दुनिया गोल आहे....
कालचक्र अव्याहत असतं....
काल जे नवं होतं ते आज जुनं झालंय....
परवा जे जुनं होतं ते आता नव्यानं आलंय….
आपण असं काही सहज बोलत / ऐकत
असतो. दिवाळी म्हणजे ‘फराळ सत्यं, बाकी मिथ्या!' हे लहानपणापासून वाटत आल्याने आणि
अस्मादिक ऍजाइल (Agile) प्रोसेस संदर्भात काम करत असल्याने म्हटलं बघावं आपल्या आजी
/ आईच्या पिढीतल्या बायकांची दिवाळी फराळ करायची पद्धत आणि संगणक क्षेत्रात लोकप्रिय
होत चाललेली ऍजाइल ही कामाची पद्धत ह्यात काय साम्य दिसतंय! (रस्त्याच्या कडेने म्हणजे बाय दि वे - ह्या लेखात इंग्लिश शब्दांसाठी मराठी
प्रतिशब्द लिहीण्यापेक्षा वापरातले इंग्लिश शब्दच वापरतोय.)
आधी जरा ऍजाइल ही काय भानगड आहे ते बघुया! तर काही
नाही ओ, काम करायची संगणक क्षेत्रात वापरली ही एक विशिष्ठ पद्धत आहे. आता बाकीची क्षेत्रंही
ह्या पद्धतीचा स्वीकार करतायत पण ही फक्त सुरुवात आहे.
ऍजाइलबद्दल एका वाक्यात सांगायचं तर ---- थोडं कर पण
पूर्ण कर!
एखादं प्रॉजेक्ट वर्षभर चालणार आहे असं समजा आणि मग
एका वर्षाने प्रॉडक्ट वापरायला मिळणार आहे. तर ऍजाइल पद्धतीने काम करायचं म्हणजे त्या
प्रॉडक्टचे भाग अशाप्रकारे तयार करायचे की ग्राहकांना (युजर्स) पाहिजे असेल तर भाग
जसे तयार होतील तसे वापरता यावे. मिसाल के तौर पे ये लो! (मराठी लेखात एखादं हिंदी वाक्य लिहिलं की लेखाचं वजन वाढतं असं ऐकलंय! लक्षात
घ्या मी लेखाच्या वजनाबद्दल म्हणतोय, लेखकाच्या नाही. ते तर असंही वाढतच जातंय!) रोजच्या वापरातलं उदाहरण देतोय नाहीतर संगणक क्षेत्रात
समोरच्याला टेक्निकल शब्दांच्या जाळयात गुंतवून ठेवायचे(च)तर पैसे मिळतात! हं तर समजा बॉल पेन हे प्रॉडक्ट आहे. ऍजाइल पद्धत
काय म्हणते तर पूर्णं पेन तयार व्हायची वाट बघण्यापेक्षा आधी फक्त रिफील तयार करा जी
वापरून ग्राहकाला पाहिजे असेल तर लिहिणं सुरू करता यईल. मग टप्प्या-टप्याने पेनची बॉडी,
टोपण, खटका वगैरे तयार करत जा.
कुठलीही प्रॉसेस म्हटलं की त्यात कुणाचा काय रोल आहे
ते माहिती पाहिजे. ऍजाइल पद्धतीत मुख्यपणे
तीन / चार रोल्स असतात -- प्रॉडक्ट ओनर, स्क्रम मास्टर, डेव्हलपमेंट टीम, आणि टेस्टर!
-- प्रॉडक्ट ओनर: काय हवं आहे आणि कधी हवं आहे ते सांगणार
-- स्क्रम मास्टर: डेव्हलपमेंट टीम, टेस्टरना काय पाहिजे काय नको,
त्यांच्या कामात काही अडथळे येत नाहीत ना
ते बघणार
-- डेव्हलपमेंट टीम: सिर्फ नाम ही काफी है!
-- टेस्टर: प्रॉडक्ट पाहिजे तसं चालतंय का ते बघणार
हेच रोल्स दिवाळीचा फराळ तयार करताना कोण करायचं ते
बघुया.
-- प्रॉडक्ट ओनर: आजी / सासुबाई
-- स्क्रम मास्टर: मोठी सून
-- डेव्हलपमेंट टीम: धाकट्या सुना आणि शेजारणी
-- टेस्टर: घरची आणि शेजार-पाजारची बच्चेकंपनी
(टेस्टिंग
क्षेत्रात असाल तर तुम्हाला बच्चेकंपनी म्हणतोय असा गैरसमज अजिबात करून घेऊ नये! आजोबा, बाबा, काका वगैरे ‘एक्स्टर्नल स्टेकहोल्डर्स’
म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा!)
प्रॉडक्ट ओनरचं म्हणजे आपल्या आजीचं महत्वाचं काम काय
तर, काय हवंय आणि कधी हवंय त्याची प्रायॉरिटी ठरवायची. सगळे पदार्थ दिवाळीच्या पहिल्या
दिवसापर्यंत तयार असावे लागतात पण येत्या काही दिवसांत कुठला पदार्थ तयार हवा आणि कुठला
पदार्थ दिवाळीच्या अगदी जस्ट आधी तयार हवा ते सांगायचं. डेव्हलपमेंट टीम पदार्थ कसा
तयार करायचा ते ठरवेल पण बदलत्या काळाप्रमाणे काय बदल हवेत (चेंजिंग बिझनेस कंडिशन्स)
ते प्रॉडक्ट ओनरनं सांगायचं!
गणपतीत आमच्या (वन अँड ओन्ली) पुणे इथे कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग,
आणि केसरीवाडा हे जसे पाच मानाचे गणपती असतात तसे घरोघरी दिवाळीत चकली, चिवडा, शेव,
लाडू, आणि करंज्या हे मानाचे पदार्थ! अनारसे आणि चिरोटे म्हणजे जणू दिमाखात सजलेले
दगडूशेठ हलवाई आणि मंडईचे गणपती! ह्यातला कुठला
पदार्थ आधी आणि कुठला नंतर हवाय ते घरोघरच्या आजी ठरवायच्या. (सीकेपी लोकांकडे करंज्या नसतात तर 'खाजाचे कानवले' हा एक मानाचा म्हणजे अगदीच
मानाचा पदार्थ असतो! तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे म्हणून इथे काही लिहिण्याचा मोह
आवरतो.)
स्क्रम मास्टर म्हणजे मोठी सून आपल्या जावांना आणि
शेजारणींना बरोबर घेऊन काम करायची. ऍजाइलमध्ये दिवसातून एकदा १५ मिनिटे सगळ्यांची एक
मिटींग (डेली स्टॅन्ड अप) होणं अपेक्षित असतं. दिवसभरात काय काम करायचं आणि कुठलं काम
करताना अडचण येऊ शकते ते ठरवायचं. मोठी सून आणि बाकीच्यांची स्टॅण्ड अप मिटींग - चार
जणी एकत्र जमून - तांदूळ निवडताना, चिवड्याचे पोहे पाखडताना वगैरे बसल्या-बसल्याच होऊन
जायची. बाजूला आम्ही लहान मुलं मातीचा किल्ला करत असायचो आणि समजायचं नाही पण त्या
बायकांचं बोलणं कानावर पडायचं. आज दुपारी काय करायचं आणि एखादा जिन्नस नसेल तर काही
अडचण होणार नाही ना त्याबद्दल बायकांचं बोलणं व्हायचं. (ह्या सगळ्या बायका गप्पा-गोष्टी करत, उत्साहाने कामं करत असताना कुणा बाईला
अचानक कसली अडचण यायची ते मात्र तेव्हा अजिबात कळायचं नाही.)
डेव्हलपमेंट टीम एका लयीत कामं हातावेगळी करायची. कुणी
रवा / बेसन भाजतेय तर कुणी चकली / शेवेच्या सोऱ्याला तेल लावतेय, कुणी चिवडा कुरकुरीत
व्हावा म्हणून पोह्यांना ऊन दाखवतेय तर कुणी चकलीसाठी मोहन योग्य प्रमाणात आहे ना बघतेय.
(मोहन कोण? आणि दिसत तर नाहीये पण कमी / जास्त
आहे म्हणजे काय ते एक लहान मुलांना कळायचं नाही!) चकल्या खुसखुशीत पडतायत असं दिसायला
लागलं की बायकांचा जीवही भांड्यात पडायचा. खुसखुशीत चकली खाणाराही खुशीत दिसतो. चकलीची भाजणी तयार होताना, चिवड्याचं तळण
होताना, लाडू करण्यासाठी रवा / बेसन भाजलं जाताना कुणी कुणाला काही सांगतंय असं दिसायचं
नाही पण घरात जो एक, भूक चाळवणारा, घमघमाट सुटायचा तो बरोब्बर सांगायचा की आतापर्यंत
कुठला फराळ तयार होत आलाय.
एका बाजुला बच्चेकंपनीची धावपळ चालू असायची. मातीचा
किल्ला मस्ट डू! (सार्वजनिक गणेशोत्सवातून जसं
प्रॉजेक्ट मॅनेजर्स घडतात तसंच घरोघरी गणपतीचं मखर करताना आणि दिवाळीत मातीचे किल्ले
करताना अनेक मुलांना त्यांच्या हातातली कला सापडते.) लाडू, चिवडा असे एक एक पदार्थ
तयार व्हायला लागले की मुलं एका हाकेत टेस्टिंगसाठी यायची. किल्ला करताना हाताला लागलेला
चिखल घाईघाईत धुतल्यासारखा करत, कपडयांवर उडलेली माती एखाद्या फडक्याने झटकत मुलं जमायची.
फराळ चाखण्यापुरता मिळायचा पण मिळायचा हे नक्की. दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवासमोर
नैवेद्य दाखवून मगच घरातले सगळे मोठे लोक फराळ करणार पण बच्चेकंपनीला मात्र त्यातून
सूट होती. "द्या ग मुलांना फराळ! मुलांनी खाल्लं की नैवेद्य दाखवला नसेल तरी देवाला
पोचतं." घरोघरच्या आजी असं म्हणायच्या. आता आठवतं की लहानपणी वाचलेल्या, श्रावणी
सोमवारच्या खुलभर दुधाच्या, कहाणीतली आजीही अशीच तर होती.
कहाणी साधारण अशी -- आटपाट नगरात एका शिवभक्त राजाने
महादेवाचा गाभारा दुधाने भरून काढायचं फर्मान काढलं. राजाची लहर, केला कहर! नगरातल्या
सगळ्यांनी आपापल्या घरचं दूध आणून ओतलं तरी गाभारा भरेना. दुपारी एका आजीने फक्त खुलभर
दूध वाहिलं आणि काय आश्चर्य! त्या खुलभर दुधाने महादेवाचा गाभारा पूर्ण भरला. मग राजाला
समजलं की घरच्या मुला-बाळांना खाऊ-पिऊ घालून, त्यांचा आत्मा थंड करून राहिलेलं खुलभर
दूध म्हातारीनं आणलं आणि ते देवाला पोचलं, गाभारा भरला!
नरक चतुर्दशी म्हणजे रिलीज डेट! पहाटे अभ्यंग स्नान
करून, फटाके वाजवायचे. (लहान मुलांना फटाके
वाजवण्याचे वेध तर कॉलेजमधल्यांना फटाकड्या बघण्याचे!) सकाळी सगळे फराळ करायला
जमायचे. एकसारख्या वळणाच्या, एका रंगाच्या चकल्या, कुरकुरीत शेव आणि चिवडा, तोंडात
विरघळणारे खाजाचे कानवले आणि लाडू ह्यांनी सजवून मांडलेली ताटं! ह्या फराळाबरोबर कांदे-पोहे,
सांजा, किंवा इडली
- सांबार असा एखादा गर्रम गरम पदार्थ आणि जोडीला छानपैकी वेलचीची पूड, केशर, बदाम–पिस्ते
वगैरे घातलेलं मसाला दूध! बाहेरून ऐकू येणारे फटाक्यांचे आवाज आणि घरात निनादणारे उ.
बिस्मिल्ला ख़ाँ ह्यांच्या सनईचे किंवा पं. हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे सूर! ह्या सगळ्याला साजेसा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे,
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा, दिवाळीचा आनंद! काया – वाचा - मनाने सगळ्याचा आस्वाद घेत
आतापर्यंत नुसते चाखलेले पदार्थ मनसोक्त खाता यायचे. वर्षं सरतात, काळ बदलतो पण मनाच्या सुगंधी कप्यातल्या,
लहानपणीच्या आठवणी, चाळिशीनंतर ठळकपणे आठवायला लागतात हे मात्र खरंय!