Sunday, September 6, 2020

चित्रकलेचा दोर (पार्ट २)

आयुष्य हे छोट्या छोट्या क्षणांचं बनलेलं असतं आणि काही क्षण खास असतात. दहा वर्षांपूर्वी मोठ्या चिरंजीवाबरोबर बसून एक चित्र काढलं होतं.  त्याबद्दलचा लेख 'चित्रकलेचा दोर' इथे लिहिला होता. त्यावेळी मोठा मुलगा आदित्य ५ वर्षांचा होता. 

आता धाकटा आयुष ६ वर्षांचा आहे. नुकतंच एकदा त्याच्याबरोबर चित्रकलेसाठी बसलो होतो! फरक इतका आहे की त्यावेळी मी आणि मोठ्या मुलाने मिळून चित्र काढलं होतं आणि ह्यावेळी धाकट्या मुलाने चित्र काढलं तर मी बाजूला बसलो होतो.   

तर, झालं असं की सध्या कोविडमुळे सगळे घरी अडकले आहोत आणि काही ना काही प्रकारे साकारात्मक काम करत राहायचा आपण सगळेच प्रयत्न करतोय. ब्रूक मेयर ह्या माझ्या एका सहकाऱ्याने एक विडीयो सीरिज सुरु केली ज्याद्वारे तो प्रत्येक भागात वेगळी वेगळी चित्रं काढण्याच्या सूचना टप्याटप्याने देतो.  शार्क, व्हेलं , ड्रॅगन असे वेगवेगळे आकार तो एकेका भागात दाखवतो. त्यापैकी शार्क कसा काढायचा ते पाहून आयुषने काढलेलं हे चित्रं . ब्रूक स्वतः युजर एक्सपिरियन्स डिझायनर आहे त्यामुळे तो अगदी साधे सोपे आकार काढत चित्र पूर्ण कसं करायचं ते दाखवतो. 

तो पेश है वो चित्र जिसे बने बस कुछ दिन हुए हैं! आमच्या चिरंजीवांनी  चित्र तर काढलंच आणि ते रंगवलंही. रंगवणं आणि कासव काढणं ह्या दोन्ही गोष्टी मूळ चित्रात नाहीत जे चिरंजीवांनी आपल्या मनाने केलं.  

Thursday, August 27, 2020

अंतरीचा डोह

बुद्धीची देवता गणपतीकडे मनाचे मागणे

वरून दिसले

कितीही भोवरे

अंतरीचा डोह

शांत राहो!

Thursday, July 9, 2020

कृतज्ञता

पाहता पाहता
कोविड पसरे
जगभर सारे
धास्तावले….

शहराचा पैस
आडवा तिडवा
पालिकेची सेवा
घरोघरी….

कुठे कुठे जाती
घडामोडींसाठी
वार्ता पोचविती
संजय जे….

कुटुंबाच्या आधी
लोकांसाठी धावी
काळ वेळ नाही
पोलिसांना….

इस्पितळांतून
रुग्ण शय्यांवर
यमाशी संगर
डॉक्टरांचा….

पंढरीला काही
गेलो नाही जरी
असा भेटे तरी
पांडुरंग`….
______________
(देवद्वार छंद)
______________

मधुरा वेलणकर -साटमचा सुप्रसिद्ध कार्यक्रम 'मधुरव'!   ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा विसावा भाग म्हणजे सांगता सोहळा. शुक्रवार, शनिवार, आणि रविवार असे तीन दिवस फेसबुक लाईव्ह ह्या माध्यमातून शेवटचे तीन भाग म्हणजे भाग मधुराने सादर केले. ह्या तीन भागात मुंबई महानगर पालिका, वार्ताहर, पोलीस , आणि डॉक्टर अशा चार क्षेत्रांचे प्रतिनिधी म्हणून त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींना तिने कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. इथे लिहिलेली कविता ही खरं तर मधुरवच्या सांगता सोहळ्यानिमित्त या चार क्षेत्रांत अहोरात्र काम करणाऱ्या सर्वाना कृतज्ञता म्हणून मी लिहिली आणि मधुराने ती खूप सुरेख अशी सादर केली.

तो कार्यक्रम इथे क्लिक करून पाहता येईल.
________________________________

Wednesday, April 8, 2020

हा काय खेळ आहे?


जावेद अख्तर.... बस्स नाम ही काफी है! 

जावेदसाहेबांची एक सुरेख कविता गेले काही दिवस मनात घुटमळत होती. त्या हिंदी कवितेला मराठी रूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न.  चूकभूल माफ असावी!  



हा काय खेळ आहे?



माझा प्रतिस्पर्धी त्याची चाल खेळलाय

आणि तो वाट बघतोय मी चाल करण्याची


पण मी कधीचा नुसता बघत बसलोय

काळ्या पांढऱ्या चौकटींत ठेवलेले

ते काळे पांढरे मोहरे….


मी  विचार करतोय

नक्की काय आहेत हे मोहरे

जर ह्या मोहऱ्यांना समजलो फक्त लाकडी खेळणी

तर हार काय आणि जीत काय

ना कशाची  गरज , ना कसलं महत्व

पण....

जिंकण्याची मजा नाही

आणि हरण्याचं दुःख  नाही

मग हा कसला खेळ



मी विचार करतोय की खेळायचं आहेच तर

आतल्या आवाजावर विश्वासून खेळावं

हे मोहरे आहेत खरोखरीचे राजा, प्रधान, शिपाई

आणि त्यांच्यासमोर ठाकलीय शत्रूची फौज

माझा नायनाट करायचा त्या फौजेचा इरादा पक्का आहे

अगदी असं जरी समजून चाललो तरी पण मग

हा खेळ म्हणजे खेळ कुठे राहतोय

हे तर आहे युद्ध, जे मला जिंकायचंय

आणि युद्धात सारं माफ असतं!



कुणी सांगतो मला

हे युद्धही  आहे, हा खेळही आहे

हे युद्ध आहे खेळाडूंचं

हा खेळ आहे युद्धासारखा



मी विचार करतोय की

शिपाई हा शिपाईच राहावा

राजा मात्र सुरक्षित राहावा

असा नियम ह्या खेळात का आहे

मन चाहेल त्या दिशेला जाण्याची

मुभा फक्त प्रधानाला

मी विचार करतोय की ह्या खेळात

असाही नियम का आहे

ज्यामुळे शिपाई घर सोडून पुढे निघाला की त्याला परतीचा मार्ग बंद आहे


मी विचार करतोय

जर हाच नियम आहे, तर नियम काय आहे?

जर हाच खेळ आहे, तर खेळ काय आहे?

ह्या सगळ्या प्रश्नांच्या गुंत्यात मी कधीचा अडकलोय 


माझा प्रतिस्पर्धी त्याची चाल खेळलाय

आणि तो वाट बघतोय मी चाल करण्याची
-----------------------------------------------

(मूळ हिंदी कविता 'मनभाया' ह्या ब्लॉगवर इथे वाचता येईल.)
------------------------------------------------
इथे असलेलं चित्र कुणी काढलंय ते माहिती नाही त्यामुळे श्रेय देऊ शकलो नाही पण वाचकांपैकी कुणाला माहिती असेल तर जरूर कळवा. 
------------------------------------------------
माझा मित्र राजेंद्र बापट ह्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती ज्यात त्याने हे चित्र आणि मूळ हिंदी कविता एकत्र आणले होते. ती कल्पना आवडली म्हणून मी त्या कवितेला मराठी रूप देण्याच्या प्रयत्न केला. धन्यवाद राजन!
----------------------------------------------------------