Tuesday, November 25, 2008

बच्चन येतो ना, भौ ss !

“मग काय! धर्मेंद्रला बांधून ठेवतात आणि गब्बरसिंग बसंतीला नाचायला सांगतो.”
“हो ss?”
“तर… आणि तिला म्हणतो – जबतक तेरे पैर चलेंगे, तबतक इसकी सांस चलेगी…”
“धर्मेंद्र खवळून ओरडतो – बसंतीsss! इन कुत्तों के सामने मत नाचना।”
“आयल्ला … मग रे ss?”
“बसंती तरी काय करणार? नाचते ना बिचारी त्या गाण्यावर – जबतक है जान, मैं नाचूंगी ! त्यात वर अर्धं गाणं झाल्यावर गब्बर त्याच्या माणासांना नुस्ती खूण करतो आणि त्याची माणसं फटाफट दारूच्या बाटल्या जमिनीवर फोडतात… आता बसंतीनं त्या काचांवर नाचायचं !!”
“तिच्याssयच्ची तर त्या .. गब्ब्बरच्याss!”
“हां ना राव… ती नाचायला लागते आणि मधेच एकदम कच्चकन पायात काच घुसते….”
“अर्रर्र..काच कस्सली कापते माहित्ये, आपला काचेरी मांजा आहे ना राव .. लै भारी !”
“ते तर काहीच नाही ! एकदा हेमामालिनी नाचताना चक्कर येऊन धाडकन्‍ पडते, बोल !”
“आई शप्पत.. मग रेss? मरतोss? धर्मेंद्र..!”
“अरे हॅट्ट…. बच्चन येतो ना भौsss!”

जवळपास चार पिढ्यांनी तरी, त्यांच्या लहानपणी, अमिताभच्या सिनेमांची स्टोरी मित्रांना सांगितली असेल पण प्रत्येक वेळी “अरे हॅट्ट…. बच्चन येतो ना भौss” म्हणताना तीच excitement !

“तो फालतू ऍक्टर आहे रेss” असं म्हणणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर पुढे वाचून उपयोग नाही !
“तो आता फालतू रोल करायला लागलाय” म्हणाल तर ठीक आहे; तुम्ही सुधरायला वाव आहे !!
“तो निदान वेगवेगळे रोल ट्राय करतोय” असं म्हणत असाल तर तुम्ही योग्य दिशेनं विचार करताय !!
“रोल कुठलाही असू दे यार, तो ऍक्टिंगमधला गॉड आहे ” असं म्हणणारे असाल तर एकदम योग्य जागी आलायत !!!

अमिताभच्या अभिनयाबद्दल इतकं लिहिलं गेलंय की अजून वेगळं काय लिहिणार? हा लेख वेगवेगळ्या सिनेमांतली बच्चनची एंट्री किंवा ठराविक प्रसंगातली त्याची एंट्री एवढ्यापुरताच ठेवायचा प्रयत्न करतो. तरीही, मारूतीच्या शेपटीसारखे, एकापाठोपाठ एक प्रसंग आठवतीलच आणि लिहिलेलं तुम्हालाही कमीच वाटेल ! खात्री आहे माझी !!

बाय दि वे, एक पाहिलयंत? त्याचे जे एसी आहेत ना ते नुसतं ‘बच्चन’ म्हणतात किंवा ‘अमिताभ’ ! ‘अमिताभ बच्चन’ नाही आणि थिल्लर मिडीयासारखं ‘Big B’, ‘AB’ वगैरे तर नाहीच नाही ! (फॅनपेक्षा एक पाऊल पुढे असतो तो एसी !!!)

काय धमाल असते ना त्याला पडद्यावर येताना पाहणं म्हणजे ! कॉलेजमधे असताना आम्ही साताठ मित्र ‘अग्निपथ’ पहायला गेलो होतो. First day – first show ! सुरूवातीचे, विजयच्या लहानपणीचे वगैरे, सीन चालू होते तेव्हा एक मित्र सारखा कटकट करत होता, “च्यायला तुम्ही माझी झोप खराब गेली. पिक्चर बोर है यार!” पण जेव्हा कानावर शब्द पडले, “विजय दीनानाथ चौहान..पूरा नाम । बाप का नाम दीनानाथ चौहान । माँ का नाम सुहासिनी चौहान । गाँव मांडवा… “ तेव्हा आमचा मित्र ताडकन सावरून बसला. तो सीन संपल्यानंतर म्हणत राहिला - “बॉस्स ये पिक्चर तो हिट है ।” मग पिक्चरभर बच्चनचा वावर पाहताना आणि त्याने मुद्दाम बदललेला आवाज ऐकताना दर थोड्यावेळाने ह्याचं आपलं चालूच, “ये तो हिट्ट है यार…।”

‘अग्निपथ’ मधलाच अजून एक प्रसंग – विजयचे विरोधक त्याच्या तरूण बहिणीला पळवून नेतात तो सीन !! त्या धक्क्याने बेशुद्ध झालेल्या आईजवळ बसून विजय म्हणतो -- “विजय चौहान की बहिन को उठाके ले गये । काट के फेंक देगा ।” इतक्या वेळा सिनेमा पाहून अजूनही समजत नाही की जास्त धगधगता अंगार कशात भरलाय? ती थंड नजर आणि त्या थंड आवाजात की नंतर झोपडपट्टीत उद्रेकलेल्या ज्वालामुखीत !

खरंतर आता असं वाटतंय की फक्त ‘अग्निपथ’मधल्याच त्याच्या कामावर एक वेगळा लेख लिहावा !!!

अग्निपथच कशाला .. शोले, दीवार, जंजीर, डॉन, अमर अकबर अँथनी, काला पत्थर, त्रिशूल, सत्ते पे सत्ता, मुकद्दर का सिकंदर, शक्ति, शान, कालिया, आखरी रास्ता, हम, खुदा गवाह, मोहब्बतें, अक्स, खाकी, आँखें, देव, ब्लॅक, सरकार, एकलव्य … हुश्श ! यादी संपतच नाहीये ! बरं ह्यात अजून कभी कभी, सिलसिला, बेमिसाल, चुपके चुपके, अभिमान, नमक हलाल, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, वक्त, बागबाँ, चीनी कम असे अजून काही soft role आठवणारच. अरे.... किती लेख लिहायचे !!

थोडं विषयांतर करतोय पण मुकुल आनंद खूप लवकर गेला ! बच्चन जेव्हा ‘देसाई- मेहरा’ साच्यात अडकला होता तेव्हा ‘हम’ मधला शेखर उर्फ टायगर, ‘अग्निपथ’ मधला विजय चौहान आणि ‘खुदा गवाह’मधला “सरजमीन-ए-हिन्दोस्ताँ ओ वालेक्कुम सलाम” म्हणणारा अफगाण बादशाह खान आपल्याला मुकुल आनंदनेच तर दिले ! डॅनी डेंग्झोंपा किती handsome दिसू शकतो ते सुद्धा मुकुल आनंदनेच दाखवलं.

ह्या लेखासाठी ‘दीवार’, ‘त्रिशूल’ आणि ‘डॉन’ तर special movies आहेत. ‘दीवार’ मधला तो गोदामातला सीन आठवतोय ना, “पीटर … तुम लोग मुझे ढूँढ रहे हो और मैं यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हूँ !” त्या सीनपूर्वी, वादळाआधीच्या शांततेसारखा, एक डायलॉग आहे, “अगले हफ्ते एक और कुली इन मवालियोंको पैसा देनेसे इन्कार करनेवाला है !”

‘दीवार’मधलाच तो शेवटचा ऑल टाईम क्लासिक सीन? नास्तिक विजय – आयुष्यात देवळाची पायरी न चढणारा विजय, आई वाचावी म्हणून, शंकराच्या देवळात येतो तो सीन ! “आज … खूष तो बहोत होगे तुम ” डायलॉगचा ! आवाज तर सोडा पण डोळेही काय बोलतात ह्या माणसाचे !! मध्यंतरी एकदा अमिताभला प्रत्यक्ष स्टेजवर हा डायलॉग म्हणताना बघायला मिळालं होतं. दहा-बारा हजार लोक पिन ड्रॉप सायलेन्स करून बच्चनचा आवाज कानांत साठवून घेत होते.

‘त्रिशूल’मधे त्याच्या एंट्रीलाच background वर सुरूंगाचे स्फोट होताना दाखवलेत. हातातल्या बिडीने सुरूंगांच्या वाती पेटवत, त्या धुराळ्यातून हा आपल्या दिशेनं चालत येतो, ज्याला oozing with confidence म्हणतात ना तसा ! शेट्टीचा अड्डा तोडायला तर डायरेक्ट अँब्युलन्स घेऊनच येताना दाखवलाय ! आजही भारतात कुठल्याही थिएटरला (सोफिस्टिकेटेड मल्टिप्लेक्सला नाही!) ‘त्रिशूल’ लावला तर त्या सीनला शिट्ट्यांचा पाऊस पडेल.

यश चोप्रा म्हणजे king of romance असं मानणाऱ्यांना विश्वास ठेवणं अवघड असेल की एकेकाळी ह्याच यश चोप्राने आपल्याला ‘दीवार’, ‘काला पत्थर’ आणि ‘त्रिशूल’ मधला दाहक बच्चन दिलाय !!

‘काला पत्थर’ची पोस्टर्स मुंबईला रस्त्याच्या दुतर्फा पाहिलेली आठवतायत ! त्या पोस्टरवर प्रामुख्याने दिसणारा बच्चनचा फक्त चेहरा ! कोळशाने काळवंडलेला, कुठल्यातरी असह्य, अनामिक वेदनेने ओरडणारा तो चेहरा !! पोस्टरवरचा तो मूक चेहराही खऱ्याखुऱ्या वेदनांनी ओरडतोय असं वाटायचं !

‘डॉन’च्या तर सुरूवातीलाच बच्चन येतो ना भौss ! ‘डॉन’ पहिल्यांदा आला त्यावेळी इंपालाचं आकर्षण होतं कारण त्या लांबलचक गाडीतून रूबाबदार बच्चन हातात बॅग घेऊन उतरतो ! Effect पूर्ण करायला background music म्हणजे डॉनची ती ‘signature tune’ एकदम मस्तंय !

“अरे दिवानों, मुझे पहचानो ..” गाण्यात सिंहाचा मुखवटा चेहऱ्यावरून काढत “मैं हूँ.. मैं हूँ.. मैं हूँ डॉन” असं बच्चन गायला लागला की आपलेही पाय आपसूक थिरकतात !!’ आमच्या Hidden Gems ह्या म्युझिक ग्रुपच्या कार्यक्रमांत ‘अरे दिवानों…’ सुरू झालं की प्रेक्षकांतून कुणीनाकुणीतरी नक्की नाचायला लागतं.

हा लेख जरी बच्चनच्या पडद्यावरील आगमनाशी संबंधित आहे तरी ‘डॉन’ सिनेमात एक सीन असा आहे ज्यात त्याची exit महत्वाची आहे ! Yes, “डॉनको पकडना मुश्कीलही नहीं, नामुमकीन है !” डॉनला साजेल असाच प्रतिकूल परिस्थितीवरही मात करणारा शातिर मेंदू आणि सराईत थंडपणा इथे बच्चनने काय जबरी दाखवलाय !

माझं मत टोकाचं वाटेल पण नवीन ‘डॉन’मधे शाहरूख पहिल्यांदा दिसतो तेव्हाच वाटतं, “हाss ? आणि डॉन? आमची काय चेष्टा करता का काय ?”

‘अभिनयाची जुगलबंदी’ हा शब्दप्रयोग आपण बरेचदा ऐकतो. प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर ‘शक्ति’ पहावा ! दिलीपकुमार आणि बच्चन .. समोरासमोर ! नुसतं कल्पनेनंच थरारायला होतं तर पिक्चर बघतानाची काय बात ! बच्चनची एंट्री आठवतीये? एक शाळकरी मुलगा, आपल्याच विचारांत गुंतलेला, पत्र्याचं डबडं लाथाडत जातो. कॅमेरा पायांवर आणि त्या डबड्यवर ! नंतरच्या फ्रेममधे तसाच डबडं उडवत जाणारा बच्चन ! विचारांच्या जाळ्यात गुरफटलेला .. एकलकोंडा !!

‘शक्ति’मधे बच्चन police inspector नव्हता पण दुसरा कुठलाही ऍक्टर police inspector म्हणून बच्चनइतका graceful दिसला नाहीये; तुमचं काय मत? विश्वास बसत नसेल तर ‘राम-बलराम’ किंवा ‘परवरिश’ पहा !

गेल्या काही वर्षांतल्या ‘खाकी’ आणि ‘देव’मधूनही बच्चन इन्स्पेक्टर बनलाय ! ‘खाकी’मधे सिनेमाच्या सुरूवातीचा सुस्तावलेला, निवृत्तीचे वेध लागलेला आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारी सिस्टीमला कंटाळलेला इन्स्पेक्टर, ‘हमारी ड्यूटी क्या है’ ह्या सीनला कसला चवताळतो ना राव ! आणि ‘खाकी’मधलाच तो माथेफिरू जमावाला सामोरा जातानाचा सीन? म्हातारा झाला तरी सिंह गर्जनाच करतो बॉस्स .. म्याऊं नाही !

‘शोले’चा रिमेक हा एक जोरदार फसलेला प्रयत्न (की वेडं धाडस?) असला तरी एक गोष्ट नक्की की रामगोपाल वर्मा टॅलेंटेड आहे. जो दिग्दर्शक आपल्याला ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कौन’ आणि ‘कंपनी’ देतो तो फालतू असूच शकत नाही. त्यामुळेच जेव्हा रामूबरोबर बच्चन ‘सरकार’ करतोय असं समजलं तेव्हा सगळे हरखले. थोडी भीतीही होतीच म्हणा ! ‘गॉडफादर’ ह्या अप्रतिम कलाकृतीचं हिंदी रूपडं एकेकाळी आपल्याला फिरोज खानने ‘धर्मात्मा’ म्हणून दाखवलं होतं !!! आधीच प्रेमनाथ, त्यात गॉडफादर ! (असाच अजून एक मराठी वाक्प्रचार आहे ना? !!!) सिनेमाचं व्हायचं तेच झालं होतं !

तर, ‘सरकार’मधे बच्चन हॉस्पिटलमधून परत घरी येतो तो सीन आठवा ! सिनेमा हॉलच्या त्या मोठ्या पडद्यावर दिसतो बच्चनच्या हाताचा नुसता पंजा ! ‘सरकार’ची सगळी ताकद आणि मॉब कंट्रोल दाखवायला तो सीन पुरतो ! हॅट्स ऑफ टू रामू ! आता सरकारचा विषय निघालाच आहे तर, दुबईहून आलेला गँगस्टर रशीद पहिल्यांदा सरकारला भेटतो, त्या सीनची आठवण न काढून कसं चालेल? बच्चनचा तर प्रश्नच नाही पण रशीदचा रोल करणाऱ्या झाकीर हुसेन ह्या गुणी नटाने पण काय काम केलंय यार ! बहुतेक ‘झाकीर हुसेन’ ह्या नावातच प्रेक्षकांवर गारूड करायची शक्ती असावी ! खरं तर सरकारमधे अभिषेक आणि के.के. मेनन ह्यांनी पण ‘तोडलंय’ ! ‘सरकार’मधे पार्श्वसंगीताचाही जणू महत्वाचा रोल आहे. विशेषत: intense सीन्समधे पार्श्वसंगीताबरोबर ऐकू येणारा आवाज - ‘साम – दाम – दंड – भेद’ किंवा ‘गोविंदा, गोविंदा..गोविंदा, गोविंदा….गोविंदा sss’.

अरे … पण आपण नुसत्या itense रोल्सबद्दलच का बोलतोय? एक-दोन जरा हलके-फुलके सीन्ससुद्धा आठवूयात की ! ‘नमक हलाल’ मधली क्रिकेट कॉमेंट्री आठवतेय ? विसंगतीतून विनोद निर्माण करण्यासाठी आधी एखाद्या गोष्टीवर कमालीचं प्रभुत्व असावं लागतं ! टीव्हीवर उठसूठ इंग्लिश टाकणाऱ्यांनी बच्चनची क्रिकेट कॉमेंट्री जरूर ऐकावी ! पाठोपाठ “मैं और मेरी तनहाई” किंवा “मधुशाला” ऐकावं ! इंग्लिश आणि हिंदीवरची त्याची जबरदस्त पकड लगेच समजते !!!

“अमर अकबर अँथनी” मधला आरश्याला चिकटपट्टीवाला सीन तर all time classic आहे ! किती वेळा ‘अमर अकबर..’ पाहिला आणि किती वेळा तो सीन पाहिला ह्याची गणतीच नाही ! आणि तो डायलॉग? “ ऐसा तो आदमी लाइफमें दोइच बार भागता है … ओलिंपिक का रेस हो, या पुलिसका केस हो !”

“याराना”मधे बच्चनचा रोल जितका कॉमिक होता तितकंच मनात ठसलं होतं ते “सारा जमाना…” गाण्याआधी त्याचं बंद पॅसेजमधून चालत येणं ! त्याच्या बुटांचा “ठॉक… ठॉक, ठॉक… ठॉक” असा आवाज तर अजूनही कानात घुमतोय ! तो ‘ठॉक.. ठॉक’ आवाज मग गाणं सुरू होताना बेमालूमपणे drum beats होतो आणि गाण्यात मिसळतो ! आणि तो असंख्य छोटे, छोटे light bulbs जडवलेला ड्रेस? तो आठवतोय?

बाय-द-वे, गाण्यावरून आठवलं - किशोरकुमारने, काळाच्या पडद्याआड जाण्याआधी, बच्चनसाठी गायलेलं शेवटचं गाणं आठवतंय?

अंधेरी रातोंमें
सुनसान राहोंपर
हर जुल्म मिटानेको
एक मसीहा निकलता है
जिसे लोग शहेनशाह कहते हैं !
‘शहेनशाह’च्या पोषाखाचा भाग असलेलं चिलखत लावलेला हात पाजळत, “रिश्ते में तो हम तुम्हारे बाप हैं, नाम हैं शहेनशाह” म्हणणारा एक वेगळा बच्चन आपल्याला टिनू आनंदने दाखवला !
(चौकस लोकांसाठी टीप – ‘मुकुल आनंद’ आणि ‘टिनू आनंद’ ही एकाच माणसाची दोन नावं नाहीत !! मुकुल आनंदच्या ‘अग्निपथ’मधे टिनू आनंदने कामही केलंय !!)

गाण्यांपैकी सांगायचं तर ‘सत्ते पे सत्ता’मधलं ‘दिलबर मेरे, कबतक मुझे, ऐसेही तडपाओगे …’ आहे ना, त्या गाण्यात बच्चन स्क्रीनवर येतो तेव्हा कस्सला हँडसम दिसतो राव ! त्याची दाढी तर असली गुळगुळीत केलीय की जणू त्याच्या after shave lotion चा सुगंध पडद्यावर दरवळतो ! Handsome looks आणि sex appeal बद्दल विचारलं की अगदी आजही बऱ्याच तरूण मुली बच्चनचं नाव घेतातच की !!!

‘सत्ते पे सत्ता’मधे तो रवी म्हणून जितका हँडसम दिसलाय तितकाच बाबूच्या रोलमधे खतरनाक दिसलाय. पिक्चरमधला बाबूच्या एंट्रीचा जो सीन आहे ना तो तर कधीच विसरणं शक्य नाही. ठाम चाल, दगडी चेहरा आणि निष्ठूर डोळे – जणू मूर्तिमंत क्रूरकर्मा ! बच्चन असा चालत येताना पडद्यावर दिसतो आणि त्यात आर.डी.चं खत्तरनाक background music. सगळं थिएटर अस्वस्थ झालं होतं !

सिनेमाचा विषय निघाला की, “किती वेळा पाहिला आठवत नाही”, “आता तर सिनेमा पाठ झालाय”, “पाहिजे तर शेवटाकडून उलटे सीन्स सांगू शकतो”, “कोण मोजत बसतंय? मनात आलं की पिक्चर पुन्हा एकदा पहायचा, बास!” अशी वाक्यं ऐकू आली की बिनधास्त विचारावं, “काय? ‘शोले’ बहाद्दर का?” अरे, त्यात बच्चन धर्मेंद्रचं ‘स्थळ’ घेऊन मौसीकडे जातो ना तो सीन ! त्यात शेवटची पंचलाईन “तो मैं ये रिश्ता पक्का समझूँ ?” बच्चन कस्सला शांतपणे टाकतो यार ! आता बघा, त्या सीनबद्दल लिहितानाच, “तुम्हारा नाम क्या है, बसंती?” आठवलंय. हॅ..असंच होतं नेहमी !! आता पुन्हा ‘शोले’ पहायला हवा !!!

इथे ‘शोले’बद्दल बोलताना तर मी नक्की सांगतो की तुम्ही इतक्यातल्या इतक्यात ते scenes मनात rewind करून पाहिले आहेत !!! ‘शोले’ परत-परत बघावा आणि काय ! प्रत्येकवेळी ‘शोले’ बघताना त्यात नवीन काहीतर सापडतंच ! निखळ आनंद आकड्यांत मोजण्यापलीकडचा असतो हेच खरं !

नाही, नाही, नाही यार ! ह्या सगळ्या यादीत आपण ‘जंजीर’ अजिबात विसरलो नाहीये !! ज्या सिनेमाने हिंदी सिनेमाला ’अँग्री यंग मॅन’ दिला त्या जंजीरला विसरून कसं चालेल? ’जंजीर’मधे शेरखान पहिल्यांदा इन्स्पेक्टर विजयला पोलिस स्टेशनमधे भेटायला येतो तो सीन आठवा ! एरियाचा दादा म्हणून गुर्मीत असलेला शेरखान ! त्यात तो रोल साकार करायला ‘प्राण’….म्हणजे जबरदस्तच की !! शेरखान खुर्ची ओढून बिनदिक्कतपणे बसणर तेव्हढ्यात, विजय समोरच्या टेबलवर बसल्या-बसल्याच, खुर्ची लाथाडून शेरखानला ऐकवतो, “ये पुलिस चौकी है, तुम्हारे बाप का घर नहीं !”

खरी धमाल तर त्यानंतरच्या सीनमधे आहे ना ! शेरखानचं आव्हान स्विकारून विजय त्याच्या गल्लीत पोचतो तो सीन !! पांढऱ्याशुभ्र कपडयांतला, शांत डोळ्यांत वादळ घेऊन उभा, बच्चन लगेच डोळ्यांसमोर आला ना !!! हे असंच होतं नेहमी ! एकदा बच्चनच्या सिनेमांचा विषय निघाला की किती सांगू आणि किती ऐकू ! सांगावं आणि ऐकावं तेवढं कमीच वाटतं !!!

मला खात्री आहे, अगदी आत्तासुद्धा, जगाच्या पाठीवर कुणीनाकुणीतरी ‘शोले’, ‘जंजीर’ किंवा ‘दीवार’ वगैरेची स्टोरी रंगवून सांगत असेल …।आणि म्हणत असेल, “अरे हॅट्ट॥ ! बच्चन येतो ना भौ ss !!!”

---------------------------------------
(पूर्वप्रसिद्धी : मायबोली दिवाळी अंक २००८)

Wednesday, November 19, 2008

सुट्टी

सुट्टीला गावी जायचं ठरतं
आणि शीळेला गाणं मिळतं

रजेचं कसं, काम आहे किती?
पैशांची सोय आहे का पुरेशी?
पाहून प्रश्न जरा दडपते छाती
मिळताच रजा गणित जुळतं
आणि शीळेला गाणं मिळतं १

जाताना पूर्वी त्यांच्या गावी
तान घ्यायचे वडील छानशी
पोहचायचे ते मनाने आधी
कळतं त्यांना काय व्हायचं
आणि शीळेला गाणं मिळतं २

गणपती नाही, दिवाळी तरी
लग्नकार्य वा नुसती भेट जरी
वाढत असते खरेदीची यादी
घरचं अंगण अनमोल वाटतं
आणि शीळेला गाणं मिळतं ३

कुठली जिलबी, कुठली भाजी
सुरमई, बांगडे,पापलेटं ताजी
बिघडलं पोट चालेल तरीही
भेळ, मिसळ, वडाही खायचं
आणि शीळेला गाणं मिळतं ४

दाराशीच वाट बघते आई
कौतुक करतील सासूबाई
भाऊबहिणीची उडते घाई
त्यांना तर काय करू वाटतं
आणि शीळेला गाणं मिळतं ५

सरींनी ओल्या चिंब भिजूनी
मोगऱ्याला सुगंध देते माती
मग फुले सुगंधित रातराणी
आता सरींना भेटायचं ठरतं
आणि शीळेला गाणं मिळतं ६

कटिंग चहा, पानाची टपरी
थोडी कट्ट्यावर भंकसगिरी
एखादी येते आठवण हळवी
थबकतं तिथेच पाऊल नेमकं
आणि शीळेला गाणं मिळतं ७

इन मीन पंधरा दिवसांची
जाते पाखराचे पंख लावूनी
सुट्टीत असते दमछाक तरी
नंतर आराम करायचं ठरतं
आणि शीळेला गाणं मिळतं ८

Monday, October 20, 2008

पहिली गझल

शांततेला सागराची गाज नाही
रातराणी धुंद झाली आज नाही

कोण रे तो, दंग बैसे गात गाणे?
बासरीला सूर की आवाज नाही?

भोग माझे योग झाले, मात्र आता
संपले ते भोगही हा माज नाही

वागताना बंधने ना पाळली मी
निंदकांची जीभही नाराज नाही

चालले जे पर्वताला हात देण्या
पाय त्यांचे भूषवाया साज नाही?

साजणी का साजणाला भूल पाडे?
धुंद झाल्या यौवनाला लाज नाही?

वृत्त: मंजुघोषा
वृत्त नियम: गालगागा * ३
मात्रा: १२

Monday, September 15, 2008

आवडत्या कवितांचा खो

संवेदनी सुरू केलेल्या आवडत्या कवितांचा खो माझ्याकडे पूनमकडून आला. (http://www.kathapournima.blogspot.com/) धन्स पूनम… त्यानिमित्ताने आवडत्या कविता पुन्हा वाचणं / आठवणं झालं !

आपल्याला आवडलेल्या दोन कविता द्यायच्या नाही का? (हे तर अवघड आहे ! दोनच काय द्यायच्या?) दुसरा नियम असा की कविता पूर्ण असेल तरी चालेल, अर्धवट आठवत असेल तरी चालेल॥ पण स्वत:ची नसावी !

कलेजे पे पत्थर रख कर वगैरे दोनच कविता देतोय. खरंतर खूप खूप देता येतील पण ह्या दोन कविता एकमेकींपासून अगदी वेगळ्या आहेत.

पहिली कविता कुसुमाग्रजांची !
‘कोलंबसाचे गर्वगीत’ कवितेमधे --
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!”

आणि ’दूर मनोऱ्यात’ कवितेमधे –
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो~यात
अन् लावा हृदयात सखयांनो आशेची वात

असलं बेफाट लिहिणारे कुसुमाग्रज ’स्वप्नाची समाप्ती’ ह्या कवितेत लेखणी किती प्रणयमधुर करतात बघा !

स्वप्नाची समाप्ती
स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा

स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशात
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरात

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

रातपाखरांचा आर्त
नाद नच कानी पडे
संपवुनी भावगीत
झोपलेले रातकिडे

पहाटेचे गार वारे
चोरट्याने जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर

शांती आणि विषण्ण्ता
दाटलेली दिशांतून
गजबज जगवील
जग घटकेने दोन!

जमू लागलेले दव
गवताच्या पातीवर
भासते भू तारकांच्या
आसवांनी ओलसर

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशी
पडे दूर पुष्परास
वाऱ्यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास

ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!

खळ्यामध्ये बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यातील घुंगुरांचा
नाद कानी येऊ लागे

आकृतींना दूरच्या त्या
येऊ लागे रूपरंग
हालचाल कुजबूज
होऊ लागे जागोजाग

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

होते म्हणू स्वप्न एक
एक रात्र पाहिलेले
होते म्हणू वेड एक
एक रात्र राहिलेले

प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर

ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडात दिसू वेडे
आणि ठरू अपराधी
- कुसुमाग्रज (’विशाखा’)

ह्या कवितेमधील सगळ्यात जास्त वेड लावणाऱ्या ओळी म्हणजे --
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
सगळी कविता म्हणजे कॅनव्हासवर एखादं रोमँटिक चित्र उतरल्यासारखी आहे ना ?
-----------------------------------------------------
त्यानंतर आमच्या पिढीतला (म्हणजे तरूण वगैरे !!) संदीप खरे !
मी स्वत: आस्तिक असूनही त्याच्या ह्या कवितेने नक्कीच विचार करायला लावलं !

नास्तिक
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा खरंतर गाभाऱ्यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरत्या सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याची….

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण की
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची….

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या नजरा
कोणीतरी स्वतःचेच ओझे स्वतःच्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच….

म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित,
पण मिळते अखंड समाधान, एक सहकारी लाभल्याचे!!....

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून....
तुमचा विश्वास नसेल आमच्यावर;
पण आमचा आहे ना!!!!!....

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात
तेंव्हा कुठे अनंत वर्षे घेऊ शकतो आपण दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे......
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो........
- संदीप खरे
----------------------------------------------
अजून खूप कवी आणि त्यांच्या कविता आहेत।

’घट्ट मिठी मारल्याशिवाय माणूस नसतं आपलं
ओठांवर आल्याशिवाय गाणं नसतं आपलं’
हे लिहिणारे मंगेश पाडगावकर आहेत.

तेवढ्यात हे लिहिणारे ना. धों. महानोर आठवतात.
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

किंवा मग –
’समुद्र बिलो्री ऐना
सृष्टीला पाचवा म्हैना’
असं गाणारे आनंदयात्री बा. भ. बोरकर आहेत.

पण काव्यमय खो-खोच्या नियमाप्रमाणे थांबायला हवं ! आता खो द्यायची वेळ.
माझा पहिला खो प्राजुला (http://www.praaju.blogspot.com/)
आता दुसरा खो तेजूला (http://halakafulaka.blogspot.com/)
(विचार केला आपण निदान प्राजु – तेजू असं तरी यमक जुळवावं !)
--------------

Sunday, August 31, 2008

बच्चन दर्शनमात्रे मन:कामनापूर्ती ! (उत्तरार्ध)

ब्लॉगवर लिहिताना खूप मोठा लेख लिहू नये असा अलिखित नियम आहे. एक मोठा लेख लिहिण्यापेक्षा २-३ छोटे लेख लिहावे. तो मोह मलाही झाला होता पण वाचनातली सलगता तुटू नये म्हणून लेख एकसंध ठेवला आहे. अरे हो आणि ह्या लेखाचा पूर्वार्ध वाचलायत ना?
-------------------------------------------------------------------------
१५ ऑगस्ट २००८ -- स्वातंत्र्य दिन दुहेरी आनंद घेऊन आला. आज ‘बच्चन दर्शन’ घडणार होतं.

‘शेवंतीचं बन’ ह्या निवडक लोकसंगीताच्या संचातली भन्नाट गाणी ऐकत संध्याकाळी निघालो. धो धो कोसळत्या पावसात जवळपास अडीच तास ड्राइव्ह करून नासाऊ कोलिजियमजवळ पोचलो ! अर्रर्र… पण काहीतरी गोंधळ झाला आणि रस्ता चुकलोय असं वाटायला लागलं ! त्यातच ‘किमान ६०% मानवी शरीर हे पाण्याने भरलेले असते’ ह्याचा प्रत्यय यायला लागला होता !! कुठेतरी थांबणं फार म्हणजे फारच आवश्यक होतं ! एवढ्यात एक मॅरियट हॉटेल दिसलं. (चला हे काम बेष्ट झालं!!)

डोकं परत काम करायला लागल्यावर जाणवलं हॉटेलमधे एक से एक श्रीमंत स्त्रिया आणि पुरूष ! बायकांचे कपडे तर सिनेमातनं उचलून आणल्यासारखे ! म्हटलं एखाद्या अमीर घरातल्या लग्नाची पार्टी वगैरे दिसतेय; आपण आपला पत्ता शोधावा ! हॉटेल स्टाफपैकी एकाला विचारलं तो म्हणाला हे काय नासाऊ कोलिजियम बाजूलाच तर आहे !! , लढ बाप्पू….मटकाच की एकदम !! आम्ही समजत होतो रस्ता चुकलोय आणि चुकून बरोबर जागी आलो होतो चक्क !! तेव्हाच मग साक्षात्कार झाला की हॉटेलमधे पार्टी बिर्टी नव्हती ! त्या ललना बच्चनचा कार्यक्रम पहायला नटूनसजून आल्या होत्या ! घाईघाईत गाडी नासाऊ कोलिजियमच्या ‘कार’स्थानात पार्क केली ! भर पावसात पळत पळत गेलो आणि मुख्य दरवाजातून आत शिरलो. पुणे / मुंबईला थिएटरात (मल्टिप्लेक्समधे नाही!) असते तशा गर्दीत घुसून निखिल समोसे घेऊन आला ! भेळ आणि मसाला चहाचा विचार एकंदर गर्दी पाहून झटकला ! त्या सगळ्या सीनमधे फक्त अजून एक आवाज हवा होता यार ! तो आवाज म्हणजे, “पाँच का दस, पाँच का दस”, “पंधरा का बीस, पंधरा का बीस” म्हणणाऱ्या ब्लॅकवाल्यांचा !

एकदाचे आमच्या सीटवर जाऊन बसलो. आरं बाबौ…नासाऊ कोलिजियम आतून एव्हढं मोठं आहे ? आपण फारच अंडर एस्टिमेट केलं होतं !! दहा-बारा हजार माणसं तर आरामात बसू शकतील. शिवाय बसायला आरामशीर खुर्च्या आणि ढकलाढकली वगैरे काही नाही ! य्ये हुई ना बात !!

सुरूवातीला एका लहान मुलांच्या ग्रुपचा डान्स झाला. पोरं जीव तोडून नाचली. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगबद्दल एक व्हिडीयो क्लिप सुरू झाली. या भयानक समस्येबद्दल काही ओळी तर डोक्यात ठाम बसल्या आहेत.. “If not now - When? If not here - Where? If not you - Who ?”

त्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. बाकी सगळ्या कार्यक्रमापेक्षा मला आणि निखिलला वेध लागले होते – अमिताभ कधी येतोय ह्याचे ! नाचगाणी चालू असताना प्रत्येक मोठ्या कलाकाराबरोबर स्टेजवर शामक दावरच्या ग्रुपचे डान्सर्स होते. शामक दावरने हिंदी सिनेमात एक चांगली गोष्ट करून ठेवलीय ती म्हणजे आपल्याला ’प्रमाणबद्ध’ डान्सर्स पहायची सवय लावलीय. खरंय ना ?

रितेश देशमुखने कार्यक्रमाला सुरूवात केली. त्याचं ’ए छोरी ! जरा नच के दिखा… जरा ठुमका लगा’ आणि ’कॅश’ चित्रपटाचं टायटल साँग मस्त होतं. रितेशच्यानंतर ’प्रिटी वूमन’ गाण्यावर पावलं थिरकली आणि दिमाखात प्रीटी झिंटा आली ! प्रिटी खरंच नावाप्रमाणे ’प्रिटी’ आहे, नाजूक आहे !

आता स्टेजवर अभिषेक बच्चन येईल म्हणून वाट बघत होतो आणि प्रेक्षकांत एकदम पाठीमागे गडबड उडली. स्पॉटलाईटच्या प्रकाशात, प्रेक्षकांच्यामधे, चक्क अभिषेक बच्चन उभा ! शप्पथ सांगतो…. तरूण पोरी आनंदाने इतक्या जोssरात किंचाळू शकतात हे माहितीच नव्हतं !! चार सुरक्षारक्षकांच्या कड्यात तो स्टेजवर आला आणि दिलखुलास नाचला. प्रेक्षागृहातले मंद दिवे पुन्हा सुरू झाले. अभिषेकने अचानक तिसऱ्या / चौथ्या रांगेत बसलेल्या एका तरूणीला उठायला सांगितलं. तिला म्हणाला, “Hey you! Beautiful lady in yellow… stand up!” हो-नाही करत ती लाजाळू मुलगी उभी राहिली आणि अभिषेकनं जाहीर केलं.. ती तरूणी म्हणजे ’श्वेतदी’! त्याची मोठी बहीण श्वेता!! दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असल्याने खास तेवढ्यासाठी भारतातून आली होती!!!

त्यानंतर स्टेजवर आली ‘Most beautiful lady on the Earth’ हे बिरूद मिरवणारी ऐश्वर्या !! ’क्रेझी किया रे’ गाण्यावर नाचत ऐश्वर्याने ऑडियन्सला क्रेझी करून टाकलं पार ! (त्यांची पूर्वजन्मीची काय पुण्यं असतील म्हणून मूर्तिमंत सौंदर्य घडवल्यावर देवाने त्यांना मधुबाला, माधुरी, ऐश्वर्या अशी नावं दिली?) सुप्त असूयेची नोंद करू शकणारं एखादं ’जेलसी मीटर’ असतं तर अभिषेक बच्चनबद्दल खूप नोंदी त्या मीटरने नोंदवल्या असत्या. आता साक्षात ऐश्वर्या बायको म्हटल्यावर दुसरं काय होणार?

नऊ वाजता सुरू झालेला कार्यक्रम साडेदहाच्या सुमाराच चांगलाच रंगला होता. ’निसर्गाच्या हाकेला ओ देणं’ पुन्हा एकदा आवश्यक होतं पण अमिताभची एंट्री तर चुकवायची नव्हती ! पण असं म्हणतात ‘जो भूक देतो तोच दाणाही देतो !’ आता बच्चन येईल असं वाटत होतं आणि स्टेजवर आले विशाल – शेखर हे म्युझिक डायरेक्टर्स ! त्यांची नाच-गाणी चालू असताना ‘हेल्थ ब्रेक’ (खास अमेरिकन शब्द !) घेऊन परत आलो तेव्हा विशाल – शेखरचा टाईम स्लॉट संपतच आला होता !!

खट खट खट …खट खट ॥खट खट खट खट !
ह्या आवाजाबरोबर तीन मोठ्या स्क्रीन्सवर अक्षरं उमटली – The Legend !

’अविस्मरणीय’ असा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा पाऊस सुरू झाला ! स्टेजवर कोण येणार आहे ते वेगळं सांगायची गरज नव्हतीच ! स्टेजवर येणं तर सोडाच पण अजून त्याचं पडद्यावरही दर्शन झालं नव्हतं आणि तरी टाळ्या – शिट्यांचा आवाज छप्पर फाडतो की काय असं वाटायला लागलं ! शिवाय टाळ्या वाजवणारे हात टीन एजर्सपासून ते वृद्धांपर्यंतचे ! अमिताभच्या लोकप्रियतेबद्दल फक्त ऐकलं होतं पण भारतापासून हजारो मैल दूर अमेरिकेत ते प्रत्यक्ष अनुभवलं !

’जहाँ तेरी ये नजर, मेरी जाँ मुझे खबर है !’ स्टेजवर नाचणारी प्रजा आपोआप बाजूला सरकली आणि ’तो’ आला ! टाळ्या-शिट्यांचा आवाज आता कानाचे पडदे फाडू पाहत होता. एखाद्या अदृश्य शक्तीने भारावल्यासारखे दहा-बारा हजार लोक एकाच वेळी उठून उभे राहिले ! Standing Ovation !!

’मैं हूँ डॉन…’, ’देखा ना हाय रे सोचा ना…’, ’रंग बरसे..’, ’शावा शावा’! सो कॉल्ड ’वय झालेला’ बच्चन एक से एक नमुने काढत होता आणि पब्लिक वेडं होत होतं ! Standing Ovation दिल्यावर बरेच लोक खाली बसले पण आमच्यासारखे काही वेडे पीर उभेच होते. आमच्या भागात तर मी आणि निखिल दोघंच उभे होतो, नाचत होतो !

’देखा ना हाय रे सोचा ना..’ चालू होतं तेव्हा ध्यानीमनी नसताना अचानक ’मोमेंट ऑफ दि लाईफ टाईम’ आला ! अमिताभने आमच्याकडे पाहिलं …त्यानं कमरेत हलकंसं वाकून आम्हाला अभिवादन केलं… आम्ही पाsssर गुडघ्यापर्यंत झुकलो आणि मग उभं राहिल्यावर त्याच्याकडे पाहून जोरजोरात हात हलवले… त्यानं आम्हाला ’हाय’ केल्यासारखे हात हलवले आणि परत परफॉरमन्समधे मश्गुल झाला ! आम्ही डायरेक्ट हवेतच तरंगायला लागलो !

थोड्यावेळाने मग बच्चन सगळ्यांशी बोलायला लागला. आत्तापर्यंत जो आवाज केवळ सिनेमा – टीव्हीवरून ऐकला होता तो धीरगंभीर आवाज पहिल्यांदा प्रत्यक्ष ऐकत होतो. कान तृप्त झाले बॉस्स… कान तृप्त झाले. तेव्हा काय माहिती होतं की अजून थोड्यावेळाने कान अजून जास्त तृप्त होणार आहेत. अमिताभ स्टेजवरून परत जाताना पुन्हा एकदा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट करत सगळे लोक उभे राहिले. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमिताभ स्टेजवर आला किंवा स्टेजवरून गेला तेव्हा प्रत्येक वेळी standing ovation!

त्यानंतर कानावर शब्द आला ‘नमश्काsssर’ ! पुन्हा एकदा टाळ्या – शिट्या सुरू !! ‘मोहिनी … मोहिनी’ अशा कोरसच्या साथीने स्टेजवर जणू मोहिनीअस्त्र अवतरलं ! ‘तेजाब’मधल्या ‘एक-दो-तीन’ गाण्यातली तिची फेमस स्टेप केली आणि आख्खा हॉल मधुरीवर फिदा झाला ! त्यापाठोपाठ तिने ‘के सरा सरा’ , ‘धक धक..’ आणि ‘आजा नच ले…’ ह्या गाण्यांवर अस्सला पर्फेक्ट डान्स केला की मनात म्हटलं उगीच नाही म्हणत, “एक सिर्फ माधुरी, बाकी सब अधुरी !’ माधुरीची गाणी झाल्यावर प्रेक्षकांशी हितगुज करताना ‘दीदी तेरा देवर दीवाना..’ आणि ‘माईने माई..’ ह्या गाण्यांच्या दोन-दोन ती ओळी गायली. माधुरीच ती … Beauty with Brains! ‘माईने माई’ गाण्यातल्या ओळी थोड्या बदलून ‘जोगन हो गई तेरी दुलारी… मन न्यू यॉर्कसंग लागा’ अशा गाण्याची चतुराई दाखवून तिनं भरपूर टाळ्या मिळवल्या !

त्या संपूर्ण कार्यक्रमाचे चार-पाच हायपॉईंटस होते. पहिला म्हणजे अभिषेकची एन्ट्री. पोरींचं ते खच्चून किंचाळणं कधीच विसरू शकणार नाही. दुसरा हायपॉइंट म्हणजे ‘तेरी बिंदिया रे..’ हे ‘अभिमान’मधलं गाणं ! स्टेजच्या एका बाजूकडून अमिताभ आणि ऐश्वर्या आले तर दुसऱ्या बाजूकडून अभिषेक आणि जया बच्चन ! अमिताभ आणि जया एकमेकांजवळ आले आणि तेवढ्यात अभिषेक एक छोटं स्टूल घेऊन आला. जया त्यावर उभी राहिली आणि मग तिने इतकं लाजून अमिताभला मिठी दिली की क्या कहने !

अजून दोन हायपॉइंट्स म्हणजे ‘कजरा रे..’ आणि ‘डोला रे डोला..’ गाणी ! ‘कजरा रे …’ तर महितीच होतं की सॉलीड हिट असेल. ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ प्रत्यक्ष आपल्यासमोर पाहून कोण जागेवर नुसता बसू शकेल ? ‘डोला रे डोला’ गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्याला एकत्र स्क्रीनवर पाहणंही निखळ आनंद होता मग प्रत्यक्षातली बात काय सांगू? लाल रंगाच्या काठाची, पांढरी धवल साडी नेसलेली माधुरी आणि लालचुटूक रंगाच्या साडीला फिक्कट हिरव्या रंगाचा काठ अशा वस्त्रांत ऐश्वर्या ! नुसत्या उभ्या राहिल्या तरी नजर खिळूवन ठेवतील अशा त्या दोन सौंदर्यवती ! इथे तर स्टेजवर गुलाल उधळीत बहारदार नृत्य करत होत्या !!

ते पाहून डोळे तृप्त झाले आणि कान तृप्त केले ते पाचव्या हायपॉइंटने… बच्चनच्या डायलॉग्जनी ! त्या तीन पडद्यांवर अक्षरं उमटली – ‘The Voice!’ बच्चनच्या आवाजामुळे अजरामर झालेल्या डायलॉग्जमधली निवडक वाक्यं, अंधारातून वेगवेगळ्या दिशांनी, एकामागोमाग एक अशी बंदुकीतून गोळ्या सुटल्यासारखी सटासट कानांवर यायला लागली…….
“हम जहाँ खडे रहते हैं लाईन वहींसे शुरू होती है !”
“डॉन का इन्तजार तो ग्यारा मुल्कोंकी पुलिस कर रही है लेकिन डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है !”
“सरजमीन-ऐ-हिन्दोस्ताँ …!”
“हाँ… मैं उसी अभागन शांती का बेटा हूँ !”
“आय कॅन टाक इंग्लिश, आय कॅन वाक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज ए फन्नी लँग्वेज…”
“रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है…शहेनशाह।”
“इतना पैसा में घर नहीं चलता॥साला ईमान कैसे चलेगा॥ हाँय ? ”
“पीटर… तुम लोग मुझे ढूँढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इन्तजार कर रहा हूँ !”

हात दुखत होते पण टाळ्या थांबत नव्हत्या! स्टेजवरच्या अमिताभकडे पाहत, आता डोळे आणि कानांना काय मेजवानी मिळणार, ह्या उत्सुकतेने सगळे लोक मिळेल त्या जागी बसले !(हाच तो आवाज जो जगभरातले बच्चनवेडे कानात प्राण आणून ऐकतात ! आज विश्वास ठेवणं अवघड जातंय..एके काळी अमिताभला ऑल इंडिया रेडियोच्या अधिकाऱ्यांनी ‘निवेदक’ म्हणून नाकारलं होतं – माईक टेस्ट फेल म्हणून ! सत्य हे कल्पनेपेक्षा अदभुत असतं हेच खरं !!)

सुरूवातच झाली ‘कभी कभी’ ह्या कवितेने ! त्याचा बुलंद आवाज आणि दहा-बारा हजार लोकांची भारावल्यासारखी शांतता ! ‘कभी कभी’ नंतर ‘अग्निपथ’ ही स्व. हरिवंशराय बच्चनांची कविता. एकोणिसशे चाळीस साली स्वातंत्र्य सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठीची कविता – ‘अग्निपथ’ !

ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है
अश्रू, स्वेद, रक्त से, लथपथ लथपथ
अग्निपथ…अग्निपथ…अग्निपथ !

अमिताभच्या आवाजात ही कविता प्रत्यक्ष ऐकताना काय वाटलं ते सांगताच येत नाही.त्यानंतर सुरू झाला ‘अग्निपथ’मधलाच सुप्रसिध्द डायलॉग “विजय दीनानाथ चौहान ! बाप का नाम दीनानाथ चौहान । माँ का नाम सुहासनी चौहान । गाँव माँडवा ….!” ‘अग्निपथ’ सिनेमा पहिल्यांदा बघताना ह्या सीनला थिएटरमधेही खुर्चीच्या काठावर बसलो होतो… इथे तर काय काय ऐकू असं झालं होतं !

‘अनफर्गेटेबल’ कार्यक्रम अत्युच्च स्थानी पोचला ‘दीवार’च्या डायलॉगने -- “आज…. खूष तो बहोत होंगे तुम..!” नास्तिक विजय फक्त आईचे प्राण वाचावेत म्हणून शंकराच्या देवळाची पायरी चढतो तो सीन ! पिन ड्रॉप सायलेन्समधे फक्त बच्चनचा आवाज थरथरत होता. डायलॉगचा शेवट आला… “मेरी माँ मुझे दे दो भगवान…मेरी माँ मुझे दे दो !” बघता बघता अमिताभच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले… ना कुठलं ग्लिसरीन, ना कुठलीही ट्रिक ! काही कळायच्या आधीच नकळत माझेही डोळे पाणावले ! सर्वोत्कृष्ट प्रसंगाला दाद द्यायला टाळ्या कमी पडतात !!!

मग अमिताभने सांगितली एक आठवण – ‘दीवार’च्या ह्या प्रसंगाचे शूटिंग करतानाची. सकाळी नऊ वाजता तो स्टुडियोत पोहचला. (By the way, तुम्हाला माहितीय? नूतन ही एक अभिनेत्री सोडल्यास इतर कोणीही अभिनेता / अभिनेत्री, वक्तशीरपणाबाबत, अमिताभचा हात धरू शकायचं नाही.) अमिताभ सांगत होता, “It was a normal shift ! मी दिग्दर्शक यश चोप्रांना विनंती केली -- हा सीन करायला माझी अजून मानसिक तयारी नाही, आपण थोड्यावेळाने सीन करू. यश चोप्रा म्हणाले काळजी करू नकोस; तुला पाहिजे तितका वेळ घे तोपर्यंत मी इतर काही सीन घेतो. मी माझ्या मेक अप रूममधे बसून होतो … मनाची तयारी करत. शेवटी एकदाचा बाहेर आलो. यश चोप्रांना म्हणालो चला शूटिंग करूया…. मी तयार आहे. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते !” ‘संयम’ हा जर दागिना असेल तर अमिताभ आणि यश चोप्रांनी त्या दागिन्याचा मुगुट करून घातला होता !!

आता अमिताभ खूपच हळवा झाला होता. त्याने त्याच्या आईची जयंती दोनच दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितले. तो म्हणाला असंख्य वेळा पडद्यावरच्या माझ्या आईचा मृत्यू झाला पण ती आई पडद्याबाहेर जिवंत असायची, मला भेटायची. आता माझी खरी आई मात्र मला भेटायला आता कधीच येऊ शकणार नाही ! त्याने उजव्या हाताच्या अंगठ्याने गालावर ओघळलेले अश्रू चटकन दूर केले.

अमिताभ बोलायचा थांबला आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्यांची फुलं उधळत standing ovation दिलं ! अमिताभने तीन वेळा कमरेत लवून अभिवादन केलं, टाळ्यांचा स्वीकार केला पण टाळ्यांचा आवाज वाढतच होता…कितीतरी वेळ !

आता कार्यक्रम ह्यापेक्षा जास्त रंगणं शक्यच नव्हतं. थोड्यावेळातच शेवटचं गाणं सुरू झालं – ‘झूम बराबर झूम’ सिनेमातलं गाणं -- ‘झूssम बराबर झूssम बराबर झूssssम !’ ह्या गाण्याला रितेश देशमुखपासून अमिताभ बच्चनपर्यंत सगळे स्टेजवर नाचत होते. आम्हीही सगळे बेभान नाचत होतो. आमचे डोळे मात्र फक्त बच्चनवर खिळले होते. फार पूर्वी जीतेंद्र हा नट म्हणाला होता की अमिताभचा सिनेमा पहायला येणारा प्रेक्षक रूपयाचे सोळा आणे अमिताभलाच बघायला खर्च करतो.

शेवटी सगळे कलाकार स्टेजवर एकत्र उभे होते। मधोमध उभ्या अमिताभकडे जया बच्चन एका व्यक्तीला घेऊन गेली। अमिताभच्या शेजारी थोडा संकोचून तो माणूस उभा राहिला. बच्चनने त्या माणसाच्या खांद्याभोवती हात टाकून दोस्ती खात्यात ओळख करून दिली, “He is Dr. Nene !” च्यायल्लाssss माधुरीचा नवरा ! (आपली पूर्बजन्मीची पुण्याई कमी पडली बहुतेक !) जेलसी मीटरने पुन्हा एकदा खूप नोंदी केल्या असत्या !

‘अनफर्गेटेबल’ शो म्हणता म्हणता कार्यक्रम संपलाही. बाहेर आलो तर अवाढव्य ‘कार’स्थानात गाडीच सापडेना. मगाशी गडबडीत रांगेचा क्रमांक नीट पाहून ठेवायचं राहूनच गेलं होतं ! मी आणि निखिल दोन दिशांना फिरतोय आपले. मग जाणवलं की आपण आमच्यासारखे इतरही नमुने होते. जवळपास पूर्ण पार्किंग लॉट रिकामा झाल्यावर शेवटी गाडी मिळाली ! आम्ही शरीराने गाडीतून आणि मनाने हवेत तरंगत पहाटे साडेतीनच्या सुमारास घरी पोहचलो! आता कधीही आठवणींच्या ’अनफर्गेटेबल’ कप्यात डोकवायचं आणि म्हणायचं, “आज…खूष तो बहोत हैं हम !”

Monday, August 18, 2008

बच्चन दर्शनमात्रे मन:कामनापूर्ती ! (पूर्वार्ध)

अमिताभ बच्चन टीव्हीवर जाहिरातीत झळकायला लागला. It’s going to be Unforgettable! अविस्मरणीय होईल अशी खात्री देणारी ‘अनफर्गेटेबल टूर’ जाहीर झाली.

काही दिवसांत अधिक अधिक माहिती मिळायला लागली. अभिषेक, ऐश्वर्या, प्रीती झिंटा, रितेश देशमुख आणि दस्तुरखुद्द अमिताभ ! हे कमी होतं म्हणून की काय तर समजलं अमेरिकेतल्या शोजमधे माधुरी असेल !! हे तर सहीच ना …आधीच बिर्याणी, कबाब आणि भरलं पापलेट वगैरे असं ताट असणार हे समजलं होतं, त्यात आता जेवणानंतर फिरनीही आहे !

एवढं सगळं समजूनही आधी निवांतच होतो. ह्याला विचार, त्याला विचार, हा येणारे का बघ, तो का येत नाही विचार असं करण्यात काही दिवस गेले. ‘स्वभावाला औषध नसतं !’

नऊ ऑगस्टला न्यू जर्सी आणि पंधरा ऑगस्टला न्यू यॉर्क असे दोन शो जाहीर झाले होते. न्यू जर्सीचा शो दहा दिवसांवर आला तरी चित्रे सरकार निवांत होते. तिकीट काढण्याचा पत्ताच नाही. सासऱ्यांनी जणू कार्यक्रमाची स्थळं (Atlantic City – न्यू जर्सी आणि Nassau Coliseum – न्यू यॉर्क) आंदण दिली होती किंवा मागच्या जन्मी संस्थानिक होतो बहुतेक !!

असं करता करता शेवटी २७ जुलैला एका मित्राशी बोलणं झालं. तो म्हणाला त्याला न्यू जर्सीच्या शोचं कसंबसं तिकीट मिळालं. आता लवकर हालचाली करणं भाग होतं नाहीतर आहेच .. कार्यक्रम संपल्यावर रिडीफ.कॉमवर नुसते फोटो बघणं !

(स्वगत – अरे तो सदुसष्ठ वर्षांचा बच्चन आपल्यापासून दोनेक तासांच्या अंतरापर्यंत येतोय आणि आपण जायला नको? आयुष्यात एकदा तरी ह्या माणसाला ‘याचि देही याचि डोळा’ पहायचय ना … मग थोडी धावपळ कर की लेका !! अगदी तुझा हरी तुला खाटल्यावरी आणून देईल असं वाटलं तरी तोही आधी एक तिकीट स्वत:साठी ठेवेल आणि मगच तुला शोधत येईल !! त्यात तू तुझ्या आतेभावाला (निखिल) सांगीतलयस की शक्यतो तिकीट मिळवतो. तो हीरो तर पाच तास प्रवास करून येणार फक्त बच्चनला बघण्यासाठी !! जा पळ टोण्या जरा फोनाफोनी कर किंवा इंटरनेटवर तिकीट मिळतय का बघ !!! )
----------------------------------
मंगळवार – जुलै २९, २००८
सकाळी १०:०० वा. --

देसी लोकांच्या भरवशाची वेबसाईट सुलेखा.कॉम ! इथे फक्त पाचशे डॉलर्सची तिकीटं राहिली होती ! बाकी तिकीटं सोल्ड आऊट !! पाचशे डॉलर्सचं तिकीट काढलं असतं तर घरी परत येताना थंडीच भरली असती !! पहिल्याच प्रयत्नात माशी शिंकली … मनात शंकेची पाल चुकचुकली !! च्यायला तिकीटं मिळतायत की नाही आता !! देसी पार्टी.कॉम आणि देसी क्लब.कॉम ह्या आजून दोन वेब साईट्स पाहिल्या. तिथेही तीच कथा !! ह्या तीन ठिकाणीच तिकीट ऑनलाईन मिळू शकणार होते. तिथल्या आशा संपल्या !!!

सकाळी ११:०० वा. --
“हॅलो … ए टू झी म्युझिक?”
“हाँ बोलो !”
“आप के पास अनफर्गेटेबल टूर की टिकेट्स हैं क्या ?”
“नहीं भाई … मैंने सब बिक डाली !”

सकाळी ११: १० वा. –
(च्यायला ह्या पूजांका एंटरप्राइजेसचा फोन नंबर सारखा बिझी येतोय. बरोबर आहे म्हणा ! ते एव्हेंट ऑर्गनायझर्स आहेत म्हणल्यावर त्यांना कुठली उसंत आता ! अरे हो बाबा .. पण तुझ्या तिकीटाचं काय ? !!)

दुपारी १२:०० ते १२:३० वा. – लंच टाईम
पूजांकाच्या वेबसाईटवर जितक्या दुकानांचे फोन नंबर होते त्या सगळ्यांना फोन झाले. सगळीकडे नन्नाचा पाढा !! नाही म्हणायला एक / दोन ठिकाणी अगदी शेवटची तिकीटं होती ! तिथे बसायचं म्हणजे क्लोज सर्कीट स्क्रीनवर दिसणाऱ्या दाढीच्या रंगावरून ओळखायला लागलं असतं – समोर अमिताभ आहे की अभिषेक !!

आशेचा किरण एकच – न्यू जर्सी़च्या एडिसन भागातला पटेल व्हिडीयोवाला म्हणालाय कदाचित उद्या त्याच्याकडे अजून काही तिकीटं येतील. कितीची, किती -- आत्ता काहीच सांगू शकत नाही !

दुपारी ३:०० वा. --
अचानक डोक्यात विचार चमकला. (अरे आपली एक देसी सहकारी आहे. तिच्या वडिलांचं न्यू यॉर्कमधे रेस्टॉरंट आहे. कदाचित ती काही मदत करू शकेल का पहावं.)

तिला ईमेल पाठवली. तिचं उत्तर आलं की तिचे वडील भरत जोतवानीला ओळखतात. ते काही प्रयत्न करू शकतील का बघते पण खूप महागाची तिकीटं मिळू शकतील. (चला ! हिचे वडील डायरेक्टली इव्हेंट ऑर्गनायझरलाच ओळखतात ! बघू या लक बाय चान्स काही होतंय का ?)

संध्याकाळी दीपाला म्हटलं शेवटच्या रांगेतून शो बघण्यात काय अर्थ आहे? पाचशे बिचशेचं तिकीट तर परवडेगा नहीं ! त्यापेक्षा नंतर घरी डीव्हीडी आणून निवांतपणे बघू ! शिवाय कुठे दोन तास गाडी चालवत जायचं ! (…कोल्ह्याला द्राक्षं आंबट !!)
निखिललाही फोन करून टाकला – एकंदर आपलं जाणं अवघड आहे … मनाची तयारी कर !!
-----------------------------------
बुधवार – जुलै ३०, २००८
सकाळी १०:१५ वा. –
नवा दिवस, नवी आशा ! नवा दिवस, नवा प्रयत्न !!

“हॅलो पटेल व्हिडीयो ?”
“हाँ !”
“अनफर्गेटेबल टूर की टिकेट्स आयी हैं क्या ?”
“हाँ !”
“कितनी टिकट्स हैं ?”
“कितनी चाहिये? मेरे पास पाँच हैं !”
“अरे वा ! दो मिलेगी क्या ! मैं आप को क्रेडिट कार्ड ..”
“सिर्फ कॅश !”
“अच्छा आप रिहर्व्ह कर सकते हैं क्या… मैं लंच टाईम में आता हूँ !”
“नहीं भाई .. इतने फोन आ रहे हैं ! आप चान्स ले लो !” – फोन कट !!
(लंच टाईममधे जाणार कसा तू? आज नेमकी गाडी बिघडली म्हणून मित्राबरोबर ऑफिसला आलायस ना लेका !)

सकाळी १०:५० वा. –
“हॅलो पटेल व्हिडीयो?”
“हां !”
“मैं संदीप बोल रहा हूँ ! मैंने थोडी देर पहले फोन किया था अनफर्गेटेबल टूर के लिये ! आप प्लीsssज साढे बारा बजे तक प्लीज टिकट होल्ड कर सकते हैं क्या… मैं डेफ्फिनेटली आऊँगा !”
“ठीक है …लेकिन साडे बारा के बाद अगर समजो टिकट बिक गया ने…तो जबाबदारी मेरी नहीं !”
“हाँ … ठीक है ! आपका क्या नाम है ?”
“अतुल !”
“ओके .. थँक्स ! आता हूँ मैं !”

सकाळी ११:०० वा. --
ऑफिसचा फोन वाजला. पलीकडून दीपा बोलत होती.
“विचारलंस का रे ?”
“नाही अजून जमलं नाही… विचारतो.”
“अरे तुझ्या तिकीटांची मलाच पडलीय … लवकर बघ काहीतरी !”
“हो बघतो !”

सकाळी ११:१५ वा. --
आता मॅनेजरला विचारायचं की तासभर बाहेर जाऊन येऊ का ?

“Hey .. Can I ask you for two favors?”
“Ya?”
“Can I rush to Edison and second thing is… can I borrow your car ? I am trying to get the tickets for this Unforgettable tour and that person is ready to hold the tickets only till 12:30.”
“Oh sure… no problem…. and the tank is full … so don’t worry!”
“Thanks …. I will be back soon.”

चला हे तर मोठ्ठं काम झालं ! कशासाठी चाललोय ते मॅनेजरला सांगून वर त्याचीच गाडी घेऊन जायचं !! आज नशीब चांगलं दिसतंय !!!

सकाळी ११:२० वा. --
“हॅलो … पटेल व्हिडीयो ?”
“हाँ !”
“अतुलभाई हैं क्या? मैं संदीप बोल रहा हूँ ।“
“हाँ संदीपभाई बोलो..मैं अतुल !”
“अतुलभाई … मैं अभी निकल रहा हूँ… आधे घंटे में पहुँच जाऊँगा !”
“कोई बात नहीं. .. ठीक है… !”
…………
(आता ऑफिसपासून पटेल व्हिडियो अर्ध्या तासावर. सरळ माहिती असलेले इंटरस्टेट ७८ इस्ट आणि गार्डन स्टेट पार्क वे हे हाय वे घ्यावे.. कदाचित ट्रॅफिक नसेल तर बारापर्यत पोचू तिथे.)
…………
(एडिसनसाठी पार्क वे वरून १३१ नंबरची एक्झिट घ्यायचीय. त्यासाठी ७८ इस्ट वरून पार्क वे साऊथ घ्यायचा की नॉर्थ ? दक्षिणे दिशेने जायचं की उत्तर दिशेनं? प्रश्न … प्रश्न … प्रश्न !!! हां ठीक आहे पार्क वे नॉर्थ घेऊन चालेल….. नाही रे मागे एकदा तू साऊथ घेतला होतास… की तो नॉर्थच होता? साउथच बहुतेक..हो साऊथच… नाही रे बाबा नॉर्थ ! .. नॉर्थच घ्यायचा !)
…………
इंटरस्टेट ७८ वरून पार्क वेसाठी एक्झिट घेतली… समोर पार्क वे नॉर्थ आणि पार्क वे साऊथ अशा दोन पाट्या… गाडी पार्क वे नॉर्थच्या दिशेने नेणार इतक्यात डोक्यात विचार आला …(अरे ! आपण तर बहुतेक एडिसनच्या थोडे उत्तरेला आहोत… पार्क वे साऊथ घेतला तर एडिसन पार करून रस्ता तसाच पुढे समुद्र आणि बीचेसच्या दिशेने जातो !)

डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला ! शेवटच्या क्षणी निर्णय घेऊन पार्क वे साऊथ घेतला !! (वाईटात वाईट काय होईल ? एक यु टर्न घ्यावा लागेल. नाहीतरी आपण रस्त्यांच्या बाबतीत ’यू, मी और हम’ आहोतच !!)

पार्क वेवर आल्यावर पहिली एक्झिट साईन एकशे बेचाळीसच्या आसपासची होती. हिशोब जुळला. (आत्ता आपण १३१ पेक्षा मोठ्या क्रमांकाच्या एक्झिटजवळ आहोत. दक्षिणेला जात आहोत म्हणजे एक्झिट क्रमांक कमी होत जातील. पर्फेक्ट … एडिसनला जाण्यासाठी हाच रस्ता बरोबर आहे !)
…………
पार्क वे वर वाहतुक सुरळीत चालू होती म्हणजे अजून एक धोका टळला होता. १३१ क्रमांकाची एक्झिट घेतली आणि ट्रॅफिक लाईटशी थांबलो.
“हॅलो … पटेल व्हिडियो ? अतुलभाई हैं क्या ?”
“ आप कोन बोल रहें ?”
“मैं संदीप”
“हाँ रूको एक मिनिट … ओ अत्तुलभाई आपका फोन..”
“हाँ .. बोलिये ?”
“अतुलभाई मैं संदीप… मैंने पार्क वे से एक्झिट ली है … एक पाँच – दस मिनट में आता हूँ !”
“हाँ हाँ … वांदा नहीं संदीपभाई !”
“ओके ..थँक्स !”
…………
सकाळी ११:५५ वा. --
पटेल व्हिडियोमधे पोचलो एकदाचा. आत्तापर्यंत न पाहिलेल्या अतुलभाईंनी तोंडभर हसून स्वागत केलं. त्यांच्याकडून दोन तिकीटं घेतली. अहाहाहा … स्वर्ग दोन बोटं का कायसा उरला ! माझ्यासमोरच लोकांचे तिकिटांसाठी फोन येत होते. मधल्या तासाभारात बाकीची तीन तिकीटं खपली होती. एकाला तर अतुलभाईंनी माझ्यासमोरच फोनवर सांगितलं की अभी लास्ट दो टिकट बेच दिया ! त्या दिवशी लॉटरीचं तिकीट घ्यायला पाहिजे होतं … नशीब फारच जोरावर होतं !
…………
हुश्श …. ! पटेल व्हिडियोमधून बाहेर पडलो. पहिला दीपाला फोन केला. ती म्हणे अरे केवढा एक्साइटेड आहेस तू ! मग … व्हायला नको ? बच्चन दर्शन घडू शकण्याची तिकीटं हातात होती !

दुपारी १२:१० वा. --
आता दोन तासांची धावपळ एकदम जाणवायला लागली. रस्ता क्रॉस केला आणि शांतपणे ‘जस्सी लस्सी & स्वीट मार्ट’ इथे गेलो. भर दुपारच्या उन्हात थंडगार उसाचा रस पिताना फारच मस्त वाटायला लागलं. पुण्यात धाकट्या भावाला फोन लावला ! मंदारला नुसतं म्हणालो की माझ्या हातात काय आहे माहिती आहे का? तर तो माझ्यापेक्षा दोन पावलं पुढे…तो म्हणे, “एबीच्या शोची तिकीटं का ?” मंदारशी बोलणं झाल्यावर पुण्यातच दीपाच्या बहिणीला (ऋतु) फोन केला. ती ही सॉलिड एक्साइटेड होती !!

दुपारी १२:५० वा. : --
ऑफिसमधे परत. मॅनेजरला मनापासून धन्यवादांसहित गाडीच्या किल्या परत दिल्या !! “आज कल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे “ असं काहीतरी फीलिंग आलं होतं !

आता कुणी म्हणेलही की कशाला एवढे उद्योग करायचे ? असं काय सोनं लागलंय अमिताभला ? त्याचवेळी कित्येक जण असे भेटतील ज्यांना ही सगळी धडपड का करायची ते नक्की माहिती असेल. शेवटी ‘घायल की गत, घायल जाने’ हेच खरं !!!
---------------------------------------------------------
ता. क. -- :
हुर्रे sssss ! १५ ऑगस्ट २००८ – बच्चन दर्शन घडले … कान, डोळे तृप्त जाहले !
आता ह्या लेखाचा उत्तरार्ध लवकरच !!!

Friday, July 18, 2008

पानसेबाई

“अरे व्वा ! शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच ‘चेंगट’ किंवा ‘शुंभ’ म्हणाल्या नाहीयेत !”

पानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी !!

कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखऱ्या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं !

आमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू? अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही. त्यांच्या आवाजाला एक नादमय गोडवा होता. मुख्य म्हणजे वाणी अगदी स्पष्ट होती. खरंतर त्यांची निवृत्ती काही वर्षांपलीकडेच उभी होती, पण ती जाणीव फक्त चेहऱ्यावरच्या काही सुरकुत्यांना आणि केसांच्या चांदीला होती. त्या केसांचा नीट बसवलेला छोटा अंबाडा बांधायच्या आणि ह्या सगळ्या वर्णनाला योग्य अशी नऊवारी साडी नेसायच्या. नऊवारी साडीमुळे तर त्या आम्हाला शाळेत शिकवणाऱ्या आजीच वाटायच्या ! त्यांच्या हाती एक छोटी कापडी पिशवी असायची.

पानसेबाईंच्या शिकवण्याबद्दल तर काय सांगू? म्हणायच्या जे आवडेल ते आधी कर ! त्या सगळ्या मुलांच्या पालकांना एक आवर्जून सांगायच्या की मुलं अभ्यास करतात हो, फक्त त्यांना गोडी लागायला पाहिजे. ती गोडी कशी लागेल तेव्हढं आपण बघायचं. तेव्हा नीट कळायचं नाही पण आता समजतं की किती मोठी गोष्ट त्या सोप्या भाषेत सांगायच्या. नुसत्या सांगायच्या नाहीत तर आमच्याबरोबर रोज जगायच्या. ‘तारे जमीन पर’ बघताना पानसेबाईंची खूप आठवण आली. त्यातला ‘राम शंकर निकुंभ’तरी वेगळं काय म्हणत होता? मुलांचं शक्तिस्थान नीट वापरलं तर त्याचा उपयोग इतर ठिकाणीही करता येतो !!!

एखादा मुलगा खिडकीतून बाहेर बघत बसला असेल तर थोडा वेळ त्याला तसंच बघू द्यायच्या. उगाच ओरडून त्याची तंद्री भंग नाही करायच्या. मग त्याच्या जोडीला सगळ्या वर्गालाच बाहेर बघू द्यायच्या. झाडावरचा एखादा पक्षी दाखवायच्या. मोकळ्या मैदानापलीकडल्या रस्त्यावरून धावणारी लालचुटूक बस दाखवायच्या. मग बोलता-बोलता अलगद सगळ्यांचं लक्ष, त्या जे काही वर्गात शिकवत असतील त्याकडे, वळवायच्या. खिडकीबाहेर बघायला सुरूवात केलेला मुलगाही आपोआप परत मनानेही वर्गात यायचा !

लहानपणी आपण खूपदा ऐकतो की अक्षर कसं मोत्याच्या दाण्यासारखं हवं ! पानसेबांईंचं अक्षर तसंच होतं … मोत्याच्या दाण्यासारखं ! नुसतं वहीतलंच नाही तर फळ्यावर लिहिलेलंसुध्दा !! बरेचदा असं दिसतं की फळ्यावर लिहिताना अक्षर नीट येत नाही. काहीजण टेकडी चढतात तर काही टेकडी उतरतात !!! काहींचं अक्षर लहान आकारापासून सुरू होतं ते मोठं होत जातं ! काहींचा हत्ती निघतो आणि पूर्णविरामापाशी मुंगी पोचते !!! सलग एका ओळीत, एका मापाची अक्षरं लिहू शकणारे कमीच ! पानसेबाईंना फळ्यावर लिहिताना पाहूनच शिकलो की, पेनने वहीवर लिहिताना, पेन धरलेला हात आपण वहीवर टेकवतो पण फळ्यावर हात टेकवायचा नसतो .. फक्त खडू टेकवायचा आणि लिहायचं !

मला वाटतं पानसेबाई सगळ्या मुलांना खूप आवडायच्या त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्या प्रत्येकातलं वेगळेपण शोधायच्या, जपायच्या आणि जोपासायच्याही. माझ्यापुरतं सांगायचं तर पानसेबाईंनी बहुतेक लगेच ओळखलं की ह्याला अभ्यास करण्यापेक्षा पुस्तकं वाचायला आवडतं आणि धड्यातली उत्तरं पाठ करण्यापेक्षा भाषणाचं पाठांतर आवडतंय. वक्तृत्वस्पर्धा आणि नाटकांमधे भाग घेण्यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं. कधी त्यांना मोकळा तास असला तर स्वत: जरा आराम करण्याऐवजी नाटक, भाषण असली खुडबूड करणाऱ्या आम्हा पोरांवर मेहनत घेत बसायच्या.

मला आठवतंय त्या वर्षी शाळेच्या गॅदरिंगला त्यांनी मला ‘सिंहगडचा शिलेदार’ असं भाषण दिलं होतं. ते शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं स्वगत अशा प्रकारचं होतं. भाषण पाठ करून घेणं आणि आवाजातले चढ-उतार ह्यावर शाळेत पानसेबाईंनी आणि घरी आईने जातीने लक्ष दिलं होतं. माझी आईसुद्धा शिक्षिका असल्याने शाळेत आणि घरीही शिक्षिकांचं जातीनं लक्ष होतं. आईनं खूप हौसेनं मावळ्याचा पांढरा ड्रेस, कमरेला शेला, खोटी तलवार, डोक्यावर आडवी पगडी वगैरे असं सगळं आणलं होतं. मिशीच्या जागी पेन्सिलने रेष काढली होती. कॉलेजमधे नंतर पुरूषोत्तम करंडक वगैरे केलं पण स्टेजमागच्या खोलीत मेक-अप करताना छातीचे ठोके आपसूक वाढण्याचा पहिला अनुभव म्हणजे ते मावळ्याचं स्वगत !

स्टेजवर गेल्यावर समोर बसलेले असंख्य चेहरे बघून पहिले काही सेकंद बोबडीच वळली ! सगळ्या चेहऱ्यांचा मिळून एक मोठ्ठा चेहरा समोरच्या अंधारातून आपल्याकडे बघतोय असं वाटायला लागलं !! शरीराचा तोल एका पायावरून दुस़ऱ्या पायावर अशी अस्वस्थ चुळबूळ सुरू झाली, छातीचे ठोके माईकमधून सगळ्यांना ऐकू जातायत असं वाटायला लागलं, दोन्ही हाताच्या तळव्यांना दरदरून घाम..! भरीत भर म्हणून, पाठांतराच्या कप्प्यावर, मेंदूनं विस्मृतीचं आवरण घालून ठेवलं !! थोडक्यात म्हणजे फजितीची पूर्वतयारी झाली होती !!

अस्वस्थपणे भिरभिरत्या नजरेला विंगमधल्या पानसेबाई दिसल्या. त्यांच्यातल्या आजीने नेहमीचं, ओळखीचं स्मित दिलं. त्या नजरेतल्या विश्वासाने धीर दिला, हुरूप वाढला !! हिंदी सिनेमात कसं… मारामारी संपली की पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं ना तसं काहीतरी डोक्यात झालं. समोर कुणीच दिसेनासं झालं आणि मोकळ्या जागेत शाळेतल्या खुर्चीवर बसून पानसेबाई नेहमीसारख्या भाषणाची तयारी करून घेतायत असं वाटलं. “आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो” हे भाषण सुरू करण्याआधीचे शब्द आठवले !(एकदम टिपीकल शाळकरी बरं का !!) त्यानंतर साधारण पाच मिनिटे माझ्यपुरतं घड्याळ थांबलं होतं..आपण काहीतरी बोलतोय एवढंच जाणवत होतं. मग आठवतोय तो एकदम टाळ्यांचा आवाज आणि पाठीवरून फिरणारा पानसेबाईंचा हात ! नेहमीसारखाच… आश्वासक नि अभिमानपूर्वक !! ‘भीड चेपणं’ किंवा ‘स्टेज फ्राईट जाणं’ ज्याला म्हणतात ना ते त्या दिवशी घडलं !

पुढच्या वर्षी चौथीत गेल्यावर शिक्षिका बदलल्या आणि पाचवीपासून तर माध्यमिक शाळा झाली. नंतर कधीतरी पानसेबाई जाता-येताना भेटायच्या पण मग त्या निवृत्तही झाल्या.

नवीन दिवस उगवताना जुने दिवस मावळत असतात. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ हा विचार खूपदा मनात यायचा पण त्याचा आचार कधी झालाच नाही. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ ! कॉलेज, मित्र-मैत्रिणी, करियरची तयारी, नोकरी … ठराविक टप्यांप्रमाणे वेग घेत गाडी चालू राहिली. एखाद्या स्टेशनवर घटकाभर थांबून पानसेबाईंची विचारपूस राहूनच गेली. काही वर्षांपूर्वी समजलं पानसेबाई गेल्या ! देवासारख्या आल्या होत्या, त्याच्याकडेच परत गेल्या !! मनातली बोच अजून तीव्र झाली !!

असं म्हणतात युधिष्टिराला यक्षाने विचारलं होतं की मनुष्याच्या जीवनातली सगळ्या विचित्र गोष्ट कुठली? युधिष्टिर म्हणाला की आपण एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे. गोष्ट अशीच काही आहे ना? चूकभूल घ्यावी पण मतितार्थ तोच. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ ह्यातलं ‘एकदा’ कधीतरी जमवायलाच हवं होतं.

एक वर्ष.. फक्त एकच वर्ष पानसेबाई मला शिकवायला होत्या पण काय देऊन गेल्या ते सांगता येत नाही ! बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो !!!
---
गुरुपौर्णिमा - २००८
---