त्याला पाहिल्यावर तर अजिबातच विश्वास बसत नाही !!
त्याला उत्तम आरोग्याचे दीर्घायू लाभो हीच प्रार्थना !!!
भारतीय क्रिकेटमधे मोजके खेळाडू असे झाले ज्यांना खऱ्या अर्थाने ‘नैसर्गिक खेळाडू’ म्हणता येईल. त्या यादीत ‘कपिलदेव रामलाल निखंज’ हे नाव खूप म्हणजे खूपच वर आहे.
गावसकर, सचिन वगैरे सगळे महान फलंदाज आहेत पण कपिल तो कपिल. भारतीय क्रिकेटमधे तेज गोलंदाजी जेंव्हा फक्त तोंडी लावण्यापुरती होती तेव्हा कपिल आला. बरं आला तो आला तेही नुसता गोलंदाज म्हणून नाही तर थेट अष्टपैलू खेळाडू म्हणूनच.
माझी पिढी खरंच भाग्यवान.. आम्ही कपिल, इयन बोथम, रिचर्ड हॅडली आणि इम्रान खान ह्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना एकमेकांशी खेळताना / मैदानावर त्वेषाने लढताना पाहिलंय ! सामना हरत असले तरी या चौघांपैकी कुणी कधी खांदे पाडून वावरले नाहीत. ती त्यांची देहबोलीच नव्हती. शिवाय प्रत्येक जण असा होता की एकाहाती सामना फिरवू शकायचा. जसा कपिलने फिरवला १९८३ च्या विश्वचषकामधे.
भारताची परिस्थिती १७ धावा, ५ बाद अशी बिकट असताना ह्या पठ्ठ्याने नाबाद १७५ धावा तडकावून झिंबाब्वेच्या आक्रमणातली हवा काढून घेतली होती. सुनील गावसकरने त्या खेळीबद्दल लिहिलंय की तो खेळत असताना टाळ्या वाजवून आमचे हात दुखायला लागले होते ! अर्थात रॉजर बिन्नी आणि किरमाणी ह्या दोघांनाही त्यांचे श्रेय द्यायला हवे. कपिल जेव्हा झिंबाब्वेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत होता तेव्हा आधी बिन्नी आणि मग किरमाणीने दुसरी बाजू चिवटपणे लावून धरली होती. जागतिक क्रिकेटचं दुर्दैव म्हणजे नेमका त्या दिवशी बीबीसीचा संप असल्याने त्या सामन्याचे रेकॉर्डिंगच केले गेले नाही !!
आठवतंय? एका सामन्यात कपिलने अगदी जमिनीलगत स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. चेंडू अडवायला म्हणून गोलंदाज मुदस्सर नझरने उजवा पाय पुढे केला आणि…. शेवटच्या क्षणी चेंडूच्या वाटेतून पाय काढून घेतला. साधा हिशोब … चौकार अडवणं महत्वाचं की पाय वाचवणं? !!
किती आठवणी सांगायच्या कपिलच्या? काही ठळक आठवणींसाठी ‘मायबोली.कॉम’वरचा आमचा मित्र ‘Farend’ ह्याने सुरू केलेला हा दुवा पहा !
1985 च्या बेन्सन अँड हेजेस कपमधे त्याने आणि दिलीप वेंगसरकरने, न्यूझीलंडच्या विरूद्ध , रिचर्ड हॅडलीच्या एका षटकात १७ धावा ठोकल्या होत्या। आम्ही मित्र नुसते आरडाओरडा करत ती मॅच पहात होतो. त्या सामन्याच्या आठवणी जागवायच्या आहेत?
इंग्लंडमधे खेळताना, आपल्याला एका कसोटीत, फॉलो ऑन वाचवायला चोवीस धावांची गरज होती। कपिलच्या साथीला फक्त तळाचा फलंदाज. एखाद्या फलंदाजाने जपून, विकेट सांभाळत, चोवीस धावा (कशातरी) जमवल्या असत्या. पण कपिल देव हे प्रकरण जरा वेगळ्या कॅटेगरीतलं ! त्यानं खटाखट लागोपाठच्या चार चेंडूंवर चार षटकार मारले. बात खतम – टेन्शन फिनिश्ड !
’गोलंदाज’ कपिल जर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड वगैरे असा कुठे जन्मला असता तर त्याने कसोटी क्रिकेटमधे अजून किमान १०० बळी जास्त मिळवले असते. त्याच्या भात्यातली सगळ्यात खतरनाक दोन अस्त्रं म्हणजे त्याचा आऊट स्विंगर आणि स्विंगिंग यॉर्कर.
त्याचा आऊट स्विंगर इतका ’आकर्षक’ होता की भल्या भल्यांची बॅट मंतरल्यासारखे खेचली जायची. अणि मग यष्टीरक्षक किरमाणी टपलेला असायचाच, झकासपैकी सूर मारून झेल टिपायला. किंवा मग चेंडू सरळ स्लिपमधे, सुनील गावसकरच्या सुरक्षित हातांमधे, विसावायचा !
मध्यंतरी झी टीव्हीवर एका वन डे सामन्याचा Replay दाखवत होते. भारत वि. पाकिस्तान. आपली पहिली बॅटिंग होती आणि आपण ‘दणकेबाज’ धावा केल्या….. सर्वबाद १२५ ! (‘दणकेबाज’ म्हणजे ‘दणके’ खात !!) त्यानंतर सुरू झाली आपल्या गोलंदाजीची जादू. पाकिस्तान – सर्वबाद ९१ की असाच काहीतरी स्कोअर !! एक विकेट अगदी प्रकर्षाने आठवतीय. कपिलच्या आऊट स्विंगरवर फलंदाजाने फटका मारायचा प्रयत्न केला. फटका चुकला पण विकेट वाचली. रन अपवर परत जाताना कपिलने गावसकरला हळूच खूण केली… थोडा मागे सरक. पुढचा चेंडू… तसाच आऊट स्विंगर… तशीच मोहिनी टाकल्यासारखी पुढे आलेली बॅट… तसाच बॅटची कड घेत चुकलेला फटका…. पण यावेळी चेंडू थेट स्लिपमधे…गावसकरच्या हातात !
तसाच तो त्याचा स्विंगिंग यॉर्कर ! ऑस्ट्रेलियातल्या एका सामन्यात, पाकिस्तानच्या कासिम उमरचा, उडालेला त्रिफळा भारतातल्या पहाटे साडेतीन –चार वाजता बघितलेला अजूनही आठवतोय.
कपिल आणि अमिताभ ह्या दोघांच्या बाबतीत माझा धाकटा भाऊ मंदार तर माझ्यापेक्षा दोन पावलं पुढेच आहेत. त्याने मध्यंतरी, कपिलवरच्या पुस्तकात, वाचलेले दोन किस्से सांगितले होते.
पहिला किस्सा म्हणजे एकदा कपिल खेळायला मैदानात उतरला. खेळपट्टीकडे एक नजर टाकताच त्याने सांगितले की नियमानुसार खेळपट्टीची जितकी लांबी असावी लागते त्यापेक्षा किमान १ इंचाने लांबी कमी आहे. विशेष म्हणजे खेळपट्टी मोजून पाहिली असता, कपिलचे म्हणणे खरे ठरले !!
दुसरा किस्सा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा. डेविड बूनला गोलंदाजी करताना, एका षटकाच्या सुरूवातीस, कपिलने रवी शास्त्रीला सांगितले की साधारण चौथ्या किंवा पाचव्या चेंडूवर बून शास्त्रीकडे झेल देईल, तयार रहा ! पहिले तीन चेंडू बूनने सीमापार धाडले, पण नंतर बूनने शास्त्रीकडे झेल दिलाच. कारण माहितीय? प्रत्येक चेंडूला, कपिल चेंडूचा टप्पा १ इंचाने आखूड करत होता. असा ठरवून टप्पा टाकू शकणारे किती गोलंदाज आहेत? हा किस्सा ऐकल्यावर मला एकदम ’इकबाल’ हा नितांतसुंदर हिंदी चित्रपट आठवला. त्यात नसिरूद्दीन शाहने श्रेयस तळपदेला जो ’चक्रव्यूह’ शिकवला तो ठरवून टप्पा बदलण्याचाच तर प्रकार होता !!
फिटनेसच्या बाबतीत कपिलचा हात धरू शकणारा एकच खेळाडू…. ‘जिमी’ अमरनाथ ! मोहिंदर अमरनाथ !! तुम्हाला माहितीये? कसोटी खेळायला सुरूवात केल्यापासून, कपिल सलग ६५ / ६६ खेळलाय. त्यानंतर एका सामन्यात तो बाहेर होता ते शिस्तभंगाची कारवाई म्हणून पण ‘अनफिट’ म्हणून तोपर्यंत कधीही त्याला सामना चुकवावा लागला नाहीये ! आणि लक्षात घ्या .. तो भारताचा मुख्य गोलंदाज होता !!
कपिलने भारतीय क्रिकेटला दिलेलं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ‘जिंकायचं स्वप्नं’ ! १९८३ नंतर भारतीय क्रिकेटने खऱ्या अर्थाने कात टाकली आणि आपण वन डे क्रिकेटमधे दादासारखे वागायला लागलो. ‘दादा’ गांगुली, ‘गॉड’ सचिन’ आणि ‘भिंत’ राहुल यांच्या यशाची बीजं तिथे रोवली गेली.
कपिलमधला ’लढवय्या’ वेळोवेळी आपल्यासमोर प्रकर्षाने आलाय. मैदानावरच्या त्याच्या जिगरबाज वृत्तीने त्याने प्रतिस्पर्ध्यांची मनंही जिंकली आहेत. ’सोने पे सुहागा’ म्हणजे आता ’भारतीय स्थल सेनेने’ (शुद्ध मराठीत -- Indian Army) कपिलला ’लेफ्टनंट कर्नल’ हे पद मानद अधिकारी म्हणून दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खेळाडूला मानद अधिकारी म्हणून हे पद दिलं गेलंय !!
कधी कधी असाच मनात विचार येतो की पूर्ण भरातल्या कपिलने पूर्ण भरातल्या सचिनला गोलंदाजी करावी. मला खात्री आहे, तो थरार बघताना आपले तर पुतळेच होतील. तुम्हाला काय वाटतं?
5 comments:
अप्रतिम लेख. मी क्रिकेटचा चाहता नाहिये तरीसुद्धा मी लेख खिळल्यासारखा एका झपाट्यात वाचला. एका जुन्या काळात तू एका मिनिटात नेलेस. मला कपीलची पहिली मॅच पाकिस्तानमधली (१९७८) आठवते. त्यावेळी मी सुद्धा क्रिकेट वेड्यासारखा पहात असे आणि आम्हा पोरांमध्ये तेव्हा ’कोणितरी कपिलदेव म्हणून आला आहे आणि म्हणे जबरी फ़ास्ट बोलिंग करतो’ अशी चर्चा होती.
क्रिकेट्च्या चाहत्यांना तर हा लेख म्हणजे मेजवानी वाटेल असे मला वाटते - खास करून माझ्या आणी त्यानंतर च्या १-२ पिढ्यांना जे त्या क्रिकेटवर वाढले.
उत्तम लेखाबद्दल परत एकदा अभिनंदन...
khoop sundar.. Kapil aahech ek apratim wyaktimatwa. eethe mala dekheel ek kissa sangawasa waatel kee Shivaji park Gymkhana madhye ekda Scorpio speedster contest chaaloo hotee. bhale bhale shivaji park che kheladoo tithe aapla kasab mhanje aaplee takad panala laawat hote. Arthaat Judge hote Kapil aani Wasim akram. aamhee bowling taakoon agdee chhaatee che bhaate karoon bowling FEKLYAWAR aamcha speed kuthe 125 chyaa gharaat gela.
Pan nantar wel aale karyakramachya sangatechee. aani arthaat maharathee KAPIL aani WASIM khelpatteewar aale. Kapil cha 2 paawlee runup. Speed count- 129. Wasim chaa 4 paawlee runup. Speed count-132. tappa ekach. Just short of good length. Batsman saathee total confusion. Aani dghannaahee hyaa yewdhyaa accuracy cha rahasya wicharla tar uttarahee ekach. 10 nawya paishache coin. aani saglee practice te coin udawnyaachee.
Khoop sundar lekh aahe Sandeep kaka.
SUrekha.
mast lekh lihila aahes. Cricket mi hi shalet asatana khoop pahayache. kapil kahi samane pahayla milale.
1983 cha worldcup mi pahila ki nahi athavat nahi. khoop lahan hote. pan tyaarchya charcha khoop aiklya.
tujhya lekhane athavani jagya zalaya.
मस्त जमलाय लेख संदीप! अरे ती मॅच म्हणजे १९८५ च्या ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड सिरीज कप स्पर्धा (जी गावस्कर ची कप्तान म्हणून शेवटची होती आणि न्यू झीलंड विरूद्ध ची तुझ्या लेखातील लिंक त्यातलीच, तसेच कासिम उमर ची दांडी ही त्यातीलच फायनल मधली) झाल्यावर कपिल कडे कप्तान पद आले तेव्हाची पहिलीच मॅच शारजातील.
या दोन्ही लिन्क मधली रिची बेनॉ ची कॉमेंट ही अचूक आहे:
१. न्यू झीलंड विरूद्ध त्याचा कॅच सोडल्यावर "That could be the match"
आणि २. चौथी सिक्स मारल्यावर "I suppose it's only logical, if you need 24 runs to save the follow-on why won't you get those in 4 hits! :)
माझ्या त्या छोट्या लेखाची लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद!
Hi Sandeep,
Kapil Baddal vachatana nehamich chhan vatat...short and sweet.. sundare lekjh ahe.
mala cricket madhal kahi kalat nahi ani tyaveli tar(4-5 vashanchi asatana) kharach kahi kalat navhat... kalayache te evhadhach ki mala Kapil khup avadato... aNi fakt tyachya premakhatar mi "Boost" cya kiti baraNya sampavalya ahet he mi nahi sangu shakat...
Prachi Tipare
Post a Comment