Saturday, September 11, 2010

एका तेलियाने

’शेख अहमद झाकी यामानी !’
नाव ऐकलंय? किंवा ऐकल्यासारखं वाटतंय ?

’एका तेलियाने’ हे पुस्तक वाचण्याआधी ’शेख अहमद झाकी यामानी’ या नावाशी कधी थेट संबंध आला नव्हता. सौदी अरेबिया, तिथली राजेशाही, तेलामुळे मिळणारा आणि ऐषोआरामासाठी पाण्यासारखा वाहणारा त्यांच्याकडचा पैसा ह्याबद्दल इथून-तिथून किस्से / कहाण्या ऐकल्या / वाचल्या होत्या. लंडनच्या नाइटक्लब्जमधे एकेका रात्रीत लाखो डॉलर्स उधळणाऱ्या राजपुत्रांबद्दलही वाचलं होतं.  (हो लाखो डॉ-ल-र्स उधळणारे !) पण ह्या सगळ्या चैनबाजीत कुठेही ’यामानी’ हे नाव ऐकल्याचे आठवत नव्हते. किंबहुना ते तसे ऐकले नव्हतेच ! मुळात यामानींना ’शेख’ जरी संबोधलं जातं तरी ते सौदी राजघराण्यातील नाहीयेत. (अगदी सौदी राजघराण्यातल्याही मोजक्या लोकांनाच ’शेख’ म्हणवून घेता येतं.) म्हणजेच सौदी राजघराण्याच्या परंपरेनुसार ते ’शेख’ नाहीयेत. मग या माणसात असं काय आहे म्हणून तो असा एकमेव माणूस असावा जो सौदी राजघराण्यातला नसूनही ’शेख’ म्हणवला जातो? या माणसात असं काय आहे म्हणून त्याच्यावर मराठीमधे स्वतंत्र (अनुवादित नाही !) पुस्तक निघावं ?

ह्या उत्सुकतेनेच श्री. गिरीश कुबेर ह्यांचं ’एका तेलियाने’ वाचायला घेतलं. पुस्तकाच्या पाठीमागे आणि पहिल्या प्रकरणाच्या सुरूवातीस यामानींबद्दल लिहिलेली संक्षिप्त माहिती पाहून तर उत्सुकता अजूनच ताणली गेली. नमुना म्हणून ह्या ओळी पहा –
>> हा आजारी पडला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्ह्यायची.
>> आत्ताआत्तापर्यत याचं नाव बातम्यांत नाही असा दिवस जात नव्हता.
>> एखाद्या सम्राटासारखा राहायचा. स्वत:च्या विमानातनं फिरायचा. ऐश्वर्यसंपन्न, तरीही निरासक्त.
>> कधीच कंटाळायचा नाही हा युक्तिवाद करायला. जे याला अमान्य आहे, ते पटवणं कठीण.
>> पण आता आपण या गावचेच नाही, असं आयुष्य तो जगतोय.

तर, असे हे यामानी हे १९६२ ते १९८६ इतकी वर्षे सौदी अरेबियाचे तेलमंत्री होते ! 
ह्या एका वाक्यात यामानींचे महत्व समजतं. असं म्हणतात की ’भगवान देता है तो छप्पर फाड के देता है !” देवाने सौदी अरेबियाला रखरखीत वाळवंट दिलं पण त्या वाळवंटाच्या पोटात एक प्रचंsssड मोठ्ठी जणू टांकसाळ ठेवली आणि ती म्हणजे -- तेल ! काळं सोनं !! Black Gold !!!
जगात जितके तेलसाठे आहेत त्यापैकी सर्वात मोठा साठा’सौदी अरेबिया’कडे आहे !

’तीळा तीळा दार उघड’ झाल्यावर त्या खजिन्यावर नियंत्रण ठेवणारा माणूस म्हणजे यामानी ! सौदी अरेबियाचे राजे फैझल ह्यांचा उजवा हात म्हणजे यामानी ! यामानींच्या सुदैवाने राजे फैझल हे सौदी अरेबियात(ही) स्त्रियांनी शिकावं अशी आकांक्षा धरणारे सुधारणावादी होते ! असं म्हणलं जातं की मध्यपूर्व आशियामधे जे वाद पराकोटीचे चिघळले आहेत ते तसे झालेत कारण राजे फैझल जगात नाहीयेत आणि यामानी आता तेलमंत्री नाहीयेत  ! काही माथेफिरूंसाठी यामानी इतका मोठा अडसर होते की कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी कार्लोस (’द जॅकल’) ह्याने जेव्हा वेगवेगळ्या देशांच्या तेलमंत्र्यांचे ’ओपेक’च्या कार्यालयातून अपहरण केले होते तेव्हा यामानींना ठार करावे अशी त्याला स्पष्ट सूचना दिली गेली होती!

सौदी अरेबियाचे अतिशय कार्यक्षम तेलमंत्री असणं हे जितकं महत्वाचे तितकंच मोठं यामानींचं अजून एक कार्य म्हणजे ते ’ओपेक’ आणि ’ओआपेक’ ह्या संघटनांचे पस्तीस वर्षांहून अधिक काळ सूत्रधार होते. तेल उत्पादन करणारे देश (’ओपेक’) आणि तेल उत्पादन करणारे अरेबियन देश (’ओआपेक’) ह्या दोन संस्थांसाठी यामानींनी भरपूर काम केलंय. अमेरिका, इंग्लंड, व्हेनेझुएलापासून ते पार रशिया, भारत, चीन, अरब राष्ट्रे ह्या सगळ्यांना यामानींचं महत्व पक्कं माहिती होतं.

’एका तेलियाने’ वाचताना एका नजीकच्या इतिहासाची इतकी मस्त सफर घडते सांगतो.  आपण एखादी छान रहस्यमय कादंबरी वाचतोय असं वाटतं. मला तर वाटलं की शाळेतली इतिहासाची पुस्तकं अशी लिहिली गेली असती तर मुलांनी सनावळ्या आणि तहाची कलमं पाठ करण्यात बालपण खर्ची घातलं नसतं ! ’इतिहास’ हा रंजक विषय झाला असता !

श्री. गिरीश कुबेर ह्यांनी तपशील आणि कहाणी ह्याची योग्य सांगड घालून एक मस्त पुस्तक लिहिलं आहे. पत्रकारितेच्या व्यवसायातले गिरीश कुबेर ह्यांनी ’एका तेलियाने’ लिहायच्या आधी ’तेल’ ह्या विषयाबद्दल अजून एक पुस्तक लिहिले आहे. ’एका तेलियाने’ मला इतकं आवडलं की आता ते पहिलं पुस्तक वाचायची उत्सुकता आहे.  ते पुस्तक  म्हणजे ’हा तेल नावाचा इतिहास आहे’ !