Friday, December 18, 2015

स्वर कट्यार….


मैफल संपली आणि सभागृहात एक समाधानी शांतता पसरली! काही क्षण सगळे जण त्या शांततेत स्वतःला सामावून घेत होते. थोड्या वेळाने कुणी कुणी भानावर आले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्यांची संख्या आणि टाळ्यांचा आवाज दोन्ही वाढायला लागले. अर्रे! पण जमलेले सगळे तर चित्रपट बघायला आले होते आणि त्यांना अनुभवायला मिळाली दर्जेदार संगीताची जणू जिवंत मैफल! कान आणि डोळे ह्यांच्या पलीकडे जाऊन, मन आणि बुद्धी ह्यांचे टप्पे पार करून, जीव सुखावणारी मैफल! 'कट्यार काळजात घुसली' हा सिनेमा म्हणजे एक अक्षरश: 'जमलेली' मैफल आहे! 

मुळात 'कट्यार …' हे नाटक असं आहे की काही पिढ्या त्या संगीतावर जोपासल्या गेल्या आहेत. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांनी 'कट्यार…' नाटकाद्वारे जे करून ठेवले आहे ते अनेकांना स्वप्नातही शक्य होत नाही. अशा नाटकाला हात लावून त्याचा सिनेमा करायचा, तोही दोन हजार पंधरा साली, ही कल्पना अशक्यप्राय होती. पण जसं आव्हान असतं तसा आव्हानाला हात घालणारा कुणी असतोच. 'कट्यार…'च्या बाबतीत ते धाडस केलं सुबोध भावेनं! 

'बालगंधर्व' चित्रपट आला तेव्हाच सुबोधने दाखवलं होतं की हे पाणी वेगळं आहे. एकदा ‘दर्जा’ ह्या निकषावर ठाम रहायचं ठरल्यावर कामही तसंच व्हायला लागतं. एका अर्थाने पाहिलं तर 'बालगंधर्व' चित्रपटातील भूमिका ही सुबोधमधल्या विचारी कलावंताची 'कट्यार…'च्या दिशेनं होणारी वाटचाल असावी.  तेव्हा कदाचित सुबोधच्या मनात 'कट्यार….'चा सिनेमा करण्याबद्दल काही नसेलही पण इंग्लिशमध्ये म्हणतात तसं ‘दि डॉटस कनेक्ट लुकिंग बॅक!’ 

'कट्यार….' येणार समजल्यावर पहिली उत्सुकता ही होती की संगीत दिग्दर्शन कोण करणार आणि अर्थातच दुसरी उत्सुकता ही की ख़ाँसाहेब कोण साकारणार?  शंकर-एहसान-लॉय संगीत देणार ऐकल्यावर बऱ्याच भुवया आश्चर्याने वर झाल्या होत्या!  अर्थात शंकर महादेवनचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास आहे आणि ह्या माणसाने श्रीनिवास खळे ह्यांच्याबरोबर खूप काम केलं आहे हे माहिती असल्याने  भीती नव्हती, तरी मनात धाकधुक होती. 'कट्यार….'चं संगीत मात्र मस्त जमलं आहे. गाणी ऐकायला सुरुवात केल्यावर तर धाकधुकही संपली होती आणि सिनेमा बघायची उत्सुकता वाढत चालली होती.  महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदा एक नाव संगीत दिग्दर्शनाच्या श्रेयनामावलीत झळकलं. सुवर्णाक्षरांनी लिहावं असं नाव -- पं. जितेंद्र अभिषेकी! 

न्यू जर्सीतला सिनेमाचा पहिला शो होण्याची तारीख आणि वेळ समजली तेव्हा मी ऑफीसमध्ये दुपारी जेवणाच्यावेळी डबा उघडत होतो. डबा खाऊन संपायच्या आधीच सिनेमाची तिकीटं संपली ही बातमी मिळाली! त्यानंतर पुढचे काही दिवस एक एक शो जाहीर होत होते आणि न्यू जर्सीकर जणू मटकेबाज झाले होते.  मटक्याचे आकडे ओपन व्हायची जशी वाट पाहिली जाते तसे सगळे 'मराठी विश्व'च्या फेसबुककडे नजर ठेवून होते. जो तो फेसबुकवर देव पाण्यात ठेवून बसला होता. थिएटर मालकाशी बोलून सिनेमाचे शो जाहीर करायचे, तिकीटांच्या वाढत्या मागणीला सामोरं जायचं ह्यात 'मराठी विश्व'तले आमचे मित्र अनिल खरे, दीपा लिमये गढून गेले होते. "थिएटरमध्ये एकदम २०-२५ तिकीटं घ्यायची कुणाला परमिशन देऊ  नका हो!" इथंपासून "माझ्या दीड वर्षांच्या जुळ्यांना आणले तर तुम्ही बेबी सीटींगची सोय कराल का?" अशा अचाट सूचना आणि प्रश्नांनी हैरान, परेशान होते! हा लेख लिहीपर्यंत न्यू जर्सीत वीस शोज झाले आणि जवळपास सगळे शोज 'सोल्ड आऊट'!  आता अमराठी मित्रही कट्यारच्या तिकीटांची चौकशी करू लागले आहेत. 'मराठी विश्व' उत्तमातील उत्तम कार्यक्रम / चित्रपट न्यू जर्सीत आणत राहील ह्याची पूर्ण खात्री आहे. त्यासाठी 'मराठी विश्व'च्या संपूर्ण कमिटीचे आभार!  'शोले' रिलीज झाला तेव्हा मी लहान होतो. 'शोले'च्या तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची उडालेली झुंबड फक्त ऐकली आहे तरी अनुभवली नाही. 'कट्यार….' आला तेव्हा काय माहोल झाला होता त्याबद्दल मात्र माझ्यासारखे अनेक जण भविष्यात आपल्या नातवंडांना सांगू शकतील. 

मिळाली रे मिळाली! एकदाची तिकीटं मिळाली!! 

कट्यार एक निर्जीव वस्तू पण ती निवेदक म्हणून कल्पकपणे चित्रपटात वापरली आहे. सिनेमाच्या सुरुवातीला सात सुरांचे कोरीव काम केलेली धारदार कट्यार रिमा लागू ह्यांच्या मुलायम आवाजात बोलू लागते. पहिल्या दृश्यापासून 'कट्यार…'ची मोहिनी मनावर पडायला लागते ती चित्रपट संपल्यावर वाढायला लागते. लहान मुलांना भारतीय शास्त्रीय संगीत ही काय चीज आहे ह्याचं आकर्षण वाटणं आणि ज्येष्ठ माणसांनी "क्या बात है!" म्हणणं हे मला तरी 'कट्यार…'चं खरं यश वाटतं! 

सिनेमा म्हणजे पटकथा अत्यंत महत्वाची असते. अर्धी बाजी इथेच मारली गेली आहे. बंदिस्त सभागृहातलं नाटक सिनेमात बदलताना 'सिनेमॅटिक लिबर्टी' ही एक दुधारी तलवार असते.  'सिनेमॅटिक लिबर्टी' ह्या नावाखाली जे काही चालतं त्याचा विचार केला तर 'कट्यार…'मध्ये स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते ह्याचे भान ठेवलं गेलंय. 

विक्रम गायकवाडांनी मेक-अपद्वारे प्रत्येकाला उठावदार केलं आहे. त्यातही ख़ाँसाहेब तर मस्त जमले आहेत. आतापर्यंत नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी आपल्याला जसं कला दिग्दर्शन दाखवलंय त्याप्रमाणे 'कट्यार'मध्ये कला दिग्दर्शक संतोष फुटाणे ह्यांनी राजमहालातील गाण्याच्या बैठकीपासून अनेक ठिकाणी आपले कौशल्य दाखवले आहे. तसंच  सिनेमा हे दृश्य-माध्यम असल्याने कॅमेरा आणि त्याच्या मागचा डोळा फारच महत्वाचा असतो. सुधीर पलसाने ह्यांनी ‘कट्यार…' सुखद केला आहे.  काजव्यांचा सीन तर खास म्हणजे खासच आहे! 

संगीतमय सिनेमा म्हणजे पार्श्वसंगीत आणि संगीत संयोजनाला विशेष महत्व!  ह्या बाबतीत संतोष मुळेकर आणि आदित्य ओकने फारच सुरेल काम केलंय. संगीत संयोजन म्हणजे चवदार जेवणात प्रत्येक पदार्थ नेमका हवा तेव्हा आणि हवा तेवढाच असतो तसं आहे. सुरेल वाद्यांमध्ये सतारीची, बासरीची एखादी कातिल सुरावट कानी येते, 'सूर से सजी संगीनी…'चा टाळ्यांचा ठेका, 'यशराज' स्टुडियोत विजय दयाळ ह्यांनी ध्वनितंत्रावर बारकाईने काम करत ग्रामोफोनवरच्या गाण्यात ऐकवलेली ती किंचीत खरखर सगळं असं आहे की सिनेमा थिएटरमध्येही आपण म्हणतो "व्वा!"  'कट्यार…'सारख्या सिनेमाच्या ध्वनीवर काम करताना काय काय करामती केल्या असतील त्याबद्दल 'डॉन' स्टुडियो (नरेंद्र भिडे, तुषार पंडित), पर्पल हेझ, यशराज ह्या आणि इतर काही स्टुडियोंच्या टीम्सशी गप्पा करायला रात्र कमी पडेल. 'कट्यार…'चं फक्त संगीत ह्या विषयावर लेख लिहिता येतील. तबला-डग्गा आणि पखावज ह्यांची साथ म्हणजे काय नैसर्गिक भारदस्तपणा असतो ते कृष्णा मुसळे, विनायक नेटके, प्रसाद जोशी वगैरे तालवाद्यांच्या माहीर साथीदारांनी ऐकवलंय. प्रत्येक वादकाचे, स्टुडियोचं, तंत्रज्ञाचं इथे नाव दयायला पाहिजे पण नमुन्यादाखल काही नावं लिहिलीयत. 

गीतकारांमधे समीर सामंत, मंगेश कांगणे, मंदार चोळकर, प्रकाश कापडिया ह्या सगळ्यांचे  काम अवघड होतं. ते अशासाठी की साक्षात पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहून ठेवलेल्या 'तेजोनिधी लोहगोल', 'सूरत पिया की', 'लागी करेजवा कटार', 'घेई छंद मकरंद' ह्या अजरामर गीतांच्या जोडीला उभी राहतील अशी गाणी लिहायची! 'मनमंदिरा', 'सूर से सजी', 'यार इलाही', 'दिल की तपीश' ही नवीन गाणी कट्यारच्या संचात अगदी फिट्ट बसलीयेत!   'सूर निरागस हो' तर 'सूरत पिया की'सारखं 'कट्यार'चं सिग्नेचर होईल. 'कट्यार'चा गाभा असणाऱ्या 'सूर निरागस हो' ह्या तीन शब्दांसाठी स्वानंद किरकिरेचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत!                          

'लागी करेजवा कटार' हे गाणं कधी येतंय ह्याची आपण आतुरतेने वाट बघत राहतो आणि ते गाणं चित्रपटात अगदी समर्पक ठिकाणी येतं. पं. जितेंद्र अभिषेकींच्या आवाजातलं गाणं सिनेमात वापरल्याने ती अभिषेकीबुवांना एक आदरांजली झाली आहे. त्याउलट 'या भवनातील गीत पुराणे' हे गाणं चित्रपटात येतच नाही.  आपण चुकचुकत असतो आणि मग लक्षात येतं की संपूर्ण सिनेमात ख़ाँसाहेब एकही मराठी शब्द बोलत नाहीत मग हे एकच मराठी गाणं का म्हणतील? त्याऐवजी 'सूर से सजी' हे नवीन दमदार गाणं आहे. 

गायकांच्या प्रांतात शंकर महादेवन, अरिजित सिंग, महेश काळे, आणि राहुल देशपांडे अक्षरश: 'सुटलेयत!’ शंकर महादेवनचे  'सूर निरागस हो….' तर नुसतं ऐकतानाही पंडितजींचे निष्कपट आणि सच्च्या सुरांचे प्रेमी ही प्रतिमा डोळ्यांसमोर उभं  करतं. महेशचं 'अरुणी किरणी….'  ऐकून, म्हणजे पुन्हा पुन्हा… पुन्हा पुन्हा ऐकूनही ऐकत रहावं असं वाटतं. अरिजित सिंगची आतापर्यंतची बरीच गाणी ऐकताना वाटायचं, “च्यायला! आपले किती प्रेमभंग झाले आहेत.” पण कधी उदास बिदास वाटलं तर सरळ 'शिव भोला ….' ऐकावं!  आणि राहुल देशपांडे -- 'सूर से सजी …', 'सूरत पिया की..', 'दिल की तपीश आज है आफताब…' आपण किती वेळा ऐकतोय ह्याची गणनाच नाही! भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात पं. भीमसेन जोशी आणि मन्ना डे ह्यांच्या आवाजातील ऑल टाईम क्लासिक 'केतकी गुलाब जुही'सारखीच राहुल आणि महेशची जुगलबंदी चिरंतन राहील. 

राहुलचे आजोबा ह्या सगळ्या गुणी गायकांना नक्की म्हणाले असते, "जीते रहो, गाते रहो!" 

चित्रपट, नाटक वगैरेबद्दल बोलताना अभिनयाचा उल्लेख कसा टाळता येईल? मृण्मयी देशपांडेनी  'उमा' जशी करेक्ट उभी केलीय तशीच अमृता खालाविलकरनी 'झरीना'! चित्रपटात दाखवल्यासारखीच आपट्याच्या अखंड पानातली दोन पाने. उमा आणि झरीना दोघींची मैत्री तसंच पंडितजींवर ओढवलेल्या प्रसंगामुळे होणारी तगमग दोघींनी नीट उभी केलीय.  साक्षी तन्वरने साकारलेली ख़ाँसाहेबांची बायको परिस्थितीच्या रेट्यामुळे आणि मुख्य म्हणजे ख़ाँसाहेबांसाठी जे काही करते ते करतानाचा चेहरा, डोळे कायमचे लक्षात राहतील. 

कविराजांच्या भूमिकेत पुष्कर श्रोत्री जेव्हा विद्या आणि कला ह्यातील फरक समजावून सांगतो तेव्हा त्याच्या आवाजाची लय छान आहे. तो सीन बघताना खूप वर्षांपूर्वी मी कोबोल प्रोग्रॅमिंग शिकत होतो त्याची आठवण आली. विद्या देता येते तर कला 'वरून' घेऊन यावी लागते -- हे म्हणजे साधारण असं आहे की सिंटॅक्स शिकवता येतो पण लॉजिक डोक्यात असायला लागतं! 

शंकर महादेवन अभिनय करणार हीच मुळात 'कट्यार…' जाहीर झाला तेव्हा बातमी होती. पंडितजी बघताना हे जाणवतं की एकदा हातात काम घेतलं  की शंकर महादेवन ते प्रामाणिकपणे पार पाडणार. गाण्यांच्या सीन्समध्ये तर ही इज ऑन होम पीच!
 
प्रांजळपणे कबूल करायचं तर ख़ाँसाहेबांचा रोल सचिन करणार ऐकल्यावर तर बऱ्याच भुवया आश्चर्यापेक्षा शंकेने
वर झाल्या होत्या! अशा प्रकारच्या रोलमध्ये सचिनला आपण कुणी पाहिले नव्हते त्यामुळे काम कसं  असेल त्याचा अंदाजही येत नव्हता. कलाकार जेव्हा त्याच्याबद्दल निर्माण झालेल्या शंकांना आपल्या कामामुळे खोटं ठरवतो तेव्हा त्या कलाकारासाठी अत्यंत आनंदाची बाब असते. सचिनला 'कट्यार'मुळे तो आनंद आणि समाधान नक्की मिळालं असेल. खरंतर कलाकारापेक्षाही रसिकांना आपण खोटे ठरल्याचा आनंद जास्त होतो. सचिनची चित्रपट कारकीर्द पन्नासहून अधिक वर्षांची आहे पण 'कट्यार' सचिनचा आतापर्यंतचा सर्वोत्तम रोल म्हणावा लागेल. चित्रपटाच्या कथेप्रमाणे / पटकथेप्रमाणे दिसणारे ख़ाँसाहेब त्याने मनापासून साकारले आहेत. काही ठिकाणी मात्र, विशेषत: शास्त्रीय संगीत गायकाचे हातवारे बघताना, "भाऊ… जरा कंट्रोल!" असं म्हणावंसं वाटतं. खैर ठीक है यार, बडे बडे पिक्चरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं! हा लेख वाचत असलेल्या बऱ्याच जणांच्या वयापेक्षाही सचिनची चित्रपट कारकीर्द मोठी असेल. इथे सचिनजींचा उल्लेख एकेरी संबोधून झालाय पण आपण  'शोले'च्या अहमदला बघतच तर लहानाचे मोठे झालोय. त्यामुळे उम्मीद है कि ये ठीक है!
 
'कट्यार'मधला सदाशिव असा आहे ज्याची पंडितजींचा गंडाबंध शागीर्द म्हणून गुरूवर अपार श्रद्धा आहे. मुख्य म्हणजे त्याला 'शिकण्याची' आस आहे. त्यापायी पाहिजे ती वणवण, वाटेल ते कष्ट करायला तो तयार आहे. सुबोध भावेने हे सदाशिवची तळमळ, तगमग व्यवस्थित साकारली आहे. सदाशिवचा, पंडितजींसाठी असलेल्या आदरामुळे परिणामांची पर्वा न करणारा, उतावळा स्वभाव दाखवणारा 'कव्वाली'चा भाग मस्त जमला आहे. 

लास्ट बट नॉट  लिस्ट -- चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर सुबोध भावेनं दिग्दर्शक म्हणून पदार्पणातच त्रिशतक ठोकलंय. वैभव चिंचाळकरने दिग्दर्शनात सुबोधचा उजवा हात होऊन असंख्य गोष्टी सांभाळल्या आहेत. सिनेमा दिग्दर्शित करणं ही मुळात सोपी गोष्टं नाही. त्यातही 'चांगला' सिनेमा करणं तर सोपी गोष्ट नाहीच पण इतक्या संख्येने चित्रपट तयार होत असतात की हे काय फार अवघड नसावं असं आपल्याला वाटतं. चित्रपट चांगल्याप्रकारे दिग्दर्शित करण्यासाठी माध्यमाची जाण, प्रेक्षकांची आवड ह्या सगळ्यांपेक्षा दिग्दर्शकाची 'नजर' जास्त महत्वाची. सुबोध आता कुठला सिनेमा करेल ह्याची जगभरातले मराठी लोक उत्सुकतेने वाट बघतील. 

सिनेमा बघून झाल्यापासून मनात जाणवत होतं की काहीतरी दिसतंय पण सापडत नाहीये. काल ऑफिसहून परत येताना अचानक ते सापडलं. 'कट्यार' हा नुसता मराठी नाही, भारतीयही नाही, तर जागतिक चित्रपट म्हणायला हवा. तुमची, माझी, जगातल्या प्रत्येक माणसाची ही कहाणी आहे.  पंडितजी, सदाशिव आणि ख़ाँसाहेब ह्यातला प्रत्येकजण सिनेमातले पात्र नाही तर प्रतीक आहे. प्रत्येक माणसात एक पंडितजी, सदाशिव, आणि ख़ाँसाहेबही दडलेले असतात. असं म्हणतात की ब्रह्मापासून माया आणि मायेपासून सत्त्व, रज, आणि तम हे तीन गुण निर्माण झाले. पंडितजी म्हणजे सत्त्व, सदाशिव हा चांगले काहीतरी करण्याची आस असलेला रजो गुण तर ख़ाँसाहेब हे अहंकार म्हणजे तमो गुणाचे प्रतीक. 'मनुष्य हा तीनही गुणांनी बनलेला असतो' हे 'कटयार…' चित्रपटाच्या मायारूपातून निदान माझ्यापुरतं तरी जाणवलेलं आदि तत्त्व!