Saturday, October 20, 2007

पोरखेळ

‘Child's Play Is Serious Business’ ह्या उक्तीवर आधारित…
Anita Wadley ह्यांच्या ‘Just Playing’ कवितेवरून स्वैर अनुवादित…
-----------------------------------------------------------------
रचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर
वाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर !
शिकतो आहे मी, ‘भार’ आणि ‘तोल’
असेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १

हाती माझ्या बाहुली नि भातुकलीचा खेळ
नजर म्हणे तुमची, “आता आवरताना वेळ “ !
‘जपणं’ नि ’सांभाळणं’, शिकवतो हा खेळ
बनू उद्या ‘आई’/‘बाप’ आम्हीही एखादवेळ.... २

हातांवरती रंग, कधी चिखलातले कुंभार
वाटती तुम्हाला, पोरखेळ हे भंगार !
‘सांगणं मनातलं’ शिकवती ना खेळ
'कलाकार’ उद्या मी, होईन एखादवेळ.... ३

श्रोते नाहीत कुणी, पण ‘वाचनाला’ चढता रंग
तुम्ही म्हणता आहे मी, पोरखेळात पुरता दंग !
‘समजणं’ नि ‘समजावणं’, शिकवत असतो खेळ
असेनही उद्या मी, चांगला ‘शिक्षक’ एखादवेळ.... ४

फिरेन कधी झुडपांतून, खिशांत असे सटरफटर
नक्की वाटेल तुम्हाला, फालतू वाया गेले पोर !
माहीत नाही अजून जे, ते कदाचित शोधे खेळ
तुम्ही म्हणाल मला मग, 'संशोधक’ एखादवेळ...५

भान माझं हरपून जाता, सोडवण्या एखादं कोडं
म्हणू नका हं प्लीज आता, "काहीतरी करतं येडं" !
नुसता खेळण्यात नाही हो मी, वाया घालवत वेळ
सोडवताना प्रश्न उभारेन, 'उद्योग'ही एखादवेळ...६

भांडीकुंडी खुडबुडेन, मिटक्या मारेन थोडावेळ
तुम्हास नक्की वाटेल मग, भलतेसलते माझे थेर !
चवींमधले वेगवेगळे, फरक शिकवति सारे खेळ
चाखत असता आंबट-गोड, ‘बल्लव’ होईन एखादवेळ…७

उड्या मारतो दोरीवर की, वारा धावत असेन चपळ
तुमचं आपलं टुमणं की, ”देवासारखा बस अंमळ”!
शिकतो आहे ‘शरीर’ आणि, हालचालींचा मेळ
डॉक्टर, नर्स वा बहुधा, ऍथलीट होईन एखादवेळ...८

“काय केले शाळेत आज ? कसे होते दिवसाचे स्वरूप?”
"फार काही केले नाही पण, खेळलो मात्र सगळे खूप"!
रागवून आता म्हणू नका हं, “तुझे फालतू नसते खेळ" !
‘माझे’ पेक्षा चांगलं ‘आपले’, शिकायची ही असते वेळ...९

राहू द्याल ’आज’ मला जर, स्वच्छंदी नि आनंदी
पाहू याल मला ’उद्या’ तर, यश ठेवेन पायाशी
लहान आहे मी अजूनि, थांबा ना हो थोडावेळ
कामात आहे मी गढुनि, तुम्हा दिसतो पोरखेळ !!!... १०
--------------------------------------------------------------------

‘Just Playing’ ही कविता हातात आल्यापासून तीन-चार दिवस वाटत राहिलं की ह्या कवितेला मराठी रूप द्यावं। अनुवाद करताना मी थोडं स्वातंत्र्य घेतलंय. जर काही त्रुटी राहिली असेल तर ती माझ्यामुळं पण मनाला जे भावेल त्याचं श्रेय मात्र मूळ कवयित्रीचं. Google वर ’ Just Playing’ किंवा ’ Anita Wadley’ शोधलं तर मूळ कविता मिळेल.

इथे मी काही ब्लॉगयात्रींनाही टॅग करतोय.

---------------------------------------------------------------

Saturday, October 13, 2007

‘दरबारी’ दिमाख

“अलबेला सजन आयो रे...अलबेला …” ।

बासरी आणि सारंगी पाठोपाठ, पायांना ठेका धरायला लावणाऱ्या, तबला, ड्रम्समधून स्वरमंडल नाssजूकपणे झंकारलं आणि अचानक हे गाणं सुरु झालं. मी सिनेमा बघताना खुर्चीत सावरून बसलो. ध्यानीमनी नसताना एकदम ‘अहिर भैरव’ रागातली बंदिश? रूबाबदार विक्रम गोखलेसाठी उस्ताद सुलतान खॉंचा भरदार आवाज कस्सला मस्त आहे. १९९९ सालच्या कमर्शियल हिंदी सिनेमात शास्त्रीय संगीतानं बांधलेलं गाणं? Music director ची तब्येत बरी आहे ना? नक्की कोणाय music director? नेहमीचा वाटत नाही. हिंदी सिनेमावाल्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘जरा हटके…’ दिसतोय. एकापाठोपाठ एक अनेक विचार डोक्यात आले. दुसऱ्या दिवशी लगेच सिनेमाच्या गाण्यांची ध्वनिफीत (मराठीत ‘audio cassette’ हो !!) विकत घेतली. गाडीत दीपा आणि मी ती गाणी ऐकत होतोच पण शिशिर-प्रज्ञाच्या घरी पोहोचल्यावर त्यांनाही लगेच ‘अलबेला सजन..’ ऐकवलं होतं. तुम्हाला गाणं इथे बघायचंय?

‘इस्माइल दरबार’ ह्या नावाशी पहिली ओळख अशी झाली होती. जरा google केल्यावर समजलं की हा माणूस सूरतहून मुंबईत आला, शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं आहे, संजय लीला भन्साळीच्याच “खामोशी: द म्युझिकल” मध्ये त्यानं व्हायोलिन उत्तम वाजवलंय वगैरे, वगैरे. ‘हम दिल दे चुके सनम’च्या यशात संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन, ‘देखणी’ ऐश्वर्या (‘द्विरूक्ती’ झाली, माहित्येय ओs !!), नितीन देसाईचं रंगबहार कला दिग्दर्शन आणि त्या रंगांची उधळण अचूक टिपणारा अनिल मेहतांचा कॅमेरा, ह्याबरोबर इस्माइल दरबारच्या संगीताचा खूपच मोठा वाटा आहे.

‘ऑंखो की गुस्ताखियॉं…’ हे प्रणयतारा अलगद छेडणारं गाणं असो किंवा ‘तडप तडप…’ सारखं विरह गीत, ‘निंबूडा, निंबूडा..’ हे खट्टं-मीठं गाणं असो किंवा ‘हे ss हे हेss, हेss हेss हेहेss’ अशी नुसती सुरावट, प्रत्येक भाव संगीतात न्हाऊन निघाला आहे. ‘झोंका हवा का…’ मध्ये हळूवार फुंकीनं बासरीचा काय अप्रतिम वापर केलाय?!! हॉस्पिटलमधे जायबंदी हाताने कुंकू लावायला धडपडणाऱ्या ऐश्वर्याला, अजय देवगण ते लावताना, पार्श्वसंगीतात “तदेव लग्नं सुदिनं तदैव, ताराबलं चंद्रबलं तदैव..…शुभमंगल सावधान” ह्या मंगलाष्टकाच्या ओळी गाण्याला वेगळीच उंची देतात.

‘हम दिल दे चुके…’ गाणं तर आठवतंय? लाल साडी, मॅचिंग बांगड्या, कपाळावर लालचुटूक कुंकू, उजव्या खांद्यावर काळा-लाल रंगसंगतीची शाल आणि रेशमी केसांचा, मानेवर रूळता, सैल अंबाडा अशी सोज्वळ सजलेली, दरवाजा उघडून येणारी, अधोवदना ‘मूर्तिमंत नजाकत’ ऐश्वर्या (पुन्हा ‘द्विरूक्ती’..काय करणार ओ!!). हे सगळं सौंदर्य perfectly खुलवणारं संगीत. सिनेमाच्या फ्रेम्स जितक्या नेत्रसुखद तितकंच संगीत कर्णमधुर !!! गाणं बघायचा मोह होतोय? फक्त click करा.

‘हम दिल दे चुके..’ नंतर इस्माइल दरबार पुन्हा SLB बरोबर ‘देवदास’ करणार असं कळलं आणि पाठोपाठ समजलं ऐश्वर्या, माधुरी एका गाण्यात एकत्र दिसणार आहेत. मन आंनदानं ‘नाचू नाचू’ का काय म्हणतात ते झालं !! हे म्हणजे job offer देताना, “भरपूर पगार मिळेल पण घरून काम करण्याची सोय, भरघोस बोनस आणि वर्षाला ६ आठवड्यांची सुट्टी मान्य असेल तरच..!” असं आपल्याला खड्डूस HR नं सांगण्यासारखं आहे. (कृपया लगेच दिवास्वप्ने पहाण्याची चूक करू नये. खड्डूस HR असं विरघळत नसतं.)

‘सिलसिला ये चाहत का..’ गाण्यातून इस्माइल दरबारनं पार्श्वगायनातलं एक अनमोल रत्न आपल्याला भेट केलं – ‘श्रेया घोशाल’. नुसता नाजूकच नाही पण काय फिरणारा आवाज आहे तिचा ! ‘बैरी पिया…’ गाण्यातलं श्रेयाचं गोड ‘इश्शss..’ !!! संगीत दिग्दर्शकाकडे असं हटकेपण ‘वरूनच’ यावं लागतं.

‘डोला रे डोला..’ म्हणजे तर audio visual treat आहे. अनुपम सौंदर्याच्या दोन प्रतिमा ! दोघीही शास्त्रीय नृत्य शिकलेल्या आणि त्यांच्या play back singers तितक्याच कसलेल्या. बघायचंय?

अपेक्षेप्रमाणे एक से बढकर एक गाणी आणि ‘ह्या’ लावण्यवतींनीच ‘देवदास’ला सांभाळलं. पण, दोघींत आपलं माप अजूनही माधुरीकडेच झुकतं हां ! आठवा ‘काहे छेड, छेड मोहे..’ आणि ‘मार डाला..’ ह्या गाण्यांतली माधुरी. (पुन्हा मोह होतोय?... ‘काहे छेड..’ आणि ’मार डाला..’ !!) Btw, ‘उमराव जान’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’च्या रेखानंतर एकदम माधुरीची ‘चंद्रमुखी’ !!! तिच्याइतकं मोहक आणि graceful दुसरं कोणी आहे? ‘मार डाला…’ संपताना देवदास आणि चंद्रमुखी दोघांच्याही, आपापल्या, वेदना अधोरेखित करणारे सनईचे सूर !

‘अलबेला सजन..’ मधे उ. सुलतान खॉं होते तर ‘काहे छेड..’ साठी साक्षात पं. बिरजू महाराज !!! बिरजू महाराजांनी गाणं लिहिलंय, compose केलंय आणि थोडं गायलंही आहे. पंडितजींच्या जोडीनं कविता सुब्रम्हण्यम (आपली कविता कृष्णमूर्ती हो ss !!) आणि माधुरीनं गाणं मस्त खुलवलंय !

नुकताच Zee TV वर ‘सारेगमप’ चा एक भाग पाहिला. पकिस्तानच्या ‘अमानत अली’ ह्या हिऱ्याला ‘दरबार’ पैलू पाडतोय. अमानतच्या आवाजाची ‘फिरत’ दाखवण्यासाठी दरबारनं ‘अलबेला सजन…’ मुद्दाम थोडं अजून वेगळं बांधलं. गुरू-शिष्यानं मिळून काय ‘माहौल’ केलाय म्हणून सांगू !! (मोहात पडलेला सावरणं अवघड असतं महाराजा…’ ! थोडं distorted recording आहे पण ती ५ मिनिटे इथे आहेत ना! पं. जसराज, जगजीत सिंग ते हिमेश रेशमिया, सगळ्यांच्या प्रतिक्रिया नक्की पहा.)

‘ताल’ हे इस्माइल दरबारच्या संगीताचं खूप मोठं शक्तिस्थान आहे. Electronic drums सगळेच वापरतात पण ‘तबला’ अतिशय प्रभावीपणे वापरून घेण्यात, आजच्या संगीतकारांमधे, इस्माइल दरबार खूप पुढे आहे. जवळपास अडीच वर्षांचा आदित्य गाडीत बसल्यावर मधेच कधीतरी, Disney किंवा Barney ऐकण्यापेक्षा, जेव्हा म्हणतो, “बाबा ! धिन..धान..धा”, तेव्हा समजायचं त्याला “काहे छेड..” किंवा ‘अलबेला सजन..” ऐकायचंय. लहान मुलापासून ते संगीताच्या दिग्गज जाणकारापर्यंत सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी गाणी ऐकल्यावर मनात येतं, “हे येरा-गबाळ्याचं काम नोहे; हा दिमाख ‘दरबारी’ आहे” !!!

Sunday, October 7, 2007

सुरेल पद्मजा

‘मराठी विश्व’ने ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात ’पद्मश्री’ पद्मजा फेणाणी-जोगळेकर ह्यांचा सुरेल कार्यक्रम आयोजित केला होता. जवळपास हजार-बाराशे लोकांनी ह्या संगीतोत्सवाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम म्हणजे नुसते सुरेल गाणंच नाही तर उत्कृष्ठ ‘सादरीकरण’ (performance) कसे असावे ह्याचा वस्तुपाठच होता. एकाहून एक सरस गाणी सादर करताना पद्मजाताईंचं पं. जसराजजी आणि पं.
हृदयनाथ मंगेशकर ह्या दिग्गजांकडचं शिक्षण आणि अथक रियाझ ठायी-ठायी दिसत होतं. ’केंव्हातरी पहाटे…’ ह्या अप्रतिम गाण्यातील ’उरले उरात काही, आवाज चांदण्याचे’ ही ओळ! ’आवाज’ हा शब्द दोन वेगवेगळ्या पद्धतीनं गाऊन त्यातला फरक त्यांनी इतका छान दाखवला की नकळत उद़्गार निघाले, “क्या बात है!”. पद्मजाताई ह्या किती ’विचारी’ गायिका आहेत ह्याची ती एक छोटीशी झलक होती.
पद्मजाताईंचा सुरेल आवाज ह्याशिवाय त्यांच्या सादरीकरणाची दोन मोठी वैशिष्ट्ये होती. पहिले म्हणजे त्या श्रोत्यांनाही आपल्याबरोबर नेत होत्या. संत ज्ञानेश्वरांच्या रचना सादर करताना ’घनु वाजे….’ मधील ’घनु’ हा शब्द पाण्याने भरलेल्या कुंभातून आल्यासारखा गाताना त्यांनी समजावून सांगीतले की ह्याला शास्त्रीय संगीताच्या भाषेत ’कुंभक’ म्हणतात तर ’रुणुझुणु, रुणुझुणु रे भ्रमरा..’चा खूप सुंदर अर्थही सांगीतला. लोकप्रिय गाणी सादर करताना सगळ्यांनी त्यांच्याबरोबर गाण्याचा आग्रह करताना गाण्यांच्या मधेच त्या गोड आवाजात म्हणायच्या, “गाणार?” त्याहून मोठे वैशिष्ट्यं म्हणजे त्या आपल्या साथीदारांनाही मनापासून दाद द्यायच्या. व्हायोलीनची साथ करणाऱ्या श्री. महेश खानोलकर ह्या गुणी वादकांना त्यांनी दोन गाणी व्हायोलीनवर वाजवण्याचा आग्रह केला. व्हायोलीनवर सादर झालेल्या ’भेटी लागे जीवा…’ आणि ’गोरी गोरी पान, फुलासारखी छान’ ह्या गाण्यांनंतर रसिकांनी अक्षरश: टाळ्या-शिट्यांचा पाऊस पाडून महेशजींना डोक्यावर घेतलं.
पद्मजाताईंचं श्रध्दास्थान लतादीदींची खेळकर नक्कल किंवा तबलासाथ करणारे श्री. पटवर्धन ह्यांच्याबद्दल ’ते हाय कोर्टात वकील म्हणून थापा मारतात आणि इथे तबल्यावर ’थाप’ मारतात’ असं नर्मविनोदी कौतुक असो, पद्मजाताईंनी श्रोत्यांशी सुरेख संवाद साधला.
’दिवे लागले रे दिवे लागले..’ हे अप्रतिम ऊषा:सूक्तं असो किंवा ’तेरे सूर और मेरे गीत’ हे हिंदी चित्रपटगीत, रसिकांच्या लक्षात राहील पद्मजाताईंचा सुरेल आवाज, तबल्याचा दमदार ठेका, सुरांची मैत्रीण संवादिनी (हार्मोनियम) आणि ’कंठसंगीताच्या (human vocal cords) सर्वांत जवळ पोहोचणारं वाद्य’ ही सार्थ कीर्ती मिळालेलं व्हायोलीन.