माणसाने माणसाला मनमोकळी घट्ट मिठी मारणं ही खूप छान गोष्ट आहे! वय, रंग, लिंग, जात, धर्म हे आणि अनेक भेद पार करून माणसाने माणसाला मनमोकळी घट्ट मिठी मारणं ही खूप छान गोष्ट आहे! गरज आहे ती प्रत्येक नात्याच्या संदर्भातील निर्मळपणाची आणि अनाठायी संकोच दूर ठेवण्याची.
आपली देहबोली ही आपल्या कल्पनेच्या पलीकडे बोलत असते. भाषा हे जरी संवादाचं मुख्य साधन असलं तरी शब्दांपेक्षा हावभाव जास्त बोलत असतात. दोन माणसांनी एकमेकांशी बोलायला, विशेषतः ज्याला डिफिकल्ट कनवरसेशन्स म्हणतात त्यासाठी, सगळ्यांत उत्तम मार्ग म्हणजे माणसांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे. आजच्या टेक्स्ट आणि व्हॉटसऍप मेसेजेसच्या जमान्यात तर माणसांनी प्रत्यक्ष नाही तर निदान फोनवर तरी बोलणं आवश्यक आहे. टेक्स्ट, ई-मेल, व्हॉटसऍप मेसेज खऱ्या अर्थाने भावना पोचवू शकत नाहीत. कुणाशीही प्रत्यक्ष बोलताना आपण नुसते शब्द ऐकत नसतो तर डोळ्यांतले भावही वाचत असतो. जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा स्पर्श मदत करतो. आपुलकीने हातात हात घेणं असो किंवा गालावर अलगद थोपटणे असो, पाठीवर शाबासकीची थाप देताना असो की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांतील पाणी आपल्या बोटांनी अलगद बाजूला करणं असो, आश्वासक स्पर्श असला की शब्दांची गरजच नसते. इंग्लिशमध्ये जसं म्हणतात -- पिक्चर स्पीकस फॉर अ थाउजंड वर्ड्स -- ते स्पर्शाच्या बाबतीतही खरं आहे.
मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर माणसांचे व्यक्तिमत्व चारपैकी एका रंगाच्या प्रकारचे असते. ते रंग म्हणजे लाल, निळा, पिवळा, आणि हिरवा. ह्या प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिण्याचा ह्या लेखाचा उद्देश्य नाही आणि माझे तेवढे ज्ञानही नाही. (ह्या चार रंगांच्या व्यक्तिमत्वांबद्दल थोडी माहिती हवी असेल ती इथे वाचता येईल.) ढोबळ मानाने इतकं तर म्हणता येईल की निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती स्पर्शाच्या बाबतीत मोकळ्या असतात. अर्थात मानसशास्त्रीय गोष्टी जशाच्या तश्या प्रत्येक व्यक्तीबाबत खऱ्या असतातच असं नाही. त्यामुळे लाल किंवा हिरव्या व्यक्तिमत्वाची काही माणसे स्पर्शाच्या बाबतीत मोकळी असू शकतात तर निळ्या किंवा पिवळ्या व्यक्तिमत्वाचे कुणी संकोची असू शकतात.
भारतीय संस्कृतीच्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत पण एक वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे स्पर्शाच्या बाबतीतला संकोच. आपल्या एकूणच नातेसंबंधात स्पर्शाला दुय्यम स्थान असतं! खरं पाहिलं तर असं असायचं कारण नाही. आपल्या ध्यानधारणेतही स्पर्शाला महत्व आहे फक्त आपल्याला ते जाणवत नाही किंवा माहिती नसतं. ध्यान करताना आपल्या हातांचे अंगठे आणि तर्जनी जुळवलेले असतात. पाहिजे तर हे आवर्जून करून बघा. एखादं महत्वाचे काम करायला सुरुवात करताना फक्त काही मिनिटे ध्यान करायला शांत बसून दीर्घ श्वास घेत राहा. अवघ्या काही मिनिटांमध्ये मनावरचं दडपण कमी होतं. ह्यासाठी दीर्घ श्वास(च) कारण आहे असं आपल्याला वाटतं पण श्वासाबरोबर दुसरा घटक जो मदत करतो तो म्हणजे अंगठे आणि तर्जनीचा स्पर्श. एकप्रकारे आपण आपल्या मनाला सांगत असतो -- ऑल इज वेल!
जगात कित्येक गोष्टी अशा आहेत ज्यांना भल्या आणि बुऱ्या अशा दोन्ही बाजू आहेत. मग स्पर्श तरी ह्याला कसा अपवाद असेल? चांगला स्पर्श असतो तसा वाईट स्पर्श असतो. मी सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे गरज आहे ती प्रत्येक नात्याच्या संदर्भातील निर्मळपणाची. विशेतः स्त्री-पुरुष ह्यांच्या संबंधात असं असतं की बायकांना वाईट स्पर्श ओळखण्याची उपजत जाणीव असते किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात तसा सिक्स्थ सेन्स असतो, अशावेळेला तर वाईट स्पर्श प्रत्यक्ष होण्याच्याआधीच वाईट नजरेचा स्पर्श झालेला असतो. वाईट स्पर्शाची कुठल्याही प्रकाराने भलावण करणं योग्य नाही म्हणजे नाहीच. ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांची ताकद मोठी आहेच पण अशा ठिकाणीसुद्धा 'मी टू' (#MeToo) म्हणायला धाडस लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात बायकांना #MeToo म्हणावं लागणं ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.#MeToo ह्या चळवळीसाठी काही मदत करायची असेल तर इथे माहिती बघता येईल.
(ह्या विषयाचा एक वेगळा पैलू असा की एखादी चळवळ सुरू होते आणि अजाणतेपणी त्याचा भलताच परिणामही सुरू होतो. #MeToo चळवळ महत्वाची आहे ह्यात वादच नाही पण नकळत त्याचा एक उलटा परिणाम असा झालाय की कॉर्पोरेट जगतात पुरुषांनी बायकांना मेंटॉर करण्याच्या प्रमाणात घट झाली! 'मेन्टॉरिंग करायला जायचो आणि फट्ट म्हणता काही तरी अंगलट यायचं त्यापेक्षा कशाला नाही त्या भानगडीत पडा?' अशी सावध भूमिका अनेक चांगले पुरुष घेऊ लागले. फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्ग ह्यांनी ह्या प्रकारात बायकांचे
नुकसान होऊ शकण्याचा धोका ओळखला आणि 'लीन इन' ही वेबसाइट सुरू केली. त्या माध्यमातून विमेन एम्पॉवरमेंटसाठी #MentorHer ही चळवळ सुरू झालीये. त्याबद्दलचा वेंडी के ह्या स्त्री पत्रकाराचा लेख इथे वाचता येईल. तसंच #MentorHer ह्याबद्दल अजून माहिती 'लीन इन 'च्या वेबसाईटवर इथे वाचता येईल.)
ह्या लेखात चांगल्या स्पर्शाचा फक्त विचार करायचा म्हटलं तरी त्याला काही कंगोरे आहेत. दोन व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत असताना स्पर्श ह्या महत्वाच्या गोष्टीकडे दोघांनीही लक्ष ठेवणं आवश्यक असतं. विशेषत: दोन वेगवेगळे रंग असलेल्या व्यक्तिमत्वाचे कुणी संवाद करत असतील तर त्या दोघांनीही ह्या बाबींकडे लक्ष ठेवणं आवश्यक असतं. एकाचा स्पर्शाच्या संदर्भात मोकळेपणा जसा दुसऱ्यासाठी घुसमट ठरू शकतो तसाच एखाद्या व्यक्तीचा स्पर्शाप्रति संकोच हा स्पर्शाच्या बाबतीत मोकळ्या व्यक्तीची घुसमट असू शकतो. तसं पाहिलं तर हे म्हणजे इन्ट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट अशा भिन्न स्वभावप्रकृतीच्या व्यक्तीना एकमेकांशी नुसतं बोलतानाही जी अडचण जाणवते तसंच स्पर्शाच्या बाबतीतही होतं. हा तिढा सोडवायचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तींचा एकमेकांशी मनमोकळा संवाद आणि स्पर्शाच्या बाबतीत मधल्या वाटेत कुठे भेटायचं ह्याचं एकमेकांसाठीचं समंजस भान!
आयुष्याच्या एका टप्प्यावर तर जाणवायला लागतं की आतापर्यंत आपण स्पर्शाबद्दल एकतर बेफिकीर मोकळे होतो किंवा उगीच संकोची होतो. 'जिंदगी एक सफर है सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना' ह्या गाण्याप्रमाणे आयुष्यात खूप अनिश्चितीता असते फक्त आपण त्याकडे डोळेझाक करतो. आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि आपण अनेकांच्या आयुष्यात असतो. नातं कुठलंही असो पण जेव्हा आपली एखादी जिवलग व्यक्ती 'न परतीच्या प्रवासाला' जाते तेव्हा काही गोष्टी आपल्या पुढच्या आयुष्यभर नक्की लक्षात राहतात. त्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीचा जिव्हाळा, आवाज आणि स्पर्श!
3 comments:
Sundar! Ektar baryach mahinyanni tu Blog war lihiles aani tyatunahi ekdum wegla vishay. I still remember and follow the touch technique you taught me and I share it with my colleagues, friends ��. ...Mandar
सुं द र !
खूप छान मांडलाय विषय. संस्काराच्या नावाखाली आपण स्पर्शाच्या बाबतीत संकोची होतो आणि स्वतःला कुंपण घालतो. कोणतंही नातं रुजण्यासाठी स्पर्श हवाच!...मनिषा जाधव
Post a Comment