Friday, July 18, 2008

पानसेबाई

“अरे व्वा ! शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच ‘चेंगट’ किंवा ‘शुंभ’ म्हणाल्या नाहीयेत !”

पानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी !!

कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखऱ्या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं !

आमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू? अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही. त्यांच्या आवाजाला एक नादमय गोडवा होता. मुख्य म्हणजे वाणी अगदी स्पष्ट होती. खरंतर त्यांची निवृत्ती काही वर्षांपलीकडेच उभी होती, पण ती जाणीव फक्त चेहऱ्यावरच्या काही सुरकुत्यांना आणि केसांच्या चांदीला होती. त्या केसांचा नीट बसवलेला छोटा अंबाडा बांधायच्या आणि ह्या सगळ्या वर्णनाला योग्य अशी नऊवारी साडी नेसायच्या. नऊवारी साडीमुळे तर त्या आम्हाला शाळेत शिकवणाऱ्या आजीच वाटायच्या ! त्यांच्या हाती एक छोटी कापडी पिशवी असायची.

पानसेबाईंच्या शिकवण्याबद्दल तर काय सांगू? म्हणायच्या जे आवडेल ते आधी कर ! त्या सगळ्या मुलांच्या पालकांना एक आवर्जून सांगायच्या की मुलं अभ्यास करतात हो, फक्त त्यांना गोडी लागायला पाहिजे. ती गोडी कशी लागेल तेव्हढं आपण बघायचं. तेव्हा नीट कळायचं नाही पण आता समजतं की किती मोठी गोष्ट त्या सोप्या भाषेत सांगायच्या. नुसत्या सांगायच्या नाहीत तर आमच्याबरोबर रोज जगायच्या. ‘तारे जमीन पर’ बघताना पानसेबाईंची खूप आठवण आली. त्यातला ‘राम शंकर निकुंभ’तरी वेगळं काय म्हणत होता? मुलांचं शक्तिस्थान नीट वापरलं तर त्याचा उपयोग इतर ठिकाणीही करता येतो !!!

एखादा मुलगा खिडकीतून बाहेर बघत बसला असेल तर थोडा वेळ त्याला तसंच बघू द्यायच्या. उगाच ओरडून त्याची तंद्री भंग नाही करायच्या. मग त्याच्या जोडीला सगळ्या वर्गालाच बाहेर बघू द्यायच्या. झाडावरचा एखादा पक्षी दाखवायच्या. मोकळ्या मैदानापलीकडल्या रस्त्यावरून धावणारी लालचुटूक बस दाखवायच्या. मग बोलता-बोलता अलगद सगळ्यांचं लक्ष, त्या जे काही वर्गात शिकवत असतील त्याकडे, वळवायच्या. खिडकीबाहेर बघायला सुरूवात केलेला मुलगाही आपोआप परत मनानेही वर्गात यायचा !

लहानपणी आपण खूपदा ऐकतो की अक्षर कसं मोत्याच्या दाण्यासारखं हवं ! पानसेबांईंचं अक्षर तसंच होतं … मोत्याच्या दाण्यासारखं ! नुसतं वहीतलंच नाही तर फळ्यावर लिहिलेलंसुध्दा !! बरेचदा असं दिसतं की फळ्यावर लिहिताना अक्षर नीट येत नाही. काहीजण टेकडी चढतात तर काही टेकडी उतरतात !!! काहींचं अक्षर लहान आकारापासून सुरू होतं ते मोठं होत जातं ! काहींचा हत्ती निघतो आणि पूर्णविरामापाशी मुंगी पोचते !!! सलग एका ओळीत, एका मापाची अक्षरं लिहू शकणारे कमीच ! पानसेबाईंना फळ्यावर लिहिताना पाहूनच शिकलो की, पेनने वहीवर लिहिताना, पेन धरलेला हात आपण वहीवर टेकवतो पण फळ्यावर हात टेकवायचा नसतो .. फक्त खडू टेकवायचा आणि लिहायचं !

मला वाटतं पानसेबाई सगळ्या मुलांना खूप आवडायच्या त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्या प्रत्येकातलं वेगळेपण शोधायच्या, जपायच्या आणि जोपासायच्याही. माझ्यापुरतं सांगायचं तर पानसेबाईंनी बहुतेक लगेच ओळखलं की ह्याला अभ्यास करण्यापेक्षा पुस्तकं वाचायला आवडतं आणि धड्यातली उत्तरं पाठ करण्यापेक्षा भाषणाचं पाठांतर आवडतंय. वक्तृत्वस्पर्धा आणि नाटकांमधे भाग घेण्यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं. कधी त्यांना मोकळा तास असला तर स्वत: जरा आराम करण्याऐवजी नाटक, भाषण असली खुडबूड करणाऱ्या आम्हा पोरांवर मेहनत घेत बसायच्या.

मला आठवतंय त्या वर्षी शाळेच्या गॅदरिंगला त्यांनी मला ‘सिंहगडचा शिलेदार’ असं भाषण दिलं होतं. ते शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं स्वगत अशा प्रकारचं होतं. भाषण पाठ करून घेणं आणि आवाजातले चढ-उतार ह्यावर शाळेत पानसेबाईंनी आणि घरी आईने जातीने लक्ष दिलं होतं. माझी आईसुद्धा शिक्षिका असल्याने शाळेत आणि घरीही शिक्षिकांचं जातीनं लक्ष होतं. आईनं खूप हौसेनं मावळ्याचा पांढरा ड्रेस, कमरेला शेला, खोटी तलवार, डोक्यावर आडवी पगडी वगैरे असं सगळं आणलं होतं. मिशीच्या जागी पेन्सिलने रेष काढली होती. कॉलेजमधे नंतर पुरूषोत्तम करंडक वगैरे केलं पण स्टेजमागच्या खोलीत मेक-अप करताना छातीचे ठोके आपसूक वाढण्याचा पहिला अनुभव म्हणजे ते मावळ्याचं स्वगत !

स्टेजवर गेल्यावर समोर बसलेले असंख्य चेहरे बघून पहिले काही सेकंद बोबडीच वळली ! सगळ्या चेहऱ्यांचा मिळून एक मोठ्ठा चेहरा समोरच्या अंधारातून आपल्याकडे बघतोय असं वाटायला लागलं !! शरीराचा तोल एका पायावरून दुस़ऱ्या पायावर अशी अस्वस्थ चुळबूळ सुरू झाली, छातीचे ठोके माईकमधून सगळ्यांना ऐकू जातायत असं वाटायला लागलं, दोन्ही हाताच्या तळव्यांना दरदरून घाम..! भरीत भर म्हणून, पाठांतराच्या कप्प्यावर, मेंदूनं विस्मृतीचं आवरण घालून ठेवलं !! थोडक्यात म्हणजे फजितीची पूर्वतयारी झाली होती !!

अस्वस्थपणे भिरभिरत्या नजरेला विंगमधल्या पानसेबाई दिसल्या. त्यांच्यातल्या आजीने नेहमीचं, ओळखीचं स्मित दिलं. त्या नजरेतल्या विश्वासाने धीर दिला, हुरूप वाढला !! हिंदी सिनेमात कसं… मारामारी संपली की पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं ना तसं काहीतरी डोक्यात झालं. समोर कुणीच दिसेनासं झालं आणि मोकळ्या जागेत शाळेतल्या खुर्चीवर बसून पानसेबाई नेहमीसारख्या भाषणाची तयारी करून घेतायत असं वाटलं. “आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो” हे भाषण सुरू करण्याआधीचे शब्द आठवले !(एकदम टिपीकल शाळकरी बरं का !!) त्यानंतर साधारण पाच मिनिटे माझ्यपुरतं घड्याळ थांबलं होतं..आपण काहीतरी बोलतोय एवढंच जाणवत होतं. मग आठवतोय तो एकदम टाळ्यांचा आवाज आणि पाठीवरून फिरणारा पानसेबाईंचा हात ! नेहमीसारखाच… आश्वासक नि अभिमानपूर्वक !! ‘भीड चेपणं’ किंवा ‘स्टेज फ्राईट जाणं’ ज्याला म्हणतात ना ते त्या दिवशी घडलं !

पुढच्या वर्षी चौथीत गेल्यावर शिक्षिका बदलल्या आणि पाचवीपासून तर माध्यमिक शाळा झाली. नंतर कधीतरी पानसेबाई जाता-येताना भेटायच्या पण मग त्या निवृत्तही झाल्या.

नवीन दिवस उगवताना जुने दिवस मावळत असतात. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ हा विचार खूपदा मनात यायचा पण त्याचा आचार कधी झालाच नाही. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ ! कॉलेज, मित्र-मैत्रिणी, करियरची तयारी, नोकरी … ठराविक टप्यांप्रमाणे वेग घेत गाडी चालू राहिली. एखाद्या स्टेशनवर घटकाभर थांबून पानसेबाईंची विचारपूस राहूनच गेली. काही वर्षांपूर्वी समजलं पानसेबाई गेल्या ! देवासारख्या आल्या होत्या, त्याच्याकडेच परत गेल्या !! मनातली बोच अजून तीव्र झाली !!

असं म्हणतात युधिष्टिराला यक्षाने विचारलं होतं की मनुष्याच्या जीवनातली सगळ्या विचित्र गोष्ट कुठली? युधिष्टिर म्हणाला की आपण एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे. गोष्ट अशीच काही आहे ना? चूकभूल घ्यावी पण मतितार्थ तोच. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ ह्यातलं ‘एकदा’ कधीतरी जमवायलाच हवं होतं.

एक वर्ष.. फक्त एकच वर्ष पानसेबाई मला शिकवायला होत्या पण काय देऊन गेल्या ते सांगता येत नाही ! बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो !!!
---
गुरुपौर्णिमा - २००८
---