Sunday, April 13, 2008

स्वप्नातलं गाव …

स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

समुद्री गाज, पोफळी बाग
कलती उन्हं सोनेरी झाक
सोनेरी वाळूत हिरवा पडाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

कौलारू घर, दारी झुलाव
पाण्यात दूर डोलतेय नाव
ताजी म्हावरं पैशाला पाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

लाकडी घर, टेकडीवर गाव
उतरतं छत .. काचेचा ताव
गुलाबी थंडी धवल वर्षाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

न्हाली दव, ऊबदार सकाळ
नेसूनि रंग ये….संध्याकाळ
चंदेरी उधळण चांदण्या वाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

जगती कोण, चुकला धाव?
मनी आपलं.. एक जपावं गाव
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

3 comments:

Unknown said...

मनी आपलं.. एक जपावं गाव>>>>

sahiicha!!

यशोधरा said...

अगदी, अगदी रे संदीप....

विनय देसाई said...

छान आहे कविता, लगे रहो..