजू.

Anonymous said...

Shewat khup aawadla.

Sanjiv

कोहम said...

masta lekh....avadala..

स्नेहल said...

tu Maharashtra Mandalat hotas? 10th kadhi zalas? mi tithe primary la hote :) pan ditch mahitiye aikun :)

संदीप चित्रे said...

Koham ...Thanks
------
Snehal:
ho mee Maharashtra ManDaLaat hoto ..dahaavee ekoNeesashe shahaa-aiMshee saalee jhaalo.
-------

Unknown said...

I thought it would be the same article, but you have modified and added a lot, good :-)
..Mandar

Aditya Panse said...

मी पण कटारियात होतो...पण आमच्या वेळेला तो खड्डा भराव वगैरे घालून बुजवला होता.

अशी एक अफवा त्याकाळी होती, की कोणीतरी मुलगा त्या डिचमध्ये पडून मेला, म्हणून डिच बुजवली!

असो! एका माजी कटारियनचा ब्लॉग वाचून बरं वाटलं. आपल्या शाळेवर लिहिण्यासारखं पुष्कळ आहे. माळीबुवा, बोराटे, बांबू हाऊस (आणि त्यातली लफडी!) वगैरे.

असंच लिहीत रहा...!

--
आदित्य पानसे

संदीप चित्रे said...

Hi Aditya,
Thanks for your comment.
I studied at Marathi medium school but my was a teacher at Katariya High school. I'm positive that you know her.
Please let me know your email address. You can use this blog's comment facility for the same; I will not publish it :)
Cheers,
Sandeep

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर said...

झकास. मी मुंबईचा. लेख इतका प्रभावी की वाचता वाचता ठरवले की आता पुण्याला जाऊन तो डिच पाहायचाच. पण शेवट वाचून निराशा झाली.

सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

संदीप चित्रे said...

सुधीरजी..प्रतिक्रियेसाठी धन्स !
आता वाटतंय शक्य होतं तेव्हा डिचचे निदान फोटो तरी घेऊन ठेवायला पाहिजे होते !!

vmp50@hotmail.com said...

mast! mee pahila para vachat asatana mala pan bumbumba ch athavala! maze favorite song ahe bumbumba!
lihit raha...

-Maitreyee

Deva Bapat said...

Visit - http://www.linkedin.com/groups?home=&gid=69051&trk=anet_ug_hm

Shailesh javalgekar said...

Hi,

IS this Chitre Madam's kid????

Khoop athawan ali ditch chi!!!!!!

Cheers,
Shailesh

संदीप चित्रे said...

Yes Shailesh, I'm Chitre madam's elder son :)
What's your name and when did you complete schooling from Katariya?
You can send it to me using the 'samparka: theT bheT' section on my blog

Ajay Godbole said...

kkhhup chaan vatle.


Ditch che amhi bahutek akherche shakshidar (1987-1993). Ditch chya tumchya athvani me asksharshah jaglo ahe :)

tithlya Pan-Kombdya. tya ditch madhle maase ghari pakdun gheun jaane :)

Aso kadhi tari shalet gelo tya athvani parat jagya hotat.

ek anhkin ditch hote, running track chya khup palikade, tyala amhi Acid- che ditch mhanat aso

btw, Chitre Madam amhala shikvayla(6th and 8th)hotya, , tyani amhala Holi chya Divashi Holike chi sangitleli gosht ajun hi lakshat ahe :)

Bahar said...

Hi Sandeep!

I am very happy to read your article on "Ditch". Made me remember my days in school. I passed out from the school in 1993. Your mother, Chitre madam was one of my favorite teacher. Hope she is well :). She must not be knowing me but convey my regards to her... Bahar.

Anonymous said...

Sandeep you are great..... man,tuza lekh vachtana mi flashback madhye gelo hoto
kharach aplya ditch ne aaplya khoop kahi shikavala,mazya mulanna surparambya mahit nahi so sad,but we are too lucky to have those golden days. god bless you.

athul oza

KAustubh Dindorkar said...

Hi Sandeep,

great job. Your piece on " ditch' is lovely. It really transports a person back to those golden days. We even played 'soor parambya'. The ditch was also a end point of countless cricket balls & I sometimes wonder how many balls it would have fetched had it been dredged. Better it buried the dis appointments of losing the ball & taught us to still get on with the game.many , many memories ....have flooded back... Thanks-- Kaustubh Dindorkar.

Anonymous said...

Subhanallah ! you transported me to those golden days ! watching the ditch flooded in rainy season and vouching how the water level rises, was too good. every one had his own stories and associate those ditched memories with school life. Keep it up. I was 1987 passout

Mohan Puntambekar said...

Sandeep,
Awesome lekh ! I was a Katarian from 1980-84. The ditch was an integral part of my school days. Sur-Parambya was a favorite past time. The lekh took me back in time. Chitre Ma'am was my marathi teacher for years. She also taught me gardening. Under her supervision, I had planted methi seeds and watched them grow ! Awesome days !

-Mohan.

Copyright जयंत कुलकर्णी said...

डिच.... आता काय सांगू या डिचबद्दल ! आम्ही ती झाडे लावली व पाणी घालून मोठी केली.. जगवली. माझी पहिली तुकडी... मी बारावा विद्यार्थी होतो शाळेचा.. हं... एकदा लिहायल्या हव्यात शाळेच्या आठवणी.. :-)

Unknown said...

संदीप, खूपच छान! डिच बद्दल भीती जाऊन जिव्हाळा वाटण्या पर्यंतचा मानसिक प्रवास आपण बरोबरच केला. खूप वर्ष झाली...डिच बूजवलेलं पटांगणही पाहिलं पण आजही डोळे बंद केल्यावर डिच पाहू शकतो ..या आठवणी बद्दल...धन्यवाद.
धनंजय

Vineet Naik said...

Hello Sandeep Khoop chan lihile aahes 👍 . Mi Chitre madam cha student hoto 81-82 batch. Punha ekda nostalgic zalo. Tu US madhe kuthe aasatos ani kai kartoi sadhya? Madam kuthe aahet? Let me know plz

Unknown said...

व्वा मस्त. मी 82 batch पास आऊट. खूप छान लिहिलेस. माझ्या मते batch कुठली पण असो सगळ्यांना अनुभव सारखाच. आमचे क्रिकेटचे अगणित बॉल ditch मध्ये नाहीसे झाले.
एकदम nostalgic लेख आहे. धन्यवाद.

Unknown said...

Awesome.... Very nice write-up... Yes... We learnt many many valuable stuff outside the classroom than within... Surparambi was fun.....golden days. .....

SANJAY said...

Excellent 👍
आमही डीच मधील झाडांवर सरास सुरपरब्या खेळायचो
परवानगी नसेल कदाचित ते काही आठवत नाही 40 वार्ष झाली 😁
Sanjay Mehta
1982 batch

Unknown said...

जुन्या आठवणी जागवल्या बद्दल आभार. मी पण कटारिया चा विद्यार्थी, 87 batch. चित्रे मॅडम ना माझा नमस्कार

PRASANNA OGALE said...

Hi Sandeep, Loved your blog. I passed out of Katariya Highschool in 1983. We did everything you mentioned and a lot more in and around 'The Ditch'.
Even today I can remember the fragrance of the nilgiri leaves. Thank you for reminiscing the school memories. Took me back in the past for a few hours. Cheers!!

Unknown said...

Hi Sandeep,
Your blog made me so nostalgic..ditch...saglyanchi avadti jaga..khup sundar aathvani..ek n ek vakya janu dolyasamor akkha chitra ubha karat hota..sundar lekh
Chitre madam na majha namaskar sang��
Dr Pradnya Joshi-Deshmukh

Sandeep said...

फारच सुंदर. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. का रे देवा इतक्या लवकर मोठं केलंस? खेळलो अस्तो ना अजून मित्रां सोबत खाल्ला असता अजून थोडा मार...

Nikhil Gangavane said...

Very nice.. kititari bhitidayak athvani ahet tya ditch chya. btw.. maage ek acid ditch pan hota at the end of chandrashekhar college ground (motocross wala)

Unknown said...

Khup mast me Seth dagduram katariyacha student 1992 batch nav vegla asla tari shala tich khup mast vatla vachun junya saglya adhvani tazya zalya. Thanks

Alpana tai said...

मस्तच... सगळ्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.. पूर्ण शाळा फिरून आले वाचताना

Alpana tai said...

Great ❤️

Rapunzel said...

Sandeep, a vivid account indeed👏👌
You have made me travel down the memory lane which has so many interesting pit stops🤗
The high point of our school, ‘the Ditch’ has many stories not only related to you all as students but even we as teachers.
Every language teacher must have included this either in comprehension or as composition I’m sure.
Many mysteries have been woven around it and it will continue to be an enigma for those who only heard them.
Thank you for giving me an opportunity to meet so many of my children through their expressions
Teacher for English and Geography
Saroj madam

Anonymous said...

आम्ही तर ह्या डीच च्या काठावर बसून qsqt आणि mpk चे डायलॉग म्हणायचो आणि आपलेच कसे जास्त पाठ आहेत आणि बरोबर आहेत ह्याच्या बढाया मारायचो

क्षमा चिटणीस

अजित माटे said...

खूपच सुंदर लेखन संदीप. माझ्याही बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला. डिच च्या मागील बाजूला एक बांबूचे वन होते. खूप दाट. आणि तिथे एक रान डुकरी होती. आम्ही सहावीत असताना तिची खूप पिल्लेही होती. ती पिल्ले वनातून बाहेर यायची, मग आम्ही पोरे त्यांच्या मागे लागायचो. अर्थातच त्यांची आई भडकून आमच्या मागे यायची. शेवटी शाळेंने डुक्कर पकडायला काही लोकं आणले. त्यांनी फास टाकून डुक्कर आणि तिची पिल्ले पोत्यात भरून नेली. आजही ती घटना काल घडल्या सारखी आठवते.