Friday, June 27, 2008

लग्नाआधी नि लग्नानंतर

'शादी से पहले और शादी के बाद' ह्या माझ्या हिंदी कवितेचा अनुवाद !!!
मूळ हिंदी कविता ह्याच ब्लॉगवर वाचता येईल.
--------------------------------------------------------------------
लग्नाआधी हाती हात
शब्दांमधे मधुर मिठास
फोनवर बोलणं तासनतास
भेटल्यावरही रोजचं खास …१

आकाशीचा रंग निळा
वा असो घनघोर वर्षा
कप कॉफीचा छोटासा
दोन जीवांना हो पुरेसा….२

लग्न होता सारे संपले
तिचे ‘ना’ केवळ नाव बदले
संध्याकाळी येतो घरी मी
घेऊनिया भाजीचे ओझे …३

एकांती मग बोलतो अजूनि
ना वेळेचा हिशोब ठेवूनि
घरखर्च नि ‘फी’ पोरांची
जमा संपते चुटकीसरशी …४

मात्र आटलं प्रेम नाही
पण सांगाया वेळ नाही
करता संवाद नजरेतूनी
फुका शब्दांचा खेळ नाही …५

Saturday, June 14, 2008

सिंहासन

‘सिंहासन’ मी दहावीच्या बोर्डाची परीक्षा चालू असताना पहिल्यांदा पाहिलाय !

विजय तेंडुलकर गेले आणि ‘सिंहासन’ आठवला. “…..तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन !” हे म्हणणारा डिकास्टा आठवला !!

पाठोपाठ आठवायला लागले -- ‘तें’च्या क्लासिक्समधले प्रसंग. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘अर्धसत्य’मधले प्रसंग !! ‘घाशीराम कोतवाल’ मधले प्रसंग !!!

खरंतर ‘सामना’, ‘सिंहासन’ पहिल्यांदा झळकले तेव्हा मी खूप लहान होतो. ‘घाशीराम…’ पहिल्यांदा रंगमंचावर आले तेव्हा तर दोनेक वर्षांचाच होतो. आठवी-नववीत असताना ह्या कलाकृतींबद्दल इतकं ऐकलं होतं की कधी एकदा त्या पाहतो असं झालं होतं.

साधारण पंचाऐंशी – शहाऐंशीच्या सुमारास, शुक्रवारी रात्री उशीरा, दूरदर्शनवर अचानक ‘सामना’ बघायला मिळाला. त्या दिवसापासून “ह्या टोपीखाली दडलंय काय…” आणि ‘सख्या रे! घायाळ मी हरिणी” ही गाणी मनात जागा करून राहिलीयत. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले ह्यांच्या जुगलबंदीबद्दल काय बोलायचं? आणि काय बोलायचं, “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…’बद्दल !!! भास्कर चंदावरकर म्हणजे अप्रतिम संगीत हे समीकरणही मनात तेव्हाच रजिस्टर झालं. (पुढे ‘थोडासा रूमानी हो जाऍं’ आणि ’घाशीराम कोतवाल’ पाहिल्यानंतर ते समीकरण एकदम पक्कं झालं)

त्यामानाने ‘घाशीराम कोतवाल’ खूप उशीरा पहायला मिळालं. आत्ता चार-पाच वर्षांपूर्वी कधीतरी डीव्हीडी मिळाली. दीपा भारतात गेली होती त्यामुळे घरी एकटाच होतो. एका वीकांतला शांतपणे ‘घाशीराम…’ पहायला बसलो. ‘नाटक असं असतं?’ ‘नाटक असंही असतं??’ ‘असू शकतं???’ घाशीराम म्हणजे एक ‘हलवणारा’ अनुभव होता. तरी आमची पिढी दुर्दैवी कारण आम्हाला डॉ. मोहन आगाशेंचा ‘नाना फडणवीस’ बघता आला नाही.

मगाशी म्हणल्याप्रमाणे ‘सिंहासन’ दहावीची परीक्षा चालू असताना पाहिलाय. मोठा झाल्यावर सिंहासनची व्हिडीयो कॅसेट घेतली पण मी दहावीत असताना आजच्याइतक्या सर्रास डीव्हीडी किंवा व्हिडीयो कॅसेट मिळायच्या नाहीत. रविवारी दुपारी टीव्हीवर ‘सिंहासन’ होता. अनायसे सोमवारी रंगपंचमीमुळे पेपर नव्हता आणि मंगळवारी हिंदीचा(च) पेपर होता. त्यामुळे बिनधास्तपणे ‘सिंहासन’ पाहिला. (गणित किंवा जीव-भौतिक-रसायनपैकी एखादा त्रस्त समंध असता तर ‘सिंहासन’ डळमळलं असतं! तिथे तर हमखास ‘ईशान अवस्थी’ व्हायचा !! प्रश्न दिसायचे पण समजायचे नाहीत !!!)

‘सिंहासन’चा विचार करताना आधी अरूण साधूंचा विचार करावाच लागतो. त्यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ ह्या दोन कादंबऱ्यांततील निवडक प्रसंगांवर आधारित -- सिंहासन ! मराठी सिनेमांत मग ‘वजीर’, ‘सरकारनामा’ असे राजकीय पार्श्वभूमीचे चित्रपट आले पण ‘सिंहासन’ची सर कुणालाच नव्हती. (जशी हिंदीत ‘शोले’ची सर सुभाष घईंच्या ‘कर्मा’ला नव्हती !)

‘सिंहासन’, ’शोले’ आणि ’गॉडफादर’ ह्या सिनेमांत पुन्हा-पुन्हा बघण्यासारखं काय आहे ह्याचं उत्तर देता येत नाही. तुम्ही एकतर ह्या मूव्हीज परत-परत बघता किंवा तो प्रश्न विचारता. ज्या दिवशी तुमचं तुम्हाला सापडतं की परत परत बघण्यासारखं काय आहे, त्यादिवशी तुमचा प्रश्न बंद होतो.

एकतर ‘सिंहासन’ मधे खूप पात्रं आहेत. त्यात सिनेमा इतका वेगवान आहे की पहिल्यांदा बघताना थोडा त्रयस्थपणे बघताच येत नाही. म्हणजे असं समजा की तुम्ही, एकामागोमाग एक चाली रचून चाललेला, बुद्धिबळाचा डाव बघताय. तुमच्याही नकळत तुम्ही त्यात ओढले जाता. त्रयस्थपणे चाली समजून घेऊन त्यांचं विश्लेषण करणं जमत नाही. ‘सिंहासन’ बघताना एक्झॅक्टली असंच होतं.
तुम्हाला काय वाटतं? …… द्या टाळी !

सिनेमात महत्वाची पात्रं चार – शिंदे, दाभाडे, डिकास्टा आणि दिगू टिपणीस. असं ऐकलं होतं की डिकास्टा हे कॅरॅक्टर त्याकाळचे ‘संपसम्राट’ जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्यावर बेतलेलं होतं.

सिनेमाच्या सुरूवातीला मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे ह्यांना एक निनावी फोन येतो … त्यांच्याविरूद्ध कट शिजतोय असं सांगणारा !! त्यानंतर डोक्यात ठोके पडल्यागत पार्श्वसंगीत सुरू होतं आणि मग सुरू होतं -- मुख्यमंत्री शिंदे, अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे, कामगार लीडर डिकास्टा, स्मगलर्स आणि पर्यायाने इतर सगळ्यांचंच…एकमेकांवर कुरघोडी करू पाहणारं राजकारण -- सिंहासन! ह्या सगळ्याचा साक्षीदार म्हणजे पत्रकार दिगू टिपणीस ! जसजसा सिनेमा पुढे सरकतो तसतसे आपणही त्या दिगूसारखेच एका गर्तेत ओढले जातोय असं वाटतं !!



त्यात सुरेश भटांच्या हादरवणाऱ्या ओळी –

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !!!

ब्लॅक एँड व्हाईट सिनेमाची एक वेगळीच जादू असते. जब्बार पटेलनं दिग्दर्शक म्हणून नुसती धमाल उडवून दिलीय ! त्यात अभिनयाच्या बाजूचे दिग्गज -- निळू फुले (दिगू टिपणीस), अरूण सरनाईक (मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे), डॉ. श्रीराम लागू (अर्थमंत्री अप्पासाहेब तथा विश्वासराव दाभाडे), दत्ता भट (शेतकीमंत्री माणिकराव पाटील), सतीष दुभाषी (कामगार पुढारी डिकास्टा), मधुकर तोरडमल (दत्ताजी), श्रीकांत मोघे (आनंदराव), माधव वाटवे (विधानसभेचे सभापती नाना गुप्ते), डॉ. मोहन आगाशे (बुधाजीराव), लालन सारंग (मिसेस. चंद्रापुरे) !!! जोडीला तेव्हाचे नवखे पण नंतरचे दिग्गज नाना पाटेकर (स्मगलर शेठचा हस्तक), रिमा लागू (अर्थमंत्र्यांची सून) !! अगदी न्हाव्याच्या छोट्या भूमिकेत राजा मयेकरांनीही बहार आणलीय !! ‘सिंहासन’मधे ‘पानिटकर’ साकारणाऱ्या जयराम हर्डीकरचा अकाली मृत्यू झाला नसता तर ….!

खरंतर ‘सिंहासन’ हा समान आवडीचे मित्र / मैत्रिणी जमवून एकत्र बघावा असा प्रकार आहे पण ‘दुधाची तहान ताकावर…’ म्हणून इथे काही निवडक संवाद दिल्याशिवाय राहवत नाहीये.
-------------
रावसाहेब टोपले: (फोनवर बोलताना) शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय …इंडस्ट्रीवल्यांना झुकतं माप मिळतंय…सेझचा प्रश्न आहे…आता काय पाईंट आहे? … स्थैर्य पायजे…
-------------
विश्वासराव दाभाडे: मुख्यमंत्र्यांच्याविषयी तुझं काय मत आहे?
डिकास्टा: डॅंबिस माणूस आहे ….. पण माझं तुमच्याबद्दलही तेच मत आहे !
o डावं-उजवं करणं अवघड आहे …तुम्ही दोघंही सारखेच डॅंबिस आहात
o काही मागण्या कागदावर लिहिता येत नाहीत. पण म्हणून जर का त्या पूर्ण झाल्या नाहीत ....तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन.
-------------
(उस्मानच्या घरी जेवताना पार्श्वसंगीतात गझल चालू आहे)
विश्वासराव दाभाडे: (टेपरेकॉर्डरकडे इशारा करून) हे मेहंदी हसन का?
उस्मान: नाही, गुलाम अली.
विश्वासराव दाभाडे: हां .. तेच ते (आवाज आणि नजरेत एक सहज बेफिकिरपणा)
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: कुठल्याही परिस्थितीत मला औद्योगिक बाजूला शांतता हवीय. नाईलाजाने मला तुला उचलावं लागेल.
डिकास्टा: आरोप कुठला ठेवणार?
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: तुझ्या सार्वजनिक जीवनात काहीही सापडेल. माणूस चोवीस तास डोळ्यात तेल घालून जगत नाही.
-------------
पक्षाध्यक्ष: च्यामायला ….. पक्षाध्यक्ष म्हणजे शेरडीच्या शेपटासारखं ! माश्या धड मारता येत नाहीत, अब्रू धड झाकता येत नाही !!
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: (कमालीच्या दांभिकपणे) राजकारण हे असं असणार माहिती असतं तर इथवर आलोच नसतो. देवाच्या आळंदीला निघालो आणि पोचलो चोराच्या आळंदीला !
-------------
शेवटी हा लेख पूर्ण करण्याआधी एकच संवाद जो एक चिरंतन सत्य सांगतो.
न्हावी: ह्या वेळी दाभाडे नक्की मुख्यमंत्री होणार.
दिगू टिपणीस: शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय …तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?
-------------