Thursday, July 29, 2021

बटवा

"माजलेत सगळे स्साले! एक तर भीक मागतात आणि वर जोर दाखवतात! 
बाई होती आणि ते पण म्हातारी म्हणून चडफडाट झाला तरी  गप्प बसलो!"

अनिकेत घरात आला तोच असा तणतणत!  भर दुपारची वेळ, उन्हाने डोकं आधीचा भणभणत होतं आणि त्यात हे नाटक झालं. किचनमधून आई आणि बायको दोघीही बाहेर आल्या. दोघींनाही कळेना की ह्याला एकदम काय झालं?

अनिकेत तिरीमिरीत पायातले शूज काढून सोफ्यावर बसला. बायको पटकन पाणी आणायला आत गेली आणि आई त्याच्याजवळ येऊन बसली. 

आईच्या मनात विचार आला की हा लहान होता तेव्हापासून असाच. एक तर शक्य तो चिडणार नाही पण  चिडला की मात्र धुसफुसत राहणार.  आईच ती! तिला तर माहिती होतंच पण आता बायकोलाही माहिती झालं होतं की अशावेळी त्याला पाणी किंवा कोकम सरबत देऊन थोडा वेळ काहीही न बोलता जाऊ देणं आवश्यक असतं. 

शेजारी त्याचा नाईन अँड थ्री क्वार्टर्स वयाचा मुलगा खेळत होता. हॅरी पॉटरचा पहिला भाग पाहिल्यापासून अनिकेतचा जवळपास दहा वर्षांचा मुलगा स्वतःचं वय असंच सांगायचा -- नाईन अँड थ्री क्वार्टर्स! त्याचे लेगो ब्लॉक्स एकमेकांवर रचतानाचा हलका क्लिक असा आवाज सोडला तर बाकी घर शांत होतं. थोडा  वेळ शांततेत गेल्यावर अनिकेतची बायको म्हणाली, "हं, आता सांग नक्की काय झालं?"

शेवटी एकदाचा अनिकेत जरा नीट बोलायला लागला. "अगं, मगाशी सगळी कामं करायला बाहेर पडलो होतो ना ती सगळी कामं झाली. बँकेचंही काम झालं आणि ज्या काही सह्या वगैरे पाहिजे होत्या त्या करून झाल्या. आपल्या ड्रायवरला म्हणालो की चल आता घरीच जाऊ. आता दुपार म्हणजे तुला तर माहितीच आहे टिळक रोडवर किती गर्दी असते. त्यात एक जण कुणी सरळ चालवेल तर खरं, सगळेच जसे बाजीराव आणि सगळेच जणू घोडयावर!" 

आई उघड हसली नाही पण तिला नकळत हसू आलं. हे एक अजून अनिकेतचं म्हणजे सांगायचा मुद्दा येईपर्यंत त्याची गोष्ट चार ठिकाणी फिरून येणार! 

"तर, सिग्नलला गाडी थांबली होती. मी फोनवर काही तरी वाचत होतो तेव्हड्यात खिडकीवर टकटक झाली. पाहिलं तर एक म्हातारी भिकेसाठी उभी होती. सिग्नल नुकताच लाल झाला होता त्यामुळे गाडी लगेच निघणारही नव्हती. तिच्या हातातला रिकामा बटवा मला दाखवत ती सारखी म्हणत होती - काय तरी दे रे बाबा. गाडीतला आहेस, रस्त्यावरच्याकडे बघ रे बाबा! काय धा पाच देशील ते दे पण सकाळपासून हा बटवा रिकामा हे. तू तरी बोहनी कर. काय पण दे पण काय तरी तर दे रे बाबा!"

"मी नेहमीसारखं कारचं ग्लोव्ह कंपार्टमेंट उघडलं की तिला ग्लुकोज बिस्किटांचा पुडा देईन. आज नेमका पुडा नव्हता, परवा एकदा कुणा भिकाऱ्याला पुडा दिल्यावर दुसरा पुडा गाडी ठेवायचा राहिला असं दिसतंय. मग मी गडबडीत खिसे चाचपडले. सिग्नल सुटायच्या आधी खिशातली जी नोट हातात येईल ती देईन असं ठरवलं. हातात जी नोट आली ती नेमकी पाचशेची. आपला ड्रायवर बघतच राहिला. अहो सर! काय करताय? असं तो म्हणेपर्यंत मी पाचशेची नोट त्या बाईला दिलीसुद्धा! " 

"अरे ठीक आहे ना! तूच ठरवलं होतंस ना की जी नोट हातात येईल ती द्यायची मग आता कसला त्रास होतोय?" बायको समजूत घालत होती आणि आईही मानेने दुजोरा देत होती. अनिकेतनं अजून दोन - तीन घोट पाणी पिऊन घेतलं. तेव्हा पुन्हा एकदा फक्त लेगो ब्लॉक्सचा क्लिक क्लिक आवाज येत होता.

"आता सांगतो का चिडलोय ते!  त्या बाईने पाचशेची नोट हातात घेतली, एकदा ती नोट पाहिली, मग माझ्याकडे पाहिलं आणि आणि काय केलं असेल? तिने कारच्या उघड्या खिडकीतून चक्क तो बटवा माझ्या अंगावर भिरकावला आणि ती बाजूच्या गल्लीत निघून गेली. पाचशे रूपये दिले ह्याचं वाईट नाही वाटत पण तिने रिकामा बटवा दाखवून मला सरळ सरळ फसवलं त्याचा येतोय! इतका कसा मी गंडलो ते कळत नाहीये!"

"पण बाबा, तू कशाला चिडतोस?"  लेगो खेळण्यात रमलेला छोटा मुलगा असं म्हणाल्यावर आई, बायको, आणि अनिकेत तिघंही चमकले. तो बाजूला खेळतोय हे जणू सगळे विसरलेच होते. एकीकडे लेगो खेळतानाच तो मुलगा म्हणाला, "मे बी डू यु थिंक की तो बटवा त्या बेगर बाईसाठी लकी होता आणि तू इतके पैसे एकदम दिलेस म्हणून हॅप्पी होऊन त्या बाईने तुला बटवा गिफ़्ट देऊन टाकला? ती इतकी हॅप्पी झाली की तिने तिचं आजचं आणि नेक्स्ट काही डेजचं सगळं लक तुला दिलंय!"

"पाहिलंस अनिकेत! छोट्यांच्या तोंडी देव बोलतो ते असं!" आई म्हणाली आणि ती देवापुढे साखर ठेवायला गेली. मगाशी तिरीमिरीत अनिकेतने सोफ्यावर फेकलेल्या बटव्याकडे अनिकेत आणि बायको बघतच राहिले!

3 comments:

Priya Tembhekar said...

छान लिहिलं आहेस 👍

Anonymous said...

Very nice! Is it going to be continued?? ~ Partha

Asli said...

सुंदर 👌