Wednesday, April 8, 2020

हा काय खेळ आहे?


जावेद अख्तर.... बस्स नाम ही काफी है! 

जावेदसाहेबांची एक सुरेख कविता गेले काही दिवस मनात घुटमळत होती. त्या हिंदी कवितेला मराठी रूप देण्याचा हा छोटासा प्रयत्न.  चूकभूल माफ असावी!  



हा काय खेळ आहे?



माझा प्रतिस्पर्धी त्याची चाल खेळलाय

आणि तो वाट बघतोय मी चाल करण्याची


पण मी कधीचा नुसता बघत बसलोय

काळ्या पांढऱ्या चौकटींत ठेवलेले

ते काळे पांढरे मोहरे….


मी  विचार करतोय

नक्की काय आहेत हे मोहरे

जर ह्या मोहऱ्यांना समजलो फक्त लाकडी खेळणी

तर हार काय आणि जीत काय

ना कशाची  गरज , ना कसलं महत्व

पण....

जिंकण्याची मजा नाही

आणि हरण्याचं दुःख  नाही

मग हा कसला खेळ



मी विचार करतोय की खेळायचं आहेच तर

आतल्या आवाजावर विश्वासून खेळावं

हे मोहरे आहेत खरोखरीचे राजा, प्रधान, शिपाई

आणि त्यांच्यासमोर ठाकलीय शत्रूची फौज

माझा नायनाट करायचा त्या फौजेचा इरादा पक्का आहे

अगदी असं जरी समजून चाललो तरी पण मग

हा खेळ म्हणजे खेळ कुठे राहतोय

हे तर आहे युद्ध, जे मला जिंकायचंय

आणि युद्धात सारं माफ असतं!



कुणी सांगतो मला

हे युद्धही  आहे, हा खेळही आहे

हे युद्ध आहे खेळाडूंचं

हा खेळ आहे युद्धासारखा



मी विचार करतोय की

शिपाई हा शिपाईच राहावा

राजा मात्र सुरक्षित राहावा

असा नियम ह्या खेळात का आहे

मन चाहेल त्या दिशेला जाण्याची

मुभा फक्त प्रधानाला

मी विचार करतोय की ह्या खेळात

असाही नियम का आहे

ज्यामुळे शिपाई घर सोडून पुढे निघाला की त्याला परतीचा मार्ग बंद आहे


मी विचार करतोय

जर हाच नियम आहे, तर नियम काय आहे?

जर हाच खेळ आहे, तर खेळ काय आहे?

ह्या सगळ्या प्रश्नांच्या गुंत्यात मी कधीचा अडकलोय 


माझा प्रतिस्पर्धी त्याची चाल खेळलाय

आणि तो वाट बघतोय मी चाल करण्याची
-----------------------------------------------

(मूळ हिंदी कविता 'मनभाया' ह्या ब्लॉगवर इथे वाचता येईल.)
------------------------------------------------
इथे असलेलं चित्र कुणी काढलंय ते माहिती नाही त्यामुळे श्रेय देऊ शकलो नाही पण वाचकांपैकी कुणाला माहिती असेल तर जरूर कळवा. 
------------------------------------------------
माझा मित्र राजेंद्र बापट ह्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती ज्यात त्याने हे चित्र आणि मूळ हिंदी कविता एकत्र आणले होते. ती कल्पना आवडली म्हणून मी त्या कवितेला मराठी रूप देण्याच्या प्रयत्न केला. धन्यवाद राजन!
----------------------------------------------------------

2 comments:

Anonymous said...

Very well done Sandeep. -Sanjiv

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.