Monday, February 16, 2009

श्रावण शृंगार

मालवून टाक दीप
चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात लाभला निवांत संग

कै. सुरेश भटांचे अजरामर गीत.
मध्यंतरी बोलता बोलता ह्या गीताचा विषय निघाला. तेव्हापासून हे गीत, वृत्ताचे नियम वगैरे मनात रेंगाळत राहिले. शेवटी एकदाची ही गझल कागदावर उतरली.

ही गझल लिहायला सुरूवात केल्यावर खऱ्या अर्थाने अनुभवलं की भटसाहेबांनी किती नजाकतीची कलाकुसर अगदी सोपी वाटावी अशी लिहून दाखवली आहे !

ही गझल म्हणजे माझी आदरांजली, भटसाहेबांना आणि त्यांच्या लेखणीला.
-------------------------------------------------------------------------------
धूप छाव खेळ सांजवेळ श्रावणात आज
सांजवेळ आणि गात्र गात्र यौवनात आज…. १

शिंपतात प्रेमरंग कृष्णमेघ, वात, थेंब
मोरपीस होय चिंब चिंब पावसात आज…. २

पाहिलीस वाट गं भिजून तू दवात रोज
भेटलो तुला नि शांत शांत मन्मनात आज… ३

भेटते वसुंधरा तिथेच सागरास जेथ
गुंजतेय गाज ऐक ऐक पैंजणात आज…. ४

बैसलो इथे कधीतरी तुझी घडेल भेट
भेटलीस आणि गंध गंध अत्तरात आज…. ५

लाजतेस तू सखे भिजून पावसात चिंब
घे टिपून लाज थेंब थेंब सांगतात आज…६

घे सुखाकडून ही मिठीच, सोड प्रश्न व्यर्थ
माग श्वासगंध धुंद धुंद जीवनात आज…. ७

राहिले उसासलेच दोन जीव फार काळ
मालवून दीप, रात्र रात्र मीलनात आज… ८

Friday, February 6, 2009

अजितकाका

“बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचा अजित सोमण लाडका बासरीवादक होता”

esakal.com वाचताना, वर दिलेल्या ओळीतला ‘होता’ हा भूतकाळ दर्शवणारा उल्लेख खटकला. मनात शंकेची पाल चुकचुकली…. पण म्हटलं, “हॅ ! तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून !”

दुर्दैवाने काही शंका खऱ्या ठरतात ! ‘निरपेक्ष वृत्तीचा अजित’ या सुधीर गाडगीळांच्या लेखातून समजलं – अजितकाका न परतीच्या प्रवासाला गेले ! इथे सुरूवातीला दिलेले वाक्य त्याच लेखातले.

अजितकाकांशी पहिली भेट झाली तेव्हा मी post graduation करत होतो आणि छंद म्हणून ‘बासरी’ शिकत होतो. कटारिया हायस्कूलमधले काळे सर हे अजितकाकांचे मित्र. त्यांनी मला अजितकाकांना भेटायला सांगितलं. एका सकाळी अजितकाकांची अपाँईंटमेंट घेऊन त्यांच्या घरी पोचलो.

तोपर्यंत अजित सोमण हे नाव पेपरमधे वगैरे वाचून परिचयाचं होतं. प्रसिद्ध माणसाला भेटायला जाताना छातीत जी धडधड होते ती वाढली होती. टिळक रोडवर एका दुमजली बंगल्यात वरच्या बाजूला अजितकाकांचं घर ! मनाचा हिय्या करून दार वाजवलं. दरवाजा उघडल्यावर पहिलेछूट काय जाणवलं तर अजितकाकांचं प्रसन्न हसणं. डोक्यावर मागच्या बाजूने वळवून नीट भांग पाडलेले केस, समोरच्या बाजूल थोडे विरळ झाले होते. दोन्ही डोळ्यांखाली काळी वर्तुळं – सततची जाग्रणं आणि कार्यक्रमांची धावपळ दर्शवत होती. ओठांवर मिशीची अगदी कोरीव अशी बारीक रेघ. अत्यंत शांत आवाजालं बोलणं. बस्स …अजितकाका एकदम आवडले… आता प्रश्न होता ते मला शिकवतील का?

चहा घेताना त्यांनी काही जुजबी प्रश्न विचारले. मग म्हणाले, “थोडं वाजवून दाखवणार का?” अग्गगग ! त्या दिवशी मी जे काही वाजवून (!) दाखवलं होते ते आता आठवलं तरी अंगावर काटा येतो! पण मी मूर्तिमंत सज्जनपणासमोर बसलो होतो. ते न चिडता म्हणाले, “पुढच्या आठवड्यापासून सुरूवात करू.”

अजितकाका म्हणजे अक्षरश: सज्जन माणूस… खरंच दुसरा शब्दच नाही. मला म्हणाले होते की कार्यक्रमांमुळे, रेकॉर्डिंगमुळे वगैरे माझ्या वेळा नक्की नसतात त्यामुळे तुला शिकवण्याचा एक दिवस किंवा एक वेळ असं सांभाळता येणार नाही. कधी एकाच आठवड्यात आपण दोन/तीनदा बसू किंवा कधी पूर्ण महिन्यात एकदाही नाही ! मला ‘सर’, ‘गुरूजी’ वगैरे काही म्हणू नकोस … म्हटलं मग अजितकाका म्हणू का? तर म्हणाले होते, “चालेल.” (नंतर कधीतरी समजलं होतं की अजितकाका इंग्लिशचे प्राध्यापक होते. तरी स्वत:हून म्हणत होते ‘सर’ म्हणू नकोस !) सर्वांत महत्वाचं म्हणजे ते म्हणाले होते मी शिकवण्याची फी / पैसे वगैरे काही घेणार नाही. बासरीवादनाबद्दल माझ्याकडे जेवढं आहे तेवढं द्यायचा प्रयत्न करीन; तुला आवडेल ते घे.
(खरंतर त्यांनी म्हणायला हवं होतं – तुला ‘झेपेल’ ते घे !!)
त्यानंतरची ३-४ वर्षे, जेव्हा कधी ते शिकवायचे, ती सकाळ म्हणजे आनंद सकाळ असायची.

मी साडे-आठ / नऊच्या सुमारास त्यांच्या घरी जायचो. कोवळी उन्हं दरवाजातून खोलीत डोकवायची आणि ऊब पांघरायची. समोरासमोर दोन खुर्च्यांवर बसून आम्ही वाजवायचो. पहिल्या दिवशीच काकांनी एक लांबट आकाराची लाकडी पेटी काढली. छान शिसवी लाकडाची. पेटी उघडली तर आतमधे मखमली मऊसूत कापडावर जपून ठेवलेल्या बासऱ्या. निरनिराळ्या आकारांच्या, निरनिराळ्या सुरांच्या बासऱ्या ! हातभर लांब बांबूपासून ते अगदी वीतभर लांब – अशा वेगवेगळ्या आकारांच्या बासऱ्या.

माझ्या बासरीच्या स्केलप्रमाणे योग्य बासरी त्यांनी पेटीतून घेतली आणि म्हणाले, “मी वाजवतो तसं... माझ्यापाठोपाठ वाजव.” (आँ ! म्हणजे काय ? नोटेशन सांगणार नाहीत? आता आली ना पंचाईत ! ठीक आहे यार... काहीतरी डोकं वापरूच.) अजितकाका हाडाचे शिक्षक होते. त्यादिवशी वाजवणं थांबल्यावर मला मिस्कीलपणे म्हणाले, “सुरूवात चांगली झालीय. पुढच्या वेळेपासून शक्यतो माझी बोटं बघून वाजवू नकोस; सूर ऐकून वाजव !”


त्यानंतर मग मी अधून मधून त्यांना फोन करून विचारायचो – आज येऊ का? काकू फोनवर सांगायच्या, “ते पहाटे अडीच / तीनला आलेत रेकॉर्डिंगहून… झोपले आहेत; उठवू का?” अजितकाकांना उठवायला जीवावर यायचं; मी नको म्हणायचो. एखाद्या दिवशी काकू म्हणायच्या, “त्यांनी सांगितलंय उद्या ये म्हणून” – की मी बासरी पाठुंगळीचा लटकवून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे हजर ! उबदार सकाळी, वाफाळता चहा घेऊन आमचं वाजवणं सुरू व्हायचं. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधूनही इतकं शिकायला मिळायचं – बासरीबद्दलच असं नाही; एकंदरच आनंदात जगण्याबद्दल !

अजितकाका म्हटलं की तीव्रतेने आप्पांची आठवण होते. ‘सज्जनपणा’, ’समोरच्या माणसाच्या आवडीच्या विषयांवर गप्पा करत त्याला आपलंसं करणं’, ‘सगळ्यांना आनंद वाटण्याची वृत्ती’ अशा अनेक गोष्टी शिकण्यासाठी ही आदर्श माणसं! सुदैवाने एक माझे वडील होते आणि दुसरे माझे गुरू ! दुर्दैवाने दोघंही, त्यांच्या, वयाच्या ६२ वर्षांच्या आसपास गेले.
‘त्याला’ नक्की कसली घाई असते म्हणून ‘तो’ अशा माणसांना लवकर बोलावून घेतो? !!!

स्वत:च्या मनाने वाजवायचा प्रयत्न केल्याचा एक खूप मोठा फायदा असा झाला की स्वत:च्या आनंदापुरतं वाजवता येऊ लागलं. कधी एकटं असताना मूड लागला की बासरी घेऊन बसायचो. वाजवणारा मी आणि ऐकणाराही मीच ! दुसरं म्हणजे काका ’तोडी’, ’देस’, ’जैत’, ’हंसध्वनी’, ’भैरवी’ अशा वेगवेगळ्या रागांमधलं काही ना काही वाजवायला प्रोत्साहन द्यायचे. मी म्हणायचो, “काका ! भैरवी? अहो इतके सगळे कोमल सूर वाजवता येतील का मला?” ते म्हणायचे, “प्रयत्न तर करू… आज नाही जमलं तर उद्या जमेल !”

त्यांची सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे – घाई करू नकोस ! एक एक स्वर खूप वेळ वाजवता आला पाहिजे मग द्रुत गतीत वाजवणं जमेल. थोडक्यात -- धावण्याआधी चालायला शीक आणि चालण्याआधी उभं रहायला !

अजितकाकांना शक्य होतं आणि तरीही त्यांनी शिकवणं टाळलंय असं कधी म्हणजे कधीच झालं नाही. खरंतर कार्यक्रम, रेकॉर्डिंग, जाहिरातींच्या जिंगल्स / कॉपी लिहिणं, शास्त्रीय संगीताच्या सीडींमधल्या वेष्टणाच्या कागदावर रागांची माहिती लिहून देणं, असे बरेच व्याप त्यांच्यामागे होते. थोडा रिकामा वेळ ते इतर कशासाठी तरी, त्यांच्या घरच्यांसाठी वगैरे वापरू शकले असते पण जमेल तसं, जमेल तेव्हा मला शिकवायचे. म्हटलं ना – सज्जन माणूस, दुसरा शब्द नाही !

एकदा आम्ही वाजवत असताना माझ्या एका बासरीला matching स्वराची बासरी त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी एक बासरी घेतली. माझ्या बासरीचा ‘षडज’ त्यांच्या बासरीच्या ’पंचम’शी जुळला ! तो ’पंचम’ त्यांनी त्यांचा ‘षडज’ मानला ! माझ्या बासरीच्या सगळ्या सुरांशी, त्या ‘मानलेल्या’ षडजापासून पुढे, जुळवून घेत आमचं वादन सुरू. मला म्हणाले, “तू बिनधास्त नेहमीसारखा वाजव, काळजी करू नकोस !”

एकदा सकाळी आम्ही वाजवत असताना मिलिंद दाते तिथे आला होता. मिलिंद साक्षात हरिजींचा शिष्य ! मिलिंद आणि अजितकाका एकत्र वाजवायला लागले. त्या दिवशी मी जे बासरीवादन ऐकलंय ना ते इथे शब्दांत सांगताच येणार नाही. अजितकाका आणि मिलिंद तल्लीन होऊन एक से एक सुरावटी वाजवत होते आणि त्या खजिन्याचा एकमेव मालक -- मी !

अजितकाका स्वत:बद्दल कधीच बोलायचे नाहीत; म्हणजे मी असं केलं, मी तसं करणार आहे, मी स्टेजवर अमक्याला फाडला वगैरे काही म्हणजे काहीच नाही ! एकदा असंच त्यांच्याकडे सकाळी गेलो होतो. वाजवणं वगैरे झाल्यावर त्यांना विचारलं की उद्यापासून सवाई गंधर्वला जाणार आहात का? तर हो म्हणाले होते. पं. बिरजू महाराज आणि साथीला उ. झाकीर हुसेन असा कार्यक्रम होता ! स्टेजवर बघतोय तर इतर साथीदारांमधे बासरीवादक म्हणून अजितकाका ! म्हटलं, “धन्य आहे !” तो कार्यक्रम नुसता विंगेतून बघायला मिळतोय म्हटलं असतं तरी एखाद्याने चार मित्रांना सांगितलं असतं की बघ मी उद्या स्टेजजवळ असणार आहे ! अजितकाका तर चक्क साथीला होते !!

अमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा अजितकाकांशी भेट झाली ती शेवटची. प्रत्येक भारत भेटीत ठरवायचो की या वेळी तरी अजितकाकांना नक्की भेटायचं पण…राहून जायचं… पुढच्या वेळी भेटू म्हणत ! कधी लक्षातच आलं नाही की ’पुढची वेळ’ अशी काही नसतेच. आला क्षण आपला..बस्स !

या वेळी पुण्याला गेलो होतो तेव्हा चंद्रकांत काळेकांकाबरोबरच्या धावत्या भेटीत त्यांच्याकडून अजितकाकांचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. काय योगायोग आहे… अजितकाकांशी पहिली भेट ज्यांच्यामुळे झाली त्यांचं नाव प्रमोद काळे आणि फोनवर शेवटचं बोलणं ज्यांच्यामुळे झालं त्यांचं नाव चंद्रकांत काळे… एकच आडनाव !

दोन-तीन आठवड्यांपूर्वीच अजितकाकांशी फोनवर बोलणं झालं होतं. सकाळी ऑफिसला जाताना गाडीतून निवांतपणे काकांशी गप्पा झाल्या. इतक्या वर्षांनी बोलताना त्यांना काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. बासरीवादनात खूप म्हणजे खूपच मोठा खंड पडलाय हे सांगताना अपराधी वाटत होतं पण ते म्हणाले कविता, लेखन वगैरे करणं चालू आहे ना मग बास ! मी आपला लहान मुलासारखा काय काय सांगत होतो – नोकरी, BMM अधिवेशन, नवीन वाचलेलं पुस्तक, लेखनाचे प्रयत्न, कविता असं बरंच काहीबाही. त्यांनी तितक्याच उत्साहाने ब्लॉगचा पत्ता, माझा इमेल पत्ता वगैरे लिहून घेतला आणि म्हणाले मी तुझा ब्लॉग नक्की वाचेन. पण पूर्ण वेळात एकदाही म्हणाले नाहीत की ते स्वत: किती आजारी होते. माझ्या लेखनाबद्दल त्यांना काय वाटलं ते आता कधीच कळणार नाही पण त्यांचे आशीर्वाद नक्की जाणवतात. मगाशी म्हटलं ना अजितकाका म्हणजे आमच्या आप्पांसारखे होते… स्वत: कितीही आजारी असले तरी दुसऱ्याला आनंद वाटणारे !

त्या, शेवटच्या ठरलेल्या, गप्पांच्या ओघात कै. सुरेश अलूरकरांचा विषय निघाला. सुरेशकाका आणि अजितकाका खूप चांगले मित्र होते. बोलता बोलता अजितकाका सहज म्हणाले होते ते एक वाक्य आता अँफ्लिफायर लावल्यासारखे मनात घुमत राहिलंय. ते म्हणाले होते, “काय असतं ना ! माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपावं काही सांगता येत नाही.’

Monday, January 26, 2009

संतश्रेष्ठ (देवद्वार छंद)

ज्ञानियाचा राजा
त्याची ज्ञानेश्वरी
या भव सागरी
नौका होई…

तुकोबा तो सांगे
आम्ही देऊ छाटी
नाठाळाला काठी
हाणू माथी….

एकनाथ गाती
रचूनी भारूड
लोकांसी गारूड
झाले ऐसे….

नामा म्हणे देवा
म्हणतो अभंग
तुझी भक्ती दंग
करितसे….

लिहिणे हे काव्य
केवढा आनंद
साथ देई छंद
देवद्वार….

Friday, January 9, 2009

योद्धा खेळाडू !

तो पन्नास वर्षांचा झालाय ह्यावर विश्वास बसत नाही !
त्याला पाहिल्यावर तर अजिबातच विश्वास बसत नाही !!
त्याला उत्तम आरोग्याचे दीर्घायू लाभो हीच प्रार्थना !!!

भारतीय क्रिकेटमधे मोजके खेळाडू असे झाले ज्यांना खऱ्या अर्थाने ‘नैसर्गिक खेळाडू’ म्हणता येईल. त्या यादीत ‘कपिलदेव रामलाल निखंज’ हे नाव खूप म्हणजे खूपच वर आहे.

गावसकर, सचिन वगैरे सगळे महान फलंदाज आहेत पण कपिल तो कपिल. भारतीय क्रिकेटमधे तेज गोलंदाजी जेंव्हा फक्त तोंडी लावण्यापुरती होती तेव्हा कपिल आला. बरं आला तो आला तेही नुसता गोलंदाज म्हणून नाही तर थेट अष्टपैलू खेळाडू म्हणूनच.

माझी पिढी खरंच भाग्यवान.. आम्ही कपिल, इयन बोथम, रिचर्ड हॅडली आणि इम्रान खान ह्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना एकमेकांशी खेळताना / मैदानावर त्वेषाने लढताना पाहिलंय ! सामना हरत असले तरी या चौघांपैकी कुणी कधी खांदे पाडून वावरले नाहीत. ती त्यांची देहबोलीच नव्हती. शिवाय प्रत्येक जण असा होता की एकाहाती सामना फिरवू शकायचा. जसा कपिलने फिरवला १९८३ च्या विश्वचषकामधे.

भारताची परिस्थिती १७ धावा, ५ बाद अशी बिकट असताना ह्या पठ्ठ्याने नाबाद १७५ धावा तडकावून झिंबाब्वेच्या आक्रमणातली हवा काढून घेतली होती. सुनील गावसकरने त्या खेळीबद्दल लिहिलंय की तो खेळत असताना टाळ्या वाजवून आमचे हात दुखायला लागले होते ! अर्थात रॉजर बिन्नी आणि किरमाणी ह्या दोघांनाही त्यांचे श्रेय द्यायला हवे. कपिल जेव्हा झिंबाब्वेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत होता तेव्हा आधी बिन्नी आणि मग किरमाणीने दुसरी बाजू चिवटपणे लावून धरली होती. जागतिक क्रिकेटचं दुर्दैव म्हणजे नेमका त्या दिवशी बीबीसीचा संप असल्याने त्या सामन्याचे रेकॉर्डिंगच केले गेले नाही !!

आठवतंय? एका सामन्यात कपिलने अगदी जमिनीलगत स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. चेंडू अडवायला म्हणून गोलंदाज मुदस्सर नझरने उजवा पाय पुढे केला आणि…. शेवटच्या क्षणी चेंडूच्या वाटेतून पाय काढून घेतला. साधा हिशोब … चौकार अडवणं महत्वाचं की पाय वाचवणं? !!

किती आठवणी सांगायच्या कपिलच्या? काही ठळक आठवणींसाठी ‘मायबोली.कॉम’वरचा आमचा मित्र ‘Farend’ ह्याने सुरू केलेला हा दुवा पहा !

1985 च्या बेन्सन अँड हेजेस कपमधे त्याने आणि दिलीप वेंगसरकरने, न्यूझीलंडच्या विरूद्ध , रिचर्ड हॅडलीच्या एका षटकात १७ धावा ठोकल्या होत्या। आम्ही मित्र नुसते आरडाओरडा करत ती मॅच पहात होतो. त्या सामन्याच्या आठवणी जागवायच्या आहेत?





इंग्लंडमधे खेळताना, आपल्याला एका कसोटीत, फॉलो ऑन वाचवायला चोवीस धावांची गरज होती। कपिलच्या साथीला फक्त तळाचा फलंदाज. एखाद्या फलंदाजाने जपून, विकेट सांभाळत, चोवीस धावा (कशातरी) जमवल्या असत्या. पण कपिल देव हे प्रकरण जरा वेगळ्या कॅटेगरीतलं ! त्यानं खटाखट लागोपाठच्या चार चेंडूंवर चार षटकार मारले. बात खतम – टेन्शन फिनिश्ड !





’गोलंदाज’ कपिल जर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड वगैरे असा कुठे जन्मला असता तर त्याने कसोटी क्रिकेटमधे अजून किमान १०० बळी जास्त मिळवले असते. त्याच्या भात्यातली सगळ्यात खतरनाक दोन अस्त्रं म्हणजे त्याचा आऊट स्विंगर आणि स्विंगिंग यॉर्कर.

त्याचा आऊट स्विंगर इतका ’आकर्षक’ होता की भल्या भल्यांची बॅट मंतरल्यासारखे खेचली जायची. अणि मग यष्टीरक्षक किरमाणी टपलेला असायचाच, झकासपैकी सूर मारून झेल टिपायला. किंवा मग चेंडू सरळ स्लिपमधे, सुनील गावसकरच्या सुरक्षित हातांमधे, विसावायचा !

मध्यंतरी झी टीव्हीवर एका वन डे सामन्याचा Replay दाखवत होते. भारत वि. पाकिस्तान. आपली पहिली बॅटिंग होती आणि आपण ‘दणकेबाज’ धावा केल्या….. सर्वबाद १२५ ! (‘दणकेबाज’ म्हणजे ‘दणके’ खात !!) त्यानंतर सुरू झाली आपल्या गोलंदाजीची जादू. पाकिस्तान – सर्वबाद ९१ की असाच काहीतरी स्कोअर !! एक विकेट अगदी प्रकर्षाने आठवतीय. कपिलच्या आऊट स्विंगरवर फलंदाजाने फटका मारायचा प्रयत्न केला. फटका चुकला पण विकेट वाचली. रन अपवर परत जाताना कपिलने गावसकरला हळूच खूण केली… थोडा मागे सरक. पुढचा चेंडू… तसाच आऊट स्विंगर… तशीच मोहिनी टाकल्यासारखी पुढे आलेली बॅट… तसाच बॅटची कड घेत चुकलेला फटका…. पण यावेळी चेंडू थेट स्लिपमधे…गावसकरच्या हातात !

तसाच तो त्याचा स्विंगिंग यॉर्कर ! ऑस्ट्रेलियातल्या एका सामन्यात, पाकिस्तानच्या कासिम उमरचा, उडालेला त्रिफळा भारतातल्या पहाटे साडेतीन –चार वाजता बघितलेला अजूनही आठवतोय.

कपिल आणि अमिताभ ह्या दोघांच्या बाबतीत माझा धाकटा भाऊ मंदार तर माझ्यापेक्षा दोन पावलं पुढेच आहेत. त्याने मध्यंतरी, कपिलवरच्या पुस्तकात, वाचलेले दोन किस्से सांगितले होते.

पहिला किस्सा म्हणजे एकदा कपिल खेळायला मैदानात उतरला. खेळपट्टीकडे एक नजर टाकताच त्याने सांगितले की नियमानुसार खेळपट्टीची जितकी लांबी असावी लागते त्यापेक्षा किमान १ इंचाने लांबी कमी आहे. विशेष म्हणजे खेळपट्टी मोजून पाहिली असता, कपिलचे म्हणणे खरे ठरले !!

दुसरा किस्सा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा. डेविड बूनला गोलंदाजी करताना, एका षटकाच्या सुरूवातीस, कपिलने रवी शास्त्रीला सांगितले की साधारण चौथ्या किंवा पाचव्या चेंडूवर बून शास्त्रीकडे झेल देईल, तयार रहा ! पहिले तीन चेंडू बूनने सीमापार धाडले, पण नंतर बूनने शास्त्रीकडे झेल दिलाच. कारण माहितीय? प्रत्येक चेंडूला, कपिल चेंडूचा टप्पा १ इंचाने आखूड करत होता. असा ठरवून टप्पा टाकू शकणारे किती गोलंदाज आहेत? हा किस्सा ऐकल्यावर मला एकदम ’इकबाल’ हा नितांतसुंदर हिंदी चित्रपट आठवला. त्यात नसिरूद्दीन शाहने श्रेयस तळपदेला जो ’चक्रव्यूह’ शिकवला तो ठरवून टप्पा बदलण्याचाच तर प्रकार होता !!

फिटनेसच्या बाबतीत कपिलचा हात धरू शकणारा एकच खेळाडू…. ‘जिमी’ अमरनाथ ! मोहिंदर अमरनाथ !! तुम्हाला माहितीये? कसोटी खेळायला सुरूवात केल्यापासून, कपिल सलग ६५ / ६६ खेळलाय. त्यानंतर एका सामन्यात तो बाहेर होता ते शिस्तभंगाची कारवाई म्हणून पण ‘अनफिट’ म्हणून तोपर्यंत कधीही त्याला सामना चुकवावा लागला नाहीये ! आणि लक्षात घ्या .. तो भारताचा मुख्य गोलंदाज होता !!

कपिलने भारतीय क्रिकेटला दिलेलं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ‘जिंकायचं स्वप्नं’ ! १९८३ नंतर भारतीय क्रिकेटने खऱ्या अर्थाने कात टाकली आणि आपण वन डे क्रिकेटमधे दादासारखे वागायला लागलो. ‘दादा’ गांगुली, ‘गॉड’ सचिन’ आणि ‘भिंत’ राहुल यांच्या यशाची बीजं तिथे रोवली गेली.

कपिलमधला ’लढवय्या’ वेळोवेळी आपल्यासमोर प्रकर्षाने आलाय. मैदानावरच्या त्याच्या जिगरबाज वृत्तीने त्याने प्रतिस्पर्ध्यांची मनंही जिंकली आहेत. ’सोने पे सुहागा’ म्हणजे आता ’भारतीय स्थल सेनेने’ (शुद्ध मराठीत -- Indian Army) कपिलला ’लेफ्टनंट कर्नल’ हे पद मानद अधिकारी म्हणून दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खेळाडूला मानद अधिकारी म्हणून हे पद दिलं गेलंय !!

कधी कधी असाच मनात विचार येतो की पूर्ण भरातल्या कपिलने पूर्ण भरातल्या सचिनला गोलंदाजी करावी. मला खात्री आहे, तो थरार बघताना आपले तर पुतळेच होतील. तुम्हाला काय वाटतं?

Thursday, January 1, 2009

मिठी

नूतन वर्षाभिनंदन !!!

नवीन वर्षाची सुरूवात एका सुखद गजलेनी करायची आयडिया कशी वाटते?

’मी माझा’ ह्या सुप्रसिद्ध कवितासंग्रहाचे कवि चंद्रशेखर गोखले ह्यांची ’मिठी’ ह्या शब्दाबद्दल खूप सुरेख ’चारोळी’ आहे. ती अशी…

मिठी या शब्दात
केव्हढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे

प्रत्येकासाठी ’मिठी’ वेगवेगळ्या रूपांत भेटते / भेटू शकते. अगदी मुन्नाभाई M.B.B.S. ने लोकप्रिय केलेली ’जादू की झप्पी’ही असते. तर,
ही आहे प्रेमिकांची …

मिठी
पावसाची तुला गोजरी ती मिठी
देह देई तुझा लाजरी ती मिठी….१

सांजवेळी नभाला नशा आज ही
साद घाली तुला केशरी ती मिठी….२

प्रेमवेडात ही राधिका बावरी
सावळ्याची असे बासरी ती मिठी….३

चुंबताना तुला, मी किनारा तुझा
लाट होऊन दे सागरी ती मिठी….४

दोन देही भरे ओढ ती सारखी
दे प्रिये दे तुझी साजरी ती मिठी…. ५

वृत्त नियम : गालगा * ४

Sunday, December 28, 2008

प्राक्तन

साथ देण्याचा इरादा पाहिला स्वप्नात होता
प्राक्तनाचा वार तेव्हा हाय रे अज्ञात होता…. १

मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला
आठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता…. २

पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना
तू मला वैरी म्हणावे हाय हा आघात होता…. ३

बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी
स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता…. ४

रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी
कुंकवाचा योग नाही काय संभोगात होता?... ५

सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या?
बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता…. ६

“मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे
सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता…. ७

वृत्त: व्योमगंगा
वृत्त नियम: गालगागा * ४
मात्रा: १६

Thursday, December 25, 2008

मनाला कळेना (श्लोक)

पार्श्वभूमी : सप्टेंबर २००८ पासून अमेरिकेत घडलेली वित्तसंस्थांची ऐतिहासिक पडझड.
वृत्त : भुजंगप्रयात
चाल : मनाचे श्लोक

कसे हे घडावे । मनाला कळेना ।
बघा कोसळे । कागदी हा मनोरा ॥ १

जना सज्जनांच्या । चुकाही नसे त्या ।
तरी वित्तसंस्था । बुडाल्या कशा ह्या ॥ २

कुणी कर्ज घ्यावे । कुणी कर्ज द्यावे ।
कुणीही कशाची । तमा बाळगेना ॥ ३

नमस्कार ज्यांनी । बरे घेतले गा ।
चमत्कार त्यांना । असे भोवले का ॥ ४

असा सांडला । सर्व पैसा तयांचा ।
जसा की । चणा वा फुटाणा असावा ॥ ५

इथे चित्त द्यावे । जना सज्जना हो ।
करा वित्त ऐसे । उद्याचा सुमेवा ॥ ६

नसावी जुगारी । असावी सुरक्षा ।
जरा पारखूनी । बसा गुंतवाया ॥ ७

जरी चंचला श्री । सुखाचाच ठेवा ।
जपूनी तिजोरी । तिला नीट ठेवा ॥ ८

--------------------------------------------